रीओ ग्रांदे : उत्तर अमेरिकेतील पाचव्या क्रमांकांची लांबी नदी. लांबी सु. ३,०३४ किमी., जलवाहन क्षेत्र ४,४५,००० चौ. किमी. सामान्यपणे उत्तर−दक्षिण वाहणारी ही नदी अमेरिकेतील संयुक्त संस्थानांच्या कोलोरॅडो राज्यात उगम पावून दक्षिणेस सु. निम्मे अंतर गेल्यावर पुढे अमेरिकेची संयुक्त संस्थाने व मेक्सिको यांच्या सरहद्दीवरून आग्नेयीस वाहत जाऊन मेक्सिकोच्या आखाताला मिळते.
या नदीला मेक्सिकन रीओ ब्राव्हो (मोठी नदी) किंवा रीओ ब्राव्हो देल नॉर्ते (उत्तरेकडील मोठी नदी) असे म्हणतात. स्पॅनिशांनी या नदीला रीओ ग्रांदे (मोठी नदी) असे नाव दिले. आल्व्हार न्यून्येथ काबेथ दे व्हाका या स्पॅनिश समन्वेषकाने १५३६ मध्ये पहिल्यांदा रीओ ग्रांदे नदी पाहिल्याचा उल्लेख मिळतो. अमेरिकेची संयुक्त संस्थाने व मेक्सिको या दोन देशांदरम्यान १८४८ मध्ये झालेल्या ग्वादालूपे ईदाल्गो करारानुसार या दोन्ही देशांदरम्यानची आंतरराष्ट्रीय सरहद्द या नदीला अनुसरून ठरविण्यात आली. परंतु नदीच्या प्रवाहमार्गात वारंवार होणाऱ्या बदलांमुळे या दोन देशांदरम्यानचा सीमाप्रश्न वादग्रस्त बनला आहे.
ही नदी कोलोरॅडो राज्यातील दक्षिण रॉकीच्या हिमाच्छादित सॅन वॉन पर्वतश्रेणीत सस. पासून ३,७०० मी. उंचीवर उगम पावते. या राज्यातून दक्षिणेस सु. २०० किमी. वाहत गेल्यावर ही न्यू मेक्सिको राज्यात प्रवेश करते व राज्याच्या मध्यातून सु. ७५२ किमी. दक्षिणेस वाहत जाते. या राज्यातील अल्बुकर्कपासून नदीचे पात्र रुंदावलेले आहे. पुढे टेक्सस राज्यातील एल् पॅसो शहरापासून अमेरिकेची संयुक्त संस्थाने व मेक्सिको यांच्या आंतरराष्ट्रीय सरहद्दीवरून आग्नेयीस सु. १,९९६ किमी. वाहत जाऊन शेवटी मेक्सिकोच्या आखाताला मिळते. या प्रवाहमार्गात टेक्सस राज्यातील चीसस डोंगररांगेजवळ ही नदी एकदम ईशान्यवाहिनी बनते. याच भागात बिग बेंड राष्ट्रीय उद्यान आहे. उद्यानाला वळसा घालून ही नदी काही अंतर ईशान्येस व नंतर पेकस नदी येऊन मिळेपर्यंत पूर्व दिशेत वाहते. त्यानंतर मात्र ती शेवटपर्यंत आग्नेयवाहिनी आहे. पेकस नदीसंगमानंतर या नदीवर थोड्याच अंतरावर (डेल रीओ शहराजवळ) पूरनियंत्रणासाठी ॲमिस्टड धरण बांधण्यात आले आहे (१९६९). तेथून लारेडोपर्यंतचे नदीपात्र बरेच रुंद आहे.
पेकस, डेव्हील्स, चामा व पूॲर्को या संयुक्त संस्थानांतील, तर कोंचोस, सालादो व सॅन वॉन या मेक्सिकोतील रीओ ग्रांदेच्या प्रमुख उपनद्या आहेत. रीओ ग्रांदेचा वरच्या टप्प्यातील प्रवाह अत्यंत खडकाळ, खोल व अरुंद (काही ठिकाणी सु. ५३० मी. उंच कडे असलेल्या) दऱ्यांतून, तर खालच्या टप्प्यातील प्रवाह उथळ रुंद असून मैदानी परंतु वाळूचे दांडे असलेल्या प्रदेशातून जात असल्याने जलवाहतुकीस फारसा उपयुक्त नाही. सुरुवातीच्या कोलोरॅडो राज्यातील हिच्या रुंद अशा सॅन लूईस खोऱ्यात स्प्रूस, फर व ॲस्पेन वनस्पतींची जंगले आहेत. नदी दुसऱ्या टप्प्यात कोरड्या प्रदेशातून वाहते. एप्रिल ते ऑक्टोबर या काळात नदीतून सर्वाधिक पाणी वाहते. वरच्या टप्प्यात बर्फ वितळल्यामुळे व अधूनमधून येणाऱ्या झंझावातामुळे पाऊस पडल्याने मे किंवा जूनमध्ये नदीला भरपूर पाणी असते. खालच्या टप्प्यात उन्हाळी वादळी पर्जन्यामुळे जून किंवा सप्टेंबरमध्ये सर्वाधिक पाणी असते. न्यू मेक्सिको राज्याच्या उत्तर भागात या नदीने रीओ ग्रांदे व गॉर्ज व व्हाइट रॉक कॅन्यन या खचदऱ्यांची तसेच बिग बेंड विभागात ५९५ मी. ते ६७५ मी. खोलीच्या तीन कॅन्यनची निर्मिती केलेली आहे. पूर नियंत्रण खोलीच्या तीन कॅन्यनची मिर्मिती केलेली आहे. पूर नियंत्रण व जलसिंचन यांसाठी न्यू मेक्सिको राज्याच्या दक्षिण भागात नदीवर ट्रुथ येथे एलेफंट ब्यूट (१९१६) व त्याच्याच दक्षिणेस काबालो (१९३८) ही दोन धरणे बांधण्यात आली आहेत. तिसऱ्या टप्प्यात सालादो नदीसंगमाच्या दक्षिणेस २० किमी. वर फाल्कोन धरण (१९५३) बांधलेले आहे. किनारी भागात ब्राउन्स−व्हिल ते माद्रो खारकच्छ यांदरम्यान २७ किमी. लांबीचा कालवा काढलेला आहे (१९३६). त्यातून जलवाहतूकही चालते.
खोऱ्यातील सु. १२,००,००० हेक्टरपेक्षा अधिक जमिनीला या नदीतून जलसिंचन केले जाते. त्यापैकी दोन-तृतीयांश क्षेत्र अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील आहे. नदीच्या पाण्यावर बटाटे, अल्फाल्फा, कापूस, लिंबू जातीची फळे, भाजीपाला इ. पिके घेतली जाताक. मुख्यतः त्रिभुज प्रदेशात बागशेती जास्त प्रमाणात केली जाते. शेती, पशुपालन, खाणकाम आणि पर्यटन हे नदीखोऱ्यातील प्रमुख व्यवसाय आहेत. अल्बुकर्क (न्यू मेक्सिको), एल् पॅसो, लारेडो व ब्राउन्सव्हिल (टेक्सस) आणि स्यूदाद ह्वा रेस, न्वेहो लारेडो व माटामोरस (मेक्सिको) ही रीओ ग्रांदे नदीतीरावरील प्रमुख शहरे आहेत.
चौधरी, वसंत