रेडिओ प्रेषक : (रेडिओ ट्रान्समीटर). रेडिओ तरंगांच्या प्रेषणाकरिता लागणाऱ्‍या  साधनसामग्रीतील एक प्रमुख साधन. याच्या द्वारे उच्च कंप्रता (दर सेकंदाला होणारी कंपन संख्या) असलेला विद्युत् प्रवाह निर्माण करण्यात येतो आणि प्रेषित करावयाच्या माहितीनुसार त्यात बदल करून तो आकाशकाला (अँटेनाला) पुरविण्यात येतो. रेडिओ प्रेषकाद्वारे निर्माण करण्यात येणाऱ्‍या प्रवाहाची कंप्रता १० किलोहर्ट्झ ते १,००,००० मेगॅहर्ट्झ यांच्या दरम्यान असते. तथापि पुढील वर्णनात १,००० मेगॅहर्ट्झपेक्षा कमी कंप्रता असणाऱ्‍या प्रेषक मंडलांसंबंधीच विवेचन केलेले आहे. यापेक्षा जास्त कंप्रता असलेल्या रेडिओ तरंगांसाठी निराळी तंत्रपद्धती वापरावी लागते. अशा रेडिओ तरंगांना ⇨सूक्ष्मतरंग म्हणतात. त्यांचा विचार येथे केलेला नाही [⟶रडार]. प्रेषित करावयाच्या माहितीनुसार या प्रवाहाचा परमप्रसर (मध्यम स्थितीपासून लंब दिशेने होणारे कमाल स्थानांतर), कंप्रता किंवा कला (एखाद्या संदर्भाच्या सापेक्ष असणारी व कोनात मोजली जाणारी स्थिती) यांत बदल होतो म्हणजेच त्यांचे ⇨विरूपण होते. विशिष्ट गरजेनुसार तयार केलेल्या अभिकल्पाचे (आराखड्याचे) हेतू साध्य करण्यासाठी विभिन्न रेडिओ प्रेषकांत अनेक विभिन्न प्रमुख घटकांचा समावेश करण्यात येतो.

प्रेषकाकडून प्रेषण करण्यासाठी आकाशकाला पुरविण्यात येणारी शक्ती काही अंश वॉट ते १० लक्ष वॉटपर्यंत असू शकते. कमी शक्तीचे प्रेषक प्रामुख्याने सुवाह्य वा चल (फिरत्या) सेवेसाठी (उदा., लष्करी वा पोलीस खात्यातील सेवेसाठी) वापरतात, तर उच्च शक्तीचे प्रेषक दूर अंतरापर्यंतच्या प्रेषणासाठी व दोन ठराविक बिंदुस्थानांपुरत्या मर्यादित अशा स्वरूपाच्या संदशवहनासाठी वापरले जातात.

वापरलेल्या विरूपणाच्या प्रकारानुसार प्रेषकांचे वर्गीकरण करता येते. परमप्रसर-विरूपण प्रेषक मध्यम कंप्रतेच्या रेडिओ प्रेषणासाठी वापरण्यात येतात. कंप्रता-विरूपण आणि कला-विरूपण यांचा रेडिओ प्रेषणासाठी उपयोग करण्याकरिता तरंग कंप्रता-पट्ट्यांची रूंदी पुष्कळ मोठी असावी लागते. विरूपणाचे हे प्रकार मुख्यत्त्वे उच्च कंप्रतांच्या रेडिओ प्रेषणासाठी वापरतात. आकाशकाला आदान केलेली विद्युत् शक्ती या तिन्ही प्रकारांत एकसमान आहे असे मानले, तर परमप्रसर-विरूपणापेक्षा कंप्रता- व कलाविरूपणांच्या बाबतीत प्रेषित संकेत व गोंगाट [विविध कारणांनी प्रणालीत उद्भवणारा अनिष्ट विद्युत् चुंबकीय क्षोभ ⟶विद्युत् गोंगाट] यांचे गुणोत्तर मोठे असते म्हणजेच त्यांच्या बाबतीत उदभवणाऱ्‍या गोंगाटाचे प्रमाण कमी असते. अतिशय उच्च कंप्रतांच्या बाबतीतगोंगाटाचे प्रमाण निग्न व मध्यम कंप्रता-पट्ट्यांच्या मानाने पुष्कळच कमी असल्याने या दृष्टीने त्यांचा उपयोग करणे फायद्याचे ठरते.

