रूमी: (३० सप्टेंबर १२०७–१७ डिसेंबर १२७३). सुप्रसिद्ध इस्लामी सूफी कवी. फार्सी भाषेत लेखन. मूळ नाव जलालुद्दीन महंमद पण रूमी आणि मौलाना म्हणूनच तो ओळखला जातो. अफगाणिस्तानातील वाल्ख येथे तो जन्मला. त्याचे वडील बहाउद्दीन वलद हे प्रसिद्ध धर्मोपदेशक आणि सूफी होते. रूमीला त्याचे आरंभीचे शिक्षण त्याच्या वडिलांकडूनच मिळाले. रूमी लहान असतानाच मंगोलांच्या भीतीमुळे आणि अन्य काही वादांमुळे रूमीचे वडील बाल्खमधले आपल्या कुटूंबाचे वास्तव्य संपवून ठिकठिकाणी फिरत फिरत अखेरीस कोन्या येथे स्थायिक झाले. १२३१ मध्ये बहाउद्दीनचा मृत्यू झाला. त्यानंतर कोन्या येथेच रूमीची भेट, त्याच्या वडिलांचे शिष्य बुऱ्हानुद्दीन ह्यांच्याशी पडली. त्यांनी रूमीला सूफी तत्वज्ञानाचे गूढ, सखोल ज्ञान दिले. आपले अध्ययन पूर्ण करण्याकरता रूमी तेव्हाची अध्ययनकेंद्रे असलेल्या आलेप्पो आणि दमास्कस येथेही गेला. रूमी अनेक धार्मिक विषयांवर प्रवचने देत असे. १२४४ मध्ये शम्स तबरीझा या प्रभावी व्यक्तिमत्वाच्या फिरत्या दरवेशांची आणि रूमीची गाठ पडली. या दरवेशामुळेच रूमी ईश्वराचा एकनिष्ठ भक्त बनला. काही दिवसांनी शम्स एकाएकी निघून गेल्यामुळे रूमी अतिशय अस्वस्थ झाला. शम्स तबरीझी परतला आणि पुन्हा १२४७ मध्ये अंतर्धान पावला. शम्सच्या विरहावर रूमीने भावपूर्ण गझला लिहिल्या. रूमी अतिशय उमद्या मनाचा आणि उदार अंतःकरणाचा होता. त्याच्या ठायी श्रेष्ठ-कनिष्ठ भाव नव्हता. सर्वांशी वागण्याची त्याची रीत प्रेमळ होती. निरनिराळी मते व धर्म यांच्यात सलोखा असावा, असे तो प्रवचनाद्वारे सांगत असे आणि त्याचे आचरणही ह्या भूमिकेला धरून असे.

फीहि-मा-फीह, मजालिस-ए-सबा आणि क्तूबात (पत्रे) हे त्याचे गद्यलेखन आहे. फीहि-मा-फीह् यात वेगवेगळ्या धार्मिक व सूफी विषयांवरील प्रवचने आहेत. ए. जे. अरबेरी यांनी डिस्कोर्सेस ऑफ रूमी (१९६१) या नावाने फीहि-मा-फीह्चे इंग्रजी भाषांतर केले आहे. मजालिस-ए-सबामध्ये रूमीची प्रबोधनपर भाषणे आहेत. रूमीची पत्रे इस्तंबूल येथे प्रकाशित झाली आहेत (१९३७).

