रॉकफेलर घराणे : प्रसिद्ध अमेरिकन उद्योगपतींचे दानशूर घराणे. आधुनिक खनिज तेल उद्योगाचा विकास त्याचप्रमाणे अतिशय मोठ्या प्रमाणावर परोपकारी व जनहितकारक कृत्ये करण्याचे श्रेय या उद्योगसमूहाला द्यावे लागेल. विशेषतः अमेरिकन वैद्यकशास्त्राला आधुनिकीकरणाचा साज देण्याचे कर्तृत्व या घराण्याचेच होय.
जॉन डेव्हिसन रॉकफेलर (८ जुलै १८३९−२३ मे १९३७) हा या घराण्यातील पहिला उद्योगपती, स्टँडर्ड ऑइल उद्योगसमूह व अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील पहिला तेलउद्योग यांचा संस्थापक. याचा जन्म न्यूयॉर्क राज्यातील टिओगा परगण्यातील रिचफर्ड या गावी झाला. याचे वडील एक छोटेसे व्यापारी होते. १८५३ मध्ये रॉकफेलर कुटुंब न्यूयॉर्कहून ओहायओ राज्यातील क्लीव्हलँड शहरी स्थायिक झाले. बॅप्टिस्ट संस्कारांखाली वाढलेल्या जॉनने माध्यमिक शालेय शिक्षण व व्यावसायिक महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यावर १८५९ मध्ये जॉनने क्लार्क याच्या भागीदारीत दलालीचा धंदा सुरू केला. पेन्सिल्व्हेनियातील टिट्सव्हिल येथे १८५९ मध्ये ड्रेक याने पहिल्या खनिज तेल विहिरीचे यशस्वी रीत्या वेधन केले. १८६३ मध्ये रॉकफेलरने ‘अँड्रूज, क्लार्क अँड कंपनी’ स्थापन करून तेलशुद्घीकरण उद्योग सुरू केला. दोन वर्षांनी ‘रॉकफेलर अँड अँड्रूज कंपनी’ स्थापण्यात आली. जॉनचा भाऊ विल्यम (३१ मे १८४१−२४ जून १९२२) याने जॉनच्या भागीदारीत क्लीव्हलँड येथे ‘विल्यम रॉकफेलर अँड कंपनी’ अशी दुसरी तेल कंपनी उभारली. १८६७ मध्ये वरील दोन्ही कंपन्या ‘रॉकफेलर, अँड्रूज, फ्लँग्लर अँड कंपनी’ मध्येच एकत्र करण्यात आल्या व पुढे तीन वर्षांनी वरील कंपनीऐवजी ‘स्टँडर्ड ऑइल कंपनी ऑफ ओहायओ’ अशी एक संयुक्त भांडवली कंपनी उभारण्यात येऊन जॉन डी. रॉकफेलर तिचा अध्यक्ष झाला. त्याच्या मार्गदर्शनाखाली या कंपनीने संयुक्तीकरण, अनुकूल मालवाहतूक दर, सूट अशा तत्कालीन बेकायदेशीर न समजल्या जाणाऱ्याविविध उपायांचा अवलंब करून संबंध तेल उद्योगावर आपले एकमेव नियंत्रण ठेवले. १८८२ मध्ये ‘स्टँडर्ड ऑइल ट्रस्ट’ या मोठ्या उत्पादनसंस्थेची स्थापना करण्यात आली. या ट्रस्टच्या नियंत्रणाखाली अमेरिकेतील ९५% तेलउद्योग, खाणी, लाकूड कारखाने, वाहतूक उद्योग यांसारखे अनेक उद्योग होते. १८९९ मध्ये ओहायओच्या सर्वोच्च न्यायालयाने शेर्मन ट्रस्टविरोधी कायद्यांनुसार वरील ट्रस्ट अवैध ठरविल्यामुळे त्याचे रूपांतर करण्यात आले. ही कंपनी १९११ पर्यंत निर्वेध कार्य करीत राहिली. त्या काळी खनिज तेल पदार्थांचे संबंध जगभर अत्यंत कार्यक्षम पद्धतीने उत्पादन व विपणन करणारी सर्वांत मोठी कंपनी म्हणून तिची प्रसिद्धी होती. १९११ मध्ये अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने या नियंत्रक कंपनीचे अनेक स्वतंत्र कंपन्यांमध्ये विभाजन करण्याचा आदेश दिला.
