प्रवचन : देवतेची पूजा वा भजन करीत असता पुरोहित, आचार्य वा गुरू पूजेतील किंवा भजनातील मंत्र वा स्तोत्र यांचा अर्थ पूजासमारंभात किंवा भजनसमारंभात भागीदार असलेले जे जन असतात, त्यांना सांगतात, त्यास प्रवचन म्हणतात. हे प्रवचन करीत असता पूजनीय देवतेचे वर्णन करून कथा सांगतात, तसेच धार्मिक तत्वज्ञानाचेही विवरण करून सांगतात. प्रवचन हे मुख्यतः पूजा करणारा यजमान आणि यजमानपत्नी यांनी ऐकायचे असते. प्रवचनाचे श्रवण केल्याशिवाय पूजेची वा भजनाची पूर्ण समाप्ती झाली, असे म्हणता येत नाही.

प्रवचन हा शब्द प्रथम तैत्तिरीय उपनिषदाच्या शिक्षावल्लीत आला आहे. यज्ञकर्मामध्ये आचार्याने प्रवचन करावयाचे असते. मुख्यतः धार्मिक व्यक्तीच्या घरी असलेल्या देव्हाऱ्‍यापुढे, देवळामध्ये, समाधिस्थानात, साधूंच्या मठात धर्मशास्त्रज्ञाने किंवा तत्त्ववेत्त्याने प्रवचन करण्याची प्रथा पुरातन काळापासून चालत आली आहे. ही प्रथा जैन मंदिरात, चैत्य मंदिरात किंवा बौद्ध मठातही अव्याहत परंपरेने चालू आहे. प्रवचनकर्ता न मिळाल्यास प्रवचनावाचूनच यज्ञपूजा, प्राथना व भजन केल्यानेही पूर्ण पुण्य मिळते, अशी धार्मिकांची श्रद्धा आहे. प्रवचनाच्या योगाने त्या पुण्यात भर पडते.

सर्व धर्मसंस्थांचा प्रचार आणि दृढीकरण प्रवचनाच्या योगाने होते. प्रवचन हे धर्मप्रचाराचे एक प्रमुख साधन आहे.

जोशी, लक्ष्मणशास्त्री

ख्रिस्ती धर्मातील : बहुतेक सर्व पंथीय चर्चमध्ये प्रत्येक रविवारी सकाळी किंवा सोयीनुसार ठरविलेल्या वेळी धार्मिक उपासना होते. त्यावेळी उपासनेच्या नियोजित कार्यक्रमात प्रवचनाला (सर्मन) एक विशिष्ट स्थान असते. काही ख्रिस्ती जन त्यालाच ‘उपदेश’ (होमिली) असेही संबोधतात. परंतु ह्या दोन संज्ञा भिन्न आहेत. ‘उपदेश’ म्हणजे भाविक जनांनी काय करावे व काय करू नये याविषयी बोध करणे तर प्रवचनात वैचारिक मीमांसा व कधीकधी संशोधनात्मक विवेचन ह्यांचाही समावेश होतो.

प्रवचन हे ईश्वरविद्येवर (थिऑलॉजी) आधारित असते. प्रवचन व्यासपीठावरूनच (पुल्‌पिट) दिले जाते व ते चर्चमधील उपासननेचे अंग असल्यामुळे बायबलमधील एखाद्या भागावर किंवा वचनावर आधारित असते.

ख्रिस्ती धर्म हा ‘येहोवा’ (व्यक्ती) आहे, त्याने मानवाविषयी आपली कळकळ काही निवडलेल्या व्यक्तींद्वारा व्यक्त केली हे ‘जुन्या करारा’त नमूद केले आहे. त्याचे विश्वव्यापी स्वरुप येशूच्या द्वारा तसेच येशूच्या शिष्यांच्या कृतीने व मुखाने नव्याने मांडले, ह्याची नोंद ‘नव्या करार’त आहे.

बायबलमधील ह्या दोन भागांत परमेश्वर हा त्याची निर्मिती जो मानव, त्याच्याशी जे बोलला व आपले जे मनोगत व्यक्त केले, ते अंतर्भूत आहे. तेच उद्‌गार व विचार विशेष ज्ञान प्राप्त झालेल्या द्रष्याद्वारे सर्वत्र पोहोचवून परमेश्वर हा मानवाशी आपला संपर्क कायम राखतो परंतु ते उद्‌गार व विचार सद्यःस्थितीला अनुलक्षून वापरण्यासाठी तो अशा लोकांना मार्गदर्शन करतो. चर्चमधील प्रवचनाची ही पार्श्वभूमी असल्याने प्रवचन हे एक नियमबद्ध शास्त्रच झाले आहे.

त्याचबरोबर प्रवचनात मानवी विचारांचे प्राबल्य वाढण्याची भीती असल्यामुळे काही पंथांत प्रवचनाचे स्वरुप प्रामुख्याने उपदेशपर ठेवण्यात येते व त्याला वेळही थोडाच देण्यात येतो. प्रॉटेस्टंट पंथात प्रवचनाला पाधान्य देण्यात आले व त्यामुळे प्रवचनाला शास्त्रोक्त पद्धती योजण्याची प्रवृत्ती वाढत गेली. मानवी इतिहास, मानवांचे एकमेकांशी बदलत जाणारे संबंध, मानवी शिक्षण व विकास तसेच एकमेकांशी बदलत जाणारे संबंध, मानवी शिक्षण व विकास तसेच युद्धासारख्या नव्याने निर्माण होणाऱ्‍या समस्या इत्यादींचा संबंध, प्रारंभी परमेश्वराने आपल्या सेवकांच्या मार्फत बायबलमध्ये व्यक्त केलेल्या मनोगताशी जोडला जाऊन, त्यातून प्रवचन तयार होते व त्याला एक विशेष वैचारिक पातळी प्राप्त होते. कालांतराने ईश्वरविद्या शिकविण्यासाठी आखलेल्या कार्यक्रमात प्रवचनाला महत्त्वाचे स्थान प्राप्त झाल्याचे दिसून येते.

अशा रीतीने प्रवचन म्हणजे परमेश्वराने मानवाच्या बदलत्या धार्मिक, सामाजिक व वैयक्तिक गरजा आणि समस्या यांविषयी आपली भूमिका भावकांना सतत विशद करून सागंणे होय. अर्थातच त्याची मांडणी बायबलमध्ये प्रकट केलेल्या भूमिकेनुसारच करण्यात येते म्हणून प्रवचनाच्या आरंभी संबंधित बायबल-वचने वाचून दाखविणे व नंतर त्यांच्याशी सुसंगत असे उचित प्रतीक घेऊन, शास्त्रोक्त पद्धतीने मुद्दे मांडून, प्रत्येक मुद्दा व बायबलमधील वचने यांची सांगड घालून वीस ते तीस मिनिटांत विवेचन करणे व शेवटी त्या विवेचनातून ऐकणाऱ्‍याच्या पुढे एक आव्हान मांडणे यांचा समावेश प्रवचनात होतो.

यातूनच एक मोठी समस्या निर्माण झाली आहे. संत योहानने येशू ख्रिस्त हा ‘शब्द’ होय, असे जे तत्त्वज्ञानावर आधारलेले येशूचे वर्णन केले आहे, त्याचे विवेचन करताना प्रवचनात शाब्दिक कसरत येण्याची भीती असते. त्यामुळेच काही पंथ बायबलमधील उतारे वाचणे व त्यावरच मनन व प्राथना करणे ह्यालाच उपासनेत महत्त्व देतात.

आयरन, जे. डब्ल्यू.