राष्ट्रकूट वंश : भारतातील एक प्राचीन इतिहासप्रसिद्ध राजवंश. त्याची अधिसत्ता प्रामुख्याने महाराष्ट्र व त्यालगतच्या प्रदेशांवर इ.स. ७५३ ते ९७५ यांदरम्यान होती. राष्ट्रकूट हे एक प्राचीन अधिकारपद होते. राज्याच्या मोठ्या विभागाला राष्ट्र म्हणत. प्राचीन ताम्रपटांत ग्रामकूटांप्रमाणे राष्ट्रकूटांचा उल्लेख येतो. ग्रामाचा मुख्य तो ग्रामकूट व राष्ट्र या विभागाचा प्रशासक तो राष्ट्रकूट. त्यांना राजदानांची माहिती दिलेली असते. ग्रामकूट म्हणजे गावचे पाटील. तसे राष्ट्रकूट म्हणजे राष्ट्र नामक देशाच्या विशाल भागाचे अधिपती. राष्ट्रकूटांची अनेक घराणी प्राचीन काळी महाराष्ट्रात राज्य करीत होती. ती परस्परसंबद्ध होती असे नाही. 

               

सर्वांत प्राचीन ज्ञात राष्ट्रकूट घराणे कुंतल देशात कृष्णानदीच्या खोऱ्यात राज्य करीत होते. त्याचा मूळ पुरुष मानांक (सु. कार. ३५०–७५) हा होय. याने आपल्या नावे मानपूरनामक नगर स्थापून तेथे आपली राजधानी केली. हे मानपूर सातारा जिल्ह्याच्या माण तालुक्याचे माण असावे. ह्या राष्ट्रकूट नृपतींना कुंतलेश्वर म्हणत. विदर्भाचे वाकाटक आणि कुंतलचे राष्ट्रकूट यांची राज्ये एकमेकांना लागून असल्याने त्यांच्यामध्ये वारंवार कटकटीचे प्रसंग उद्‌भवत. मानांकाने विदर्भाला त्रस्त केले होते, असे राष्ट्रकूटांच्या पांडरंगपल्ली ताम्रपटात म्हटले आहे तर वत्सगुल्म (वाशीम) च्या विंध्यसेन वाकाटकाने कुंतलेशाचा पराजय केल्याचा उल्लेख अजिंठ्याच्या लेखात आला आहे. मानांकाचा पुत्र देवराज याच्या काळी गुप्त सम्राट दुसरा चंद्रगुप्त (विक्रमादित्य) याने आपला राजकवी कालिदास याला या कुंतलेश राष्ट्रकूटांच्या दरबारी वकील म्हणून पाठविले होते. या प्रसंगाने कालिदासाने कुंतलेश्वरदौत्य रचले होते. ते आता उपलब्ध नाही पण त्यातील काही उतारे राजशेखर व भोज यांच्या अलंकार ग्रंथांत आले आहेत. मानपूर येथे हे घराणे बादामीच्या दुसऱ्या पुलकेशीच्या (कार. ६११-४२) काळापर्यंत टिकले. पुलकेशीने त्यांचा पराभव करून त्यांचा प्रदेश खालसा केला.

               

दुसरे राष्ट्रकूट घराणे विदर्भात सहाव्या शतकात कलचुरींचे मांडलिक म्हणून उदयास आले. त्याचे काही ताम्रपट रामटेकजवळ नंदिवर्धन, अकोला व मुलताई येथे सापडले आहेत. कलचुरींच्या उच्छेदानंतर त्यांनी बादामीच्या चालुक्यांचे स्वामित्व स्वीकारले आणि पुढे ते राष्ट्रकूटांचे मांडलिक झाले. त्यांची राजधानी प्रथम नंदिवर्धन, नंतर भंडारा जिल्ह्यातील पद्मपूर (पद्मनगर) आणि शेवटी अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथे होती. हे घराणे दहाव्या शतकाच्या मध्यापर्यंत टिकले. 

               

या दोन्हींपेक्षा अत्यंत कीर्तिमान असे तिसरे राष्ट्रकूट घराणे औरंगाबाद जिल्ह्यात उदयास आले. त्याची आरंभीची राजधानी अद्यापि अनिश्चित आहे. नंतर तिसऱ्या गोविंदाच्या काळात ती मयूरखंडी येथे होती पण तिचेही ठिकाण निश्चित नाही. ⇨पहिल्या अमोघवर्षा ने नवव्या शतकात ती मान्यखेट (मालखेड) येथे नेली. तेथे ही घराणे शेवटपर्यंत राज्य करीत होते.

               

या घराण्याचा पहिला विख्यात राजा दंतिदुर्ग (कार. ७१३– ५८) हा होय. हा प्रथम बादामीच्या चालुक्यांचा मांडलिक होता पण पुढे त्याने त्यांचे जूं झुगारून दिले. याने सु. ४५ वर्षे राज्य केले. याने लाट (दक्षिण गुजरात), महाराष्ट्र, विदर्भ हे प्रदेश जिंकून आपल्या राज्यास जोडले. नंतर त्याने मालव, कोसल (छत्तीसगड), कलिंग (ओरिसा), श्रीशैलम् वगैरे दूरदूरच्या प्रदेशांवर स्वाऱ्या केल्या पण त्यांपासून त्याच्या राज्याचा विस्तार झालेला दिसत नाही. त्याने चालुक्य कीर्तिवर्म्याचा ७५३ च्या सुमारास पराभव केला.

