रूपककथा : (ॲलिगरी). कथावाङ्मयाचा एक प्रकार. पाश्चात्त्य साहित्यात ‘ॲलिगरी’ किंवा रूपकात्मता हे एक वाङ्मयीन तंत्र असून ते कविता, कथा, कादंबरी व नाटक या सर्वच वाङ्मय प्रकारांत वापरले जाते. ज्या कथेमध्ये पात्रे व घटना यांचे एकापेक्षा अनेक पातळ्यांवर अर्थ ध्वनित होतात आणि या अर्थाच्या सुसंगत व समांतर रचना दिसून येतात, ती रूपककथा. रूपक (मेटॅफर) या अलंकारात अर्थाचा एकच घटक असतो पण रूपककथेचे महत्त्वाचे लक्षण, ते रूपकात नसते. उदा., ससा व कासव हे प्राथमिक अर्थघटक तर बढाईखोर. चंचल आणि मंद पण सातत्यशील अशी दोन व्यक्तिमत्वे आणि शर्यतीचा प्रसंग वा घटना अशी रूपककथेची चौकट असते. यात दुय्यम अर्थाचा कथानकावर अंकुश असतो. त्यानुसार घटना व व्यक्तिचित्रण असणे आवश्यक ठरते. ही सामांतरता न साधल्यास रूपककथेच्या रचनात्मक सौंदर्यावर परिणाम होतो. दुय्यम अर्थाच्या अनेक पातळ्या असू शकतात. उदा., स्पेन्सर या इंग्रजी कवीच्या ‘फेअरी क्वीन’ या रूपकात्मक महाकाव्याचे नऊ पातळ्यांवर अर्थ संभवतात. रूपककथेचे तंत्र प्रथम वापरले गेले, ते धर्म व नीतीतत्त्वांच्या प्रभावी अभिव्यक्तीसाठी. काम, क्रोधादी षटरिपू दया, क्षमा, शांती, आशा, निराशा इ. अमूर्त भावसंकल्पनांना मानवी रूपे देऊन कविता, कथा, नाटके लिहिली गेली. उदा., इंग्रजी वाङ्मयातील सदाचार-नाटके (मोरॅलिटी-प्लेज), मराठीतील मनुविजयसारखी नाटके इत्यादी. कालचक्र, ऋतु, जन्म, मृत्यू, लग्न अशा सर्वसामान्य गोष्टींचे स्पष्टीकरण करण्यासाठी सर्वच धर्मात रूपककथांचा उपयोग केला गेला आहे. ग्रीक व रोमन मिथ्यकथा (मिथ्स) ह्या रूपककाशात्मकच आहेत. होमर, व्हर्जिल, ऑव्हिड हे अभिजात कवी म्हणूनच गणले जातात. देवदेवांच्या अशिष्ट व्यवहारांची भलावण करण्यासाठी पुराणांचा रूपककथात्मक अर्थ लावला गेला. उदा., बायबलमधील ‘जुन्या करार’चे सेंट ऑगस्टीन, बीड यांसारख्यांनी केलेले रूपककथात्मक स्पष्टीकरण वा कृष्ण व राधा यांना परमात्मा व भक्ती मानून कृष्णलीलांचा लावला गेलेला अर्थ. ही एकप्रकारे रूपकात्मक समीक्षेची सुरुवातच म्हणता येईल. विसाव्या शतकात फ्रॉइड व युंग यांच्या मनोविश्लेषणशास्त्राने या समीक्षेला नवे परिमाण दिले. रूपकथेसंबंधी तात्त्विक विचार प्रथम मध्ययुगातील इटालियन कवी ⇨दान्तें (१२६५−१३२१) याने केला. त्याने साहित्याचा अर्थ शाब्दिक, रूपकात्मक, नैतिक आणि आध्यात्मिक अशा चार स्तरांवर लावला जातो, असे