यादव, आनंद : (३० नोव्हेंबर १९३५ – ). आधुनिक मराठीतील ग्रामीण कवी, कथा-कादंबरीकार आणि ग्रामीण साहित्य चळवळीचे समर्थक समीक्षक. कोल्हापूरजवळ कागल येथे एका शेतकरी कुटुंबात जन्म, शिक्षण कागल, रत्नागिरी, कोल्हापूर, पुणे येथे एम्.ए.पर्यंत. ‘मराठी लघुनिबंध: प्रेरणा, प्रवृत्ती आणि विकास’ या पीएच्.डी. (१९७४) प्रबंधास पुणे विद्यापीठाची केळकर व परांजपे पारितोषिके मिळाली. पु. ल. देशपांडे, सुनीता देशपांडे, श्री. पु. भागवत, शंकर पाटील, य. दि. भावे अशांचे संस्कार, आणि साहित्याचे मनःपूर्वक वाचन व चिंतन यांतून यादवांचे वाङ्‍मयीन व्यक्तिमत्त्व वाढतघडत गेले. विद्यार्थिदशेत पुणे आकाशवाणीवर स्क्रिप्टरायटर अँड असिस्टंट टू दि प्रोड्यूसर (१९५९ – ६०), पुढे पंढरपूर महाविद्यालय (१९६१ –६३), श्री शाहू मंदिर महाविद्यालय, पुणे (१९६३ –७८) येथे मराठीचे अध्यापन केले. फेब्रुवारी १९७८ पासून पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागात प्रपाठक म्हणून काम करू लागले. 

हिरवे जग(१९६०) हा यादवांचा विद्यार्थिदशेतील पहिला काव्यसंग्रह, मळ्याची माती (१९७८) हा दुसरा काव्यसंग्रह. ग्रामीण कुटुंब व परिसर यांच्या संदर्भक्षेत्रात एका संवेदनशील कुमारमनाचे साद-पडसाद टिपणारी ही साधी व अकृत्रिम कविता आहे. नंतरच्या कवितेत खेड्यापासून दुरावणाऱ्या आणि व्यावसायिक कारणाने शहरी जीवनात वास करणाऱ्या मनाची तगमग उत्कटतेने व्यक्त झाली आहे. तिच्यातील नाट्य ग्रामीण बोलीतून बोलके होते. तिला आत्मानुभवाचे व आत्मप्रत्ययाचे बळ लाभलेले आहे. 

 खळाळ (१९६७) हा त्यांचा उल्लेखनीय कथासंग्रह. घरजावई (१९७४), माळावरची मैना (१९७६), आदिताल (१९८०), रणी (१९८२) हे इतर कथासंग्रह. ग्रामीण अनुभवविश्व संवेदनशील मनाने, तन्मयतेने व उत्कटतेने व्यक्त करण्याचा प्रयत्न त्यांनी सातत्याने केला आहे. नाना प्रवृत्तींच्या, निरनिराळ्या वयोगटांतील व परिस्थितीतील मानवी मनांचा वेध ते मर्मस्पर्शी दृष्टीने घेतात. काव्यात्म प्रकृतीमुळे त्या त्या व्यक्तिमनाचा नेमका गाभाच ते आपल्या समोर खुला करतात. दुःखानुभवाच्या सूक्ष्म व सखोल चित्रणातून यादव मानवी मनाच्या तळाला स्पर्श करतात. संमिश्र अनुभवाच्या ताणांतून व अनुभवघटकांच्या साम्य-विरोधातून त्यांची कथा अर्थपूर्ण आकार धारण करते. व्यक्तिचित्र, नाट्यछटा, चिंतनिका, संवाद अशा अनेक रुपांनी ती अवतरते. प्रतिमांनी समृद्ध असलेली त्यांची भाषा भाववृत्तीनुसार विविध रूपे धारण करीत आशयाशी इमान राखते. उखडलेली झाडे (१९८६) हा त्यांचा ताजा कथासंग्रह बदलत्या खेड्याचा वेध घेणारा आहे. मातीखालची माती (१९६५) हा त्याचा व्यक्तिचित्रसंग्रह. 

 गोतावळा (१९७१). नटरंग (१९८०) या त्यांच्या राज्यपुरस्कारप्राप्त कादंबऱ्या. एकलकोंडा (१९८०), माऊली (१९८५) या इतर कादंबऱ्या. गोतावळा ही निसर्ग-प्राणिसृष्टीशी सख्य जोडणाऱ्या नारबा या सालगड्याच्या एकाकी जीवनाची हृदयस्पर्शी कहाणी. तिच्यावर यांत्रिकीकरणामुळे होणाऱ्या कृषिसंस्कृतीतील एका युगान्ताची छाया पसरली आहे. निसर्ग आणि माणूस यांच्या आदिम पातळीवर गुंफलेल्या निरागस भावविश्वाचे उमलते कोमेजते चित्र येथे आहे. कृषिकेंद्रित वास्तव अस्सल कलात्मकतेने व बोलीच्या लयीने यादवांनी या कादंबरीतून आविष्कृत केले आहे. 

 रात घुंगुरांची (१९७८) हे त्यांनी लिहिलेले वगनाट्य, तसेच स्पर्शकमळे (१९७८) व पाणभवरे (१९८२) हे त्यांचे ललित लेखन लक्षणीय आहे आणि त्यांच्या रसिक, सौंदर्यवेधी वृत्तीची साक्ष देणारे आहे. 

यादवांच्या लेखनात ग्रामजीवनाची अनुभूती व दीनदुबळ्यांची कणव उत्कटतेने असून तिला कलात्मकतेने संघटित करण्याचा ध्यास आहे. यासाठी सर्वत्र ग्रामीण बोली त्यांनी सातत्याने व पुऱ्या सामर्थाने वापरली आहे. मराठी ग्रामीण कथेच्या दुसऱ्या टप्प्याचे दर्शन त्यांच्या कथांतून घडते. 

 ग्रामीण साहित्य: स्वरूप आणि समस्या (१९७९), ग्रामीणता: साहित्य आणि वास्तव (१९८१, राज्यपुरस्कारप्राप्त) आणि मराठी साहित्य, समाज आणि संस्कृती (१९८५) यांमधील त्यांच्या समीक्षेत अभिनिवेश व आत्मसमर्थन आहे तरीही ती ग्रामीण साहित्यप्रवाहाला सुप्रतिष्ठित करणारी आहे. 

मंचरकर, र. बा.