             

दंतिदुर्गानंतर त्याचा चुलता पहिला कृष्ण (सु. कार. ७५६–७३) याने चालुक्य सम्राट दुसरा कीर्तिवर्मा याचा पुन्हा पराभव करून चालुक्य राजवटीचा अंत केला. नंतर त्याने गंगवाडीच्या गंगांचा आणि वेंगीच्या पूर्वचालुक्यांचा पराभव केला. अशा रीतीने राष्ट्रकूट साम्राज्याचा पाया घातला. त्याच्या काळी ⇨वेरूळ येथील कैलास लेणे खोदण्यात आले. कृष्ण सु. ७७३ मध्ये निधन पावला असावा.

               

कृष्णानंतर त्याचा मुलगा दुसरा गोविंद (कार. ७७३–८०) गादीवर आला. पण त्याच्या काळी सर्व सत्ता त्याचा धाकटा भाऊ ध्रुव याच्या हाती होती. शेवटी ध्रुवाने त्याला पदच्युत करून सु. ७८० मध्ये गादी बळकावली.

               

नंतर ध्रुवाने गोविंदाच्या पक्षाचे गंग आणि पल्लव राजे यांचा पराभव करून गंग राजपुत्र शिवमार याला बंदिवान केले आणि गंगवाडी खालसा केली. पुढे त्याने उत्तर भारतात स्वारी करून दोआबापर्यंत आक्रमण केले. गुर्जर प्रतीहार नृपती वत्सराज याला राजपुतान्यात पिटाळून लावले आणि बंगालच्या पालनृपती धर्मपाल याचा दोआबात पराभव केला. तेव्हापासून गंगा व यमुना नद्यांची चिन्हे राष्ट्रकुटांच्या ध्वजावर झळकू लागली. 

               

ध्रुवानंतर ⇨तिसरा गोविंद (सु. कार. ७९३–८१४) हा गादीवर आला. हा आपल्या पित्यापेक्षा जास्त पराक्रमी निघाला. त्याने आपल्या स्तंभ नामक वडील भावाचा आणि त्याच्या पक्षाच्या व बंदीतून मुक्त झाल्यावर उलटलेल्या गंग राजाचा पराभव केला. गंगाला पुन्हा बंदीत टाकले, पण स्तंभाला पुन्हा गंगवाडीचा अधिपती नेमले. नंतर त्याने आपल्या पित्याप्रमाणे उत्तर भारतात स्वारी केली. तीत त्याने वत्सराजाचा पुत्र द्वितीय नागभट याचा पराजय केला. पालनृपती धर्मपाल आपला हस्तक कनौजचा अधिपती चक्रायुध याच्यासह त्याला शरण आला. नंतर गोविंदाने हिमालयापर्यंत स्वारी केली.

               

परत नर्मदातीरी आल्यावर त्याने तिच्या काठाने जाऊन मालक. डाहल (चेदि), ओड्रक (ओरिसा) इ. देश जिंकून पावसाळ्यात श्रीभवन (गुजरातेतील सारमोण) येथे मुक्काम केला. तेथे त्याचा मुलगा ⇨पहिला अमोघवर्ष इ.स. ७९९ मध्ये जन्मला. गोविंद नंतर मयूरखंडीला परत आला. तेथे काही काळ राहून त्याने दक्षिणच्या दिग्विजयाची तयारी केली आणि तुंगभद्रेच्या तीरी हेलापूर येथे तळ दिला. तेथून त्याने गंग, पल्लव, पांड्य आणि केरळ देशांवर स्वाऱ्या करून तेथील राजांचा पराभव केला. त्यांना आपले स्वामित्व स्वीकारावयास भाग पाडले. त्याने वेंगीचा पूर्वचालुक्य दुसरा विजयादित्य याचा पराभव करून त्याचा धाकटा भाऊ भीम याला गादीवर बसविले. अशा रीतीने हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत आपले साम्राज्य विस्तारले.

               

तिसऱ्या गोविंदानंतर त्याचा पुत्र पहिला अमोघवर्ष (कार. ८१४–८०) गादीवर आला. त्यावेळी तो पंधरा-सोळा वर्षांचा होता. अमोघवर्षाच्या कारकीर्दीत अनेक बंडे झाली. पूर्वचालुक्य विजयादित्याने आपली गादी परत मिळविली. गंगांनी राष्ट्रकुटांना गंगवाडीतून हाकलून लावले. गुजरातेत तिसऱ्या गोविंदाने स्थापिलेल्या राष्ट्रकूट शाखेनेही स्वातंत्र्य पुकारले. अमोघवर्षाने शेवटी यांपैकी बहुतेकांना काबूत आणले पण या बंडाळ्यांमुळे त्याच्या राज्याला शांतता लाभू शकली नाही.