रॉकफेलरने १८९५ च्या सुमारास स्टँडर्ड ऑइल कंपनीचे दैनंदिन व्यवस्थापन आपल्या सहकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यास प्रारंभ केला होता. तेल उद्योगातून मिळणाऱ्या प्रचंड नफ्यापैकी बराचसा भाग बाजूला काढून तो लोहधातुकाच्या खाणी व न्यूयॉर्कमधील व्यापारी बँकिंग व्यवसाय या दोन अतिशय विकासक्षम उद्योगांकडे त्याने वळविल्याचे आढळते. मोठ्या प्रमाणावरील लोकोपकारविषयक कार्ये, हे रॉकफेलरच्या जीवनातील दुसरे मोठे वैशिष्ट्य होते. त्यामुळे तो तेलउद्योगापेक्षा या कार्याबद्दल अधिक ख्यातकीर्त झाला होता. आपल्याजवळील अफाट संपत्तीचा काही भाग जनकल्याणार्थ खर्च करणे हे आवश्यक आहे, नव्हे ते आपले कर्तव्यच आहे, अशी त्याची भावना होती केवळ आपल्या वारसदारांना सर्व संपत्ती मिळणे इष्ट नसल्याचे त्याचे ठाम मत होते. परिणामी त्याने अमेरिकेतील वैद्यकशास्त्र, शिक्षण तसेच संशोधन यांचा विकास व उन्नती यांकरिता लक्षावधी डॉलर खर्च केले. अनेक धर्मादाय निगम उभारून त्यांचे संचालन सुयोग्य विश्वस्तांच्या हाती ठेवले व त्यांच्या दैनंदिन कार्यवाहीसाठी लोककल्याणाची तळमळ व आस्था असणारे कर्तव्यदक्ष अधिकारी नेमले. अशा निगमांद्वारा रॉकफेलरने सु. साठ कोटी डॉ. रकमेचा विनियोग केला. अमेरिकेच्या दक्षिण राज्यांमधील अतिशय हलाखीची शैक्षणिक अवस्था सुधारण्यासाठी ‘जनरल एज्युकेशन बोर्ड’ हे मंडळ व ‘शिकागो विद्यापीठ’ या दोन्ही संस्था त्याच्या प्रचंड देणग्यांमधून स्थापन झाल्या. शिकागो विद्यापीठास त्याने आपल्या मृत्यूपर्यंत सु. आठ कोटी डॉलर देणगीरूपाने दिले.
जॉन डी. रॉकफेलरमध्ये व्हिक्टोरियाकालीन व्यावसायिकाची सर्व वैशिष्ट्ये एकवटलेली होती. व्यवसायासून मिळणारा नफा व त्याचे सामाजिक महत्त्व यांची समानता ओळखण्याची त्याची आधिभौतिक वृत्ती असली, तरी धर्मश्रद्धा व वैयक्तिक गुण यांना पैसा हा पर्याय ठरू शकत नाही, हे त्याने पुरेपूर जाणले होते. वडिलांपासून घेतलेला बॅप्टिस्ट वारसा पुरेपूर अंगी वसल्यामुळे मद्य वा तंबाखू यांच्या सेवनापासून तो पूर्णतया अलिप्त होता. स्वतः रॉकफेलर किंवा त्याची पत्नी या दोघांनाही उंची खाद्यपदार्थ, उत्तम फर्निचर यांबाबत अजिबात पर्वा नव्हती मात्र न्यूयॉर्क राज्यातील टॅरीटाउन गावाजवळील ‘पोकँटिको हिल्स’ ह्या आपल्या इस्टेटीचा (वसाहतीचा) उत्कृष्ट तऱ्हेने विकास करण्यात त्याने मोठी रुची बाळगली. त्याने दीर्घायू आयुष्य व्यतीत केले, फ्लॉरिडा राज्यातील ऑर्मंड बीच येथे तो वयाच्या अठ्याण्णवव्या वर्षी मरण पावला.
