राष्ट्रीय फिल्म विकास निगम : (नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन). भारतीय चित्रपटांचा दर्जा वाढविणे व चित्रपट-व्यवसायाचा सर्वांगीण विकास घडवून आणणे, या हेतूंनी भारत सरकारने स्थापन केलेले एक स्वायत्त मंडळ. हे मंडळ निरनिराळ्या दोन फिल्म विकास मंडळाच्या एकत्रीकरणातून अस्तित्वात आले. १९५१ सालच्या पाटील कमिटीच्या शिफारसीप्रमाणे ⇨फिल्म वित्त महामंडळ १९६० साली स्थापन करण्यात आले. दर्जेदार चित्रपटनिर्मिती-करता अर्थसाहाय्य देण्याची त्यामार्ग कल्पना होती. १९६३ साली भारतीय चित्रपट निर्यात महामंडळाची (इंडियन मोशन पिक्चर एक्सपोर्ट कॉर्पोरेशन) स्थापना करण्यात आली. भारतीय चित्रपटांची परदेशी बाजारपेठ वाढविणे, हे या मंडळाचे उद्दिष्ट होते. सु. २० वर्षे या दोन संस्था आपापल्या क्षेत्रांत स्वतंत्रपणे काम करीत होत्या. तथापि भारतीय चित्रपटव्यवसायाचा सर्वांगीण विकास आणि विस्तार हाच त्यांचा समान उद्देश असल्याने त्यांचे एकत्रीकरण करण्याची कल्पना निघाली आणि १९८० च्या एप्रिल महिन्यात ‘राष्ट्रीय फिल्म विकास निगम’ सुरू झाले.
गेल्या काही वर्षांत या नवीन निगमाच्या कार्यकक्षा खूपच विस्तारल्या आहेत. चित्रपटकथांच्या स्पर्धा, चित्रपटांना अर्थसाहाय्य यांसारख्या कार्याबरोबर हे निगम स्वतः चित्रपटनिर्मितीही करून लागले आहेत. सत्यजित रे या जगद्विख्यात तदग्दर्शकाचा घरे बैरे (१९८५) हा बंगाली चित्रपट व आदि शंकराचार्य (१९८३) यासारखा संस्कृत भाषेतील पहिलाच चित्रपट हे या निगमातर्फेच तयार करण्यात आले. हा निगम दूरदर्शनवर दाखविल्या जाणाऱ्या चित्रपटांनीही आर्थिक साहाय्य देतो. निगमाच्या अनेक चित्रपटांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पारितोषिके व पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्याखेरीज गांधी (१९८५) यासारख्या ब्रिटिश चित्रपटाच्या निर्मितीत प्रस्तुत निगमाने भांडवल गुंतवून संयुक्त चित्रपटनिर्मितीचे एक नवे दालन सुरू केले आहे. फ्रान्सच्या एका दूरदर्शन−मालिकेतही निगमाचा असाच सहभाग आहे.
निर्मितीबरोबर वितरण आणि प्रदर्शन या क्षेत्रांतही निगमाने पदार्पण केले आहे. देशातील चित्रपटगृहांची संख्या वाढावी, म्हणून त्यांच्या बांधणीकरिता आर्थिक साहाय्य देण्याची योजनाही सुरू करण्यात आलेली आहे.
परदेशी चित्रपट व कच्ची फिल्म यांची आयात व भारतीय चित्रपट किंवा त्यांच्या दृक्ध्वनिफिती (व्हिडिओ कॅसेट्स) यांची निर्यात या निगमामार्फतच होते. या महामंडळाचा एक स्वतंत्र वितरण−विभागही आहे. या महामंडळाने निर्यात केलेले काही भारतीय चित्रपट परदेशांतील दूरदर्शनवरही दिसू लागले आहेत. त्याकरिता १९८०-८१ साली लंडन येथे महामंडळाची शाखा स्थापन करण्यात आली आहे. दृक्ध्वनीच्या नवीन तंत्राचा फायदा घेण्याकरिता महामंडळाने मद्रास येथे एक अद्ययावत यंत्रणा उभी केली आहे. त्यामुळे देशात आणि परदेशांत लागणाऱ्या दृक्ध्वनिफिती आता भारतातच फिल्मवरून तयार करता येतात. महामंडळाच्या कलकत्ता येथील केंद्रामार्फत १६ मिमी. चित्रपटनिर्मितीसाठी लागणारी यंत्रसामग्री पुरविण्यात येते. निर्यात होणाऱ्या भारतीय चित्रपटांची परदेशी भाषांतील उपवर्णने (सब्टायटल्स) करण्याची व्यवस्था मुंबईत करण्यात आली आहे.
धारप, भा. वि.
“