               

अमोघवर्षाच्या काळी विद्येला उत्तेजन मिळाले. त्याने स्वतः कविराजमार्ग नामक साहित्यशास्त्रीय ग्रंथ कन्नड भाषेत लिहिला. त्या भाषेतील आद्य ग्रंथांत त्याची गणना होते. त्याचा प्रश्नोत्तरमालिका नामक दुसऱ्या ग्रंथावरून तसेच कोरीव लेखांतील उल्लेखावरून तो मधून मधून आपल्या युवराजावर राज्यकारभार सोपवून धार्मिक चिंतनाकरिता मठात जाऊन राहत असे, असे दिसते. त्याने एकदा मोठ्या साथीच्या निवारणाकरिता आपल्या हाताचे बोट कापून ते कोल्हापूरच्या महालक्ष्मीस अर्पण केल्याचा कोरीव लेखात उल्लेख आहे. तसेच त्याच्या दरबारी अनेक जैन कवींनी आपले ग्रंथ रचल्याचे उल्लेख आहेत. जिनसेनाचे आदिपुराण, महावीराचार्याचे गणित-सारसंग्रह वगैरे ग्रंथ त्याच्या कारकीर्दीत रचले होते.    


          

पहिल्या अमोघवर्षानंतर त्याचा पुत्र दुसरा कृष्ण (सु. कार. ८८०—९१४) गादीवर आला. काहींच्या मते पहिला अमोघवर्ष इ. स. ८७८ मध्ये मरण पावला. त्रिपुरीचा कलचुरी नृपती पहिला कोकल्ल याने त्याला आपली मुलगी दिली होती. त्याच्या युद्धात साहाय्य करण्याकरिता त्याने आपला पुत्र शंकरगण यास पाठविले होते. या दोघांचे पूर्वचालुक्य नृपती तिसरा विजयादित्य याच्याशी दीर्घकाल युद्ध चालले. विजयादित्याने पश्चिमेस आक्रमण करून छत्तीसगढातील किरणपूर जाळले पण शेवटी कृष्णाने त्याच्या नंतरच्या भीम राजाचा पराभव करून त्याला बंदीवान केले. पुढे त्याने राष्ट्रकुटांचे स्वामित्व स्वीकारल्यावर त्याला वेंगीचे राज्य परत देण्यात आले. कृष्णाने आपल्या कारकीर्दीच्या शेवटी उत्तर अर्काट जिल्ह्यातील बाण नृपती दुसरा विजयादित्य प्रभुमेरू याचा पराभव केला, या स्वारीत त्याचा नातू तिसरा इंद्र याने पराक्रम गाजविला होता. कृष्णाला उत्तर भारतातील माळवा व काठेवाड हे प्रांत गुर्जर प्रतीहार पहिला भोज याला द्यावे लागले. त्याच्या कारकीर्दीत गुजरातेतील राष्ट्रकूट शाखेचा अस्त झाला.

               

कृष्णाचा पुत्र जगतुंग हा त्याच्या हयातीत निधन पावल्यामुळे त्याच्या नंतर त्याचा पौत्र ⇨तिसरा इंद्र (कार. सु. ९१४–२७) हा गादीवर आला. त्याने आपल्या प्रतापी पूर्वजांचे अनुकरण करून उत्तरेत गुर्जर प्रतीहारांच्या कान्यकुब्ज राजधानीवर स्वारी करून ते नगर उद्ध्वस्त केले. प्रतीहार नृपती महीपाल याला राजधानी सोडून चंदेल्लांच्या आश्रयास जावे लागले. या स्वारीत त्रिपुरीच्या कलचुरींचे इंद्राला साहाय्य झाले. त्यानंतर कनौज दरबारी असलेला राजशेखर कवी कलचुरिनृपती पहिला युवराजदेव याच्या आश्रयाकरिता त्रिपुरीस आला.

               

इंद्र सु. इ. स. ९२७ मध्ये निधन पावला. त्यानंतर त्याचा पुत्र दुसरा अमोघवर्ष हा गादीवर आला पण तो एक वर्षातच निधन पावल्यावर त्याचा भाऊ चौथा गोविंद (सु. कार. ९२८–३६) याला गादी मिळाली. याच्या काळी अनेक सामंतांनी बंड करून मान्यखेटवर चाल केली. कलचुरी युवराजदेवाने आपला जामात तिसरा अमोघवर्ष याचा पक्ष घेऊन उत्तरेकडून राष्ट्रकूट प्रदेशावर सैन्य पाठवले. त्या सैन्याचे राष्ट्रकूटांच्या अचलपूर येथील सामंताच्या सैन्याशी पयोष्णीच्या (पूर्णेच्या) काठी घनघोर युद्ध झाले. त्यात कलचुरी सैन्याला विजय मिळून त्याने अमोघवर्षाला पुढे घालून मान्यखेटवर चाल केली. दक्षिणेकडून अमोघवर्षाचे साहाय्यक आले होतेच. या धुमश्चक्रीत चौथा गोविंद मारला गेला आणि तिसरा अमोघवर्ष गादीवर आला. ही घटना ९३६ मध्ये घडली असावी. कलचुरींच्या विजयोत्सवात त्रिपुरी येथे राजशेखराचे विद्धशालभंजिका हे नाटक प्रथम रंगभूमीवर आले.

               

गादीवर आला तेव्हा तिसरा अमोघवर्ष वृद्ध झाला होता. तो स्वतः शांत वृत्तीचा होता, म्हणून त्याचा पुत्र तिसरा कृष्ण हाच सर्व राज्यकारभार पाहात होता. त्याने आपल्या पित्याच्या कारकीर्दीत काही विजय मिळविले आणि तीन वर्षांनी त्याच्या निधनानंतर तो गादीवर आला. 