परमप्रसर-विरूपित संकेतात वाहक कंप्रतेच्या वर व खाली असणाऱ्‍या सममित कंप्रता-पट्ट्यांना उपपट्टे म्हणतात. या उपपट्ट्यांत प्रेषित केलेली माहिती असते. संकेताचे प्रेषण करण्यासाठी एक-उपपट्टा किंवा स्वतंत्र उपपट्टा अशा दोन प्रणाली वापरतात. एक-उपपट्टा प्रणालीत परमप्रसर-विरूपणामध्ये वापरण्यात येणाऱ्‍या दोन उपपट्ट्यांपैकी एका उपपट्ट्याचे तसेच वाहक तरंगाचे दमन करण्यात येते किंवा प्रेषकाच्या एकूण शक्तीशी तुलना करता नगण्य मूल्यापर्यंत त्याची राशी कमी करण्यात येते. स्वतंत्र-उपपट्टा प्रेषकात वाहक तरंग कमी करण्यात येतो वा अजिबात काढून टाकण्यात येतो आणि त्याच्या वरच्या व खालच्या उपपट्ट्यांमध्ये माहितीचे प्रेषण करण्यात येते. एक-उपपट्टा पद्धतीने करण्यात येणाऱ्‍या प्रेषणात परमप्रसर व कोनीय अशा दोन्ही प्रकारे विरूपण केले जाते. एक-उपपट्टा प्रेषणाचा उपयोग मुख्यत्त्वे दूर अंतरावरील दोन ठिकाणी असलेल्या दूरध्वनी व तारायंत्र मंडलांच्या थेट विशेष संपर्कासाठी केला जातो. अनुरूप एक-उपपट्टा या नावाने ओळखण्यात येणारी प्रेषण पद्धती रेडिओ कार्यक्रमांच्या प्रेषणासाठी वापरता येते कारण तिच्या ग्रहणासाठी नेहमीचा परमप्रसर-विरूपण ग्राही संच उपयोगात आणता येतो.


आ. १. परमप्रसर-विरूपण रेडीओ-दूरध्वनी प्रेषकप्ररमप्रसर-विरूपण प्रेषक : या प्रेषकांच्या अभिकल्पांचे भिन्न पातळी विरूपित व उच्च पातळी विरूपित असे दोन मुख्य प्रकार आहेत. निम्न-पातळी विरूपित प्रेषकाच्या बाबतीत विरूपण हे मंडलाच्या निम्न शक्तीच्या टप्प्यात करण्यात येते व यासाठी विरूपण शक्ती कमी लागते. उच्च-पातळी विरूपित प्रेषकात सामान्यतः विरूपण हे मंडलाच्या प्रदान शक्ती विवर्धकाच्या धनाग्रापाशी साध्य होते व त्याकरिता लागणारी विरूपण शक्ती वाहक तरंगाच्या विद्युत् शक्तीच्या सु. ५०% असते. मूळ संकेताचे अगदी हुबेहुबपणे विवर्धन करण्यासाठी व निम्न शक्ती पातळ्यांवर विरूपणाचे पुनरूत्पादन करण्यासाठी शक्ती विवर्धक रेखीय असणे आवश्यक असते (म्हणजे त्यांतील प्रदान प्रवाहातील बदल आदान विद्युत् दाबाच्या रेषीय प्रमाणात असणे आवश्यक असते. हे विवर्धक सामान्यतः आ-वर्गातील रेखीय विवर्धक असून ते उच्च पातळी विरूपित वाहक विवर्धकांत वापरण्यात येणाऱ्‍या इ-वर्गीय विवर्धकांपेक्षा पुष्कळच कमी कार्यक्षम असतात [⟶इलेक्ट्रॉनीय विवर्धक]. उच्च-शक्ती विरूपक (विरूपित विवर्धकाला विरूपणकारी संकेत पुरविणारा प्रेषकाचा टप्पा) हा मोठ्या कंप्रतापट्ट्यावर कार्य करीत असल्याने प्रदानातील विकृती कमी ठेवण्यासाठी त्यात रेखीय शक्ती विवर्धन असणे आवश्यक असते.