‘जनरल एज्युकशेन बोर्ड’ हे शैक्षणिक मंडळ थोरल्या रॉकफेलरने १९०२ मध्ये स्थापन केले. अमेरिकेतील शिक्षणाचा वंश, धर्म, जात, लिंग यांचा विचार न करता विकास करणे, हे या मंडळाचे उद्दिष्ट होते. १९५२ अखेर या मंडळाने आर्थिक अडचणीमुळे आपले कार्य थांबविले. पन्नास वर्षांच्या कालखंडात महाविद्यालये व विद्यापीठे, वैद्यकीय शाळा, शैक्षणिक संशोधन प्रकल्प व शिष्यवृत्त्या अशा विविध शैक्षणिक कार्यक्रमांसाठी मंडळाने पैसे खर्च केले. रॉकफेलर वैद्यकीय संशोधन संस्था न्यूयॉर्कमध्ये १९०१ साली स्थापण्यात आली. आरोग्यशास्त्र, शस्त्रक्रिया, वैद्यक व तदनुषंगिक शास्त्रे यांच्या संशोधन कार्यात मदत, रोगांचे स्वरूप, कारणे व निवारण या कार्यात मदत व संशोधन आणि यांविषयी झालेल्या व होणाऱ्या संशोधनाचा व ज्ञानाचा सार्वजनिक कल्याणार्थ प्रसार करणे, अशी या संस्थेची उद्दिष्टे होती. पुढे याच संस्थेचे रॉकफेलर विद्यापीठामध्ये रूपांतर करण्यात आले. जगातील मानवजातीच्या कल्याणाचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून रॉकफेलर प्रतिष्ठानाची १९१३ मध्ये स्थापना करण्यात आली.
जॉन डेव्हिसन रॉकफेलर (२९ जानेवारी १८७४−११ मे १९६०) हा संस्थापक रॉकफेलर यांचा एकुलता एक मुलगा आणि रॉकफेलर औद्योगिक साम्राज्याचा एकमेव वारस. जन्म ओहोयओ राज्यातील क्लीव्हलँड शहरी. त्याच्या आईचे नाव लॉरा स्पेलमन असे होते. १८९७ मध्ये ब्राउन विद्यपीठातून पदवी प्राप्त केल्यावर तो आपल्या वडिलांच्या उद्योग-व्यवसायांत शिरला. आपल्या वडिलांप्रमाणे उद्योग, दानशूरत्व आणि लोकहितपर कार्ये यांच्यात तो गढून गेला. १९३० च्या पुढील काळात धाकट्या जॉनने मॅनहॅटम विभागात ‘रॉकफेलर सेंटर’ या गगनचुंबी वास्तुसमूहाची उभारणी करण्याकडे लक्ष दिले. हा वास्तुसमूह १९२९−४० या काळात न्यूयॉर्क शहरातील मॅनहॅटन विभागात सु. पाच हेक्टर क्षेत्रात १४ इमारतींच्या स्वरूपात रचण्यात आला. दुसऱ्या महायुद्धकाळात त्याने अमेरिकन लष्करातील सैनिक व त्यांचे कुटुंबीय यांच्या साहाय्यार्थ ‘युनायटेड सर्व्हिस ऑर्गनायझेशन’ ही संस्था उभारण्यात पुढाकार घेतला. युद्धोत्तर काळात त्याने संयुक्त राष्ट्रांचे प्रधान कार्यालय न्यूयॉर्क शहरात बांधण्यासाठी आपल्या मालकीची जमीन देऊ केली. १९५८ मध्ये त्याने न्यूयॉर्कमध्ये ‘लिंकन सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्ट्स’ या संस्थेसाठी ५० लक्ष