रिबैरु, दिओगु पाद्री : (? १५६०−१८ जून १६३३). कोकणी भाषेचा शब्दकोशकार व जेझुइट धर्मप्रचारक. जन्म लिस्बन (पोर्तुगाल) मध्ये. गोव्यातील सासष्टी तालुक्यातील रायतूरच्या (पोर्तुगीज राशोल) कॉलेजमध्ये त्याची नेमणूक झाली. तेथे त्याने संस्कृत, हिंदी, मराठी व कोकणी या भाषांचा अभ्यास केला. क्रिस्तपुराण (१६१६) रचणारे ⇨फादर स्टीफन्स (१५४९−१६१९) यांच्या दौत्रीन क्रिश्तां (१६२२, म. शी. ख्रिस्ती धर्मतत्त्व) व आर्ति द लिंग्व कानारीं (१६४०, म. शी. कोकणी भाषेचे व्याकरण) या ग्रंथांचे परिशीलन करून आणि त्यांत आवश्यक त्या सुधारणा करून, त्यांच्या नवीन आकृत्या रिबैरूने सादर केल्या. १६३४ साली त्याने देक्लारासांव द दौत्रीन क्रिश्तां (१६३२, म. शी. ख्रिस्ती धर्म तत्त्वदर्शन) हा ग्रंथ कोकणीत रचला. जेझुइट पंथांचे कार्डिनल बेलार्मिनो यांच्या सिम्बोलुम फिदै या लोकप्रिय ग्रंथावरून तो रचिला गेला. फादर स्टीफन्सने आपला दौत्रीन क्रिश्तां हा ख्रिस्ती धर्मतत्त्व ग्रंथ मुख्यतः नवख्रिस्ती आणि मुले यांच्यासाठी रचिला होता, तर रिबैरू आपला ग्रंथ प्रौढांसाठी आणि हिंदूंसाठी लिहिला आहे. फादर स्टीफन्सच्या ग्रंथातील गुरू-शिष्य संवादाचे स्वरूप त्रोटक आहे, तर रिबैरूच्या ग्रंथात शिष्याच्या प्रश्नांना गुरू तपशीलवार उत्तरे देतो. या ग्रंथात ख्रिस्ती धर्मविषयक विचार व्यक्त करण्यासाठी संस्कृत पारिभाषिक शब्दांचा रिबैरू विपुल प्रमाणात उपयोग करतो. उदा., अमृत, वैकुंठ, अग्निप्रवेश, अवतार, देवस्थान, धर्म इत्यादी.

रिबैरूचा महत्त्वपूर्ण ग्रंथ म्हणजे ‘कोकणीचा शुब्दसंग्रह’. या ग्रंथाचे दोन भाग आहेत : (१) व्हॉकाबुलारियु द लिंग्व कानारीं व्हेर्तिदु दु पुर्तुगेश पेलु पाद्रि दियोगु रिबोरू (१६२६, म. शी. कोकणी भाषेचा पोर्तुगीज−कोकणी शब्दकोश−कर्ता पाद्रि दियोगु रिबैरू) आणि (२) फैतु पेलु पाद्रिश दा कॉम्पानीय द् जेझू (१६२६, म. शी. जेझुइट पाद्रींनी तयार केलेला कोकणी शब्दसंग्रह). यात एकंदर १५,५०० शब्दांच्या नोंदी असून, शब्दसंग्रहाबरोबरच रिबैरू कोकणी भाषेतील महत्त्वाचे वाक्प्रचार व म्हणीही नमूद करतो. उदा., ‘अडचे आयलें अडचे गेलें’ (कष्ट न करता आले, सहज गेले) ‘चाकरी करुंची, भाकरी खावंची’ (चाकरी करून भाकरी खावी) ‘आपले नाशें पेल्याचे हांशे’ (आपले नुकसान व लोक हसतात) ‘मडें थंड रडें’ (मढे दिसल्यावर रडू येते) इत्यादी. या शब्दसंग्रहावरून सतराव्या शतकातील कोकणी भाषेच्या स्वरूपावर थोडाफार प्रकाश पडतो. या ग्रंथीची प्रत पणजीच्या ‘सेंट्रल लायब्ररी’ मध्ये उपलब्ध आहे.

सासष्टी, गोवा येथे तो निधन पावला

सरदेसाय, मनमोहनराय