रेनॉल्ट (रन्यो), आंरी व्हिक्तॉर : (२१ जुलै १८१०−१९ जानेवारी १८७८). फ्रेंच भौतिकीविज्ञ व रसायनशास्त्रज्ञ. वायूंच्या गुणधर्मांसंबंधीच्या कार्याबद्दल विशेष प्रसिद्ध. त्यांचा जन्म फ्रान्समधील एक्स ला शपेल (आता जर्मनीतील आखेन) येथे झाला. प्रतिकूल आर्थिक परिस्थितीतही त्यांनी एकोल पॉलिटेक्निकमध्ये शिक्षण घेऊन १८३२ मध्ये पदवी मिळविली व पुढे एकोल दे माइन्स या संस्थेतही शिक्षण घेतले. जर्मनीतील गीसेन येथे युस्टुस फोन लीबिग यांच्या हाताखाली काही काळ संशोधन केल्यावर ते लीआँ येथे प्राध्यापक झाले. १८३६ मध्ये ते एकोल पॉलिटेक्निकमध्ये गे-ल्युसॅक यांचे साहाय्यक म्हणून परतले आणि १८४० मध्ये तेथे त्यांच्यानंतर रसायनशास्त्राचे प्राध्यापक झाले. १८४१ साली कॉलेज द फ्रान्समध्ये भौतिकीच्या प्राध्यापकपदावर त्यांची नेमणूक झाली. पुढे १८५४ मध्ये ते सेव्हर येथील प्रख्यात सरकारी पेनिसिलिन कारख्यान्याचे संचालक झाले. तेथील त्यांची प्रयोगशाळा १८७०-७१ मध्ये फ्रॅको-जर्मन युद्धात नष्ट झाली व त्यांचा मुलगाही मारला गेला. या दुहेरी आघातामुळे १८७२ मध्येच त्यांचे वैज्ञानिक कार्य संपुष्टात आले.
रेनॉल्ट यांचे रसायनशास्त्रातील महत्त्वाचे कार्य १८३५−३९ या काळातील असून त्यांनी अतृप्त (इतर अणू वा अणुगट संयोग पावू शकतात अशा) हायड्रोकार्बनांचे हॅलोजन व इतर अनुजात (त्यापासून बनलेली इतर संयुगे), अल्कलॉइडे व कार्बनी अम्ले यांविषयी संशोधन केले. त्यांनी व्हिनिल क्लोराइड, डायक्लोरोएथिलीन, ट्रायक्लोरोएथिलीन व कार्बन टेट्राक्लोराइड यांचा शोध लावला. त्यांनी धातूंचे एक वर्गीकरण प्रचारात आणले. भौतिकीमध्ये अनेक मापनांसाठी त्यांनी प्रमाणभूत स्वरूपाची उपकरणे अभिकल्पित केली (आराखडे तयार केले). जे. बी. ए. द्यूमा यांच्या प्रोत्साहनामुळे रेनॉल्ट यांनी अनेक घन, द्रव व वायू पदार्थांच्या विशिष्ट उष्णता १८३९−४२ या काळात पुन्हा निर्धारित केल्या आणि त्यांचा अभ्यास करून डुलॉग व पेटिट यांचा नियम स्थूल स्वरूपाचा असल्याचे दाखवून दिले [⟶ उष्णता]. एफ. ई. नॉयमान यांनी या नियमाचा मूलद्रव्यांपासून संयुगापर्यंत केलेला विस्तारही तितक्याच स्थूलमानाने सत्य असल्याची रेनॉल्ट यांनी खात्री केली. १८४२ मध्ये सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मंत्र्यांनी वाफ एंजिनाच्या अभिकल्पात व कार्यात अंतर्भूत होणारे सर्व भौतिक स्थिरांक पुनर्निर्धारित करण्यासाठी रेनॉल्ट यांची नेमणूक केली आणि यातूनच यांनी वायूंच्या ऊष्मीय गुणधर्मासंबंधीच्या आपल्या संशोधनास प्रारंभ केला. वायूंच्या ऊष्मीय प्रसरणाचे अन्वेषण करून त्यांनी कोणत्याही दोन वायूंचे ऊष्मीय प्रसरण गुणांक [⟶ ऊष्मीय प्रसरण] तंतोतंत सारखे नसतात, असे (पूर्वीच्या समजुतीच्या विरुद्ध) दाखवून दिले. सूक्ष्मग्राही प्रयोगांच्या साहाय्याने त्यांनी रॉबर्ट बॉइल यांचा परिपूर्ण वायूसंबंधीचा नियम [⟶ स्थिति समीकरण] नित्य (वा वास्तव) वायूंच्या बाबतीत फक्त स्थूलमानाने खरा आहे, असे सिद्ध केले. पाण्याचा बाष्प ताण व बाष्पीभवनाची उष्णता तसेच वायूंची ऊष्मीय संवाहकता यांचेही त्यांनी अतिशय काळजीपूर्वक मापन केले. तापमानासंबंधी केलेल्या आपल्या संशोधनाद्वारे त्यांनी अचूक अशा वायुतापमापकाचा [⟶ तापमापन] उपयोग रूढ केला व याकरिता त्यावरील तापमान दर्शकांची पाऱ्याच्या तापमाकावरील दर्शकांशी तुलना केली. त्याच वेळी त्यांनी पाऱ्याचे निरपेक्ष प्रसरणही निर्धारित केले. त्यांच्या नावाने ओळखण्यात येणाऱ्या आर्द्रतामापकाचीही [⟶ आर्द्रता] त्यांनी रचना केली.
रेनॉल्ट यांना मिळालेल्या अनेक सन्मानांत लिजन ऑफ ऑनरचे सदस्यत्व (१८५०), लंडनच्या रॉयल सोसायटीची रम्फर्ड (१८४८) व कॉप्ली (१८६९) ही पदके यांचा समावेश होता. ते रॉयल सोसायटीचे तसेच फ्रान्सच्या ॲकॅडेमी देस सायन्सेसचे व अमेरिकेच्या नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे सदस्य होते. रसायनशास्त्रावरील त्यांचा ग्रंथ (तीन खंड, १८४७–४९) पाठ्यपुस्तक म्हणून फार यशस्वी ठरला व त्याची अनेक भाषांत रूपांतरे झाली. ते पॅरिस येथे मृत्यू पावले.
भदे, व. ग.