डॉलरची देणगी दिली. ‘लॉरा स्पेलमन रॉकफेलर स्मारक’ उभारण्यास धाकट्या जॉनने मदत केली. १९२३ मध्ये त्याने निसर्गविज्ञाने, मानव्यविद्या व शेती या क्षेत्रांसाठी ‘आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ’ स्थापिले. १९३७ मध्ये पैशाच्या अभावी ते बंद करण्यात आले. नैसर्गिक साधनसंपत्ती व ऐतिहासिक वास्तू यांचे रक्षण व संवर्धन करण्याबाबत अतिशय आस्था व आवड असल्याने धाकट्या जॉनने त्यासाठी मोठाल्या रकमा खर्च केल्या. त्याची इतर लोकोपकारी कार्ये पुढीलप्रमाणे होत : व्हर्जिनिया राज्यातील वसाहतकालीन विल्यम्सबर्ग शहराची पुनर्रचना न्यूयॉर्क सिटीमधील गरीब भागातील लोकांसाठी कमी भाड्याची घरे बांधून देण्याच्या प्रकल्पाची कार्यवाही याच शहरातील ‘रिव्हरसाइड चर्च’ व ‘म्यूझीयम ऑफ मॉर्डन आर्ट’ यांकरिता देणग्या. रॉकफेलरने दोन वेळा विवाह केले. ॲबी ग्रीन ऑल्ड्रिच या त्याच्या पहिल्या पत्नीला ॲबी (१९०३) ही एक मुलगी आणि जॉन डी. तिसरा, नेल्सन, लॉरेन्स, विन्थ्रॉप व डेव्हिड असे पाच मुलगे झाले. ही रॉकफेलर घराण्याची तिसरी पिढी होय.
तिसरा जॉन डेव्हिसन (२१ मार्च १९०६−१० जुलै १९७८) जॉन डी. धाकट्याचा हा सर्वांत मोठा मुलगा. न्यूयॉर्क सिटी येथे जन्म. प्रिन्स्टन विद्यापीठातून पदवी मिळाल्यानंतर (१९२९) तो रॉकफेलर उद्योगसमूहात शिरला. १९३१ पासून तो रॉकफेलरस्थापित विविध संस्था व समित्या यांचा विश्वस्त म्हणून काम पाहू लागला. दुसऱ्या महायुद्धकाळात त्याने अमेरिकन नौदलात काम केले (१९४२−४५). यानंतर त्याने सार्वजनिक जीवन टाळून स्वतःस परोपकारी कार्यास वाहून घेतले. त्याने पुढील संस्थांसाठी कार्य केले : न्यूयॉर्क सिटीमधील ‘लिंकन सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्ट्स,’ नवी दिल्ली येथील ‘इंडिया इंटरनॅशनल सेंटर,’ ‘द इंटरनॅशनल हाउस ऑफ जपान’ व ‘एशिया सोसायटी’. ‘रॉकफेलर प्रतिष्ठाना’च्या अध्यक्षीय कारकीर्दीत त्याने आंतरराष्ट्रीय संस्थांना भरघोस आर्थिक साहाय्य दिले त्याचबरोबर १९५२ मध्ये कुटुंब नियोजन संशोधन केंद्र म्हणून लोकसंख्या परिषद (पॉप्युलेशन कौन्सिल) ही संस्था उभारली व तिच्या विकासार्थ स्वतःच्या निधीतून भरपूर अर्थसाहाय्य केले. त्याचा मुलगा, जॉन (जे.) डेव्हिसन रॉकफेलर चौथा (१९३७− ) ह्याचा वेस्ट व्हर्जिनिया राज्याच्या राजकारणात सक्रिय सहभाग होता. १९७७ पासून तो त्या राज्याचा गव्हर्नर बनला.
