रेझाशाह, पेहलवी: (१५ मार्च १८७८–२६ जुलै १९४४). पेहलवी राजवंशाचा संस्थापक व आधुनिक इराणचा शिल्पकार. त्याचा जन्म सैनिकी परंपरा असलेल्या कुटूंबात अलश्त (जिल्हा सावदकृह–प्रांत मझंदेरान) या गावी झाला. त्याचे नाव रेझाखान व जमातीचे नाव पेहलवान. त्याचेच पुढे रेझाशाह पेहलवी झाले. वडील कर्नल अब्बास अलीखान यांच्या मृत्यूनंतर रेझाच्या आईने त्याचा सांभाळ केला. त्याने लष्कराच्या कोसॅक ब्रिगेडमध्ये नोकरी पतकरली. त्यावेळी इराणी सैन्य रशियन अधिकाऱ्यांच्या वर्चस्वाखाली होते. औपचारिक शिक्षण नसतानाही तो हळूहळू स्वकर्तृत्वाने लष्करात वरच्या पदावर चढला. प्रथमपासून त्याला रशियन अधिकाऱ्यांविषयी तिटकारा होता. यावेळी इराणची राजकीय व आर्थिक स्थिती दयनीय होती प्रथम त्याने रशियन अधिकाऱ्यांच्या जागी इराणी अधिकारी आणण्याची खटपट केली आणि ती यशस्वी झाली. पुढे २१ फेब्रुवारी १९२१ रोजी त्याने सैय्यद झियाउद्दीन तबातबाई हा वृत्तपत्रकार व अन्य सहकाऱ्यांच्या साहाय्याने तेहरानमध्ये अवचित सत्तांतर घडविले. सैय्यद झिया पंतप्रधान, तर रेझाखान युद्धमंत्री व सरसेनापती झाला पण लवकरच मतभेद होऊन सैय्यद झियाला देशत्याग करणे भाग पडले. तेव्हा रेझाने दोन्ही पदे आपणाकडे घेतली. १९२१ ते १९२५ दरम्यान त्याने लष्कर सक्षम केले, बंडखोर जमातींना शमविले आणि देशात शांतता व सुव्यवस्था निर्माण केली. नेता म्हणून रेझाखानची लोकप्रियता वाढत गेली. कजार वंशातील तत्कालीन शाह अहमदशाह प्रकृती अस्वास्थ्यामुळे यूरोपमध्ये गेला आणि परतण्यास टाळाटाळ करू लागला. तेव्हा ३१ ऑक्टोबर १९२५ रोजी मजलीसने (इराणी संसद) शाहाला पदच्युत केले. त्याच्या जागी नवा शहेनशाह म्हणून रेझाखानची निवड झाली. २५ एप्रिल १९२६ रोजी त्याने पदग्रहण केले. अशा प्रकारे १९०६ मध्ये इराणमध्ये सुरू झालेल्या क्रांतीची परिणती रेझाखानच्या राजेशाहीत झाली.
रेझाशाहने सर्वसत्ताधीश झाल्यानंतर सर्वांगीण सुधारणेचे अंतर्गत धोरण व सलोख्याचे परराष्ट्रीय धोरण अवलंबिले. त्याने लष्कराचे आधुनिकीकरण केले. बिनतारी संदेश व टपालसेवा, सुवर्णपरिणाम, नव्या बँका, रूग्णालये, रेल्वे-विस्तार, सरकारी नियंत्रणाखाली व्यापार उद्योगांचा विकास अशा सुधारणांना त्याने चालना दिली. ट्रान्सइराणियन रेल्वे आणि राष्ट्रीय बँक या रेझाशाहच्या विशेष महत्वाच्या देणग्या होत. सुधारणावादी कार्यक्रम राबवताना आवश्यकतेनुसार परकीय तंज्ञांची मदत त्याने घेतली पण त्यांचे वर्चस्व वाढणार नाही याचीही दक्षता घेतली. कायदा आणि शिक्षण क्षेत्रातील धार्मिक वर्चस्व बरेच कमी करून त्याने पाश्चात्य परंपरा रूजवल्या. तेहरान विद्यापीठाची आणि इराणी अकादमीची स्थापना, आधुनिक वेशभूषा, सुटसुटीत आडनावे व सुबोध दिनदर्शिकेचा स्वीकार, बुरखा पद्धतीला बंदी व घटस्फोटाच्या कायद्यात बदल आणि पर्शिया या पारंपारिक नावाऐवजी देशाचे इराण असे नामकरण (१९३५) या त्यांच्या सुधारणा प्रसिध्द आहेत. त्याच्या आधुनिक विचारांना अर्थातच पुराणवादी लोकांकडून विरोध झाला. तो निपटून काढण्यासाठी त्याला प्रसंगोपात्त लष्कराचे साहाय्य घ्यावे लागले. यामुळे त्याची प्रवृत्ती काहीशी हुकूमशाहीवादी बनली.
परराष्ट्रीय धोरणात त्याने शक्यतो आर्थिक मदत न घेता इराणला तटस्थ ठेवण्याचा प्रयत्न केला आणि रशियापासून इराण अलिप्त राहील, याची दक्षता बाळगली. १९३९ मध्ये सुरू झालेल्या दुसऱ्या महायुध्दात इराणने तटस्थता जाहीर केली. मात्र इराणची सहानुभूती काहीशी जर्मनीकडेच होती. युध्दात इंग्लंड व रशियाची युती झाली. जर्मन अधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यास आणि युद्धसाहित्याच्या रशियाकडील वाहतुकीस इराणच्या भूमिचा वापर करू देण्यात रेझाने नकार दिली. त्यामुळे इंग्लंड व रशियाने इराण पादाक्रांत केला. या पार्श्वभूमीवर रेझाशाहला पदत्याग (१६ सप्टेंबर १९४१) व देशत्याग करावा लागला. यानंतर त्याचा जेष्ठ पुत्र मुहम्मद रेझा पेहलवी नवा शाह झाला. ब्रिटिशांनी रेझाला प्रथम मॉरिशला आणि नंतर जोहान्सबर्ग (दक्षिण आफ्रिका) येथे ठेवले. जोहान्सबर्ग येथेच तो मरण पावला. ‘आधुनिक इराणचा शिल्पकार’ अशा रेझाशाहचा गौरवपूर्ण उल्लेख केला जातो. तुर्कस्तानच्या केमाल पाशाप्रमाणे रेझाशाह हा आधुनिक इस्लामी जगतातला एक श्रेष्ठ राज्यकर्ता होता. मात्र हूकूमशाही वृत्ती आणि स्वार्थबुध्दी या दुर्गुंणांचे गालबोट त्याच्या श्रेष्ठत्वाला लागले होते. १९७९ मधील सत्तांतरापर्यंत रेझाशाहच्या पेहलावी घराण्याची राजवट इराणमध्ये टिकून होती.
संदर्भ : 1. Arfa, Hassan Under Five Shahs, London, 1964.
2. Armajani, Yahya, Middle Eas :, Past and Present, Englewood Cliffs, 1970.
3. Avery, Peter, Modern Iran, 1967. 4. Mohammad, Rezashah Pahlavi, Mission for My Country, London, 1961.
चौधरी, जयश्री
“