नमुनेदार परमप्रसर-विरूपण प्रेषकामध्ये एक भिन्न शक्तीचा रेडिओकंप्रता आंदोलक [⟶आंदोलक, इलेक्ट्रॉनीय] उत्तेजक (प्रेषकाचा वाहक कंप्रता तरंग निर्माण करणारा भाग) म्हणून कार्य करतो. प्रेषकाची अंतिम वाहक कंप्रता या आंदोलकाद्वारे निश्चित होत असल्याने त्याची कंप्रता अगदी काटेकोरपणे नियंत्रित करण्यात येते. उत्तेजकानंतर विद्युत् मंडलात शक्ती विवर्धनाचे अनेक टप्पे असतात व ते अंतिम शक्ती प्रदान टप्प्याला कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक असतात. निम्न-पातळी विरूपित प्रेषकामध्ये विरूपित मंडल टप्प्यानंतरचे सर्व विवर्धक एकाच कंप्रतेला मेलित केलेले (जुळविलेले) असतात. विरूपित टप्प्याच्या पुढे जोडलेले विवर्धक उत्तेजकाची कंप्रता दुप्पट व तिप्पट करण्यासाठी वापरता येऊ शकतात.

परमप्रसर-विरूपण प्रेषकाच्या एका नमुनेदार प्रकाराचा आराखडा आ. १ मध्ये दाखविला आहे. यात इष्ट कंप्रता तरंग एका स्थिर आंदोलकाद्वारे [सामान्यतः स्फटिक आंदोलकाद्वारे ⟶ आंदोलक, इलेक्ट्रॉनीय] निर्माण करण्यात येतो. त्यानंतर इ-वर्गीय विवर्धकांची साखळी असून तीद्वारे शक्ती पातळी वाढविण्याबरोबरच आंदोलक विरूपकापासून विद्युत् दृष्ट्या अलग ठेवण्याचे कार्यही होते. जेव्हा स्फटिक आंदोलकापासून सरळ मिळणाऱ्‍या कंप्रतेपेक्षा प्रेषित करावयाची कंप्रता जास्त असते तेव्हा इ-वर्गीय विवर्धकांच्या साखळीत हरात्मक जनित्रांचा समावेश केला जातो. हरात्मक जनित्राद्वारे मूलभूत कंप्रते-बरोबरच तीव्र प्रगुण (पूर्णांकी पटीत असलेल्या) कंप्रताही निर्माण केल्या जातात. या विशिष्ट प्रेषकाच्या बाबतीत स्फटिक प्रेषित कंप्रतेच्या उपगुणक (प्रेषित कंप्रतेला पूर्ण भाग जाणाऱ्‍या) कंप्रतेवर कार्य करतो. अंतिम इ-वर्गीय विवर्धक विरूपित केलेला असतो म्हणजे या विवर्धकात वाहक रेडिओ तरंगावर माहिती संकेताचे आरोपण (मिश्रण) केले जाते. काही प्रेषकांत विरूपित विवर्धकानंतर एक वा अधिक रेखीय विवर्धकांचा समावेश करण्यात येतो.