म्हटले आहे. उदा., ‘ऑर्फियस’ या ग्रीक पुराणरकथेत आपल्या संगीताच्या सामर्थ्याने पशुपक्षी व दगडधोंडे यांनादेखील प्रभावित करणाऱ्या, ऑर्फियसची गोष्ट एक बोधपर रूपककथाच आहे. यांतला ऑर्फियस म्हणजे सूज्ञ माणूस, पशू म्हणजे क्रूरात्मे, झाडे व दगडधोंडे म्हणजे अज्ञ लोक आणि ऑर्फियसचे संगीत म्हणजे सूज्ञाचे तत्त्वज्ञान, हा रूपात्मक अर्थ. त्याचप्रमाणे बायबलमधील कथांचा व येशू ख्रिस्ताच्या कृतींचा रूपकात्मक अर्थ लावला जातो. ख्रिस्ताने पर्वतावर जाताना आपल्या बारा शिष्यांपैकी तिघांनाच बरोबर घेणे, याचा नैतिक अर्थ अतिशय गुप्त कामासाठी कमीत कमी सहकाऱ्यांना गुंतवावे ईजिप्तमधून बाहेर पडून ज्यू जमात पवित्र झाली, याचा आध्यात्मिक अर्थ आत्मा जेव्हा पापयुक्त जीवनातून बाहेर पडतो, तेव्हा पवित्र व मुक्त होतो. रूपककथेचे हे तंत्र मध्ययुगीन यूरोपीय साहित्यात देखील मोठ्या प्रमाणात वापरले गेले. मध्ययुगात फ्रेंचमध्ये ‘रोमाँ द ला रोज’, इंग्रजीत ‘पिअर्स द प्लाउमन’ अशी प्रसिद्ध रूपकथात्मक काव्ये लिहिली गेली. ⇨जॉन बन्यनचा द पिलग्रिम्स प्रोग्रेस हा ग्रंथ म्हणजे एका परीने रूपकात्मक कादंबरीच म्हणता येईल. आधुनिक काळात धार्मिक, नैतिक व सरधोपटपणे समांतर साधणारी जाऊन तिची जागा राजकीय व सामाजिक परिणाम असलेल्या सखोल औपरोधिक रूपककथेने घेतली. प्राचीन काळातील ⇨इसापच्या (इ. स. पू. सहावे शतक) गोष्टींत हे प्रथम दिसते. नंतरच्या काळात ⇨जॉन ड्रायडनचे ॲब्सलम अँड ॲचिटोफेल (१६८१) ⇨जॉनाथन स्विक्टचे गलिव्हर्स ट्रॅव्हल्स व टेल ऑफ अ टब ⇨सॅम्युएल टॉमस बटलर (१८३५−१९०२) याचे एरेव्हॉन, ⇨जॉर्ज ऑर्वेलचे ॲनिमल फार्म (१९४५) ही उपरोधप्रचुर रूपककथेची काही उत्तम उदाहरणे आहेत. राजकीय रोष व अभ्यवेक्षण (सेन्सॉरशिप) यांपासून बचाव म्हणून फ्रेंच नाटककार झां आनुईयचे अँटिगनी (१९४४) खाडिलकरांचे कीचकवध यांसारखी रूपकात्मक नाटके, तसेच पूर्व जर्मनीतील श्टेफान हाइम याच्या द किंग डेव्हिड रिपोर्टसारख्या कादंबऱ्या लिहिल्या गेल्या. भारतीय भाषांतील रूपककथांना पुराणे, पंचतंत्र, जातककथा यांचा वारसा परंपरेने मिळाला आहेच. मराठीत ⇨वि. स. खांडेकर व ⇨अनंत काणेकर यांनी रूपककथा हा प्रकार विशेषत्वाने हाताळला. खांडेकरांचे कलिका (१९४३), सुवर्ण कण (१९४४ खलिल जिब्रानच्या रूपककथांचा अनुवाद), वनदेवता (१९६०) व काणेकरांचा रूपेरी वाळू (१९४७) हे रूपक कथांचे संग्रह प्रसिद्ध