रुबिएलीझ : (कदंब गण). फुलझाडांपैकी [⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] द्विदलिकित (बियांत दोन दलिका अथवा दले असलेल्या) वनस्पतींच्या वर्गातील एक गण. यामध्ये रुबिएसी, कॅप्रिफोलिएसी,. ॲडॉक्सेसी, व्हॅलेरिएनेसी आणि डिप्सॅकेसी या पाच कुलांचा अंतर्भाव केला जातो. जे. बेंथॅम व जे. डी. हूकर यांनी इन्फीरी या श्रेणीत रुबिएलीझ गण घातला असून त्यात फक्त रुबिएसी आणि कॅप्रिफोलिएसी या कुलांचा समावेश केला आहे जे. हचिन्सन यांच्या वर्गीकरण पद्धतीत असेच केले असून वर दिलेल्या पाच कुलांपैकी उरलेली तीन कुले ॲस्टरेलीझ गमात घातली आहेत त्यांनी पुढे व्हॅलेरिएनेलीझ या नवीन गणात ही तीन कुले घेतली आहेत. वर्गीकरणातील अशा तऱ्हेचे मतभेद भिन्न कुलांतील परस्पर आप्तसंबंध व त्यांचे उगम आणि पूर्वजांची परंपरा यांवर आधारलेले असतात. येथे प्रथम सँबूकस नायग्रा : (१) फुलांसह फांदी, (२) कळी, (३) फूल, (४) फळ, (५) फळाचा उभा छेद.सांगितलेली रुबिएलीझ गणाची विभागणी तो गण एक नैसर्गिक गट समजून केली आहे कारण त्या सर्व कुलांमध्ये पुढील लक्षणे आढळतात : सर्व वनस्पती ओषधी, झुडपे, वृक्ष किंवा लता असून त्यांवरची पाने समोरासमोर असतात त्यांची फुले द्विलिंगी, अपिकिंज (किंजपुट इतर पुष्पदलांच्या खालच्या पातळीत असलेली), एकसमात्र (एका उभ्या पातळीने दोन सारखे अर्ध करता येण्याजोगी) किंवा अरसमात्र (केंद्रातून जाणाऱ्या कोणत्याही उभ्या पातळीने दोन सारखे अर्ध होण्याजोगी), चतुर्भागी किंवा पंचभागी (चार-पाच भांगाची मंडले असलेली) आणि युक्तप्रदल (जुळलेल्या पाकळ्यांची) असतात [⟶ फूल] ती कुंठित चवरीसारख्या किंवा गुच्छासारख्या. [चामरकल्प किंवा स्तबक ⟶ पुष्पबंध] फुलोऱ्यावर येतात केसर पाकळ्यांइतकी असतात किंजमंडलात (स्त्री-केसर-मंडलात) किंजदलांच्या व बीजकांच्या संख्येत घट असते [⟶ फूल].

अंबेलेलीझ (चामर गण), रुबिएलीझ आणि कँपॅन्यूलेलीझ या तिन्ही गणांत निकट आप्तसंबंध असून यांपैकी पहिल्या गणापासून दुसरे दोन्ही अवतरले असावेत किंवा कँपॅन्यूलेलीझ हा गण प्रत्यक्ष रुबिएलीझ गणापासून विकास पावला असावा, असे बहुतेक वनस्पतिविज्ञ मानतात. रुबिएसी ⇨कदंब या अधिक परिचित वनस्पतीमुळे त्या कुलाला कदंब कुल व रुबिएलीझला कदंब गण म्हटले आहे. बेसी यांच्या मते रोझेलीझ गणापासून अंबलेलीझ गण अवतरला असावा. कॅप्रिफोलिएसी कुलातील सँबूकस प्रजातीतील सहा उपयुक्त जाती भारतात आढळतात यूरोपीय एल्डरच्या (सँबूकस नायग्रा) वृक्षातील ⇨भेंड वनस्पतींच्या शरीररचनेच्या (सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने केल्या जाणाऱ्याए) अभ्यासात बरेच वापरतात लोनिसेरा प्रजातीतील (हनीसकलच्या) काही जाती बागेत शोभेकरिता लावतात. व्हॅलेरिएनेसी कुलातील ⇨जटामांसी ही प्रसिद्ध औषधी वनस्पती हिमालयात आढळते. रुबिएसीतील ⇨कॉफी सुपरिचित व व्यापारी महत्त्वाची आहे.

संदर्भ : 1. Lawrence, G. H. M. Taxonomy of Vascular plants, New York, 1965.

2. Mitra, J. N. An Introduction to Systematic Botany and Ecology, Calcutta, 1964.

जोशी, गो. वि. परांडेकर, शं. आ.