आ. २. अवरोधक नलिकायुक्त कंप्रता-विरूपण प्रेषकउच्च-पातळी विरूपित प्रेषकात शक्ती विवर्धक टप्पे एकाच कंप्रतेला क्वचित मेलित केलेले असतात मात्र आकाशकाला रेडिओ कंप्रतेचा विद्युत् प्रवाह पुरविणाऱ्‍या शक्ती विवर्धकाच्या बाबतीत आदान व प्रदान संचय मंडले [एका वा अधिक कंप्रतांना अनुस्पंदन दर्शविणारी व अनुस्पंदन कंप्रतेच्या भोवती अखंडपणे वितरित झालेल्या कंप्रतापट्ट्यावर विद्युत् ऊर्जा साठवू शकणारी मंडले ⟶ अनुस्पंदन] मात्र मेलित केलेली असतात. उच्च-पातळी प्रेषकाच्या विरूपकाला मिळणारा आदान संकेत हा ध्वनिग्राहक वा इतर उद्गमापासून मिळालेला ध्वनि-संकेत असतो. तो सामान्यतः वाहक तरंग विद्युत् शक्तीच्या निम्म्या पातळीइतका विवर्धित केला जातो व त्यात १% इतक्या कमी मानाची विकृती असेल, अशी काळजी घेतली जाते. बहुतेक उच्च शक्तीच्या विरूपकात विकृती कमी करण्यासाठी ढकल-ओढक्रियेचा उपयोग करणाऱ्‍या प्रकारचा अ-वर्गीय वा रेखीय आ-वर्गीय विवर्धकांचा उपयोग करतात. यामध्ये सम प्रगुण कंप्रता तसेच काही गोंगाट घटक हे परस्पर छेद मिळाल्यामुळे नाहीसे होतात. अशा प्रकारच्या विकृतीचे प्रमाण कमी करण्यासाठी आ. १ मध्ये दर्शविल्याप्रमाणे ऋण पुनःप्रदायाचाही (मूळ संकेताची शक्ती कमी होईल अशा प्रकारे प्रदान संकेताचा काही भाग आदान संकेताला देण्याच्या क्रियेचाही) उपयोग करण्यात येतो. या कार्यांसाठी ⇨एकदिशकारक (प्रत्यावर्ती म्हणजे उलटसुलट दिशेने वाहणाऱ्‍या विद्युत् प्रवाहाचे एका दिशेने वाहणाऱ्‍या प्रवाहात रूपांतर करणारे साधन) वापरून प्रेषकाच्या प्रदानाचा काही अंश भाग पुनःप्रदानासाठी वापरण्यात येतो.


कंप्रता-विरूपण प्रेषक : या प्रेषकात प्रेषणाची कंप्रता ही विरूपणकारी संकेताच्या परमप्रसरानुसार व या संकेतामुळे निर्धारित केलेल्या वेगानुसार मूळ वाहक कंप्रतेच्या वर व खाली बदलली जाते. प्रेषित रेडिओ कंप्रतेचा परमप्रसर स्थिर असतो व त्यामुळे या प्रेषकाच्या विरूपण प्रणालीवर बाहेरून येणाऱ्‍या विद्युत् क्षोभांचा परिणाम नगण्य होतो.

मूलतः कंप्रता-विरूपण प्रेषक हा परमप्रसर-विरूपण प्रेषकासारखाच असतो मात्र त्यात परमप्रसर-विरूपणातील विरूपण-विवर्धक प्रणाली नसते पण यामधील उत्तेजकाची कंप्रता अखंडपणे बदलता येते. उत्तेजकापाशी कंप्रतेचे विरूपण करण्याच्या एका पद्धतीत उत्तेजकाच्या आंदोलक मंडल विभागातील कंप्रता-निर्धारक विभागात एक अवरोधक वापरतात. अवरोधकाचा अवरोध कंप्रतेवर अवलंबून असल्यामुळे उत्तेजकाच्या प्रदान कंप्रतेत तदनुसार बदल होतो. यासाठी अवरोधक नलिका [पंचप्रस्थ नलिकेच्या रूपातील ⟶ इलेक्ट्रॉनीय प्रयुक्ति] वापरतात. प्रेषकाच्या उरलेल्या भागात परमप्रसरविरूपण प्रेषकाप्रमाणेच कंप्रता दुप्पट व तिप्पट वाढविणारे मधले शक्ती विवर्धनाचे टप्पे व शेवटी शक्ती प्रदान टप्पा यांचा समावेश असतो.

