रुस्का, एर्न्स्ट : (२५ डिसेंबर १९०६−३० मे १९८८). जर्मन इलेक्ट्रॉनीय अभियंते. इलेक्ट्रॉन प्रकाशकी (विद्युत् व चुंबकीय क्षेत्रांच्या प्रभावाखाली मुक्त इलेक्ट्रॉनांच्या होणाऱ्या गतीच्या अभ्यासाचे शास्त्र) या विषयात मूलभूत महत्त्वाचे कार्य केल्याबद्दल व पहिल्या ⇨इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाचा अभिकल्प (आराखडा) तयार केल्याबद्दल रुस्का यांना १९८६ च्या भौतिकीच्या नोबेल पारितोषिकाच्या अर्ध्या भागाचा आणि गेर्ट बिनिंग व ⇨हाइन्रिदख रोहरर यांना क्रमवीक्षण सुरंगी इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाच्या अभिकल्पासाठी एकत्रितपणे उरलेल्या अर्ध्या भागाचा बहुमान मिळाला.
रुस्का याचा जन्म हायडल्बर्ग येथे झाला. प्रारंभी म्युनिक येथील तांत्रिक विद्यापीठात आणि त्यानंतर बर्लिन तांत्रिक विद्यापीठात शिक्षण घेऊन १९३३ मध्ये त्यांनी डॉक्टरेट पदवी संपादन केली. सुरुवातीला त्यांनी फेर्नझे-एजी (१९३४−३७) आणि सीमेन्स व हाल्सकेएजी (१९३४-५५) या कंपन्यांत काम केले. त्यानंतर ते बर्लिन विद्यापीठात इलेक्ट्रॉन प्रकाशकी व सूक्ष्मदर्शकी (सूक्ष्मदर्शकाद्वारे मिळाणाऱ्या) विवर्धनाचा विविध द्रव्यांच्या अभ्यासात करण्यात येणारा उपयोग) या विषयांचे विनावेतन अध्यापक (प्रीव्हाटडोझंट१९४९−५९) व पुढे १९५९ मध्ये प्राध्यापक झाले. १९५५ पासून ते फ्रिट्स हाबर इन्स्टिट्यूटच्या इलेक्ट्रॉन मायक्रोस्क्रोपी इन्स्टिट्यूटचे संचालक झाले.
जीवनविज्ञान व वैद्यक यांसारख्या विज्ञानाच्या विविध क्षेत्रांत इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाचे महत्त्व आता चांगले प्रस्थापित झाले असून विसाव्या शतकातील महत्त्वाच्या शोधांत त्याची गणना होते. रूस्का यांनी बर्लिन तांत्रिक विद्यापीठात विद्यार्थी म्हणून विसाव्या शतकाच्या तिसऱ्या दशकाच्या अखेरीस केलेल्या संशोधन कार्याने या उपकारणाच्या विकासास प्रारंभ झाला. चुंबकीय वेटोळे हे इलेक्ट्रॉनांच्या बाबतीत भिंगासारखे कार्य करू शकते आणि असे इलेक्ट्रॉन भिंग ज्यावर इलेक्ट्रॉनांची शलाका टाकलेली आहे. अशा वस्तूची प्रतिमा मिळविण्यासाठी वापरता येईल, असे त्यांना आढळून आले. दोन इलेक्ट्रॉन भिंगे वापरून त्यांनी प्राथमिक स्वरूपात इलेक्ट्रॉन सूक्ष्म दर्शक बनविला व त्याच्या साहाय्याने प्रतिमेचे पंधरा पट विविर्धन करून दाखविले. या सूक्ष्मदर्शकाला ‘पारगमन इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक’ असे संबोधले जाते. त्यानंतर रूस्का यांनी या सूक्ष्मदर्शकाच्या विविध तपशीलांत झपाट्याने सुधारणा केल्या आणि १९३३ मध्ये आधुनिक अर्थाने म्हणता येईल असा पहिला इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक तयार केला. त्याची कार्यमानता रूढ प्रकाशीय सूक्ष्मदर्शकापेक्षा निश्चितपणे सरस होती. पुढे सीमेन्स कंपनीत नेमणूक झाल्यावर रूस्का यांनी व्यवहारिक व मोठ्या प्रमाणात उत्पादित करण्यात आलेल्या आणि विज्ञानाच्या विविध क्षेत्रांत झपाट्याने उपयोगात आलेल्या इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकांच्या विकासात सक्रिय भाग घेतला. असा पहिला सूक्ष्मदर्शक १९३९ मध्ये बाजारात आला. अशा प्रकारच्या आधुनिक सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने प्रतिमेचे दोन लक्ष पट विवर्धन करता येते. त्यानंतर तांत्रिक सुधारणांद्वारे व रूस्का यांच्या पारगमन प्रकारापेक्षा आगदी नवीन प्रकारचे अभिकल्प (उदा., क्रमवीक्षण सुरंगी इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक) उदयास येऊन इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकीचा मोठ्या प्रमाणावर विकास झाला. इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाच्या या व पूर्वीच्या विकासावस्थांमध्ये अनेक संशोधक सहभागी झाले होते परंतु त्यांत रूक्सा यांचे मूलभूत कार्य लक्षणीय महत्त्वाचे ठरलेले आहे.
नोबेल पारितोषिकाखेरीज रुस्का यांना लास्कर पुरस्कार (१९६०), चार सन्माननीय डॉक्टरेट पदव्या आणि इतर सन्मानांचा व पुरस्कारांचा बहुमान मिळाला. विविध वैज्ञानिक नियतकालिकांतून त्यांचे शंभराहून अधिक संशोधनपर निबंध प्रसिद्ध झालेले आहेत. ते पश्चिम बर्लिन येथे मृत्यू पावले.
भदे, व. ग.