शक्तिबाह्य : (अल्ट्रा व्हायरीझ). क्षमताबाह्य. कायद्याने निर्माण होणाऱ्या अधिकाऱ्याची क्षमता ज्या कायद्याने त्यांची निर्मिती होते, त्या कायद्याने सीमित केलेली असते. त्या क्षमतेच्या पलीकडे जाऊन त्या अधिकाऱ्यानी जर कुठली कृती केली, तर ती त्यांच्या क्षमतेच्या किंवा शक्तीच्या बाहेरची आहे, या कारणास्तव ती रद्दबातल केली जाऊ शकते. अशी कृती क्षमताबाह्य वा शक्तिबाह्य आहे असे म्हटले जाते. असा अधिकारी कुणाच्यातरी वतीने व्यवहार करणारा दलाल (एजंट) असेल किंवा एखादी व्यापारी कंपनी किंवा कायद्याने निर्माण झालेले महामंडळ, स्थानिक स्वराज्य संस्था, शासनाची कार्यकारिणी किंवा कायदेमंडॅळ वा न्यायालय असेल. ‘कायद्याचे राज्य’ या संकल्पनेची प्राथमिक कार्यवाही क्षमताबाह्य कृतींना आक्षेप घेऊनच केली जाते. इंग्लंडच्या संसदेच्या क्षमतेला कायदेशीर मर्यादा नसल्याने तिने केलेल्या कायद्याविरूद्ध तो क्षमताबाह्य आहे, असा आक्षेपच घेता येत नाही पण जिथे लिखित संविधान आहे, तिथे मात्र संसदेने किंवा इतर नावाने ओळखल्या जाणाऱ्या कायदेमंडळाने केलेला कायदाही क्षमताबाह्य आहे, अशा कारणास्तव रद्दबातल होऊ शकतो. शासकीय अधिकाऱ्याची क्षमता त्यांच्या अधिकार शक्तीवरून (पॉवर वा कॉंपिटन्स) ठरते, तर न्यायालयांच्या क्षमतेबाबत अधिकारक्षेत्राचा (जुरिस्डिक्शन) आग्रह धरला जातो.

साठे, सत्यरंजन