परमप्रसर-विरूपण प्रेषकांच्या मानाने कंप्रता-विरूपण प्रेषकांच्या बाबतीत वाहक कंप्रतेचे स्थिरीकरण करणे जास्त अवघड असते. यासाठी विविध योजना वापरण्यात आलेल्या आहेत. रेडिओ ग्राहीत वापरण्यात येणाऱ्‍या स्वयंचलित वाहक कंप्रता नियंत्रणाच्या पद्धतीही याकरिता वापरण्यात येतात. कंप्रता स्थिरीकरणासाठी वापरण्यात येणाऱ्‍या दुसऱ्‍या एका पद्धतीत स्फटिकजनित उच्च कंप्रतेच्या तरंगाचे संकरण ढकल-ओढ अवरोधक नलिकांनी विरूपित केलेल्या, संचय-मंडलयुक्त आंदोलकाद्वारे निर्माण होणाऱ्‍या व सुस्थिर केलेल्या निम्न-कंप्रतेच्या तरंगाबरोबर करून हे उद्दिष्ट साधतात.

 

एक-उपपट्टा किंवा स्वतंत्र उपपट्टा प्रेषक : एक-उपपट्टा किंवा स्वतंत्र उपपट्टा प्रणालीच्या वैशिष्ट्यांमुळे ही प्रेषण पद्धती बरीच लोकप्रिय झालेली आहे. परमप्रसर-विरूपण व कंप्रता-विरूपण पद्धतींशीतुलना करता फक्त निम्म्या कंप्रतापट्टा रूंदीतून माहितीचे प्रेषण करण्याची व कित्येक कंप्रता उपवाहकांद्वारे विरूपण करण्यासाठी अनुकूलता, हे या प्रणालीमुळे मिळणारे प्रमुख फायदे आहेत. ही प्रणाली कंप्रता-पट्टा कमी प्रमाणात व्यापीत असल्याने व हिची वाहक कंप्रता कमी मूल्याची असल्याने निम्म्या कंप्रता-पट्ट्यात प्रेषित करावयाची माहिती परिणामकारकपणे केंद्रित करता येते आणि यामुळे प्रेषणातील परिणामी ध्वनि-शक्ती पुष्कळच वाढविता येते. प्रेषणासाठी लागणारी कंप्रतापट्ट्याची रूंदी कमी झाल्याने उपलब्ध सेवांची संख्या दुप्पट होते व या सेवा कंप्रता वर्णपटाचा कोणताही भाग उपयोगात आणू शकतात.

एक-उपपट्टा/स्वतंत्र उपपट्टा प्रेषणाचा वापर केला नाही, तर पूर्व-निर्धारित व एकमेकींजवळ असणाऱ्‍या विशिष्ट कंप्रतांद्वारे कार्य करणाऱ्‍या रेडिओ तारायंत्र व रेडिओ दूरध्वनी मंडले कार्यान्वित करणे अवघड जाते. निम्न श्राव्य वर्णपटातील विरूपण कंप्रतांपेक्षा उच्च कंप्रतांच्या बाबतीत अचूकता व स्थिरता राखणे हे अधिक कठीण काम असते.

आ. ३. नमुनेदार एक-उपपट्टा प्रेषकाची योजना

नमुनेदार एक-उपपट्टा प्रेषणाच्या साधनसामग्रीच्या योजनेत सामान्यतः संतुलित विरूपकांचा उपयोग करतात. याखेरीज यातएक-उपपट्टा अथवा स्वतंत्र उपपट्टा संकेताची निर्मिती करणाऱ्‍या एक-उपपट्टा जनित्राचा (उत्तेजकाचा) आणि इष्ट तितकी वाहक कंप्रता पुनःसमावेशनासाठी अलग करण्याकरिता, इष्ट उपपट्ट्याची   निवड करण्याकरिता व अनिष्ट उपपट्टा वगळण्यासाठी निरनिराळ्या छानकांचा [⟶ छानक, विद्युत्] समावेश केलेला असतो. नंतर कंप्रतेत बदल न करता आ-वर्गीय रेखीय विवर्धकाद्वारे आकाशकाला पुरविण्यासाठी लागणाऱ्‍या अंतिम शक्ती प्रदानाइतके विवर्धन केले जाते. या पद्धतीला सामान्यतः रेखीय एक-उपपट्टा प्रेषण म्हणतात. या अभिकल्पात प्रदान शक्ती जास्तीत जास्त वाढवून अनिष्ट पट्टाबाह्य प्रारणाचे (प्रेषकाच्या कंप्रता-पट्ट्याच्या बाहेरील कंप्रतांमध्ये उत्सर्जित होणाऱ्‍या तरंगरूपी ऊर्जेचे) प्रमाण किमान ठेवण्याचा उद्देश असतो.


