जॉन रस्किनरस्किन, जॉन : (८ फ्रेबुवारी १८९९–२० जानेवारी १९००). इंग्रज साहित्यिक, समीक्षक आणि कलावंत. लंडन शहरी जन्म. त्याचे वडील व्यापारी असले, तरी त्यांना चित्रकलेत रस होता. रस्किन वीस वर्षांचा असताना, डलिजजवळील डेन्मार्क हिल येथे त्याचे कुटुंब रहावयास आले. रस्किनला त्याच्या आई वडिलांनी कोणत्याही शाळेत न पाठविता, त्याचे आरंभीचे शिक्षण खाजगी रीत्या केले त्यांच्या रसिक, सुसंस्कृत व्यक्तिमत्वांचे संस्कार रस्किनवर झाले. वडिलांच्या बरोबर त्याने अनेक कला दालनांना भेटी दिल्या, उत्कृष्ट साहित्यकृतींचे वाचन केले. कॉप्ली फील्डिंग ह्या चित्रकाराकडून त्याने चित्रकलेचे धडे घेतले. ‘डलिज गॅलरी’ ह्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या चित्रसज्जातील चित्रेही त्याला प्रेरणा देत असत आणि त्या चित्रांनीच त्याच्या कलाविचाराचा पाया घातला. १८३६ मध्ये ऑक्सफर्डच्या ख्राइस्ट चर्च ह्या कॉलेजात रस्किनने प्रवेश घेतला पण तेथे त्याने पद्धतशीर असे अध्ययन केले नाही. तेथे असताना, काव्यरचनेसाठी ठेवलेले, ‘न्यूडिगेट पारितोषिक’ मात्र त्याने मिळविले होते (१८३९). १८४० साली प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे, रस्किनला ऑक्सफर्ड सोडून इटलीस जावे लागले. बरे वाटू लागल्यानंतर तो पुन्हा ऑक्सफर्डला आला आणि १८४२ मध्ये पदवीधर झाला. पुढील वर्षीच मॉडर्न पेंटर्स (५ खंड, १८४३ –६०) ह्या त्याच्या ग्रंथाचा पहिला खंड प्रसिद्ध झाला. विख्यात इंग्रज निसर्गचित्रकार ⇨टर्नर (१७७५–१८५१) ह्या च्या चित्रांवर कलासमीक्षकांनी केलेल्या टीकेमुळे मॉडर्न पेंटर्सचा पहिला खंड लिहावयास रस्किन उद्युक्त झाला. त्यात त्याने अस्सल कलानिर्मितीमागील तत्वे सांगुन टर्नरच्या चित्रकृतीतील  कलागुणांचे विवेचन केले आहे. कलेच्या संदर्भात कल्पनाशक्तीचे कार्य, निसर्गचित्रांच्या रसग्रहणाचा इतिहास, विविध तपशिलांच्या अंगाने निसर्गचित्रांचा अभ्यास इत्यादींचा अंतर्भाव ह्या ग्रंथाच्या अन्य खंडांतून केलेला आढळतो. द सेव्हन लँप्स ऑफ आर्किटेक्चर (१८४९), द स्टोन्स ऑफ व्हेनिस (१९५१ – ५३), अंटू धिस लास्ट आणि सेसमी अँड लिलीज (१८६८) हे रस्किनचे अन्य उल्लेखनीय ग्रंथ होत. द सेव्हन लँप्स … मध्ये वास्तुकलेच्या प्रमुख तत्वांचा परामर्श रस्किनने घेतला आहे. गॉथिक कलेचा गौरव करणे आणि प्रबोधनकालीन कलेवर परखड टीका करणे, हा ह्या ग्रंथलेखनामागील त्याचा हेतू होता. प्रबोधनकालीन कलेचा प्रकर्ष व्हेनिसमध्ये झाला. त्या कलेचे तेथील नमुने कलादृष्ट्या कौतुकास्पद नाहीत, हे दाखवून दिले, तर ती कला अन्य कोठेच मोठेपण मिरवू शकणार नाही, असे रस्किनचे म्हणणे होते. ‘गॉयिक’ ही संज्ञा प्रबोधनकालीन कलावंतांनी मध्ययुगीन वास्तुकलेच्या एका प्रकाराला उद्देशून वापरली होती आणि त्यांच्या दृष्टीने हा वास्तुप्रकार प्राकृतिक (बार्बरिक) होता. व्हिक्टोरियन कालखंडात, इंग्लंडमध्ये गॉयिक कलेचे जे पुनरुज्जीवन झाले, त्याच्या संदर्भात रस्किनचा हा ग्रंथ महत्त्वाचा मानला जातो. द सेव्हन लँप्स … प्रसिद्ध झाला, त्या वर्षी रस्किन ‘प्री-रॅफेएलाइट ब्रदरहूड’ ह्या संघटनेकडे ओढला गेला. रॅफेएलच्या प्रबोधनकालीन परंपरेतून निर्माण झालेल्या ब्रिटिश अकादेमिक चित्रकलेतील निर्जीवपणा व सांकेतिकता ह्यांविरुद्ध प्रतिक्रिया म्हणून ही संघटना उभारण्यात आली होती.

