रूनेबॅर्य, यूहान लड्व्हिग : (५ फेब्रुवारी १८०४−६ मे १८७७). श्रेष्ठ कवी. जन्माने फिनिश. काव्यलेखन स्वीडिश भाषेत. पश्चिम फिनलंडमधील याकॉपस्टाड येथे जन्मला. आबो (तुर्कू) विद्यापीठातून पदवीधर झाल्यानंतर तो हेल्सिंकी येथे आला. तेथे तो लॅटिन भाषासाहित्याचे अध्यापन करू लागला. १८३७ साली तो बॉर्गो (पोर्व्हो) येथे आला व तेथे वीस वर्षे त्याने वर्षे त्याने ग्रीक−लॅटिन आभिजात साहित्यकृतींचे अध्यापन केले. ‘द ग्रेव्ह ॲट पेर्हो’ (१८३१, इं. शी.) ह्या फिनिश जीवनावर त्याने लिहिलेल्या पद्य रोमान्सला स्विडिश अकॅडमीने सुवर्णपदक देऊन गौरविले होते (१८३१).
‘द मूज हंटर्स’ (१८३२, इं. शी.) आणि ‘हान्ना’ (१८३६) ह्या दोन काव्यकृतींनी त्याला स्वीडिश साहित्यात मानाचे स्थान प्राप्त करून दिले. किंग फ्जालर (१८४४, इं. भा. १९०४) ही स्कँडिनोव्हियन आख्यायिकांवर आधारलेली त्याची पद्य रोमान्समालाही प्रसिद्ध आहे. द साँग्ज ऑफ एनसाहन स्टाल (दोन खंड, १८४८ आणि १८६०, इं. भा. १९२५) मध्ये त्याच्या देशभक्तिवर कविता अंतर्भूत आहेत. त्यांतील ‘अवर कंट्री’ (इं. शी.) ही कविता फिनलंडने आपले राष्ट्रगीत म्हणून स्वीकारली.
अभिजात साहित्यकृतींचे संस्कार त्याच्या काव्यलेखनावर झाले आहेत. अभिजातता, स्वच्छंदतावादी भाववृत्ती व फिनिश कृषकांच्या जीवनाचे वास्तववादी भान ह्यांचा उत्कृष्ट समन्वय आपल्या कवितांतून साधण्यात रूनेबॅर्य यशस्वी झाला. फिनलंडची भूमी आणि फिनिश लोक ह्यांच्याबद्दल त्याला प्रेम होते. बॉर्गो येथेच त्याचे निधन झाले.
कुलकर्णी, अ. र.