               

तिसरा कृष्ण (सु. कार. ९३९–६७) हा महाप्रतापी होता. त्याने आपला मेहुणा बूतुग याला गंगवाडीच्या गादीवर बसविले, उत्तरेत स्वाऱ्या करून कालंजर व चित्रकूट येते राष्ट्रकूटांची ठाणी बसविली आणि नंतर दक्षिणेत परत येऊन कांची आणि तंजावर ही स्थळे काबीज केली. पुढे सहा वर्षांनंतर तक्‌कोलम् येथे झालेल्या घनघोर लढाईत चोल युवराज राजादित्य याला गंग सामंत बूतुगाने ठार केले. नंतर कृष्णाने रामेश्वरपर्यंत चाल करून तेथे आपला जयस्तंभ उभारला. पुढे चोलांनी आपला काही प्रदेश जिंकून परत घेतला पण त्यांचा तोंडइमंडल (अर्काट, चिंगलपुट आणि वेल्लोर जिल्ह्यांचा) प्रदेश राष्ट्रकूटांच्या हाती राहिला.

               

कृष्णाने पुन्हा ९६३ मध्ये उत्तरेत स्वारी केली. त्याने माळवा काबीज करून बुंदेलखंडवर आक्रमण केले. या स्वारीत कोरलेला त्याचा शिलालेख मेहर रेल्वे स्टेशनजवळ जूरा येथे सापडला आहे. त्यात चोलवंशाचे उन्मूलन केल्याचा उल्लेख आहे. 

               

कृष्णानंतर त्याचा धाकटा भाऊ खोट्टिग (सु. कार. ९६७–७२) गादीवर आला. त्याच्या कारकीर्दीत माळव्याच्या परमार सीयकाने मान्यखेटवर इ. स. ९७२ मध्ये स्वारी करून ते नगर लुटले.

               

त्यानंतर खोट्टिगाचा पुतण्या दुसरा कर्क (सु. कार. ९७२–७३) गादीवर आला, पण तो दुर्वर्तनी निघाला. त्यामुळे राज्यात बेबंदशाही माजली. तिचा फायदा घेऊन तरदवाडी (बेळगाव जिल्हा) येथे राज्य करणारा राष्ट्रकूटांचा मांडलिक तैलप याने बंड करून ९७३ मध्ये कर्काचा पराभव केला आणि मान्यखेट काबीज केले. कर्क पुढे म्हैसूर प्रदेशात जाऊन सु. नऊ वर्षे लहानशा प्रदेशावर राज्य करीत होता, पण त्याला आपले पूर्वीचे राज्य परत मिळविता आले नाही. गंग नृपती मारसिंह याने तिसऱ्या कृष्णाचा नातू इंद्र याला राष्ट्रकूटांचे राज्य मिळवून देण्याचा ९७४ मध्ये प्रयत्न केला, पण तो यशस्वी झाला नाही.

               

इतर भारतीय राजांप्रमाणे राष्ट्रकूटांनी धर्म, विद्या व कला यांना उदार आश्रय दिला. राष्ट्रकूटांच्या काळी बहुधा सर्वत्र बौद्ध धर्माची पीछेहाट झाली होती तरी त्यांच्या साम्राज्यात एक-दोन ठिकाणी बौद्ध विहार असल्याचे उल्लेख आढळतात. कृष्णगिरी (कोकणातील कान्हेरी) येथील बौद्ध संघाला पहिल्या अमोघवर्षाच्या कारकीर्दीत शिलाहारांच्या अमात्याने काही द्रम्मांच्या देणग्या दिल्या होत्या. गुजरातेतील गंगा, दशावतार गुहा, वेरूळ.सामंत राष्ट्रकूट शाखेच्या दंतिवर्म्याने कांपिल्य तीर्थातील विहाराला ग्राम दान केले होते. पहिला अमोघवर्ष व त्याचा पुत्र दुसरा कृष्ण यांनी जैन देवालयांना देणग्या दिल्या होत्या. जैनमुनी जिनसेन आणि गुणभद्र हे अनुक्रमे त्यांचे गुरू होते. हिंदू धर्म तर अत्यंत ऊर्जितावस्थेस पोचला होता. पहिल्या कृष्णाच्या काळात वेरूळ येथे जगातले एक आश्चर्य म्हणून गणलेले कैलास लेणे कोरले होते. राष्ट्रकूटांच्या ताम्रपटाच्या आरंभी विष्णू व शिव या दोन्ही देवांना नमन केले आहे. राष्ट्रकूटांच्या काळी श्रौत यज्ञ प्रचारातून गेले होते पण त्या राजांनी अनेक महादाने करून ब्राह्मणांना पंचमहायज्ञांच्या अनुष्ठानाकरिता शेकडो गावे आणि हजारो सुवर्ण आणि द्रम्म नाणी दिली होती. चौथ्या गोविंदाला त्याच्या अनन्यसाधारण दातृत्वामुळे सुवर्णवर्ष नामक बिरुद मिळाले होते. धार्मिक क्षेत्रात राष्ट्रकूट राजे सहिष्णू आणि उदार होते. बौद्ध, जैन, मुस्लिम, शैव, वैष्णव या सर्वांना त्यांनी समभावाने वागविले व सहकार्य दिले. मुसलमानी धर्माच्याही बाबतीत त्यांनी उदार धोरण ठेवले होते. त्यांना मशिदी बांधण्यास परवानगी दिली होती व कित्येक प्रदेशांवर मुसलमानी प्रांताधिपती नेमले होते. मुसलमानी लेखकांनी राष्ट्रकूटांच्या या उदार धोरणाची प्रशंसा गेली आहे.