रस्किनने लिहिलेल्या कलाविषयक ग्रंथांतून त्याची कलेच्या संदर्भातील जी भूमिका लक्षात येते ती थोडक्यात अशी : सत्याचा शोध आणि सत्याची अभिव्यक्ती हा प्रत्येक कलाकृतीचा हेतू होय. कोणत्याही प्रकारच्या सौंदर्यसाधनेस भक्कम अशा नैतिक पायाची आवश्यकता आहे. कला आणि नीती ह्यांचे नाते निकटचे आहे कलाकृतीचा काळजीपूर्वक अभ्यास केल्यास ती घडविणाऱ्यांचे नैतिक सामर्थ्य वा दुबळेपणा प्रत्ययास येते. कला ही एक प्रकारची विश्वभाषा असून तिचे आवाहन केवळ रसिकांना नसून उभ्या मानवतेला असते. तसेच कला ही समकालीन संस्कृतीच्या सर्व पैलूंशी निगडित असते.    

रस्किनच्या उपर्युक्त ग्रंथांपैकी अंटू धिस लास्ट ह्या ग्रंथात अर्थशास्त्रावर त्याने लिहिलेले चार निबंध अंतर्भूत आहेत. ह्या ग्रंथातून मुक्त अर्थव्यवस्थेवर त्याने परखड टीका केली. भांडवलदार आणि कामगार ह्यांच्यातील संबंध माणुसकीच्या पायावर आधारलेले असले पाहिजेत, असे त्याचे मत होते. व्यापारी वृत्तीचा प्रकर्ष झालेल्या व्हिक्टोरियन काळात रस्किनचे हे विचार स्फोटक ठरले. सौंदर्य, नीतिमूल्ये ह्यांचे भान रस्किनच्या समकालीन समाजातून हरवत चालले होते. अशा सामाजिक वातावरणाविरुद्ध रस्किनला एकाकी लढत द्यावी लागली. रस्किनच्या ह्या ग्रंथाने महात्मा गांधी प्रभावित झाले होते.  

रस्किनच्या सेसमी अँड लिलीज ह्या ग्रंथात त्याची दोन व्याख्याने अंतर्भूत आहेत : ‘सेसमी : ऑफ किंग्ज ट्रेझरीज’ आणि ‘लिलीज : ऑफ क्वीन्स गार्डन्स’. ‘सेसमी …..’ मध्ये काय वाचावे आणि ते कसे वाचावे, ह्यांविषयी आपले विचार रस्किनने मांडले आहेत. स्त्रियांचे क्षेत्र, शिक्षण, कर्तव्ये हे ‘लिलीज ……’ चे विषय. ‘द मिस्टरी ऑफ लाइफ अँड इट्स आर्टस’ हे तिसरे व्याख्यान ह्या पुस्तकाच्या पुढल्या, सुधारित आवृत्तीत अंतर्भूत केले गेले.

