रिव्हेट : ग्रीवेच्या (मानेसारख्या भागाच्या) एका टोकाला माथा असलेली धातूची आखूड खीळ. यंत्राचे व वाहनांचे धातूंचे सुटे भाग तसेच रचनात्मक जोडकामातील उदा., इमारती, पूल, टाक्या, मनोरे, बाष्पित्र (बॉयलर), भट्ट्या, धुराडी, ट्रंका, पेट्या, पन्हळ्या, वगैरे पोलादाचे सुटे घटक भाग [तुळई, कोनी छेदांचे, पन्हळी छेदाचे पट्ट पट्ट (प्लेटी), पत्रे इ.] कायमचे एकत्र जोडण्यासाठी रिव्हेटांचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. रिव्हेटांच्या साहय्याने जोडणी केलेले भाग रिव्हेट एका बाजूने तोडल्याखेरीज अलग करता येत नाहीत. औद्योगिक कामासाठी वापरण्यात येणारे रिव्हेट तांबे, पितळ, ॲल्युमिनियम, शुद्ध लोखंड, मृदू पोलाद, अगंज (स्टेनलेस) पोलाद इ. धातूंपासून बहुधा तयार केलेले असतात. लोखंडी रिव्हेट नेहमी यंत्रावर घडवितात व त्यांच्या एका टोकाला माथा (डोके) बनविलेला असतो. रिव्हेटाचे सामान्यतः माथा, ग्रीवा व शेपूट असे तीन भाग असतात. शेपूट हा भाग आ. १ मध्ये दाखविल्याप्रमाणे किंचित निमुळता असतो. ग्रीवेचा व्यास महत्त्वाचा असतो म्हणून तोच सर्वत्र नमूद करतात (याला रिव्हेटाचा व्यास असेही म्हणतात). १.५ ते ५० मिमी. व्यासाच्या ग्रीवेच्या रिव्हेटांचे उत्पादन केले जाते. ग्रीवेच्या व्यासाच्या प्रमाणात त्याच्या इतर भागांच्या आकारमानांचे माननीकरण (प्रमाणीकरण) निश्चित केलेले असते. ग्रीवेची लांबी जोडावयाच्या भागांच्या जाडीइतकीच असते. शेपटीची लांबी रिव्हेटाच्या ग्रीवेच्या व्यासाच्या सु. सव्वापट असते व रिव्हेटाच्या दुसऱ्या बाजूचा माथा यापासून हाताने किंवा यंत्राने तयार करतात. रिव्हेट हा त्याची धातू, माथ्याचा आकार, ग्रीवेचा व्यास व लांबी यांवरून मुख्यत्वे ओळखला जातो. भरीव, पोकळ व विभाजित (किंवा द्विदली) असेही त्यांचे वर्गीकरण करण्यात येते. आ. २ मध्ये रिव्हेटांचे मुख्य प्रकार दाखविले आहेत.
रिव्हेट बसविणे : रिव्हेट बसविण्यासाठी प्रथम जोडावयाच्या दोन अथवा तीन भागांत किंवा पट्ट तुकड्यांत छिद्रण यंत्राणे दोन अथवातीन भागांत किंवा पट्ट तुकड्यांत छिद्रण यंत्राने अथवा दाब यंत्रातील मुद्राकारकाने किंवा दाबछिद्रण यंत्रानेछिद्रे पाडावी लागतात. नंतर अशा छिद्रात हवे ते रिव्हेट सारून छिद्राच्या बाहेर येणाऱ्याग्रीवेच्या टोकाला (शेपटाला) ठोकून ठोकून माथ्याचा आकार द्यावा लागतो.
त्यासाठी धातूचा भागाच्या अथवा पट्टाच्या जाडीशी योग्य अशा जाडीचा रिव्हेट वापरावा लागतो. रिव्हेट बसविण्याच्या क्रियेत ग्रीवेचा व्यास वाढत असल्याने छिद्राचा व्यास मुळात रिव्हेटाच्या व्यासापेक्षा किंचित मोठा ठेवावा लागतो म्हणून छिद्राचा व्यास व पट्टाची जाडी यांच्या मापींचे रिव्हेटाच्या व्यासाशी मानकीकरण केलेले असते. रिव्हेटाच्या नंतर घडविलेला माथा ज्या पृष्ठभागावर टेकतो तेथून द्रव, वाफ अथवा वायू पदार्थांची झिरप (गळती) होऊ नये म्हणून फटबंदी करण्यासाठी किनार मारण्याचे बोथट छिन्नीसारखे हत्यार वापरतात. तसेच पट्ट्याच्या कडा ज्या भागावर टेकतात त्या कडांची किनार अशा बोथट छिन्नीने ठोकून ठोकून रुतवतात. आ. ३ वरून याची कल्पना येईल. ही छिन्नी जवळजवळ पट्ट्यांच्या जाडीइतकी जाड असेल,तर रिव्हेट जोड अधिक समाधानकारक होतो. फटबंदीचे काम सोपे करण्यासाठी पट्ट्यांच्या कडा जोडण्यापूर्वी त्या ८००च्या कोनात कापतात. फटबंदीनंतर हा कोन ८५०चा होतो. फटबंदीसाठी सामान्यतः हवेच्या दाबावर चालणाऱ्यायंत्राचा उपयोग करतात.
