राँटगेन, व्हिल्हेल्म कोनराट : (२७ मार्च १८४५ −१० फेब्रुवारी १९२३). जर्मन भौतिकीविज्ञ. ⇨ क्ष-किरणांच्या शोधाकरिता ते विशेष प्रसिद्ध असून या शोधाकरिता त्यांना १९०१ मध्ये भौतिकीचे पहिले नोबेल पारितोषिक देण्यात देण्यात आले. या शोधामुळे आधुनिक भौतिकीचे युग सुरू झाले व वैद्यकशास्त्रात मोठी क्रांती घडून आली.
राँटगेन यांचा जन्म प्रशियातील लेनेप येथे झाला. झुरिक येथील पॉलिटेक्निकमध्ये त्यांनी यांत्रिक अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. याचबरोबर ते आर्. जे. ई. क्लॉसियस यांच्या व्याख्यानांना उपस्थित राहिले आणि ए. ए. कुंट यांच्या प्रयोगशाळेतही त्यांनी काम केले. १८६९ मध्ये त्यांनी झुरिक विद्यापीठाची पीएच्. डी. पदवी संपादन केली. त्यानंतर कुंट याचे साहाय्यक म्हणून त्यांनी प्रथम वुर्ट्सबर्ग येथे व पुढे स्ट्रॅस्बर्ग येथे काम केले (१८६९−७४). १८७४ मध्ये स्ट्रॅस्बर्ग विद्यापीठात अध्यापक म्हणून अर्हता प्राप्त झाल्यावर त्यांनी होअनहाइम (१८७५), पुन्हा स्ट्रॅस्बर्ग (१८७६−७९), गीसेन (१८७९−८८) व वुर्ट्सबर्ग (१८८८−१९००) येथे अध्यापक केले. पुढे १९०० साली म्युनिक विद्यापीठात भौतिकीच्या अध्यासनावर त्यांची नेमणूक झाली आणि अखेरपर्यंत त्यांनी तेथेच अध्यापन व संशोधन केले.
राँटगेन यांचे पहिले संशोधन कार्य १८७० मध्ये प्रसिद्ध झाले व ते वायूंच्या विशिष्ट उष्णतांसंबंधी [⟶ उष्णता] होते. त्यानंतर त्यांनी स्फटिकांची ऊष्मीय संवाहकता, क्वॉर्ट्झाचे विद्युत् व इतर गुणधर्म, निरनिराळ्या द्रायूंच्या (द्रव व वायू यांच्या) प्रणमनांकावर (प्रकाशाचा निर्वातातील वेग व त्याचा दिलेला माध्यमातील वेग यांच्या गुणोत्तरांवर) दाबाचा होणारा परिणाम, विद्युत् चुंबकीय प्रभावामुळे ध्रुवित (एकाच प्रतलात कंपने होणाऱ्या) प्रकाशाच्या प्रतलात होणारा बदल, ⇨दाबविद्युत् वगैरे विविध प्रशनांसंबंधी संशोधन केले. तथापि त्यांचे नाव क्ष-किरणांच्या शोधाशीच मुख्यत्वे निगडित आहे. १८९५ मध्ये ते काचनलिकेतील अतिशय नीच दाब असलेल्या वायूतून वाहणाऱ्या विद्युत् प्रवाहाशी संबंधित असलेल्या आविष्काराविषयी [⟶ ऋण किरण] संशोधन करीत होते. त्या वेळी ही नलिका कार्यान्वित असताना जवळपास ठेवलेल्या व एका बाजूला बेरियम प्लॅटिनोसाइड लावलेल्या कागदी पट्टीपासून प्रकाश उत्सर्जित होतो, असे त्यांना आढळून आले. याचे स्पष्टीकरण देण्यासाठी ऋण किरण (इलेक्ट्रॉन) नलिकेच्या काचभित्तीवर आदळले तेव्हा कोणते तरी अज्ञात प्रारण (तरंगरूपी ऊर्जा) तयार होऊन ते खोलीतून जाऊन त्या रसायनावर आदळले व त्यामुळे अनुस्फुरण निर्माण झाले, असा सिद्धांत राँटगेन यांनी मांडला. नंतर केलेल्या प्रयोगांवरून कागद, लाकूड व ॲल्युमिनियम हे या किरणांना पारदर्शक असून निरनिराळ्या जाडीच्या वस्तू या किरणांच्या मार्गांत ठेवून छायाचित्रण काचपट्टीवर नोंद केली असता या किरणांच्या बाबतीत त्या वस्तूंची पारदर्शकता निरनिराळी असल्याचे त्यांना दिसून आले. या किरणांच्या मार्गात स्वतःच्या पत्नीचा हात ठेवून छायाचित्रण काचपट्टीवर नोंद केली असता त्यात किरणांना अपारदर्शक असलेली हाडे आणि बोटातील अंगठी यांच्या गडद छाया व त्यांभोवती किरणांना अधिक पारगम्य असलेल्या मासांची अंधूक छाया त्यांना आढळली. हे किरण प्रकाशाचे परावर्तन वा प्रणमन (एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात शिरताना दिशेत बदल होणे) यांसारखे गुणधर्म लक्षणीय रूपात दाखवीत नसल्याने त्यांनी हे किरण प्रकाशाशी संबंधित नाहीत, असा चुकीचा निष्कर्ष काढला. या किरणांच्या अनिश्चित स्वरूपामुळे राँटगेन यांनी त्यांना क्ष-किरण (X-rays) असे नाव दिले. तथापि ते ‘राँटगेन किरण’ या नावानेही ओळखले जातात. पुढे माक्स फोन लौए व त्यांचे शिष्य यांनी या किरणांची उच्च कंप्रता (एका सेकंदात होणारी कंपनांची संख्या) हाच त्यांतील फरक आहे, असे दाखविले.
नोबेले पारितोषिकाखेरीज राँटगेन यांना लंडनच्या रॉयल सोसायटीचे रम्फर्ड पदक (१८९६), कोलंबिया विद्यापीठाचे बर्नार्ड पदक (१९००) आणि इतर अनेक बहुमान व सन्माननीय पदव्या मिळाल्या. ते उत्तम गिर्यारोहक होते. म्युनिक येथे ते मृत्यू पावले.
भदे, व. ग.