रस्किनच्या उल्लेखनीय ग्रंथांत टाइम अँड टाइड (१८६७) ह्या ग्रंथाचाही समावेश होतो. एका श्रमिकाला उद्देशून लिहिलेली २५ पत्रे त्यात आहेत. ह्या पत्रांतून, रस्किनला अभिप्रेत असलेल्या सामाजिक नव-निर्माणाची आकांक्षा प्रभावीपणे व्यक्त झाली आहे.

ऑक्सफर्ड विद्यापीठात १८६९ मध्ये ‘स्लेड प्रोफेसर ऑफ आर्ट’ म्हणून रस्किनची नेमणूक झाली. तेथे प्राध्यापक म्हणून तो यशस्वी ठरला. अधूनमधून काही वेळा पडलेला खंड वगळता, १८८५ पर्यंत तो तेथे होता.


रस्किनला मानसिक आजाराचे झटके अधूनमधून येत असत. १८४८ मध्ये एका सुंदर तरुणीशी त्याचा विवाह झाला होता पण १८५४ मध्ये तिने रस्किनपासून फारकत घेतली. पुढे त्याच्याहून तीस वर्षांनी लहान असलेल्या एका मुलीच्या प्रेमात तो पडला. ही मुलगी शारीरिक – मानसिक आजाराने ग्रस्त होऊन १८७५ मध्य निधन पावली. त्यानंतर हळूहळू रस्किनचे बौद्धिक जीवन संपुष्टात आले. आयुष्याच्या अखेरच्या पर्वात त्याने प्रीटेरिटा हे आत्मचरित्र लिहिले. लँकाशरमधील कोनिस्टन येथे तो निधन पावला.

व्हिक्टोरियन कालखंडातील रस्किन हे एक नमुनेदार व्यक्तिमत्व होते. कलाक्षेत्राबरोबरच निसर्गविज्ञान, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र इ. अनेक विषयांत त्याला स्वारस्य होते तथापि विविध विषयांतील स्वारस्यामुळे एका विशिष्ट विषयावर पूर्ण लक्ष तो केंद्रित करू शकला नाही, असा आक्षेप त्याच्यावर घेतला जातो. कलाक्षेत्रातील प्रेषित म्हणून रस्किनची प्रतिमा एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस प्रस्थापित झाली होती तथापि त्याच्या कलासमीक्षात्मक लेखनात अनेकदा पद्धतशीरपणाचा अभाव आढळतो. इटली आणि इंग्लंड ह्या देशांतील प्रबोधनकालीन कलेपलीकडे त्याचा कलाभ्यास फारसा गेलेला नव्हता. मात्र कलासमीक्षा हे क्षेत्र फारसे विस्तारलेले नव्हते, अशा काळात रस्किनने कलासमीक्षात्मक लेखन केले. त्यामुळे त्याच्या ह्या लेखनाच्या मर्यादा ह्या एका अर्थाने त्याच्या काळाच्या मर्यादा होत्या.

सामर्थ्य आणि साधेपणा ह्यांच्या प्रत्यय देणाऱ्या रस्किनच्या शैलीवर बायबलच्या किंग जेम्स आवृत्तीचे संस्कार झालेले दिसून येतात. बायबलचा प्रभाव त्याच्या विचारांवरही आहे.

संदर्भ : 1. Bloom, Harold, Ed. Literary Criticism and John Ruskin, New York, 1965.

    2. Collingwood, W. G. The Life and Works of John Ruskin, 2 Vols., London, 1893.

    3. Cook, E. T. Wedderburn, A. D. O. Ed. The Works of John Ruskin,39 Vols., London, 1902–12.

    4. Herbert, Robert L. Ed. The Art, Criticism of John Ruskin, New York, 1964.

    5. Hobson, John A. John Ruskin, Social Reforemr  London, 1898.

    6. Leon, Derriok, Ruskin, the great Victorian, Londan, 1949.                   

कुलकर्णी, अ. र.