रू, प्येअर पॉल एमील: (१७ डिसेंबर १८५३–३ नोव्हेंबर १९३३). फ्रेंच सूक्ष्मजंतुशास्त्र. घटसर्पाला कारणीभूत असणाऱ्या सूक्ष्मजंतूविषयीच्या संशोधनासाठी प्रसिद्ध वैद्यकीय सूक्ष्मजंतुविज्ञानाचा पाया घालण्यात यांचा वाटा मोठा आहे.

 

रू यांचा जन्म फ्रान्समधील कोफॉलां (शारेंत) येथे व माध्यमिक शिक्षण ओरीयाक व लवी येथे झाले. क्लेरमाँ-फेरँ येथे व पॅरिस विद्यापीठात वैद्यकीय शिक्षण घेतल्यावर त्यांना या विद्यापीठाच्या वैद्यकीय विद्याशाखेत चिकित्सालयीन मदतनीस म्हणून व अध्यापनाचेही काम केले (१८७४–७८). १८७८ साली ते ल्वी पाश्चर यांच्या प्रयोगशाळेत साहाय्यक म्हणून दाखल झाले व १८८३ साली तेथे साहाय्यक संचालक झाले. १८८८ साली पाश्चर इन्स्टिट्यूट स्थापन झाल्यावर त्यांची तेथील सूक्ष्मजीविज्ञानाच्या विभागात नेमणूक झाली. १८९५ साली ते या इन्स्टिट्यूटचे साहाय्यक संचालक व त्याच वर्षी पाश्चर यांच्या मृत्यूनंतर संचालक झाले. मृत्यूपावेतो ते या पदावर होते.

काळपुळी [⟶ काळपुळी, संसर्गजन्य] धनुर्वात, ⇨अलर्क रोग इ. संसर्गजन्य रोगांवर रू आणि पाश्चर यांनी मिळून संशोधन केले. काळपुळीची कारणे व उपचार पद्धती, तसेच सूक्ष्मजंतू वा व्हायरस हतप्रभ (क्षीण) करणे याविषयी या दोघांनी संशोधन केले. पाश्चर यांना लस तयार करण्याच्या कामी हे संशोधन आधारभूत ठरले. याकरिता त्यांनी मेंढ्यांना व गाईगुरांना काळपुळीच्या हतप्रभ सूक्ष्मजंतूंची लस टोचली. परिणामी या प्राण्यांमध्ये याच रोगाच्या प्रबल सूक्ष्मजंतूविरूद्धची प्रतिकारक्षमता येते, असे त्यांना आढळले. अशा तऱ्हेने पाश्चर व जोसेफ लिस्टर या दोघांच्या तसेच प्रत्यक्ष लिस्टर यांच्या संशोधनामुळे वैद्यकीय सूक्ष्मजंतूविज्ञानाचा पाया घातला गेला.

घटसर्प या रोगाच्या संशोधनावर रू यांनी लक्ष केंद्रीत केले होते. या रोगाला कारणीभूत असणाऱ्या सूक्ष्मजंतूचे कार्य विकृतिविज्ञानाच्या दृष्टीने कसे चालते, हे त्यांनी निश्चित केले. या सूक्ष्मजंतूची विकृतीकारक शक्ती केवळ त्यांच्या अस्तित्वावर अवलंबून नसून त्यांच्याकडून निर्माण होणाऱ्या विषारी द्रव्यावर अवलंबून असल्याने रू व ए.ई. जे. येर्सँ यांनी दाखवून दिले. म्हणजे घटसर्पास कारणीभूत असणारा क्रियाशील घटक हे एक विष असल्याचे दाखवून दिले. रू. यांनी घोड्यांवर प्रयोग करून घटसर्पविरोधी लस मिळविण्यासाठी सर्वोत्कृष्ट परिस्थीती कोणती हेही ठरविले . या सर्व संशोधनातून पुढे एमिल फोन बेरिंग यांनी या विषाविरूद्धचे प्रतिविष (वा उतारा) तयार केले. पुढे लसविषयक चिकित्साही विकसित झाली. घटसर्पावरील लसीचा वापर १८८४ साली करण्यात आला. घटसर्पाविषयीच्या आपल्या संशोधनाचे निष्कर्ष रू यांनी १८७४ सालच्या अखेरीस बूडापेस्ट येथे भरलेल्या आरोग्यविज्ञानविषयक आंतरराष्ट्रीय परिषदेसमोर ठेवले होते. आपले घटसर्पाविषयीचे लेखन त्यांनी १८८९ साली प्रसिद्ध केले आणि १८९० नंतर त्यांनी घटसर्पाविरूद्धच्या लसीचा प्रचारही केला.

अलर्क रोगाचा व्हायरस अज्ञात होता पण रू यांना हा रोग प्रयोगशाळेतील सशांमध्ये निर्माण करण्यात यश मिळाले होते व त्याविरूद्धच्या प्रतिकाराचा त्यांनी अभ्यास केला होता. एदमाँ ईझीदॉर एत्येन नॉकार यांच्याबरोबर त्यांनी गोकुलीय न्यूमोनियाला कारणीभूत असणाऱ्या सूक्ष्मजंतूचा (न्यूमोकॉकसचा) शोध लावला (१८८०) व त्याचे संवर्धन करण्याची पद्धती शोधून काढली. इल्या इल्यीच म्येच्न्यिकॉव्ह यांच्याबरोबर त्यांनी उपदंशाविषयी संशोधन केले.

 

फ्रेंच सायन्स ॲकॅडेमीचा प्रिक्स ओसिरिस पुरस्कार (१९०३), हायर कौन्सिल फॉर पब्लिक हायजीनचे अध्यक्षपद, फ्रेंच सरकारचे वैज्ञानिक सल्लागारपद इ. बहुमान रू यांना मिळाले होते. ते पॅरिस येथे मृत्यू पावले.

भालेराव, य. त्र्यं. ठाकूर, अ. ना.