रिव्हेट सांधे : यात कड सांधा (किंवा सीमा सांधा) व आरोहक सांधा असे दोन प्रकार आहेत. कड सांध्यात जोडावयाच्या पट्ट्यांच्या कडा एकमेकींशी टेकून पट्ट्यांच्या एका किंवा दोन्ही अंगांवर निराळे आच्छादक पट्ट ठेवून रिव्हेटाने जोडकाम करतात. जोडावयाच्या पट्टाच्या जाडीशी आच्छादक पट्टाची जाडी प्रमाणित असते. आरोहक सांध्यात, जोडावयाच्या दोन पट्टांची अंगे एकमेकांवर ठेवून रिव्हेटाने जोडकाम करतात. या दोन्ही प्रकारच्या सांध्यांत रिव्हेटांच्या एक किंवा अनेक रांगा सरळ रेषेत (साखळी पद्धत) अथवा असमचित रचनेत (सर्पिल पद्धत) रिव्हेट जोडाचे बल वाढविण्यासाठी वापरतात. या पद्धतींना एकरी, दुहेर, तिहेरी इं. रिव्हेट जोड म्हणतात. रिव्हेटाच्या रांगेच्या रेषेला अक्षरेषा म्हणतात. मात्र दोन रांगांतील समांतर अक्षरेषांच्या मधील अंतर, रांगेतील लगतच्या दोन रिव्हेटांच्या मध्यबिंदूमधील अंतर (अंतराल) आणि पट्टाच्या कडेपासून पहिल्या रांगेच्या अक्षरेषेमधील अंतर (माया) किती असावे हे रिव्हेटाच्या व्यासाशी प्रमाणित केलेले असते. कारण रिव्हेट जोडावर बव्हंशी ताण व कर्तन प्रतिबले [⟶पदार्थाचे बल] येतात. आ. ४ मध्ये रिव्हेट सांधे व प्रकार दाखविले आहेत. त्यांची प्रमाणित मापेही दर्शविली आहेत.
रिव्हेटाचा सांधा पुढीलपैकी कोणत्याही कारणाने तुटणे शक्य असते : (१) दोन रिव्हेयटांमधील अंतर कमी असेल, तर पट्ट तुटतो.(२) रिव्हेट पट्टाच्या जास्त कडेला असेल, तर रिव्हेटापासून कडेपर्यंत पट्ट फाटतो. (३) रिव्हेटाचा व्यास आवश्यकतेपेक्षा कमी असेल, तर रिव्हेट तुटतो. (४) रिव्हेट अगर पट्ट चिरडण्यामुळे रिव्हेट तुटतो. वरील गोष्टींसाठी रिव्हेटाचे बल अजमावणे जरूरीचे असते आणि त्यासंबंधीचे विवेचन ‘पदार्थाचे बल’ या नोंदीत दिलेले आहे.
रिव्हेटाने दोन भाग कायमचे एकत्र जोडले की, त्यास पक्का रिव्हेट जोड म्हणतात परंतु सांडशी, कात्री, पकड, व्यासमापक अशा सारख्या हत्यारांचे दोन भाग रिव्हेटाने एकमेकांशी हलू शकतील असे जोडले की, त्यास सैल रिव्हेट जोड म्हणतात.
रिव्हेट बसविण्याच्या पद्धती : ५ मिमी. व्यासापर्यंतची पोलादाचे रिव्हेट व १० मिमी. व्यासापर्यंतचे मऊ धातूचे रिव्हेट शीत अवस्थेत हातोडीने ठोकून तसेच वा दाब यंत्राच्या साहाय्याने माथा घडवून बसवितात. यापेक्षा जास्त व्यासाचे रिव्हेट अशाच पद्धतींनी पण तप्त अवस्थेत माथा घडवून बसवितात.