नेल्सन ॲल्ड्रिच राकफेलर (८ जुलै १९०८−२६ जाने. १९७९) जॉन डी. धाकट्याचा हा द्वितीय क्रमांकाचा मुलगा. मेन राज्यातील बार हार्बर येथे जन्म. न्यू हँपशर राज्याच्या हॅनोव्हर शहरातील डार्टमथ महाविद्यालयातून १९३० मध्ये त्याने अर्थशास्त्राची पदवी मिळविली. पुढे काही त्याने ‘चेस नॅशनल (पुढे चेस मॅनहॅटन) बँक’, ‘रॉकफेलर सेंटर’, ‘क्रिओल पेट्रोलियम’ इ. विविध रॉकफेलर समूहातील संस्थांमध्ये काम केले. क्रिओल पेट्रोलियम ह्या स्टँडर्ड ऑइलच्या व्हेनेझुएला येथील संलग्न कंपनीचा संचालक म्हणून काम करीत असताना (१९३५−४०) नेल्सनने स्पॅनिश भाषा आत्मसात केली, तसेच लॅटिन अमेरिकेविषयी त्याच्या मनात मोठा जिव्हाळा निर्माण झाला. म्हणूनच १९४० मध्ये आंतर-अमेरिकन घडामोडींचा समन्वयक या पदावर तो स्टेट डिपार्टमेंटलमध्ये काम करू लागला. फ्रँकलिन डी. रूझव्हेल्ट या डेमॉक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षाच्या कारकीर्दीत स्वतः रिपब्लिकन पक्षाचा असूनही नेल्सन हा पुढे १९४८ मध्ये उपपरराष्ट्रमंत्री पदावर पोचला. १९४५ मध्ये नेल्सनने केंद्रशासनाची सेवा सोडली व पुढच्याच वर्षी लॅटिन अमेरिकेतील विकासोन्मुख (विकसनशील) देशांना साहाय्य करण्याच्या उद्देशाने आपल्या काही सहकाऱ्यांसमवेत ना-नफा तत्त्वावर एक खाजगी संस्था स्थापिली. हॅरी एस्. ट्रूमन यांच्या अध्यक्षीय कारकीर्दीत आंतरराष्ट्रीय विकास सल्लागार मंडळाचा अध्यक्ष या नात्याने तो पुन्हा शासकीय सेवेत रूजू झाला (१९५०). १९५२ मध्ये नव-निर्वाचित राष्ट्राध्यक्ष ड्वाइट डी. आयझनहौअर यांनी शासकीय संघटनांसंबंधीच्या राष्ट्राध्यक्षीय सल्लाकारी समितीच्या अध्यक्षपदी नेल्सनची नियुक्ती केली. १९५३−५५ या काळात नेल्सनने नवनिर्मित आरोग्य-शिक्षण-कल्याण या खात्याचा अवर सचिव म्हणून काम पाहिले. सक्रिय राजकारणात भाग घेण्याच्या उद्देशाने नेल्सनने १९५६ मध्ये शासकीय सेवा सोडली. १९५८ मध्ये न्यूयॉर्क राज्याच्या गव्हर्नरपदाच्या निवडणुकीत ॲव्हरेल हॅरिमन याच्याविरुद्ध उभे राहून नेल्सनने ५ लाखांच्या मताधिक्याने ही निवडणूक जिंकली. यामुळे १९६० च्या राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षातर्फे त्याची निवड निश्चित करण्यात आली, तथापि रिचर्ड एम्. निक्सनसाठी त्याने आपले नाव मागे घेतले. न्यूयॉर्क राज्याच्या गव्हर्नरपदी आणखी तीन वेळा (१९६२, १९६६ व १९७०) निवडून आलेल्या नेल्सनने न्यूयॉर्क राज्यात अनेक वित्तीय, सांस्कृतिक व शैक्षणिक सुधारणा अंमलात आणल्या. १९६४ मध्ये निक्सन राजकारणातून निवृत्त झाल्यावर नेल्सनने पुन्हा एकदा रिपब्लिकन पक्षातर्फे राष्ट्राध्यक्षपदाकरिता आपली उमेदवारी जाहीर केली, तथापि पुराणमतवादी गटाचा नेता म्हणून बॅरी