राष्ट्रद्रोह : (ट्रीझन). एखाद्या देशाच्या शासनाविरूद्ध त्याच देशातील व्यक्तीने वा गटाने युद्ध करणे अथवा अशा युद्धास मदत करणे अथवा तशा प्रकारचा कट करणे, यास कायद्याच्या दृष्टीने सामान्यपणे राष्ट्रद्रोह असे म्हटले जाते. जगातील बहुतेक सर्व देशांत राष्ट्रद्रोहाच्या गुन्ह्यासंबंधी कायदेशीर तरतुदी करण्यात आल्या आहेत. भारतीय दंडसंहितेत राष्ट्रद्रोहासंबंधीच्या गुन्ह्यासंबंधी (कलम १२१ ते १३०) तरतूद आहे. त्यांनुसार या गुन्ह्याला सात वर्षांपासून आजन्म कारावास तसेच मृत्युदंडापर्यंतच्या शिक्षेची आणि/अगर दंडाची शिक्षा देण्यात येते. भारत सरकारविरुद्ध युद्ध करणे अथवा युद्घास मदत करणे हा राष्ट्रद्रोहाचा गुन्हा होय. या कृत्यासाठी कट करणे अथवा बळाचा वापर करुन केंद्रीय अगर घटक राज्यशासनावर दबाव आणणे अथवा तसा प्रयत्न करणे, शासनाविरुद्ध युद्धाकरता शस्त्रे अगर दारूगोळा जमविणे अथवा इतर प्रकारे तयारी करणे, हे सर्व राष्ट्रद्रोहाच्या गुन्ह्यात मोडते. युद्धाचा बेत माहीत असता तो मुद्दाम गुप्त राखणे, राष्ट्रपती अगर राज्यपाल यांच्यावर त्यांनी विशिष्ट तऱ्हेने वागावे म्हणून हल्ला करणे अथवा त्यांच्या कामकाजात वा कर्तव्यात अडथळा निर्माण करणे किंवा त्यांना कर्तव्यापासून परावृत्त करणे तसेच प्रस्थापित शासनाविरुद्ध विद्वेष निर्माण करणे, भारत सरकारशी सलोखा असलेल्या राष्ट्राविरुद्ध लढाई करणे अथवा त्या राष्ट्रात लूटमार करणे व अशा लूटमारीतील लूट स्वीकारणे, शासकीय सेवकाने राजकीय कैद्यास पळून जाण्यास मदत करणे अथवा त्यास आश्रय देणे इ. सर्व कृत्ये राष्ट्रद्रोह समजली जातात. अशा गुन्ह्यांना निरनिराळ्या शिक्षांची तरतूद करण्यात आली आहे.

ग्रेट ब्रिटनमध्ये राजाला ठार मारण्याचा प्रयत्न करणे, त्यास इजा अथवा कैद करण्यासाठी काही कृत्ये करणे अथवा तसे लिहिणे किंवा बोलणे तसेच राजघराण्यातील वारसांना मारण्याचा प्रयत्न करणे किंवा विशिष्ट राजसेवकांना ठार मारणे इ. कृत्ये राष्ट्रद्रोहाच्या गुन्ह्यात मोडतात व त्यांसाठी गुन्हेगारास मृत्युदंडाची शिक्षा दिली जाते.

देशमुख, हरीश