हात-पद्धत : शीत हात-पद्धतीत आ.५ मध्ये दाखविल्याप्रमाणे रिव्हेटाचा मूळ माथा पोलादी आधार उखळीत टोकवून जोडावयाच्या भागांच्या किंवा पट्टांच्या छिद्रांतून बाहेर आलेल्या ग्रीवेच्या कड भागावर प्रथम हातोडीच्या सपाट तोंडाने घाव घालून माथ्याला साधारण आकार देतात. शेवटी अशा साधारण घडविलेल्या माथ्यावर पोलादी माथा रूपक ठेवून त्यावर होतोडीने भारी घाव घालून माथ्याचे अंतरूपण करतात. तप्तहात-पद्धतीत रिव्हेटाचा माथा घडविण्याचा भाग प्रथम भट्टीत तापवून नंतर शीत हात-पद्धतीप्रमाणेच माथा घडवून रिव्हेट बसविण्याची क्रिया पूर्ण करतात.
यंत्र-पद्धत : औद्योगिक उत्पादन कामात रिव्हेट जलद बसविण्यासाठी वाफ, द्रव, संपीडित (दाबाखालील) वायू, विद्युत् व यांत्रिक शक्तीवर चालणारी यंत्रे वापरतात. अशा यंत्रात रिव्हेटाचा माथा घडविण्यासाठी दाब वा परिवलनी प्रेरणांचा उपयोग करतात.
विद्युत् यंत्रात रोहित्रातून (चुंबकीय प्रवर्तनाद्वारे विद्युत् दाब बदलणाऱ्या साधनातून) विद्युत् अग्राला दिला जातो व त्याच्या रोधनाने रिव्होटाच्या ग्रीवेचे टोक तप्त होते. नंतर विद्युत् प्रवाह बंद करून विद्युत् अग्रावर यांत्रिक योजनेने दाब देऊन रिव्हेटाचा माथा घडविला जातो. द्रविक यंत्रात दोन भाग असून चौकटी वरील भागांत सिलिंडर व पोलादी चल मुद्रा बसविलेली असते व समोरच्या दुसऱ्या भागात अचल मुद्रा बसविलेली असते. सिलिंडरामधील दट्ट्या स्थिर दाबाने द्रवाने (तेलाने वा पाण्याने) रेटला जाऊन चल मुद्रा रिव्हेटाच्या ग्रीवेचे पिळणक्रियेने माध्यात रूपांतर करते. अशाच प्रकारच्या दुसऱ्या एका यंत्रात दाब देण्यासाठी द्रवाच्या ऐवजी वाफेचा उपयोग केला जातो. रिव्हेट बसविण्याची हातात धरून वापरण्याची सुबाह्य यंत्रेही उपलब्ध आहेत. या यंत्रात आवाजाचा त्रास होत नाही. एका प्रकारच्या वातचलित यंत्रात द्रविक यंत्राप्रमाणेच रचना असून सिलिंडरामधील दट्ट्या संपीडित वायूने (हवेने) रेटून मुद्रेवर दाब दिला जातो व ग्रीवेचे रूपांतर माथ्यात होते. दुसऱ्या प्रकारच्या वातचलित यंत्रात सिलिंडरामधील दट्ट्याला संपीडित वायूने जलद पश्चाग्र गती देऊन आघाताने ग्रीवेचा माथा घडविला जातो. रिव्हेट बसविण्याची सुबाह्य वातचलित यंत्रेही असतात पण या यंत्रांचा आवाज फार होतो. घूर्णी कंपन यंत्रात विकेंद्री भूमितीय केंद्राच्या संदर्भात एका बाजूला बसविलेल्या) यंत्रणेने एका फिरत्या दंडिकेला कंपने पुरवितात व अशा अंतरिक आघातांनी ग्रीवेचा माथा घडविला जातो. परिवलनाची व अशा अंतरिक आघातांनी ग्रीवेचा माथा घडविला जातो. परिवलनाची यंत्रात रिव्हटाच्या मूळ माथ्याच्या उलट आकाराचे पोलादी सैल आसावरील जुळे रूपण लाटे एका फिरत्या उभ्या किंवा आडव्या दंडिकेवर बसविलेले असून ते ग्रीवेच्या टोकावर यांत्रिक योजनेने दाबले जाऊन माथा घडविला जातो. रिव्हेटाच्या ग्रीवेच्या टोकात बंद छिद्र असलेले रिव्हेट हलक्या कामासाठी (उदा., टंकलेखन यंत्राच्या जोडणासाठी) वापरतात. अशा रिव्हेटांना बंदमुखी रिव्हेट म्हणतात. हे रिव्हेट बसविण्यासाठी छिद्रण यंत्राच्या रचनेचे परिवलनी यंत्र वापरतात. या यंत्रातील उभ्या फिरत्या दंडिकेचे निमुळते टोक बंद छिद्रात टेकवून यांत्रिक दाब दिल्याने परिवलनी व दाब क्रियांनी रिव्हेटाचा माथा तयार होतो. आ. ६ मध्ये रिव्हेट बसविण्याच्या दोन निरनिराळ्या परिवलनी यंत्रपद्धती एकाच रिव्हेटावर दाखविल्या आहेत.
