रुमा मस्तकी : (हि. रुमी मस्तिकी सं. रुमकुंदरू इं. मॅस्टिक ट्री लॅ. पिस्टाशिया लेंटिस्कस कुल-ॲनाकार्डिएसी). हा रेझिनासारखा एक पदार्थ असून त्याचा उपयोग इ. स. पू. ४०० वर्षांपासून होत आला आहे. तो फुलझाडांपैकी [⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] ⇨कक्कटशिंगी व ⇨पिस्ता यांच्या प्रजातीतील (पिस्टाशियातील) एक विदेशी जातीच्या वृक्षांपासून मिळतो. या प्रजातीतील एकूण दहा जातींपैकी फक्त वर उल्लेखिलेल्या दोन भारतात आढळतात.
रुमा मस्तकीचा लहान सदापर्णी वृक्ष सु. ४ मी. उंच असून तो मूळचा भूमध्यसामुद्रिक प्रदेशातील आहे. इजीअन समुद्रातील कायऑस बेटातील दक्षिण पूर्व भागात सु. ५०० मी. उंचीपर्यंतच्या प्रदेशात ही झाडे मुख्यतः आढळतात व या बेटातून या पदार्थांची (कायऑस मॅसिटक) भारतात आयात होते. ह्या वृक्षाला पिसासारखी संयुक्त पाने एकाआड एक असतात. फुले लहान व एकलिंगी असून ती स्वतंत्र झाडावर येतात व त्यांना पाकळ्या नसतात. फळ अश्मगर्भी (आठळीयुक्त फळ), शुष्क, ४-५ मिमी. व्यासाचे, गोलसर व काळे असून त्यात एकच तैलयुक्त बी असते. इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ॲनाकार्डिएसी अथवा आम्रकुलात वर्णन केल्याप्रमाणे असतात. नवीन लागवड छाट कलमे लावून करतात मादी वृक्षापासून चांगले रेझीन मिळत नसल्याने फक्त नर वृक्षांची लागवड करतात. वास्तविक हे रेझीन नैसर्गिक रीत्या पाझरते तथापि व्यापारी प्रमाणात ते जमा करण्यास सालीवर लहान व उभे चरे पाडून त्यांतून आलेला पदार्थ पुढे तीन आठवड्यांनी जमा करतात. सरासरीने दर झाडापासून दर वर्षी सु. ३·५−५·५ किग्रॅ. रेझीन मिळते.
जमा केलेले रेझीन गोलसर, कुंभाकृती किंवा सु. ४−८ मिमी. व्यासाचे स्वच्छ, फिकट पिवळे खडे असून पुढे त्यांचा रंग बदलून ते फिकट व ठिसूळ बनतात त्यांना सुगंध येतो व त्यांची चवही बरी असते. त्यांच्यात काही अम्ले, २% बाष्पनशील (उडून जाणारे) तेल व एक कडवट पदार्थही असतो. भूमध्यसामुद्रिक प्रदेशात व आपल्याकडे रूमा मस्तकीचा उपयोग दात व हिरड्या यांच्या संरक्षणाकरिता व चघळून मुख (श्वास) सुगंधित होण्याकरिता करतात. हल्ली चघळण्याच्या गोंदात (चूईंग गममध्ये) ती वापरतात. हृदयाला बल देणारी काही पेये व मद्ये यांतही तिचा उपयोग स्वादाकरिता करतात. रुमा मस्तकी कफघ्न (कफाचा नाश करणारी), वायुनाशी, उत्तेजक व मूत्रल (लघवी साफ करणारी) असून काही औषधे, अत्तरे व धूप यांतही तिचा वापर करतात. जखमांवर संरक्षक लेप व दातांत भरण्याचे लुकण यांतही ती घालतात. सूक्ष्मदर्शकातून तपासण्याकरिता बनविलेल्या द्रव्यांत तिचा वापर होतो. बहुमोल रंगीत कलाकृती व धातुकाम यांवर लेप देण्यास केलेल्या पारदर्शक रोगणात रुमा मस्तकी घालतात. शिलामुद्रण प्रक्रियेत व व्यस्तचित्रांच्या (निगेटिव्हच्या) सुधारणेच्या प्रक्रियेत तिचा उपयोग करतात. रुमा मस्तकीच्या बियांतील तेल (३०%) काहीसे गोडसर व सुगंधी असून त्याचा उपयोग साबणाकरिता किंवा खाण्याकरिता होतो. पाने कातडी कमाविण्यास वापरतात कारण त्यात ९−१२% टॅनीन असते ⇨सुमाकमध्ये त्यांची भेसळ करतात. बाजारात मिळाणाऱ्या रुमा मस्तकीत गोंदाचे खडे मिसळतात ते बहुरंगी असल्याने ओळखू येतात. ती पाण्यात उकडून ते पाणी लहान मुलांस जुलाबात देतात तसेच फुप्फुसाच्या रोगांत कफ कमी करण्यास देतात. श्वासमार्गातील श्लेष्मल त्वचेस तिच्यामुळे जोम येतो. बॉम्बे मॅस्टिक हे नाव पि. कॅबुलिका या झाडाच्या रेझिनास दिले आहे ते रेझीन फिकट दुधी रंगाचे असून खडे मोठे असतात. ते रुमा मस्तकीसारखे वापरतात परंतु ते कमी प्रतीचे असते.
संदर्भ : 1. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials. Vol. VIII, New Delhi, 1969.
2. Hill, A. F. Economic Botany, Tokyo, 1952.
3. Kirtikar, K. R. Basu, B. D. Indian Medicinal Plants. Vol. I, New Delhi, 1975.
४. देसाई, त्रा. गो. ओषधीसंग्रह, मुंबई, १९७५.
वैद्य, प्र. भ. परांडेकर, शं. आ.