 राष्ट्रकूटांचा विद्वानांना आश्रय असे. आद्य चम्पू ग्रंथ नलचम्पू याचा कर्ता त्रिविक्रम भट्ट हा मूळचा विदर्भातला. त्याला तृतीय इंद्राच्या दरबारी आश्रय मिळाला होता. हालयुधाने मट्टिकाव्याच्याधर्तीवर रचलेल्या कवि रहस्यातील श्लोकात राष्ट्रकूट नृपती तिसऱ्या कृष्णाची स्तुती आहे. पहिला अमोघवर्ष व दुसरा कृष्ण यांचा जैन धर्माकडे ओढा असल्याने त्यांच्या दरबारी अनेक जैन पंडित होते. अकलंकदेवाची अष्टशती टीका, जिनसेनाचा हरिवंश, आदिपुराण पार्श्वाभ्युदय, शाकटायनाची अमोघवृत्ती, वीराचार्याचा गणितसारसंग्रह इ. ग्रंथ राष्ट्रकूटांच्या आश्रयाखाली रचण्यात आले होते. त्यांच्या कर्नाटकातील सामंतांनी कन्नड कवींना उदार आश्रय दिला होता. 

मिराशी, वा.वि. 

वास्तुशिल्पकला : राष्ट्रकूट राजांनी विद्वानांना आश्रय दिला आणि अनेक साहित्यकृती निर्माण केल्या, तद्वतच त्यांच्या काळात स्थापत्य आणि शिल्प या कलांनाही उत्तेजन मिळाले. राष्ट्रकूटांनी आपल्या राज्यात अनेक मंदिर–वास्तू बांधल्या. त्या शिल्पांनी सुशोभित केल्या आणि मंदिरांना पूजा-अर्चेसाठी देणग्या दिल्या. राष्ट्रकूटकालीन मंदिरे भारतातील विविध प्रदेशांत विखुरलेली आहेत. कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे राष्ट्रकूट राजे परम भक्त होते. दुष्काळाचे निवारण होण्यासाठी पहिल्या अमोघवर्षाने आपली करंगळी कापून ती महालक्ष्मीस अर्पण केली होती. राष्ट्रकूटांच्या मंदिरांपैकी बहुसंख्य मंदिरांची कालौघात पडझड झाली असून फारच थोडी अवशिष्ट आहेत आणि तीही विच्छिन्न अवस्थेत कशीबशी तग धरून आहेत. या मंदिरांमध्ये मान्यखेट, मार्कंडादेव (मार्कण्डा), रामेश्वरम् इ. ठिकाणची मंदिरे सुस्थितीत असून वास्तुशिल्पशैलीच्या दृष्टीने वैशिष्ट्यपूर्ण आहेत. मंदिर-वास्तूंप्रमाणेच त्यांनी महाराष्ट्रात कान्हेरी, घारापुरी व वेरूळ या ठिकाणी गुंफा खोदल्या व त्या शिल्पाकृतींनी सुशोभित केल्या.

सामान्यतः राष्ट्रकूट राजे हिंदू असून शिवोपासक होते. कृष्णराजाचे कृष्णेश्वर हे कैलासलेणे हे एक शिवमंदिरच आहे. त्याव्यतिरिक्त त्यांनी अठरा शिवमंदिरे बांधल्याचा उल्लेख राष्ट्रकूटांच्या कोरीव लेखांतून येतो. वेरूळाप्रमाणेच घारापुरी येथे राष्ट्रकूट राजांनी कित्येक शिवकथा प्रसंग साकार केलेले आहेत याशिवाय इतरही अनेक शिवमंदिरे राष्ट्रकूट राजांनी बांधलेली होती. त्यांच्या मंदिरांपैकी पहिल्या अमोघवर्षाने वसविलेल्या मान्यखेट राजधानीजवळ कागना व वेण्णीतोरा या नद्यांच्या संगमाजवळ राष्ट्रकूट काळातील एका दगडी दुर्गाचे अवशेष आढळले. आता गावही ओसाड झाला आहे. त्यात एक महादेवाचे व दुसरे जैन मंदिर आहे. जैन मंदिरात पार्श्वनाथ, महावीर आदी तीर्थंकरांच्या त्यांच्या लांछनांसह प्रमाणबद्ध मूर्ती आहेत. तिसरा कृष्ण (कार. ९३९-६७) या राजाने रामेश्वरम्‌पर्यंत प्रदेश पादाक्रांत करून तिथे आपला विजयस्तंभ उभारला. रामेश्वरम्‌जवळ त्याने कृष्णेश्वर आणि गंडमार्तंडा ही दोन आणि कांची येथे कालप्रियाचे मंदिर बांधण्यासाठी गावे दान दिली. मार्कंडादेव येथील मार्कंडी अथवा मार्कंडेश्वर हे मंदिर गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगेच्या तीरावरील एक प्रसिद्ध शिवालय असून त्यावरच्या सुंदर शिल्पांमुळे ते विशेष उल्लेखनीय ठरले आहे. सांप्रत हे श्रीमार्कंडेश्वर देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. ते विस्तृत अशा आयताकार प्राकारामध्ये नागरशैलीत बांधले आहे. या प्रकारातील मंदिर समूहात पूर्वी २४ मंदिरे होती परंतु सद्यःस्थितीत फक्त १८ मंदिरांचेच अवशेष असून त्यांपैकी मार्कंडेय ऋषी, यमधर्म, मृकंड ऋषी आणि महादेव ही अद्यापि सुस्थितीत आहेत. मार्कंडेश्वर मंदिरावर विपुल शिल्पांकन आहे. यांतील अर्ध्याहून अधिक मूर्ती शैव संप्रदायातील आहेत. त्यात शिव-पार्वतीसह श्रीगणेश, कार्तिकेय, भैरव इ. देव-देवता असून विष्णु-लक्ष्मी, सरस्वती, अन्नपूर्णा, विष्णुचे अवतार आणि रामायण-महाभारतातील प्रसंगांचेही शिल्पांकन आहे. याशिवाय नृत्यांगना-सुरसुंदरी तसेच दर्पणधारी, पुत्रवल्लभा, वृक्षी, शालभंजिका आणि पत्रलेखन किंवा केशरचना यांत तल्लीन असलेली अप्सरा यांचीही शिल्पे आहेत. मूर्तिसंभारात ज्यांना कामशिल्पे म्हणता येतील, अशी प्रणयी युगुले वा दंपती शिल्पे आणि नग्निका यांच्या मूर्ती आहेत. एकूण स्त्री-प्रतिमांत गतिमानता असून त्या मोहक आणि प्रमाणबद्ध आहेत. केवळ मार्कंडेश्वर मंदिराच्या मंडोवरावर तीन रांगांत सु. चारशे स्वतंत्र शिल्पे आहेत. येथील मंदिरांच्या काळाविषयी भिन्न मते असली तरी राष्ट्रकूटांची राजधानी मयुरखंडी म्हणजेच मार्कंडी असण्याचा संभव वा. वि. मिराशी व्यक्त करतात आणि राष्ट्रकूट राजा तिसरा गोविंद (कार. ७९४–८१४) याच्या कारकीर्दीत ही मंदिरे बांधली गेली असावीत, असे मत व्यक्त करतात. शिलालेखांच्या अक्षरवटिकेवरून व मूर्तीच्या किंचित स्थूल शरीरयष्टीवरून या मतास पुष्टी मिळते.