वरील पद्धतीखेरीज पोकळ रिव्हेट बसविण्याच्या दोन विशिष्ट पद्धती आ. ७ वरून स्पष्ट होतील. स्फोटन पद्धतीत रिव्हेट अर्ध पोकळ असून त्याच्या ग्रीवेच्या पोकळीत स्फोटक पदार्थ भरतात व त्याचा विद्युत् ठिणगीने स्फोट घडवून आणतात. त्यामुळे ग्रीवेच्या टोकाला माथ्याचे रूप येते. दंडाधार पद्धतीत पूर्ण पोकळ रिव्हेट असून त्याच्या पोकळीतून एक पोलादी आधार दंड ओढून वर घेतात. त्यामुळे रिव्हेटाच्या ग्रीवच्या टोकाचे माथ्यात रूपांतर होते.
उपयोग : भरीव रिव्हेट वजनाने भारी असलेल्या कामासाठी, तर पोकळ रिव्हेट वजनाने हलक्या असलेल्या कामासाठी वापरतात. विभाजित वा द्विदली रिव्हेट चामडे व कॅनव्हास यांचे भाग एकत्र जोडण्यासाठी वापरतात. अशा भागांत ते ठोकल्याने आपोआप छिद्र पडते व ग्रीवेची द्विदल टोक फाकून रुतल्याने रिव्हेट बसविण्याची क्रिया होते. सर्वसाधारण कामासाठी चपटा, गोल किंवा फुलपात्री माथा असलेले रिव्हेट वापरतात. बुगडी माथा रिव्हेटाचा दाब जास्त पृष्ठभागावर बसत असल्याने तो पातळ भागांसाठी वापरतात. तिरपमारी चपटा माथा रिव्हेट हा जोडावयाच्या पृष्ठभागाशी समपातळीत बसतो. तिरपमारामुळे जोडाचे बल वाढते. पट्टाजोड रिव्हेट हा चामडे व कॅनव्हास यांचे पट्टे जोडण्यासाठी वापरतात. हे बहुधा तांब्याचे असतात. सूळ माथा रिव्हेट पोलादाचे असून बाष्पित्राच्या जोडकामासाठी वापरतात. पत्रा जोड रिव्हेट हे पत्राकारागीर (टिन मेकर) पत्र्यांच्या जोडकामासाठी वापरतो. रिव्हेटचा माथा ऐरणीवर ठेवून पत्रे ग्रीवेच्या टोकावर टेकवून त्यावर एक नट ठेवतात. हातोडीने नटावर घाव घातला की, पत्र्यांत आपोआप छिद्र पडून ग्रीवेचे टोक बाहेर येते. चाप रिव्हेटाचे दोन भाग असून एका भागाचे टोक दुसऱ्या भागाच्या पोकळीत ठोकून घट्ट बसते. चामडे, मेणकापड व कॅनव्हास यांच्या जोडकामासाठी असे रिव्हेट वापरतात. अर्ध व पूर्ण पोकळ रिव्हेट हलक्या कामासाठी जेथे टोकाकडे नेहमीप्रमाणे माथा तयार करता येत नाही अशा ठिकाणी उदा., बस गाडीच्या साट्याचे सांधे, खिडक्यांचे सांगाडे, पोकळ चौरस नळ्यांचे जोडकाम यांत व विशेषतः विमान बांधणीत वापरतात. ॲल्युमिनियमाच्या रिव्हेटांचे कालकठिनीकरण (कालमानानुसार होणाऱ्या वातावरणीय तापमान बदलांमुळे कठीण बनण्याची क्रिया) होऊन ते वापरण्यास अयोग्य होतात म्हणून ते शीतपेटीत ठेवावे लागतात.
संदर्भ : 1. Baumeister, T., Ed., Mark’s Standard Handbook for Mechanical Engineers, New York, 1978.
2. Institute for Power System, Handbook of Industrial Fasteners, 1979.
3. Wilson, F. W. Harvey. P. D. Ed., Tool Engineers’ Handbook, New York, 1959.
कुबेर, ह. वा. दीक्षित, चं. ग.
“