रॉकफेलर प्रतिष्ठान : जगातील मानवजातीच्या कल्याणास चालना देण्याच्या उद्देशाने जॉन. डी. रॉकफेलर या अमेरिकन उद्योगपतीचे १४ मे १९१३ रोजी स्थापन केलेली लोकोपकारी संघटना. या प्रतिष्ठानाचे वैशिष्ट्य हे की, अन्य रॉकफेलर-स्थापित निधी व धर्मदाय संस्थांप्रमाणे स्थायिक क्षेत्रापुरते आपले कार्य मर्यादित न ठेवता, ते जागतिक स्तरावर लोकोपयोगी कार्य करते.
रॉकफेलर प्रतिष्ठानाच्या कार्यक्षेत्रात पुढील सात महत्त्वाच्या विभागांचा अंतर्भाव होतो. जागतिक पातळीवर पार पाडण्यात येणाऱ्या कार्यक्रमांत (१) भुकेवर मात, (२) लोकसंख्या नियंत्रण, आरोग्याची निगा आणि काळजी यांत सुधारणा, (३) आंतरराष्ट्रीय संबंधांमधील संघर्ष व तणाव यांचे निरसन आणि (४) विकसनशील राष्ट्रांमधील शैक्षणिक विकास, यांचा समावेश होतो. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत प्रतिष्ठानाद्वारा आखण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्ये (१) पर्यावरणविषयक गुणवत्ता साध्य करण्याचे प्रयत्न (२) सर्वांना समान संधी व (३) नाट्य, साहित्य, संगीत यांसारख्या सांस्कृतिक घटकांचा विकास, या तीन योजनांचा अंतर्भाव होतो.
प्रतिष्ठानाचे निधी व त्याची धोरणे यांचे संयोजन स्वतंत्रपणे नेमलेल्या व विनावेतन काम करणाऱ्या सुयोग्य व्यक्तींनी बनलेल्या विश्वस्त मंडळामार्फत चालते हे मंडळ विद्यापीठे, संशोधन−संस्था−संघटना आणि अन्य लायक संस्था यांना अनुदाने व देणग्या वितरित करते. प्रतिष्ठानाच्या कार्यक्रमांना दीर्घकालिक छात्रवृत्त्या व शिष्यवृत्त्या यांचीही जोड मिळत असते. प्रतिष्ठान केवळ शेती व विषाणुशास्त्र या दोनच क्षेत्रांपुरते स्वतःचे संशोधन करीत असते. व्यक्ती, स्थानिक संस्था वा त्यांच्या इमारतींचे बांधकाम यांना या प्रतिष्ठानाद्वारे आर्थिक साहाय्य वा अनुदान दिले जात नाही.
रॉकफेलरने प्रथम दहा कोटी डॉलर रकमेवर या प्रतिष्ठानाची स्थापना केली पुढे ही रक्कम १८.३ कोटींपर्यंत वाढविण्यात आली. स्थापनेपासून प्रतिष्ठानाचा स्थायी निधी बराच वाढला असून सांप्रत त्याची मत्ता ७० ते ८० कोटी डॉलरच्या घरात गेली आहे. प्रतिष्ठानाने आतापर्यंत सु. ३.७ कोटी डॉलर एवढी रक्कम देणग्यांच्या रूपाने वितरित केलेली आहे.
गद्रे, वि. रा.