आहेत. खलील जिब्रानचा प्रभाव त्यांच्यावर दिसतो. एखाद्या विशिष्ट भावनेभोवती वा विचाराभोवती लिहिलेल्या चिंतनपर रूपककथा, असे त्यांचे स्थूल स्वरूप. या कथा प्रायः उद्बोधनपर आहेत पण त्यांच्यात कथात्मकतेचा अभाव जाणवतो. तसेच कथानातून येणारे रचनात्मक सौंदर्यही जाणवत नाही. आधुनिक मराठी कथावाङ्मयामध्ये ⇨ जी. ए. कुलकर्णी यांनी ह्या प्रकाराला आगळे सामर्थ्य व वैभव प्राप्त करून दिले. रमणखुणा (‘प्रवासी’ व ‘इस्किलार’ या दीर्घकथा) व सांजशकून (२६ लघुतम रूपककथा) हे त्यांचे कथासंग्रह या संदर्भात वैशिष्ट्यपूर्ण आहेत. यांखेरीज त्यांच्या काजळमाया संग्रहातील ‘रत्न’, ‘गुलाम’, ‘विदूषक’ इ. व पिंगळा वेळ या संग्रहातील ‘ऑर्फियस’, ‘यात्रिक’ इ. कथाही या प्रकारात मोलाची भर घालणाऱ्या आहेत. त्यांच्यातील गूढरम्यता व काही प्रमाणात असलेली दुर्बोधता यांची तुलना इंग्रज कवी ⇨विल्यम ब्लेकच्या रूपकात्मक खंडकाव्याशी करता येईल. पण विल्यम ब्लेकने असहिष्णू प्रस्थापितांविरुद्ध असलेला आपला दुय्यम किंवा लक्ष्यार्थ लपविण्यासाठी हेतुपुरस्सर दुर्बोध व दूरान्वयी मिथ्य वा दिव्य कल्पना उपयोजिल्या तसा प्रश्न जी. ए. कुलकर्णीच्या कथेत उपस्थित होत नाही. त्यांच्या कथांतील प्राथमिक अर्थघटक म्हणजे ‘इस्किलार’, ‘प्रवासी’ यांसारख्या कथांतील व्यक्तिरेखा आणि त्यांचे विलक्षण गूढ रम्य जीवनविश्व तर दुय्यम वा लक्ष्यार्थ म्हणजे त्यातून जाणवणारी मानवी जीवनमूल्ये, गूढरम्यता किंवा पूर्वघटिताच्या तावडीत सापलेले असहाय, शोकात्म मानवी जीवन. मानवी जीवनविषयक तत्त्वचिंतन या कथांमधून होत असले, तरी तत्त्वे व व्यक्तिरेखा यांचे एकास एक असे नाते जोडता येईलच, असे नाही. म्हणून काही प्रमाणात दुर्बोध झालेल्या या कथा नेहमीच्या रूपककथेच्या नाही. लेखकाच्या विशिष्ट जीवनदृष्टीची साक्षात्कारी जाणीव त्यांच्यामागे असल्यामाने असल्याने त्यांना ‘दृष्टांत कथा’ असेही म्हणता येईल. रूपककथेचे स्वरूप सर्वसाधारणपणे उद्बोधनपर व तत्त्वचिंतनात्मक असले, तरीही त्यातून प्रतीत होऊ शकणारे रचनात्मक सौंदर्य व वाचकांना मिळणारे बौद्धिक आव्हान यांमुळे रूपककथेला वाङ्मयीन मौलिकता प्राप्त होते.
पहा : अलंकार, साहित्यातील (रूपक) कथा बोधकथा मिथ्यकथा.
संदर्भ : 1. MacQueen, John, Allegory (The Critical Idiom), London, 1970.
2. Honig E. Dark Conceit, The Making of Allegory, London, 1959.
कळमकर, य. शं.