रहमान, शेख मुजीबूर : (१७ मार्च १९२०−१५ ऑगस्ट १९७५). बांगला देशाचे संस्थापक−पंतप्रधान−राष्ट्राध्यक्ष व स्वातंत्र्य चळवळीचे एक थोर नेते. त्यांचा जन्म हिंदुस्थानातील बंगाल प्रांतात तोंगीपारा (जिल्हा फरीदपूर) या खेड्यात मध्यम वर्गीय कुटुंबात झाला. त्यांनी कलकत्ता व डाक्का विद्यापीठांतून राज्यशास्त्र व कायद्याचा अभ्यास करून पदवी घेतली. तत्पूर्वी विद्यार्थिदशेतच ते राजकारणाकडे आकृष्ट झाले. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील सहभागासाठी त्यांना काही काळ तुरुंगवास भोगावा लागला. त्यांनी पूर्व पाकिस्तानला स्वायत्त राज्य असावे, याकरिता सहकाऱ्यांच्या मदतीने अवामी लीग पक्षाची स्थापना केली (१९४९). पुढे त्या पक्षाचे ते सचिव झाले (१९५३). जनरल मोहम्मद याह्याखान पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष असताना रहमानला हिंसाचाराला चिथावणी दिल्याबद्दल अटक करण्यात आली. परिणामतः पूर्व पाकिस्तानमध्ये दंगली उसळल्या. पुढे नवीन संविधानानुसार डिसेंबर १९७० मध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या. रहमानच्या अवामी लीगने संघीय विधिमंडळात ३०९ पैकी १६७ तसेच प्रांतिक विधिमंडळात २७९ पैकी २६९ जागा जिंकून बहुमत नोंदविले. मुजीबने प्रांतीय स्वायसत्तेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे ठरविले. यानंतर त्याने असहकाराचे पूर्ण धोरण अवलंबिले, तेव्हा त्याला अटक करण्यात येऊन पूर्व पाकिस्तानात लष्करी कायदा लादण्यात आला. एवढे करूनही पूर्व पाकिस्तानातील अस्थिर परिस्थिती आटोक्यात येईना. तेव्हा अयुबखानने शांतता प्रस्थापित करण्यासाठी जनरल टिक्काखानाच्या नेतृत्वाखाली सैन्य धाडले. या सैन्याने अनन्वित अत्याचार केले. मुक्तवाहिनीने बांगला देशाच्या स्वातंत्र्याचा सशस्त्र लढा अधिक तीव्र केला. हद्दपारीत बांगला देशाचे सरकार स्वातंत्र्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत होते. बंगाली भाषिक एकत्र येऊन या लढ्याचे स्वरूप उग्र बनवीत. लक्षावधी हिंदु-मुसलमान निर्वासित भारतात आश्रयाला आले. अखेर भारतीय सैन्याने मुक्तवाहिनीला मदत केली आणि पूर्व पाकिस्तानात सैन्य धाडले. भारत-पाकिस्तानमधील हे युद्ध चौदा दिवस चालले. १६ डिसेंबर १९७१ रोजी पूर्व पाकिस्तानातील पाकिस्तानच्या सैन्याने शरणागती पतकरली. जानेवारी १९७२ मध्ये पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष भुट्टो यांनी शेख मुजीब याची मुक्तता केली. बांगला देशाचे पहिले पंतप्रधान म्हणून शेख मुजीब अधिकाररूढ झाले आणि अबू सय्यद चौधरी राष्ट्राध्यक्ष झाले. मुजीबचे सोनार बांगला निर्माण करण्याचे स्वप्न होते. त्याचे आधारस्तंभ राष्ट्रवाद, धर्मनिरपेक्षता, लोकशाही आणि समाजवाद या चार गोष्टी होत्या. त्यासाठी त्याने अंतर्गत सुधारणांची मोहीम आखून अलिप्ततेचे परराष्ट्रीय धोरण जाहीर केले आणि १९७३ मध्ये सार्वत्रिक निवडणुका घेतल्या. यात अबामी लीग पक्षाला बहुमत मिळाले. चौधरींनी राजीनामा दिला. साहजिकच मुजीबकडे सर्व सत्ता केंद्रित झाली. पुढे दुष्काळ आणि अवर्षण यांमुळे १७ जिल्ह्यांतील परिस्थिती बिकट झाली. मुजीबूरच्या नातेवाईकांनी भ्रष्टाचार केल्याचे निदर्शनास आले. त्यातच त्याचे भारतधार्जिणे धोरण त्याच्या काही सहकाऱ्यांना अप्रिय ठरले. यामुळे त्याची लोकप्रियता घटू लागली. या सर्वांमुळे देशात असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले. तेव्हा मुजीबने आणीबाणी जाहीर केली (डिसेंबर १९७४). राष्ट्राध्यक्षपद आपणाकडे घेतले व बहुपक्षीय पद्धतीवर नियंत्रण लावून विरोधी पक्ष बरखास्त केले. देशात अध्यक्षीय राजवटीची घोषणा करून आपल्या हाती सर्व सत्ता घेतली. परंतु त्याची ही सत्ता अवघी सात महिनेच टिकली. १५ ऑगस्ट १९७५ रोजी लष्करी उठाव होऊन अवचित सत्तांतर घडून आले आणि त्यात शेख मुजीबूरची त्याच्या कुटुंबियांसह डाक्का येथे हत्या करण्यात आली.
शेख मुजीबचा मूळ पिंड हा समाजवादी कार्यकर्त्याचा होता. त्याने असहकाराच्या तत्त्वानुसार घटनात्मक मार्गांनी सत्ता काबीज केली. स्वदेशी वस्तूंचा वापर हा एक त्याच्या कार्यक्रमाचा भाग होता. त्याच्या पत्नीचे नाव फझीलातेनेसा. त्याला दोन मुली−हसीना व रेहना व तीन मुलगे−शेख कमाल, शेख जमाल व रसेल होते. मोठी मुलगी हसीना वजेद−पुढे सक्रिय राजकारणात पडली.
संदर्भ : 1. Banerjee, Subrata, Bangladesh, New Delhi, 1981.
2. Bhatnagar, Jatindra, Bangla Desh, Delhi, 1971.
3. Bhuiyan, Abdul Wadud, Entergence of Bangladesh and Role of Awami League,
Delhi, 1982.
4. Rahman, Sheikh Mujibur, Bangaladesh, My Bangaladesh, Dacca, 1972.
चौधरी, जयश्री
“