यापेक्षा अधिक जटिल प्रेषण प्रणालीत नेहमीच्या अभिकल्पाचा परम-प्रसर-विरूपण प्रेषक वापरतात पण यामधील एक-उपपट्टा संकेताचे त्याच्या परमप्रसर व कला विरूपण अशा दोन घटकांत विभेदन करणारा उत्तेजक असतो. यानंतर तीमध्ये नेहमीचे प्रेषकाचे टप्पे असतात (यात कंप्रता गुणन व कला घटकाचे विवर्धन करण्याकरिता इ-वर्गीय विवर्धक यांचा समावेश करणे शक्य असते). परमप्रस-विरूपण घटक सामान्य परमप्रसर-विरूपण संकेत म्हणून विरूपकात अंतर्विष्ट केला जातो. त्याच्या एकदिशीकरणाकरिता एकदिशकारकाचा समावेश करण्यात येतो. कला व परमप्रसर पद्धतीने मिळालेले विरूपण संकेत प्रथम समान मूल्याचे केले जातात. नंतर या दोन घटकांना महत्तम शक्ती पातळीवर पुन्हा एकत्रित करण्यात येते. या पद्धतीला विरूपण अन्वालोप निरसन आणि पुनःस्थापन एक-उपपट्टा पद्धतीम्हणतात. या अभिकल्पाचा मुख्य हेतू शक्ती प्रदानावर अवलंबून नसणाऱ्‍या अनिष्ट घटनाबाह्य प्रारणाचे प्रमाण कमी करणे हाच असतो.

 

आकाशक : प्रेषकाबरोबर वापरण्यात येणारे आकाशक प्रेषकाने निर्माण केलेली विद्युत् प्रवाह शक्ती विद्युत् चुंबकीय क्षेत्रात रूपांतरित करतात. आकाशकापासून उत्सर्जित होणारे विद्युत् चुंबकीय प्रारण क्षेत्र मूल्य व एकूण रोध यांचे गुणोत्तर उच्च राहील, अशा प्रकारे आकाशकाचा अभिकल्प केलेला असतो. या गुणोत्तराने आकाशकाची कार्यक्षमता निर्धारित होते. आकाशकाचे अभिकल्पन करताना प्रेषित कंप्रता-पट्टा सामावून घेण्याइतकी पट्टा रूंदी, दिशिकता (इतर दिशांपेक्षा एखाद्या ठराविक दिशेत प्रारणाचे प्रेषण चांगल्या तऱ्‍हेने करण्याची आकाशकाची क्षमता) व प्रारणाच्या घन कोनाची मर्यादा या गोष्टीही विचारात घेतल्या जातात. रेडिओ प्रेषकाद्वारे मूळ कंप्रतेव्यतिरिक्त काही प्रगुण कंप्रतांचेही अल्प प्रमाणात प्रेषण होत असते. अशा प्रगुण कंप्रतांमुळे इतर प्रेषकांच्या कार्यांत व्यत्यय येण्याचा संभव असतो. काही प्रगुण कंप्रतांचे आकाशकाद्वारेच दमन करणे शक्य असते.[⟶आकाशक].

 

