रुर : पश्चिम जर्मनीतील खाणकाम व औद्योगिक उत्पादने यांसाठी प्रसिद्ध असलेला प्रदेश आणि यूरोपला दगडी कोळसा व कोक यांचा पुरवठा करणारा प्रमुख विभाग. क्षेत्रफळ ३,३७० चौ.किमी. पश्चिम जर्मनीच्या नॉर्थ ऱ्हाईन-वेस्टफेलिया राज्यातील हा प्रदेश म्हणजे जगातील एक महत्त्वाचे पोलादनिर्मिती केंद्र समजले जाते.
या प्रदेशाच्या दक्षिण सरहद्दीवरून वाहणारी रुर (लांबी २३७ किमी.) ही ऱ्हाईन नदीची उपनदी विंटर्बेर्खच्या उत्तरेस उगम पावते व दाट जंगलमय प्रदेशातून साधारणतः पूर्व-पश्चिम वाहत जाऊन ड्युइसबुर्क येथे ऱ्हाईन नदीला मिळते. ही नदी सु. ४, ५५८ चौ. किमी. क्षेत्राचे जलनिःसारण करते. मर्न ही उजव्या बाजूने, तर होन व लेन या डावीकडून तिला मिळणाऱ्या उपनद्या होत. रुर नदीच्या नावावरूनच या प्रदेशाला जर्मन भाषेत ‘रुरगबीट’ (रुर नदीखोरे) म्हणतात. हा प्रदेश ऱ्हाईन नदीच्या पूर्वेस हाम या शहरापर्यंत आणि लिप व रुर या दोन नद्यांदरम्यान विस्तारलेला आहे. एसेन, डॉर्टमुंड, बोखुम, म्यूलहाइम, र्हापईनहाउझेन, ड्युइसबुर्क, ओबरहाउझेन, गेल्झनकिर्खन, रेक्लिंगहाउझेन व हाम ही या प्रदेशातील प्रमुख औद्योगिक शहरे आहेत. हा प्रदेश उद्योगधंद्यांनी अतिशय गजबजलेला असला, तरीही शेतजमीन व जंगले यांनीही यामधील भूभाग व्याप्त आहे.
रुर प्रदेश दोन्ही महायुद्धांत जर्मनांच्या युद्धसामग्रीचे कोठार होते. पहिल्या महायुद्धात जर्मनीने युद्धभरपाई स्वच्छेने दिली नाही, या सबबीखाली फ्रान्सने १९२३ च्या प्रारंभी संबंध रुर क्षेत्र बळकावले. रुरवासियांनी फ्रान्सच्या या आक्रमक कृत्याचा अहिंसात्मक प्रतिकार केला. त्यांनी रुर खाणी व कारखाने येथील कामावर बहिष्कार घातला. परिणामी फ्रान्सला आपले मजूर काम करण्याकरिता मागवावे लागले तथापि रुर येथील अवाढव्य यंत्रप्रणालीची कार्यपद्धती फ्रेंच कामगारांना न समजल्यामुळे काम व्यवस्थित होऊ शकले नाही. त्यामुळे रुर क्षेत्रात राजकीय गोंधळ निर्माण झाला. रुरवरील फ्रान्सचा ताबा व त्याला रुरने दिलेले हे क्रियाशून्य उत्तर यांयोगे सबंध जर्मन आर्थिक संरचना मृतप्राय झाली परिणामी जर्मन डॉइश मार्क पार घसरला व युद्धभरपाईची रक्कम देणेही जर्मनीला दुर्धर झाले. यावर तोडगा म्हणून अमेरिकेची संयुक्त संस्थाने व ग्रेट ब्रिटन या दोन्ही राष्ट्रांनी फ्रान्स व जर्मनी या दोहोंमधील मतभेद डॉज योजनेनुसार मिटविले जावेत, असे दोन्ही देशांच्या गळी उतरविले आणि जुलै १९२५ च्या सुमारास जर्मनीतून सर्व परकीय सैन्य काढून घेण्यात आले.