गोल्डवॉटरने रिपब्लिकन पक्षातीलच उदारमतवादी-मवाळ गटाचा नेता असलेल्या नेल्सनचा अल्प मतांनी पराभव केला. पुढे १९६८ मधील राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीसाठी दुसऱ्यांदा नेल्सनने आपली उमेदवारी जाहीर केली, तथापि निक्सनकडून तो पराभूत झाला. १९७० मध्ये नेल्सनला न्यूयॉर्क राज्याचा गव्हर्नर म्हणून चौथ्या वेळेस विजय मिळाला. या खेपेस त्याने अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा प्रधान न्यायाधीश आर्थर गोल्डबर्ग याचा सु. ७ लक्ष मताधिक्याने पराभव केला. नेल्सन १९७३ मध्ये गव्हर्नरपदावरून निवृत्त झाला व त्याने ‘नॅशनल कमिशन ऑन क्रिटिकल चॉइसेस फॉर अमेरिका’ व ‘कमिशन ऑन वॉटर क्वॉलिटी’ या दोन आयोगांचे काम पाहण्यास प्रारंभ केला. तथापि निक्सनने राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने व १९ डिसेंबर १९७४ रोजी जेराल्ड आर्. फोर्ड हा उपराष्ट्राध्यक्षपदावरून राष्ट्राध्यक्ष झाल्यामुळे नेल्सनची उपराष्ट्राध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आली. फोर्ड प्रशासन जानेवारी १९७७ मध्ये संपुष्टात येईपर्यंत नेल्सन दोन वर्षांपर्यंत उपराष्ट्राध्यक्ष होता. नेल्सन रॉकफेलर कलेचा आश्रयदाता तसेच कलावस्तुसंग्राहक म्हणून प्रख्यात होता. ‘म्यूझीयम ऑफ मॉडर्न आर्ट’ या संग्रहालयाचा तो विश्वस्त होता ‘म्यूझीयम ऑफ प्रिमिटिव्ह आर्ट’ या संग्रहालयाचा तो संस्थापक-अध्यक्ष होता. नेल्सनचे न्यूयॉर्कमध्ये निधन झाले.
लॉरेन्स स्पेलमन रॉकफेलर (२६ मे १९१०− ). जॉन डी. धाकट्याचा हा तिसरा मुलगा. न्यूयॉर्क सिटीमध्ये जन्म. त्याने प्रिन्स्टन विद्यापीठातून तत्त्वज्ञानाची पदवी मिळवली (१९३२), तथापि पाचही रॉकफेलर भावंडांमध्ये लॉरेन्स सर्वाधिक व्यवसायाभिमुखी बनला. त्याने ‘ईस्टर्न एअरलाइन्स’ ही विमान कंपनी स्थापन करण्यात पुढाकार घेतला (१९३८) व अल्पावधीतच कंपनीचे भाग सर्वाधिक प्रमाणात मिळवून तो जवळजवळ तिचा मालकच बनला. ‘मॅक्डोनेल एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन’ या विमान कंपनीतही त्याची भागीदारी होती. दुसऱ्या महायुद्धकाळात त्याने अमेरिकन नौदलात सेवा बजावली. दुसऱ्या महायुद्धोत्तर काळात लॉरेन्सने हॉटेलव्यवसायप्रमाणेच आण्विक उपकरणे व संगणक यांच्या उद्योगांमध्ये प्रचंड गुंतवणूक केली. अनेक पर्यावरणविषयक समित्या, आयोग, संस्था तसेच अनेक प्रतिष्ठाने, धर्मादाय संस्था यांच्याशी तो अध्यक्ष, उपाध्यक्ष, सल्लागार अशा विविध नात्यांनी संबद्ध आहे. ‘रीडर्स डायजेट असोसिएशन’ चा तो १९७३ पासून एक संचालक आहे. ‘रॉकफेलर ब्रदर्स फंड’ य संस्थेचा उपाध्यक्ष (१९८०−८२) व सांप्रत अध्यक्ष म्हणून तो काम पाहतो. त्याला अनेक मानसन्मान लाभले आहेत.