संरक्षण : प्रेषकांच्या अभिकल्पातील ही महत्त्वाची बाब असून प्रेषकाचे कार्य सातत्याने चालू राहील व काम करणाऱ्‍या कर्मचाऱ्‍यांचे संरक्षण होईल या गोष्टी तीत विचारात घेतल्या जातात. कोणत्याही नवीन प्रेषक प्रणालीचा अभिकल्प करताना मुख्य विद्युत् शक्ती पुरवठा व उच्च विद्युत् दाब पुरवठा हे प्रमुख प्रश्न विचारात घ्यावयाचे असतात. धोक्याच्या वेळी प्रेषक मंडलाचा एखादा अंतर्भाग कार्यान्वित होण्यास प्रतिबंध करणारी साधने, ⇨विद्युत् मंडल खंडक (विद्युत् प्रवाह ठराविक मर्यादेपेक्षा जास्त झाल्यास मंडल आपोआप खंडित करणारी विद्युत् चुंबकीय साधने) व धोकासूचक दिवे यांचा अंतर्गत सुरक्षिततेसाठी मोठ्या प्रमाणावर उपयोग करतात. मंडलातील ⇨विद्युत् धारित्राचे (विद्युत् भार साठवून ठेवणाऱ्‍या प्रयुक्तीचे) अशा वेळी स्वयंचलित विसर्जन होणे कर्मचारी वर्गाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचे असते व त्यासाठी योग्य अशी योजना केलेली असते. प्रेषक प्रणालीचे काम सुलभ कार्यक्षमतेने चालू राहण्याच्या दृष्टीने तिच्या संरक्षणाकरिता शीतक पाण्याचा वा हवेच्या झोताचा उपयोग करून तापमान पुरेसे कमी ठेवणे आवश्यक असते. नाहीतर तापमान एका ठराविक मर्यादेपलीकडे गेल्यास प्रणालीचे कार्य स्वयंचलित रीत्या थांबेल, अशी व्यवस्था करावी लागते. कंप्रता-विरूपण प्रेषकाचे संरक्षण परम-प्रसर-विरूपण प्रेषकाप्रमाणेच करण्यात येते मात्र या प्रेषकात घटक कमी असल्याने त्याची संरक्षणव्यवस्था तितक्या विस्तृत प्रमाणात नसते.

 

पर्यवेक्षण : कर्मचारी वर्गाला प्रेषणाच्या परिस्थितीसंबंधी सातत्याने माहिती देण्यासाठी प्रेषकाच्या कार्यावर सतत लक्ष ठेवण्याकरिता पर्यवेक्षण आवश्यक असते. प्रेषकातील विद्युत् मंडलाच्या महत्त्वाच्याठिकाणी मापक उपकरणे ठेवून, ऋण दोलनदर्शकाचा [⟶ इलेक्ट्रॉनीय मापन] उपयोग करून व श्रवणाद्वारेसुद्धा हे कार्य करता येते.

कंप्रता-विरूपण प्रेषकाचे पर्यवेक्षण करण्याची कार्यपद्धती परमप्रसरविरूपण प्रेषकापेक्षा निराळी असते. कारण कंप्रता-विरूपणाचे शोधन करण्यासाठी वापरण्यात येणारी साधने परमप्रसर-विरूपणाच्या शोधनासाठी वापरण्यात येणाऱ्‍या साधनांपेक्षा निराळी असतात [⟶ शोधक]. प्रेषकाच्या पर्यवेक्षण स्थानापाशी जरूरीप्रमाणे विरूपणाची पुनर्रचना करण्यासाठी संबंधित कंप्रतेशी मेलित केलेल्या कंप्रता विवेचक मंडलाचा (आ. २) उपयोग करणे आवश्यक असते.

 

प्रेषक-ग्राही : (ट्रान्सिव्हर). रेडिओ प्रेषक व ग्राही यांचा संयोग करून तयार केलेल्या एकत्रित संचाला प्रेषक-ग्राही असे म्हणतात. अशा प्रकारचा सुवाह्य रेडिओ संच अमेरिकेच्या लष्कराने १९३३ च्या सुमारास विकसित केला व तो वॉकी-टॉकी या लोकप्रिय नावाने ओळखला जातो. दुसऱ्‍या महायुद्धात पायदळातील प्लॅटून व कंपनी कमांडर यांच्यातील परस्पर संदेशवहनासाठी याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला गेला होता. त्याचे वजन सु. १३.५ किग्रॅ. असे आणि त्याला एकात एक बसणाऱ्‍या समकेंद्री नळ्यांनी बनविलेला व जरूरीप्रमाणे ज्याची लांबी कमी जास्त करता येत होती असा आकाशक, तसेच दूरध्वनी हातसंच (एकाच दांडीवर दूरध्वनी प्रेषक व ग्राही बसविलेला संच) जोडलेला असे. हा संच सैनिकाच्या पाठीवर बांधलेला असे. प्रेषक व ग्राही एकाच पूर्वनिश्चित कंप्रतेवर चालत असल्याने मेलनाची आवश्यकता नसे. आकाशकाचा त्याच्या पूर्ण लांबीइतका विस्तार केल्यावर हा संच आपोआप कार्यान्वित होत असे.

