रिचर्ड्स, डिकिन्सन वुड्रफ : (३० ऑक्टोंबर १८९५−२३ फेब्रुवारी १९७३). अमेरिकन वैद्य. हृद्-शलाका तंत्र (तपासणीसाठी हृदयात पोकळ नलिकाकार उपकरण नीलेतून सरकविण्याचे तंत्र) आणि रक्ताभिसरण तंत्राचे (संस्थेचे) विकृतिविज्ञान यांविषयीच्या संशोधनाबद्दल रिचर्ड्स यांना ⇨आद्रें फ्रीदरिक कूरनांद आणि ⇨व्हेर्नर फॉसमन यांच्या समवेत १९५६ चे शरीरक्रियाविज्ञान किंवा वैद्यक या विषयाचे नोबेल पारितोषिक विभागून मिळाले.
रिचर्ड्स यांचा जन्म ऑरेंज (न्यू जर्सी) येथे झाला. येल विद्यापीठात शिक्षण घेऊन १९१७ मध्ये त्यांनी ए. बी. पदवी मिळवली. दोन वर्षे सैन्यात काम केल्यानंतर त्यांनी कोलंबिया विद्यापीठाच्या कॉलेज ऑफ फिजिशिअन्य अँड सर्जन्स या संस्थेत शिक्षण घेऊन शरीरक्रिया विज्ञानाची एम्. ए. (१९२२) व पुढे त्याच विद्यापीठाची एम्. डी. (१९२३) या पदव्या संपादन केल्या. १९२३−२७ या काळात न्यूर्योर्कमधील प्रॅसबिटिरीयन हॉस्पिटलमध्ये नोकरी केल्यानंतर ते लंडनला गेले व तेथील नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर मेडिकल रिसर्च या संस्थेत सर हेन्रीक डेल यांच्या मार्गदर्शनाखाली यकृतातील रक्तभिसरणाच्या नियंत्रणावर एक वर्ष संशोधन केले.
प्रेसबिटिरीयन हॉस्पिटलमध्ये परतल्यानंतर रिचर्ड्स यांनी फुप्फुस व रक्ताभिसरण शरीरक्रियाविज्ञानाविषयी हार्व्ह्रड विद्यापीठातील प्रध्यापक एल. जे. हेंडरसन यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन केले. १९३१ पासून न्यूयॉर्कमधील बेल्विह्यू हॉस्पिटलमध्ये त्यानी आंद्रे कूरनांद यांच्याबरोबर काम सुरू केले. १०४० मध्ये या सहकार्यातून हृद-शलाका तंत्र विकसीत झाले. या तंत्राचा १९४१−५६ या काळात प्रत्यक्ष उपयोग करून आघातजन्य अवसाद (रक्तप्रवाहामध्ये एकदम बिघाड झाल्याने होणारा शक्तिपात), जन्मजात हृद् विकृतीचे निदान, हृदपातासंबंधीचे शरीरक्रियाविज्ञान, औषधांचा हृदयावरील परिणाम, चिरकारी (दीर्घ कालीन) हृदय व फुप्फुस विकारांत त्यांच्या कार्यात होणाऱ्या बिघाडांचे विविध प्रकार व त्यावरील उपचार यासंबंधी रिचर्ड्स यांनी १९२९ मध्ये लावला होता परंतु त्याचा निदानात्मक व उपचारातील उपयोग रिचर्ड्स व कूरनांद यांनी सप्रयोग सिद्ध केला.
इ. स.१९४५ मध्ये रिचर्ड्स यांनी कोलंबिया विद्यापीठात वैद्यकाचे प्राध्यापक आणि बेल्व्ह्यू हॉस्पिटलामध्ये अग्यागत वैद्य व प्रथम विभागाचे संचालक म्हणून नेमणूक झाली. १९४७ मध्ये ते वैद्यकाचे लँबर्ट प्राध्यापक झाले. १९६१ मध्ये अध्यासनावरून निवृत्त झाल्यावर ते गुणश्री लँबर्ट प्राध्यापक झाले.
अमेरिकन रिव्ह्यू ऑफ ट्यूबर्क्युलोसिस या नियतकालिकाचे ते काही काळ संपादक होते. याशिवाय मेडिसीन आणि सर्क्युलेशन या नियतकालिकांच्या संपादकीय मंडळावरही त्यांनी काम केले. १९५८ मध्ये अमेरिकेच्या नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसच्या सदस्यत्वावर त्यांची निवड झाली. ते लेकव्हिल (कनेक्टिकट) येथे मरण पावले.
भालेराव, य. त्र्यं.