जननमान : समाजात प्रतिवर्षी सजीव जन्मणाऱ्या बालकांचे त्यांच्या एकूण लोकसंख्येशी असणारे दर हजारी प्रमाण म्हणजेच स्थूल जननप्रमाण वा जननमान. निरनिराळ्या समाजांच्या जननक्षमतेची तुलना करण्यासाठी हे प्रमाण वापरतात. अर्थात प्रत्यक्षात जननक्षमता समाजामधील स्त्री आणि पुरुष ह्यांचे परस्परप्रमाण, त्यातील प्रजननक्षम वयोगटांतील स्त्रियांची संख्या व विवाहित स्त्रियांचे प्रमाण इ. घटकांवर अवलंबून असते परंतु ह्या घटकांविषयीची बिनचूक आकडेवारी बऱ्याच राष्ट्रांमध्ये उपलब्ध नसल्याने स्थूल जननप्रमाणाचाच उपयोग करावा लागतो. साधारणतः जननमान आणि समाजाचा किंवा समाजगटाचा आर्थिक विकास, औद्योगिकीकरण व शैक्षणिक पातळी ह्यांचे प्रमाण व्यस्त असते. संततिप्रतिबंधक साधनांचा वापर, उशिरा लग्ने करण्याची किंवा अविवाहित राहण्याची स्त्रियांची प्रवृत्ती यांमुळेही जननप्रमाण कमी होते. [⟶ जनांकिकी].

धोंगडे, ए. रा.