युद्धानंतर प्रथमतः छोट्या विद्युत् घटमाला व लहान निर्वात नलिका [⟶इलेक्ट्रॉनीय प्रयुक्ति] यांमुळे आणि पुढे ट्रॅंझिस्टर व इतर लघू भाग उपलब्ध झाल्याने अशा रेडिओ संचाचे आकारमान पुष्कळच लहान झाले. त्यानंतर अशा कंप्रता-विरूपणावर आधारित ट्रँझिस्टरयुक्त संचाचा उपयोग लष्करी कामाबरोबरच पोलिस, आग निवारण, रेल्वे, विमान, नाविक व मोटार वाहतूक, मोठे कारखाने, खाजगी नागरिक, हौशी रेडिओ मित्र इ. अनेक क्षेत्रांत होऊ लागला.

प्रेषक-ग्राही संचाचा उपयोग चल दूरध्वनीसाठी करण्याकरिताप्रथमतः वापरण्यात येणाऱ्‍या रूंद पट्टा कंप्रता-विरूपणातील काही पट्ट्यांतील परिवाह रूंदी १५ किलोहर्ट्झपर्यंत कमी करण्यात आलेली आहे. चल दूरध्वनी मधूनमधून खंडित रूपात वापरले जातात. प्रत्येक केंद्र फक्त संकेत प्रेषित करण्याचे कार्य करते. ग्राही त्यांच्या परिवाहावर (संकेत वाहक मार्गावर) येणारे संकेत ग्रहण करण्यास सज्ज असतो किंवा विशिष्ट सांकेतिक ध्वनी मिळाल्यावरच ग्राही कार्यान्वित होतो. यात बहुधा एकमार्गी प्रेषणाचाच उपयोग करण्यात येतो म्हणजे बोलण्यासाठी हातसंचावरील वा ध्वनिग्राहकावरील बटन दाबून प्रेषक चालू करण्यात येतो. अनेक केंद्रे एकाच परिवाहाचा उपयोग करू शकतात व परिवाह केव्हा उपलब्ध असेल तेव्हा प्रत्येक केंद्राला सूचना देण्यात येते.

चल प्रेषकाची प्रदान शक्ती १० ते ३० वॉट असते, तर हातात धरता येणारे संच २·५ ते ५ वॉट शक्ती वापरतात. आधार किंवा संपर्क स्थानके २५० वॉटपर्यंत शक्ती वापरतात. त्यामुळे अशा केंद्रांचा पल्ला अगदी अनुकूल भूप्रदेशात ५० किमी. पर्यंत असतो पण डोंगराळ भागात वा दाट जंगलात कमी असतो. उंच इमारतींवर वा टेकड्यांच्या माथ्यांवर पुनःप्रेषक बसवून चल-ते-पुनःप्रेषक हा पल्ला १०० किमी. ते ११० किमी. इतका वाढविता येतो. यामुळे आदर्श परिस्थितीत चल-प्रेषक-ते-चल-प्रेषक असे संदेशवहन याच्या दुप्पट अंतरापर्यंत शक्य असते. पुनःप्रेषक हा आदान संकेत एका कंप्रतेवर ग्रहणकरतो आणि अधिक प्रेषण शक्ती वा आकाशक दिशिक लाभ अथवा दोन्ही असलेला संकेत दुसऱ्‍या कंप्रतेवर पुनःप्रेषित करतो.

पहा : रेडिओ ग्राही रेडिओ प्रेषण विरूपण.

संदर्भ : 1. Carr, J. J. The Complete Handbook of Radio Transmitters, Blue Ridge Summit, Pa., 1980.

    2. Gray, L. Graham,R. Radio Transmitters, New York, 1961.

   3. Noll, E. M. Radio Transmitter Principles and Projects. Indianapolis, 1973.

  4. Pappeatus, E. W. and others, Single SidebPrinciples and Circuits, New York, 1964.

  5. Terman, F. E. Electronics and Radio Engineering, Tokyo, 1955.

भदे, व. ग.