सहा खंडात प्रसिद्ध झालेल्या मस्नवि-ए मानवी या काव्यग्रंथामुळे रूमीला अमर कीर्ती लाभली. हे सर्व खंड भाष्यासह संपादित केले गेले. आर्.ए.निकल्सन (१९२४–४०) यांनी मनस्वीचे सटीक इंग्रजी भाषांतर केले. मस्नवीची तुर्की, उर्दू, फार्सी भाष्येही विपुल झाली आहेत. बदीउज्जमान फ्रुजानफर याने रूमीच्या गझला व रूबाया यांचे आठ खंडांत (१९५७–६१) संपादन केले. रूमीला संगीताचा–विशेषतः बासरीवादनाचा–छंद होता. बासरीचा त्याने आपल्या काव्यात प्रतीकात्मक वापर केला . बासरी म्हणजे जणू आत्म्याचे प्रतीक. मस्नवीत रूमीच्या आत्म्याचे शोकात्म सूरच ऐकू येतात. देवाचा वियोग झाल्यामुळे मानवी आत्म्याला होणारे दुखः त्यात प्रगटले आहे. देवाशी एकरूप होण्याची उत्कट इच्छा रूमीने व्यक्त केली. देवाच्या भेटीची तीव्र उत्कंठा व्यक्त करताना रूमीने मुख्यतः कुराणाचा आधार घेतला. त्यामुळे मस्नवी फार्सी ‘कुराण’ म्हणूनच मानले जाते. एकता, सत्प्रवृत्ती, प्रयत्नवाद यांसारख्या धार्मिक नि तात्विक विषयांवर रूमीच्या कविता आहेत. सूफी तत्वज्ञानातील सैद्धांतिक व प्रात्याक्षिक अशा सर्व मुद्यांचा त्याने आकर्षक आणि रूपकात्मक शैलीत परामर्श घेतला आहे. त्यामुळे ‘सूफी तत्वज्ञानाचा ज्ञानकोश’ असे स्वरूप त्याला आले. मस्नवी ह्या काव्यग्रंथातील कथाही फार्सी व हिंदू संस्कृतींतून उचलल्या आहेत. उदा., पंचतंत्रातील सिंह व ससा ही गोष्ट (मस्नवी, खंड–२). रूमीने हिंदी हत्ती म्हणजे मानवी आत्म्याचे प्रतीक मानले आहे. दूर देशी गेलेल्या हत्तीला जशी आपल्या मायभूमीची आठवण येत राहते, त्याचप्रमाणे देवापासून तुटलेला आत्माही त्याच्या शोकाने सतत स्फुंदत असतो. आणखी एका गोष्टीत रूमी हत्तीच्या संदर्भात एक उल्लेख करतो. यात अनेक माणसे अंधारात हत्तीच्या एका एका अवयवाला हात लावतात आणि तेवढा अवयव म्हणजेच संपूर्ण हत्ती असे म्हणतात. त्यावरून रूमी म्हणतो, की ईश्वरी सत्य एकच आहे ते आपणा सर्वांचे उद्दिष्ट आहे पण त्याकडे पाहण्याचे आपले दृष्टीकोण मात्र वेगवेगळे आणि एकांगी आहेत. उद्दिष्ट एक असल्याने त्याप्रत पोहोचणाऱ्या मार्गांतील भिन्नता हा वादाचा विषय होऊ नये, असे रूमीचे सांगणे आहे. एका गझलमध्ये रूमी प्रश्न विचारतो, की आपण सारे एकाच ध्येयाकडे जाणारे सहप्रवासी असल्याने आपण परस्परांशी का भांडतो ॽ भाषा भिन्नतेमुळेदेखील आपल्यात वितुष्ट येता कामा नये. कुणाची भाषा ‘हिंद’ असो की कुणाची ‘सिंध’ असो. त्यामुळे आशयात–देवाची स्तुती करण्यात–कोणताच फरक पडत नाही (मस्नवी, खंड–२). सर्वाविषयीचे–विशेषतः देवाविषयीचे-प्रेम महत्वाचे. प्रेम हे बुध्दीवर मात करून सर्व अडथळे दूर करते आणि आत्मशुध्दी घडवून आणते. जेवढा मनुष्य शुद्ध तेवढा तो देवाच्या अधिक जवळ जातो. रूमीचे असंख्य अनुयायी आणि शिष्य आहेत. विसाव्या शतकाचा एक महान कवी ⇨ इक्बाल मोठ्या अभिमानाने स्वतःला रूमीचा ‘हिंदी शिष्य’ म्हणवतो.

संदर्भ : 1. Hakim, K. A. The Metophysics of Rumi, Lahor, 1933.

2. Naimuddin, Sayyad, The Concept of Love in Rumi and Iqbal, Islamic Culture, Hyderabad, Oct, 1968.

३. नोमानी, शिवली, सवानेहे मौलाना रूमी, आजमगढ, १९३८.

४. फ्रुजानफर, बदीउज्जमान, जिंदगानिए मौलाना जलालुद्दीन मुहम्मद, तेहरान, १९५३.

नईमुद्दीन, सय्यद