रिव्हार, ज्योकी एलियोदोरू द कुन्या : (१८००−७९). कोकणी व मराठी भाषांचा पोर्तुगीज विद्वान, इतिहासकारक व संपादक. पोर्तुगालमधील एन्हॉर शहरी त्याचा जन्म झाला. त्याचे वडील आंतोनियु फ्रांसिश्कु रिव्हार हे इटालियन होते, तर आई मारिया इझाबेल काश्तेलु ब्रान्कु स्पॅनिश होती. १८२४ मध्ये कोईब्राच्या विद्यापीठात प्रवेश मिळवून १८३६ मध्ये वैद्यकशास्त्राचा अभ्यासक्रम त्याने पुरा केला परंतु वैद्यकीय पेशा न चालविता, एव्हॉरमध्ये तत्त्वज्ञानाचा शिक्षक म्हणून त्याने काम स्वीकारले. त्याचबरोबर एव्हॉरच्या ग्रंथपाल म्हणूनही काम केले. त्याने ग्रंथालयाची पुनर्रचना केली आणि ८,००० ग्रंथासाठी नवीन इमारत उभारली. पोर्तुगालमध्ये सर्वत्र विखुरलेल्या प्राचीन धर्ममठांतून त्याने सु. दहा हजार महत्त्वपूर्ण ऐतिहासिक ग्रंथ परिश्रमपूर्वक मिळवून एकत्र केले. तसेच एकट्याने ग्रंथालयातील सर्व ग्रंथाची सूचीही तयार केली. १८४२ मध्ये फ्रांसिश्कु जुझे फेर्रैर याच्या सहकार्याने त्याने आपला रेफ्लेक्साँइश सोब्रि अ लिंग्व पोर्तुगेझ (म. शी. पोर्तुगीज भाषाविषयक विचार) हा ग्रंथ प्रसिद्ध केला. १८५० मध्ये त्याने आशिया, आफ्रिका आणि अमेरिकेतील पोर्तुगीज वसाहतींतील महत्त्वाच्या हस्तलिखित कागदपत्रांची जंत्री प्रसिद्ध केली.
गोव्याचे राज्यपाल व्हिश्कोंदिद् तोर्रिश नॉव्हश यांचे मुख्य सचिव म्हणून कुन्य रिव्हारची १८५५ मध्ये झाली. त्याचे गोव्यात आगमन म्हणजे कोकणी भाषेच्या पुनरुत्थानाच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाची घटना होय. आपल्या कारकीर्दीत कुन्य रिव्हारने राज्यकारभार, शिक्षण, उद्योगधंदे, अर्थकारण या क्षेत्रांत बहुमोल सुधारणा केल्या.
पोर्तुगीज सरकारने १८५८ साली त्याच्यावर जुआंव किंवा ⇨झ्युआंउ द बार्रुश आणि दिओगु द कौतु (दियोगु द कोउतु) या इतिहासकारांच्या ग्रंथांतील संशोधन पुढे चालू ठेवण्याची कामगिरी सोपविली. त्या निमित्ताने त्याला विपुल प्रवास करावा लागला. पोर्तुगीजांनी मागे ठेवलेल्या ऐतिहासिक कागदपत्रांच्या व अवशेषांचा मागोवा घेत त्याने सर्व भारत पालथा घातला.
कुन्य रिव्हारने पानोरामा, आर्किव्हु उनिव्हेर्साल, रेव्हिश्त उनिव्हेर्साल लिश्बोनॅन्सि यांसारख्या नियतकालिकांत महत्त्वपूर्ण संशोधनात्मक लेख लिहिले. १८५७ मध्ये ⇨फादर स्टीफन्स (१५४९−१६१९) याच्या आर्ति द लिंग्व कानारीं (१६४०) या कोकणीच्या व्याकरणाची नवीन आवृत्ती प्रसिद्ध केली. तसेच सतराव्या शतकात, एका पोर्तुगीज धर्मप्रचारकाने लिहिलेला ग्रामातिक द लिंग्व कोंकानी नु दियालेतु दु नॉर्ति हे कोकणीच्या उत्तरेकडील बोलीतले व्याकरण १८५८ मध्ये प्रसिद्ध केले. तसेच फ्रेंच प्रवासी फ्रांस्वा पिरार द् लाव्हाल याचा प्रवासवर्णनपर ग्रंथ पोर्तुगीजामध्ये भाषांतरित करून टीपांसहित प्रसिद्ध केला. १८५८ साली गोव्यात प्रसिद्ध झालेला त्याचा अँसाय्यु इश्तोरिकु द लिंग्व कोंकानी (कोकणी भाषाविषयक ऐतिहासिक निबंध) या ग्रंथात गोव्याच्या पुराभिलेख संग्रहातील कोकणी−मराठी ग्रंथाची सूची दिलेली आहे, त्या ग्रंथाचा परामर्श घेण्यात आला आहे आणि आपल्या मातृभाषेचा रास्त अभिमान धरून तिचा विकास करण्यासाठी कंबर कसण्याचे कोकणी भाषिकांनी कळकळीचे आवाहनही केले आहे.
शिक्षणक्रमात कोकणी भाषेच्या अभ्यासाला उत्तेजन देण्याच्या उद्देशाने त्याने आदव्हेतेंसियज्ञ आउश प्रोफेसोरिश पिमारियुष सोब्रि उ एंसिनु द लिंग कोंकानी (कोकणी भाषाशिक्षणाविषयी प्राथमिक शिक्षकांस सूचना) हे पुस्तक लिहिले. या पुस्तकात, कोकणी ही गोमंतकीय मुलांची पहिली भाषा असल्यामुळे तिचा प्राथमिक शिक्षणात आवर्जून अंतर्भाव केला पाहिजे, असे प्रतिपादन केले गेले आहे. कुन्य रिव्हारने केलेल्या शिफारशी गव्हर्नर तॉर्रिश नॉव्हश यांनी आपल्या १८५९ च्या शिक्षणविषयक जाहीरनाम्यात स्वीकारल्या. परंतु १८६९ साली गव्हर्नर पेस्तान यांनी कोकणीची शिक्षणक्रमातून हकालपट्टी केल्यामुळे कुन्य रिव्हारच्या योजनांवर पाणी पडले. त्याने १८७० मध्ये आपल्या हुद्याचा राजीनामा दिला, तरी तो गोमंतकात १८७७ पर्यंत राहिला. इष्टमित्रांचा प्रखर विरोध सहन करावा लागल्यामुळे त्याचे अखेरचे जीवन कष्टमय व एकाकी झाले. एव्हॉरमध्ये त्याचे निधन झाले.
सरदेसाय, मनोहरराय