विन्थ्रॉप रॉकफेलर (१ मे १९१२−२२ फेब्रुवारी १९७३). जॉन डी. धाकट्याचा हा चौथा मुलगा. न्यूयॉर्क सिटी येथे जन्म. १९३४ मध्ये महाविद्यालयीन शिक्षण सोडून टेक्ससच्या तेलखाणीवर, चेस नॅशनल बँक, ग्रेटर न्यूयॉर्क फंड इ. विविध संस्थांमध्ये त्याने काम केले. १९४१ मध्ये अमेरिकेच्या भूदलात सेवा. दुसऱ्या महायुद्धानंतर काही काळ न्यूयॉर्क सिटीत वास्तव्य. १९५३ मध्ये तो आर्कन्सास राज्यात गेला व तेथे त्याने प्रचंड प्रमाणावर प्रायोगिक शेती करावयास प्रारंभ केला. स्थानिक क्षेत्रात त्याची परोपकारी कृत्ये चालूच होती. आर्कन्सास राज्याचा गव्हर्नर असतना (१९६७-७१) त्याने राज्यातील पहिला किमान वेतन कायदा संमत करून घेतला तुरुंगामध्ये व्यापक प्रमाणावर सुधारणा केल्या आणि राज्यातील सर्व शाळा सर्व जातीच्या मुलांमुलींसाठी खुल्या करविण्यात यश मिळविले. आर्कन्सासमध्ये एका नमुनेदर शाळेसाठी त्याने १२.५० लक्ष डॉलरची देणगी दिली, अनेक नागरी प्रकल्प व वैद्यकीय चिकित्यालये यांना भरघोस देणग्या दिल्या तसेच लिटल रॉक शहरात आर्ट्स सेंटरच्या वास्तूसाठी मोठ्या देणग्या दिल्या. पाम स्प्रिंग्ज (कॅलिफोर्निया राज्या) या शहरी विन्थ्रॉप मरण पावला.
डेव्हिड रॉकफेलर (१२ जून १९१५− ). जॉन डी. धाकट्याचा सर्वांत धाकटा व पाचवा मुलगा. न्यूयॉर्क सिटी येथे जन्म. हार्व्हर्ड विद्यापीठातून त्याने बी. एससी. पदवी प्राप्त केली (१९३६) हार्व्हर्ड येथे व लंडन अर्थशास्त्र संस्थेत अर्थशास्त्र विषयाचा अभ्यास केला. शिकागो विद्यापीठातून अर्थशास्त्रातील डॉक्टरेट मिळविली (१९४०). दुसऱ्या महायुद्धात भूदलात सेवा (१९४२−४५). १९४६ मध्ये न्यूयॉर्क सिटीमधील चेस नॅशनल बँकेत तो काम करू लागला. विविध अधिकारपदांवर काम केल्यावर तो बँकेचा ज्येष्ठ उपाध्यक्ष बनला (१९५२). चेस नॅशनल बँक व बँक ऑफ मॅनहॅटन कंपनी या दोन्ही बँकांच्या विलानीकरणात व चेस मॅनहॅटन बँकेच्या स्थापनेत त्याचा सिंहाचा वाटा होता. या बँकेच्या संचालक मंडळाचा तो अनेक वर्षे अध्यक्ष होता (१९६९−८१). आंतरराष्ट्रीय बँकिंगवर त्याचा विशेष अभ्यास असून अनेक धर्मादाय संस्था, समित्या यांच्याशी तो विविध नात्यांनी संबंधित आहे. डेव्हिडला अनेक विद्यापीठांकडून डॉक्टरेट व इतर मानसन्मान लाभले आहेत. अनयूज्ड रिसोर्सेस अँड इकॉनॉमिक वेस्ट (१९४०), क्रिएटिव्ह मॅनेजमेंट इन बँकिंग (१९६४) हे त्याचे प्रसिद्ध ग्रंथ आहेत.
रॉकफेलर घराण्याने वैद्यक, शिक्षण, कला, सांस्कृतिक घडामोडी इ. अनेक क्षेत्रांना प्रचंड प्रमाणावर आर्थिक साहाय्य देऊन मानवजातीचे कल्याण व विकास अव्याहत होत राहील यासाठी प्रतिष्ठेने व विविध निधी उभारून दानशूरतेचे कार्य अखंड चालू ठेवले आहे.
संदर्भ : Collier, Peter Horowitz, David, The Rockefellers: An American Dynasty, New York, 1976.
गद्रे, वि. रा.
“