               

या मंदिरांव्यतिरिक्त राष्ट्रकूटांची स्थापत्य – शिल्पशैली त्यांनी खोदलेल्या वा खोदून घेतलेल्या बहुविध गुंफांतून दिसते. महाराष्ट्रात त्यांनी कान्हेरी, घारापुरी (मुंबईजवळ) आणि वेरूळ या तीन स्थळी लेणी खोदली. कान्हेरी येथील बौद्ध लेणी आणि वेरूळ येथील हिंदू व जैन लेणी प्रसिद्ध आहेत. यांतून त्यांचे काही शिलालेख उपलब्ध झाले असून ते तत्कालीन राजकीय घडामोडींवर प्रकाश टाकतात. या लेण्यांतील वेरूळ हे राष्ट्रकूलीन स्थापत्य व शिल्पकला यांचे जगप्रसिद्ध सुंदर प्रतीक आहे. राष्ट्रकूटांच्या लेण्यांना दर्शनी कमान नाही. लेण्यांतील स्तंभ सामान्यतः चौकोनी असून त्यांचा माथा गिरदीसारखा 3दिसतो.

               

कान्हेरी येथे सु. ११२ लहानमोठी लेणी खोदलेली असून या बौद्ध लेण्यांतील ७८ व्या गुंफेत राष्ट्रकूटांचे मांडलिक शिलाहार यांचा एक शिलालेख आहे. त्यावरून अमोघवर्षाच्या कारकीर्दीत या गुहेचे खोदकाम पूर्ण झाले असावे, असा तज्ञांचा कयास आहे. त्यातील बोधिसत्वादिकांच्या मूर्ती या काळातच खोदण्यात आल्या असाव्यात. 

               

मुंबईजवळील घारापुरी येथे पाच लेण्यांचा समूह आहे. अग्रहारपुरीवरून घारापुरी हे नाव रूढ झाले असावे. ते एलेफंटा केव्हज् या नावानेही प्रसिद्ध आहे. शिल्पाकृती, त्यांची घडण, शैलीकरण आणि एकूण तत्कालीन पेहराव यांवरून जेम्स बर्जेस, जेम्स फर्ग्युसन, भगवानलाल इंद्रजी इ. पुरातत्त्वज्ञांनी ही लेणी आठव्या-नवव्या शतकांत खोदली गेली असावीत आणि ती राष्ट्रकूटांची असावीत, असे अनुमान काढले आहे. येथील बहुतेक सर्व शिल्पे शैव संप्रदायातील असून त्यातून शिवाच्या जीवनाशी निगडित कथा आढळतात. मुख्य शिल्प ५·२३ मी. उंचीच्या त्रिमूर्तीचे असून ब्रह्मा, रुद्र व विष्णू यांचे अनुक्रमे शांत, रौद्र व उदात्त भाव तीत व्यक्त होतात. याशिवाय अर्धनारी नटेश्वर, गंगावतरण, कल्याणसुंदरमूर्ती, अंधकारसूरवधमूर्ती, उमामहेश्वर, तांडवनृत्य, रावणानुग्रह इ. प्रमुख शिल्पे प्रमाणबद्धता, जोष आणि भाव रेखाटन या दृष्टींनी उल्लेखनीय आहेत. चतुर्भुज द्वारपाल, गणेश, कार्त्तिकेय, ब्रह्मा, विष्णू, वगैरेंच्या अन्य काही मूर्तीही विलक्षण वेधक आहेत. शिल्पांशिवाय भिंतींवर-छतांवर चित्रे व रंगीत नक्षीकाम असावे, असा काही तज्ञांचा कयास आहे. येथील काही शिल्पे प्रिन्स ऑफ वेल्स वस्तुसंग्रहालयात ठेवलेली आहेत. त्यांपैकी ब्रह्मदेव, शिवाच्या एक-दोन भग्नमूर्ती आणि पार्वती व तिचे सेवक, नटराजाची कबंध मूर्ती, महिषासूरमर्दिनी इ. काही शिल्पे लक्षणीय आहेत. 

