रूनिक लिपि : जर्मनी, उत्तर यूरोप, ब्रिटन, स्कँडिनेव्हिया आणि आइसलँड या ठिकाणी इ. स. तिसऱ्या शतकापासून इ. स. सोळाव्या-सतराव्या शतकपर्यत रूनिक लिपी प्रचारात होती. जर्मानिक
देशांमध्ये ⇨रोमन लिपीच्या अगोदर रूनिक लिपीचा उपयोग होत होता, हे आपल्याला तेथील विविध स्मारकांवरील लेखांवरून दिसून येते. वाङ्मयीन लेखनासाठी ही लिपी रूढ होती किंवा नाही, हे निश्चित माहीत नाही. प्राचीन सॅक्सन भाषेत रूनिक याचा अर्थ ‘गुप्त कुजबुज’ असा आहे.
या लिपीच्या उगमाविषयी निश्चित माहिती उपलब्ध नाही. हिचा उगम मेडिटरनियन म्हणजे भूमध्य सामुद्रिक भागातील लिपींपैकी एखाद्या लिपीपासून झाला असावा. ही लिपी डावीकडून उजवीकडे, क्वचित उजवीकडून डावीकडे किंवा एका आड एक म्हणजे नांगरटी पद्धतीने लिहिलेली आढळते. तसेच या लिपीतील अक्षरे कोनयुक्त असून त्यांत फारशी वळणे आढळत नाहीत. प्राचीन शिलालेख मात्र उजवीकडून डावीकडे लिहिलेले आहेत. त्यामुळे या लिपीचा उदय इ. स. पू. सहाव्या शतकापासून इ. स. पाचव्या शतकापर्यंतच्या काळातील ग्रीक [⟶ ग्रीक लिपि] किंवा लॅटिन लिपीच्या ‘कॅपिटल’ किंवा ‘कर्सिव्ह’ पासून झाला असावा, असा विद्वानांनी निष्कर्ष काढला आहे. याशिवाय जर्मानिक ‘गॉथ’ लोकांनी उत्तर इटालीच्या ⇨इट्रुस्कन लिपीपासून रूनिक लिपीचा विकास घडवून आणला असावा, असेही मानले जाते. इ. स. पू. पहिल्या-दुसऱ्या शतकांत लॅटिन लिपीचा प्रभावही रूनिक लिपीवर पडला असावा, असाही एक विचार मांडण्यात येतो.
रूनिक लिपीचे प्रमुख तीन प्रकार पहायला मिळतात : पहिला प्रकार म्हणजे उत्तर यूरोपात इ. स. ८०० मध्ये प्रचलित असलेली ‘प्राचीन’ किंवा ‘कॉमन जर्मानिक’ (ट्यूटॉनिक) लिपी. दुसरा प्रकार इ. स. पाचव्या-सहाव्या शतकांपसून इ. स. बाराव्या शतकांपर्यंत ब्रिटनमध्ये वापरात असलेली ‘अँग्लो-सॅक्सन’ किंवा ‘अँग्लियन’ लिपी आणि इ. स. आठव्या शतकापासून इ. स. बाराव्या-तेराव्या शतकांपर्यंत स्कँडिनेव्हिया आणि आइसलँड येथे उपयोगात असलेली ‘नॉर्डिक’ किंवा ‘स्कँनेव्हियन’ लिपी हा तिसरा प्रकार. इ. स. च्या बाराव्या शतकानंतर इ. स. सोळाव्या-सतराव्या शतकापर्यंत स्कँडिनेव्हियामध्ये जादूटोणा आणि स्मारक शिलालेखासाठी रूनिक लिपीचा काही वेळा उपयोग करीत असत.
‘कॉमन जर्मानिक’ लिपीत चोवीस अक्षरे होती आणि ती तीन गटांत विभागलेली होती. त्यांतील पहिली सहा अक्षरे F, u, th, a, r आणि k अशी असल्यामुळे या लिपीला ‘फुथर्क’ असेही नाव पडले.
प्राचीन इंग्रजी भाषेतील ध्वनी प्रतीत व्हावेत म्हणून ‘अँग्लो सॅक्सन’ लिपीत चार अक्षरे वाढविण्यात आली आणि त्यामुळे अक्षरांची संख्या अठ्ठावीस झाली. इ. स. नऊशे नंतर या लिपीत तेहेतीस अक्षरे झाली. तसेच अक्षरांच्या आकारांतही थोडाफार बदल झाला.
जुन्या इंग्रजीपेक्षा स्कँडिनेव्हियन भाषा ध्वनीच्या दृष्टीने अधिक समृद्ध होत्या. जुन्या फुथर्क लिपीत ध्वनी प्रतीत करण्यासाठी नॉर्डिक लिपात आणखी अक्षरे वाढविण्याऐवजी कमी करण्यात आली आणि एक अक्षर हे एकाहून अधिक ध्वनींचे प्रतीक बनले. उदा. ‘k’ आणि ‘g’ यांसाठी एक अक्षर a, ae आणि o यासाठी एक अक्षर. यामुळे अर्थातच अक्षरांची संख्या कमी होऊन ती सोळाच राहिली.
रूनिक लिपीतील प्राचीन लेख हे बव्हंशी उत्तर जर्मनीत हत्यारे, अंगठ्या, फासे इत्यादींवर मिळालेले आहेत. चौथ्या शतकानंतर रूनिक लिपीत लेख कोरण्याची प्रथा उत्तर जर्मनीत सुरू झाली. पश्चिम जर्मनीत मात्र असे शिलालेख आढळत नाहीत. स्वीडन येथे मात्र ते २,५०० हून अधिक अधिक मिळाले आहेत. बाराव्या शतकात ही लिपी फक्त इतिहासतज्ञांपुरतीच मर्यादित होती. त्यानंतर इ. स. बाराशे ते इ. स. सोळाशे पर्यंतच्या काळात ही लिपी अस्तंगत झालेली दिसते. सोळाव्या शतकाच्या नंतरच्या काळात या लिपीचा पुन्हा उदय झाला. इंग्लंडमधील काही लोकांना ती अवगतही असल्याचे दिसते. अठराव्या शतकात कारागीर लोक वळणदार अक्षरासाठी या लिपीत लिहीत असत. एकोणिसाव्या शतकात रूनिक लिपीच्या लेखांचे शोध, वाचन, नकला आणि स्पष्टीकरण विपुल प्रमाणात झाले. विसाव्या शतकातील केंब्रिज हिस्टरी ऑफ इंग्लिश लिटरेचर या ग्रंथात याची तपशीलवार माहिती आलेली आहे.
संदर्भ : 1. Diringer, David, The Alphabet, 2 Vols., London, 1968.
2. Jensen. Hans, Sing, Symbol and Script, London, 1970.
3. Page, R. I. An Introduction to English Runes, London, 1973.
गोखले, शोभना आरोळे, मीरा
“