रूझीच्‌का (रूझिका), लेओपोल्ट (स्टेफन) : (१३ सप्टेंबर १८८७−२६ सप्टेंबर १९७६). स्विस रसायनशास्त्रज्ञ. पॉलिमिथिलीन व उच्च टर्पिनांसंबंधीच्या संशोधनाबद्दल त्यांना आणि लिंग हॉर्मोनांविषयीच्या संशोधनासाठी जर्मन जीवरसायनशास्त्रज्ञ ⇨आडोल्फ फ्रीड्रिख योहान घूटेनांट यांना १९३९ सालचे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक विभागून देण्यात आले. तथापि दुसऱ्या महायुद्धामुळे रूझीचूका यांनी ते पारितोषिक १९४५ साली स्वीकारले.

रुझीच्‌का यांचा जन्म व्हूकॉव्हर, क्रोएशिया (आता यूगोस्लाव्हिया) येथे झाला. त्यांचे माध्यमिक शिक्षण जर्मनीमध्ये आणि महाविद्यालयीन शिक्षण स्वित्झर्लंडमध्ये झाले. १९१० साली ते पदवीधर झाले. त्यांनी जर्मनमधील कार्लझूए इन्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये जर्मन रसायनशास्त्रज्ञ हेर्मान स्टाउडिंगर यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करून पीएच्. डी. पदवी संपादन केली. १९१७ साली त्यांना स्वित्झर्लंडचे नागरिकत्व मिळाले. त्यांनी झुरिक येथील स्विस फेडरल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये स्टाउडिंगर यांच्याबरोबर काम केले. ते नेदर्लडसमधील उत्रेत्क विद्यापीठात कार्बन रसायनसास्त्राचे प्राध्यापक होते (१९२६−२९). १९२९ साली ते स्वित्झर्लडला परत आले आणि झुरिक येथील स्विस फेडरल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्लॉलॉजीमध्ये प्राध्यापक झाले. तेथे ते १९५७ साली निवृत्त होईपर्यंत होते.

रूझीच्‌का यांनी पायरेथ्रममधील कीटकनाशकांच्या संरचनेवर संशोधन केले (१९११−१६). १९१६ साली त्यांनी नैसर्गिक सुगंधी द्रव्यांचे संशोधन करण्यास सुरुवात केली. कस्तुरी मांजर व कस्तुरी भृग या प्राण्यांपासून मिळणारे अनुक्रमे सिव्हेटोन व मस्कोन या संयुगांचे त्यांनी संशोधन केले. त्यात त्यांना ही संयुगे अनुक्रमे १७ व १५ कार्बन अणूंची वलये असलेली आढळून आली. या कालापर्यंत फक्त आठ कार्बन अणूंची वलये असलेली आढळून आली. या कालापर्यत फक्त आठ कार्बन अणू या संयुगात निरनिराळ्या प्रतलांत राहून अशी वलये होऊ शकतात व त्यापेक्षा जास्त अणूंची वलये अस्तित्वात असणार नाहीत, असे शास्त्रज्ञांचे मत होते. त्या दृष्टीने रूझांचूका यांचे हे संशोधन महत्त्वाचे ठरले. कार्बन अणू या संयुगात निरनिराळ्या प्रतलांत राहून अशी वलये होऊ शकतात. अशा वलयांचे अस्तित्व त्यांनी संयुगांचे विश्लेषण व संश्लेषण करून निश्चित केले. ९ ते ३० कार्बन अणूंची वलये तयार करता येतात, हे त्यांनी सिद्ध केले. त्यांनी बहु-आणवीय विषमवलयी संयुगेदेखील तयार केली.

रूझीच्‌का व त्यांचे सहकारी यांनी टर्पिनावर संशोधन करून १०,१५, २०, ३० व ४० कार्बन अणू असलेली अणू असलेली टर्पिने शोधून काढली. टर्पिने ही आयसोप्रीन एककांची (C5H8) बनलेली असतात, अशी आयसोप्रानी मीमांसा त्यांनी मांडली. १९३० मध्ये त्यांनी अनेक पुरूष-लिंग-हॉर्मोनांची (विशेषतः टेस्टोस्टेरोनाची) रेणवीय संरचना शोधून काढली आणि त्याच वेळेस त्यांचे संश्लेषणही केले. त्यांनी लिंगहॉर्मोनांची संरचना, जीवनसत्त्व अ, पित्ताम्ले व स्टेरॉइडे यांवरही संशोधन केले.

रूझीच्‌का यांना आठ सन्माननीय डॉक्टरेट पदव्या आणि सात पारितोषिके मिळाली. ते रसायनशास्त्र, जीवरसायनशास्त्र इ. २४ वैज्ञानिक संस्थांचे व १८ वैज्ञनिक अकादमीचे सन्माननीय व परदेशी सदस्य होते. ते झुरिक येथे मृत्यू पावले.

जमदाडे, ज. वि. घाटे, रा. वि.