    


           

विश्वकर्मा गुहेचे प्रवेशद्वार, वेरूळ.औरंगाबादजवळची वेरूळची लेणी ही राष्ट्रकूट राजांची कलाक्षेत्रातील अनुपम व अतुलनीय देणगी आहे. येथे गुंफांचे साधारण तीन समूह आढळतात. त्यांत अनुक्रमे बौद्ध, हिंदू आणि जैन या धर्मांतील देव-देवतांचे शिल्पांकन आहे. दक्षिणेला बौद्ध आणि उत्तरेला जैन लेणी असून हिंदू लेणी या दोहोंमध्ये आहेत. सबंध मालिकेच्या मध्यावर कैलास हे शैलमंदिर असून त्याच्या पुढेमागे रामेश्वर, धुमार इ. पाच-सहा गुंफा आहेत. जैन गुंफांत छोटा कैलास, इंद्रसभा, जगन्नाथसभा इ. लेण्यांचा अंतर्भाव होतो. सुरुवातीच्या विश्वकर्मा, तीन थाल, जांभाल या बारा गुहा बौद्ध शिल्पाकृतींनी सुशोभित केलेल्या आहेत. यात बुद्धाच्या जीवनाशी निगडित कथात्मक प्रसंग असून प्रारंभी द्वारपालांच्या भव्य मूर्ती आहेत. याशिवाय पद्‌मपाणी, चक्रपाणी, अमिताभ इ. बुद्ध-बोधिसत्वादिकांच्या मूर्ती अलंकाररहित असल्या तरी त्यातून धर्मचक्र परिवर्तन मुद्रेचा सात्विक भाव दृग्गोचर होतो. या सर्व बुद्धमूर्तींचे वस्त्र अत्यंत तलम दाखविले असून त्यातून बुद्धाचे अंगसौष्ठव उत्तम रीतीने व्यक्त होते. येथील रूपकांना जिवंतपणा आहे, त्याचप्रमाणे उठावातील या शिल्पांत त्रिमिती चित्रणातून छायाप्रकाशाचा खेळ दिसतो. पहिल्या एक ते चार लेण्यांत तारादेवी आणि गंधर्व विद्याधर यांचे संच आहेत. या गुंफांचे वैशिष्ट्य म्हणजे इथल्या वीथिका डाव्या-उजव्या हातांच्या भिंतींत देवालयात खोदलेल्या आहेत. त्यासमोर नक्षीदार स्तंभ, दोन्ही बाजूंस अंध्री आणि समोर पारट, यांमुळे या देवालयांना एकाच वीथिकेचे रूप प्राप्त झाले आहे. 

त्यानंतरच्या १२ ते ३४ पर्यंतच्या हिंदू (ले. क्र. १३–२९) आणि जैन (ले. क्र. ३०–३४) लेण्यांत रामेश्वर (सीता की नहाणी), दशावतार, कैलास, धुमार, इंद्रसभा इ. नावांनी प्रसिद्ध असलेल्या कलात्मक लेण्यांचा अंतर्भाव होतो. यातील कैलास लेणे ही केवळ एक स्तिमित करणारी अलौकिक कलाकृती आहे. वेरूळ येतील सर्वांत मोठे आणि सुरेख शैलमंदिर म्हणून कैलास लेण्याचा उल्लेख करतात. ते संपूर्ण शिवमंदिर अखंड खडकातून सभोवतालच्या ओवऱ्यांसह खोदून काढलेले आहे. ते दोन मजली असून दोन्ही मजल्यांवर राष्ट्रकूट शैलीचे प्रचंड स्तंभ आहेत आणि दुसऱ्या मजल्याच्या द्वारापाशी भव्य द्वारपाल आहेत. यातील काही भागांवर चित्रकाम केलेले असून पूर्वी हे मंदिर अंतर्बाह्य रंगविलेले असावे. हे आश्चर्यकारक लेणे खोदून पूर्ण झाल्यावर ते कार्य आपल्या हातून पार पडले, याच्याबद्दल त्याच्या शिल्पीलाच आश्चर्य वाटले, असे एका कोरीव लेखात म्हटले आहे. तो असा, ‘एतन्मया कथमहो कृतमित्यकस्यात कर्तापि यस्य खलु विस्मयमापशिल्पी’. कैलासला पूर्वी कृष्णेश्वर म्हणत. दंतिदुर्गाच्या वेळी याचे काम चालू झाले आणि पहिल्या कृष्णाने ते पूर्ण केले. नंतरही सरिता, लंकेश्वर, मातृका इ. मंदिरे तेथे खोदण्यात आली. शैलमंदिर या संकल्पनेची परिणत व्यवस्था येथे स्पष्ट उमटली आहे. पट्टदकल येथील विरूपाक्ष आणि कांचीपूरम् येथील कैलासनाथ या दोन मंदिर-वास्तूंचा आदर्श या शैलमंदिरात दिसून येतो आणि आलंकरणात पल्लव व चालुक्य शैलींची संमिश्र छटा स्पष्ट दिसते. स्तंभ, कोनाडे, छप्पर, विमान, शिखर आदी वास्तू-विशेषांवरून या शैलमंदिराची द्रविडशैली जाणवते. तिला सुशोभनासाठी मूर्तिकामाचा साज चढविलेला असून गोपूराच्या दोन्ही बाजूला भिंतींवर त्रिपुरांतक, गरुडारूढ नारायण, अर्जुन-सुभद्रा विवाह अशांसारख्या मूर्ती आहेत. आतील बाजूस गजमूर्ती असून ध्वजस्तंभ आहेत. जोत्यावर रामायण, महाभारत, विष्णुपुराण यांतील कथा-दृश्ये कोरली आहेत. इतर शिल्पांत कमलाधिष्ठित लक्ष्मी, कैलासपर्वत हलविणारा रावण, शिवाला दशमुखे अर्पण करणारा दशानन, गंगा, यमुना आणि सरस्वती यांची शिल्पे उल्लेखनीय आहेत. यांतील प्रत्येक मूर्ती आपले स्वतंत्र अस्तित्व दर्शविते. या प्रतिमांव्यतिरिक्त आलिंगन चुंबनादी अवस्थांतील काही लक्षवेधक कामशिल्पे असून त्यांतील मिथुन मूर्तीतील ढंग, हावभाव व मुद्रा यांतून अभिजात कलेचा आविष्कार दिसतो.

