सादी : (सु. १२१३–९ डिसेंबर१२९१). थोर फार्सी कवी. त्याचे मूळ नाव मुस्लिह उद्दीन होय. शीराझ (इराण) येथे जन्म. तो लहान असतानाच त्याचे वडील वारले. आरंभीचे शिक्षण शीराझ येथे घेतल्यावर पुढचे शिक्षण त्याने बगदादच्या निझामिया अकादेमीत घेतले. त्यानंतर निरनिराळ्या धार्मिक स्थळांना भेटी देण्यासाठी तो निघाला. धर्म-युद्घांच्या काळात फँकांनी त्याला पकडून काही काळ कैद केले होते, असा निर्देश त्याने त्याच्या गुलिस्ताँ (१२५८) ह्या ग्रंथात केलेला आहे. सादीने अरबस्तान, ईजिप्त, मोरोक्को, ॲबिसिनिया, मध्य आशिया, भारत ह्या देश-प्रदेशांचा प्रवास केला होता. सुमारे १२५६ मध्ये सादी शीराझ ह्या त्याच्या जन्मभूमीस परतला. तिथे त्याला इराणी राजांची मर्जी लाभली. विद्याभ्यास आणि आयुष्यातल्या भ्रमंतीतून मिळालेले विविध अनुभव ह्यांमुळे त्याचे व्यक्तिमत्त्व व्यासंगी झालेले होते. बोस्ताँ (१२५७) ह्या काव्यग्रंथातून आणि उपर्युक्त गुलिस्ताँ ह्या गद्यग्रंथातून त्याचा प्रत्यय येतो. बोस्ताँचा निर्देश कधी कधी सादीनामा असाही केला जातो. बोस्ताँ म्हणजे फळांची बाग. बोस्ताँचे दहा विभाग असून त्यांत न्याय, उत्तम शासन (सरकार), परोपकार, नम्रता, तृप्ती, प्रेम अशा अनेक विषयांवर त्याने आपले विचार मांडलेले आहेत. ह्या ग्रंथाला फार मोठी लोकप्रियता प्राप्त झाली. ह्या ग्रंथातील काव्यशैली वरवर साधी वाटली, तरी तिची अभिव्यक्तिक्षमता मोठी आहे. बोस्ताँमधील अनेक काव्यपंक्तींना फार्सी भाषेत म्हणींचे वा वाक्प्रचारांचे स्थान प्राप्त झाले आहे. लोकांचे व्यावहारिक शहाणपण आणि त्याची वैविध्यपूर्ण अंगे दाखवून देणाऱ्या या समर्पक कथा हे बोस्ताँचे एक लक्षणीय वैशिष्ट्य होय. अगदी साध्याशाच कथाही प्रभावीपणे सांगण्याचे सामर्थ्य सादीपाशी आहे. अनेकदा त्याच्या भ्रमंतीच्या काळातील अनुभव तो वाचक्राला काही बोध घडवून देण्यासाठी सांगतो. हे अनुभव नेहमीच खरे वाटावेत, असे नसतात ते कधी खरे, कधी कल्पनारचित, कधी सत्यासत्याचे मिश्रण, अशा स्वरूपाचे वाटतात पण बोध घडविण्याचा हेतू ते समर्थपणे सिद्घीस नेतात.

गुलिस्ताँ म्हणजे गुलाबांची बाग. अधूनमधून छोटी छोटी पद्ये विखुरलेल्या ह्या गद्यग्रंथाचे आठ भाग किंवा प्रकरणे आहेत आणि प्रत्येक प्रकरणात कथांचा एकेक गुच्छ आहे. ह्या गुच्छातील काही कथा प्रसन्न, तर काही उदास भाववृत्ती निर्माण करणाऱ्या आहेत. मात्र सर्व कथांचा आशय नैतिक, बोधवादी आहे. शैलीचा साधेपणा गुलिस्ताँमध्येही आहे पण त्या शैलीला तिची अशी एक सुंदर लय आहे. कथांच्या विषयांनुरूप ही शैली अनेक रूपे धारण करते. ह्या ग्रंथाला केवळ पौर्वात्य जगात नव्हे, तर यूरोपमध्येही फार मोठा प्रतिसाद मिळाला आणि अनेक शतके तो टिकून राहिला. ह्या संपूर्ण ग्रंथाचे लॅटिन भाषांतर १६५१ मध्ये प्रसिद्घ झाले. नंतर ही गुलिस्ताँची अनेक भाषांतरे झालेली आहेत.

सादी हा एक श्रेष्ठ भावकवीही होता. सादीच्या पूर्वी भावकवितेच्या रचनेकडे फार्सी कवींचे फारसे लक्ष गेले नव्हते. उद्देशिका (ओड) हा काव्यप्रकार कवी प्रामुख्याने हाताळीत असत. सादीने स्वतः उत्कृष्ट भावकविता लिहून ह्या काव्यप्रकाराला महत्त्व प्राप्त करून दिले. ⇨हाफीजसारख्या थोर भावकवीला आगमनाचा मार्ग मोकळा करून दिला. रचनेचे कौशल्य, कवितेतून सहजपणे स्रवत जाणारी शब्दकळा आणि उदात्ततेचा स्पर्श लाभलेला आशय, ही त्याच्या भावकवितेची विलोभनीय वैशिष्ट्ये होत. कसीदा हा काव्यप्रकार राजेरजवाड्यांच्या स्तुतिप्रीत्यर्थ वापरला जात असे पण सादीने आपल्या कसीदांतून राजाने न्यायबुद्घीने वागले पाहिजे, असा उपदेश केला.

शीराझ येथे तो निधन पावला.

पहा : फार्सी साहित्य.

कुलकर्णी, अ. र.