दुसऱ्या महायुद्धात रुरला दोस्तराष्ट्रांच्या बाँबवर्षांवाला सतत तोंड देत रहावे लागले परिणामी रुरच्या विस्तृत क्षेत्राची, त्यामधील शहरांची व उद्योगांची प्रचंड हानी झाली. दुसऱ्या महायुद्धसमाप्तीनंतर रुर प्रदेश जर्मनीपासून तोडावा, ही फ्रान्सची सूचना ग्रेट ब्रिटन व अमेरिकेची संयुक्त संस्थाने यांनी अमान्य केली. त्याऐवजी नवनिर्मित पश्चिम जर्मनी या राष्ट्राचा भाग बनलेल्या रुर प्रदेशाचे प्रशासन पाहण्यासाठी १९४९ मध्ये ‘आंतरराष्ट्रीय रुर नियंत्रण प्राधिकरण’ स्थापण्यात आले. त्याच्याकडे रुरमधील उद्योगांचे सम्यक् संयोजन तसेच शस्त्रसंभारनिर्मितिउद्योगांचे पुनरुज्जीवन न होण्याबाबत घ्यावयाची दक्षता ही कामे सुपूर्द करण्यात आली होती. तथापि शीतयुद्धजन्य ताणतणाव आणि कोनराड आडनौअर ह्यांनी प. जर्मन प्रजासत्ताकाच्या आपल्या चान्सलरपदाच्या कारकीर्दीत (१९४९−६३) पश्चिमी राष्ट्रांबाबत दाखविलेले अनुकूल धोरण यांयोगे दोस्तराष्ट्रांना त्वरेने रुरचा पुनर्विकास करणे भाग पडले. असे असूनही, दोस्त राष्ट्रांनी रुर येथील उत्पादनावर नियंत्रण घालण्याचे प्रयत्न केले. १९५२ मध्ये ‘यूरोपीय कोळसा व पोलाद समुदाय’ स्थापन झाल्यानंतर ही सर्व नियंत्रणे रद्द करण्यात आली. रुरचे मध्यवर्ती महत्त्व लक्षात घेऊन मार्शल योजनेद्वारे अर्थसाहाय्ययादीत जर्मनीचे नाव घालण्यात आले. मार्शल योजनेची कार्यवाही तसेच प. जर्मन शासनाची अर्थनीती यांयोगे रुरने पुनश्च प. युरोपीय अर्थव्यवस्थेमध्य महत्त्वाचे स्थान मिळविले आहे.
रुर खोऱ्यात नागरीकरण व औद्योगिकीकरण सतत होत गेले असून या प्रदेशाला लोहमार्ग तसेच नदी व कालवे यांद्वारे जलवाहतूक यांचे उत्कृष्ट साहाय्य लाभले आहे. जलपाशांच्या साहाय्याने व्हिटेन बंदरापर्यंत पडाव नेता येतात. रुर खोऱ्याच्या वरच्या भागातील स्फटिकी खडकांमुळे निर्मळ बनलेले पाणी, कापड व तदनुषंगी उद्योग तसेच अवजड व भारी उद्योगांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. पश्चिम जर्मनी व फ्रान्स यांचा आर्थिक विकास रुर खोऱ्यातील उत्पादित कोळसा व पोलाद यांवर निर्भर आहे. जागतिक कोळसा उत्पादनापैकी सात टक्के उत्पादन तसेच युरोपातील एकूण कोळसा उत्पादनापैकी सु. २० टक्के उत्पादन रुर प्रदेशातून होते प. जर्मनीचे बहुतेक सर्व पोलादउत्पादन या खोऱ्यातील कारखान्यांतून होते.
रुर खोरे हा संबंध जगामधील अतिशय उच्च प्रतीच्या समाकलित (एकात्मीकृत) औद्योगिक प्रदेशांपैकी अग्रेसर प्रदेश समजला जातो. १८७० ते १९१४ यांदरम्यान एक औद्योगिक संकुल म्हणून उद्यास आलेल्या जर्मन व्यापारी संघाचे केंद्र या नात्याने रुर क्षेत्रात औद्योगिक विकास होत गेला. या प्रदेशात रसायने, कापड व वस्त्रे, कोळसा, खाणउद्योग, धातुकर्मउद्योग, विद्युत्शक्तिउत्पादन यांसारख्या उद्योगांची प्रकर्षाने भरभराट होत गेल्याचे दिसून येते.
गद्रे, वि. रा.