दशावतार, रामेश्वर, धुमार, रावण की खाई इ. लेण्यांमधूनही विपुल शिल्पांकन आहे. दशावतार लेणे दंतिदुर्गाने खोदवून घेतले, असे तेथील शिलालेखांवरून स्पष्ट झाले आहे. शैव व वैष्णव संप्रदायांची शिल्पे आहेत. हे लेणे दुमजली असून खालच्या मजल्यावरील सभामंडपास १४ स्तंभ आहेत तर दुसऱ्या मजल्यावर ५४ स्तंभ आहेत. हे सर्व अत्यंत साधे कलाकुसर विरहित आहेत. स्तंभांच्या पुढे दर्शनी भागात दोन भव्य द्वारपाल उभे आहेत. रावण की खाई आणि रामेश्वर या गुंफा दशावतार लेण्याच्या आधी निर्माण झालेल्या असाव्यात. धुमार लेणे व घारापुरीचे लेणे यांत बरेच साम्य आहे. त्यांतही द्वारपालांच्या भव्य मूर्ती आहेत तर रामेश्वर लेण्यात गंगा-यमुनांच्या सुरेख मूर्ती आढळतात. या लेण्यांत नरसिंह, अंधकासुरवध, शिवतांडव, महिषासुरमर्दिनी, द्वारपाल इत्यादींच्या काही मूर्ती लक्षणीय आहेत. वेरूळ येथील जैन लेणी पहिल्या अमोघवर्षाच्या कारकीर्दीत खोदली असावीत. तीर्थंकार, चक्रेश्वरी यक्षिणी, उभे पार्श्वनाथ, गोमटेश्वर, अलंकारयुक्त गंधर्व-युग्म आणि नर्तक-नर्तिका यांच्या सुबक मूर्ती, हे या जैन लेण्यांचे वैशिष्ट्य. यांतील इंद्रसभा व जगन्नाथसभा या दोन गुंफा त्या दृष्टीने विशेष उल्लेखनीय आहेत. इंद्रसभेत इंद्र, इंद्राणी, शांतिनाथ व पार्श्वनाथ यांच्या भव्य मूर्ती आहेत. जगन्नाथसभेत महावीराची मूर्ती आहे. राष्ट्रकूटकालीन मूर्तिसंभारात विशेषतः वेरूळ येथील मूर्तीत भव्यतेची छटा सर्वत्र प्रकर्षाने जाणवते. येथील प्रत्येक मूर्ती सचेतन व जिवंत वाटते. तिच्या कलात्मक आविष्कारात कृतीचा भाव स्पष्ट दिसतो. त्यामुळे अगदी कथात्मक शिल्पांतही वास्तवता आली आहे. राष्ट्रकूटांची कीर्ती धर्म, विद्या, साहित्य आणि कला यांना त्यांनी दिलेल्या आश्रयामुळे अजरामर झाली आहे.

पहा : कान्हेरी कैलास लेणे घारापुरी मार्कंडादेव वेरूळ.

संदर्भ : 1. Altekar, A. S. Rashtrakutas and Their Times, Poona, 1967.

2. Ganguli, O. C. Goswami, A. The Art of the Rashtrakutas, Bombay, 1958.

3. Majumdar, R. C. Ed. The Age of Imperial Kanauj, Bombay, 1970.

5. Yazdani, Gulam, Ed. The Early History of the Deccan, Two Vols., London, 1960.

        ६. माटे, म. श्री. मराठवाड्याचे शिल्पवैभव, मुंबई, १९६४.

देशपांडे, सु. र.