रूदकी : (? − ९४०). फार्सी कवी. मूळ नाव अबू अब्दुल्ला जाफर इब्न मुहंमद. समरकंदजवळच्या बन्नूज या खेड्यात त्याचा जन्म झाला. तो जन्मांध होता असे म्हणतात तो पुढे आंधळा झाला, असेही म्हटले जाते. लहानपणची रूदकीने कुराण पाठ केले. त्यानंतर तो काव्यरचना करू लागला. गायनात त्याला गती होती. बर्बत नावाचे वाद्य वाजवण्यात तो कुशल होता. सफारी अमीर अबू जाफर यांनी व इतरांनी त्याला राजाश्रय दिला, तरी प्रामुख्याने वझीर अबुल फाजल वलामी आणि खोरासानचा राजा नसर बिन अहमद सोमानी (९१४−४३) यांनी त्याचा अधिक गौरव केली. नसर बिन अहमद यानेच रूदकीकडून बारतीय पंचतंत्राचे फार्सी भाषांतर−कलीलादिम्ना हे त्याचे नाव−करवून घेतले. रूदकी हा इराणचा पहिला प्रभावी असा अभिजात कवी होय. त्याचे काव्य भावनांनी ओतप्रोत भरलेले आणि साध्या, स्वाभाविक उपमांनी नटलेले आहे. ओघवती भाषा हाही त्याच्या काव्याचा एक स्वतंत्र विशेष आहे. त्याच्या एका कशिद्याचा प्रारंभ-बुये जुये मुलिया आयद हमी (मुलिया नदीचा सुगंध येत आहे)−इतका भावपूर्ण आहे, की रिवाजाप्रमाणे उन्हाळ्यात बुखारा ही आपली राजधानी सोडून राज्यात अन्यत्र राहणारा नसर बिन अहमद हा कशिदा ऐकताच आपल्या बुखारा या राजधानीला परतला. रूदकीने गझल, काशिदा, रूबाया असे काव्याचे अनेक प्रकार हाताळले. आज उपलब्ध असलेली त्याची कविता फारच थोडी आहे. वार्धक्यावर त्याने एक फार प्रभावी कविता रचली. गझलांमध्ये त्याने सौंदर्य, प्रेम आणि मद्यपानाची आवड यांवर भर दिला. त्याच्या काही कवितांतील मद्याची व जीवनाची आसक्ती पाहून कदाचित उमर खय्यामला काव्याची प्रेरणा मिळाली असावी. असे म्हटले जाते. बन्नूज ह्या आपल्या जन्मगावीच रूदकीचा मृत्यू झाला.

नईमुद्दीन, सैय्यद