राष्ट्रकुल क्रीडासामने : (कॉमनवेल्थ गेम्स). दुसऱ्या महायुद्धापूर्वी ब्रिटिश साम्राज्यांतर्गत देशांतील हौशी खेळाडूंचे, ‘ब्रिटिश एंपायर गेम्स’ हे ऑलिंपिक सामन्यांच्या धर्तीवरील सामने होत असत. १९३० पासून दर चार वर्षांनी हे सामने होत असत. पुढे दुसऱ्या महायुद्धानंतर अनेक देश स्वतंत्र झाले, त्यामुळे या सामन्यांना १९५० पासून ‘कॉमनवेल्थ गेम्स’ या नावाने संबोधण्यात येऊ लागले. या नवीन प्रकारच्या रचनेमध्ये संस्थापक देशांमध्ये भारत एक प्रमुख देश होता. सध्या हे सामने दोन ऑलिंपिक सामन्यांच्या दरम्यान दर चार वर्षांनी भरतात.

आंतरराष्ट्रीय क्रीडास्पर्धांची ही कल्पना ॲस्ट्ली कूपर (१८६६—९४) यांनी प्रथम १८९१ मध्ये मांडली. १९११ मध्ये पाचव्या जॉर्जच्या राज्यारोहणप्रसंगी साम्राज्योत्सव झाला. त्यावेळी लंडन येथे ‘क्रिस्टल पॅलेस’मध्ये या सामन्यांना प्रत्यक्ष सुरुवात झाली. त्यांत ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, द. आफ्रिका, न्यूझीलंड इ. ब्रिटिशांच्या वसाहती असलेल्या देशांनी भाग घेतला होता. त्यांत मैदानी शर्यती व स्पर्धा, पोहणे व मुष्टियुद्ध यांचा समावेश होता. १९३० च्या हॅमिल्टन (कॅनडा) येथील सामन्यांपासून या स्पर्धांना खरे आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले. त्यावर्षी ११ देशांच्या ४५० खेळाडूंनी भाग घेतला होता. १९३४ च्या लंडन येथील दुसऱ्या ब्रिटिश एंपायर गेम्स सामन्यांत १६ देशांच्या ६०० खेळाडूंनी भाग घेतला. नंतर पुढील ठिकाणी या स्पर्धा झाल्या : सिडनी, ऑस्ट्रेलिया (१९३८) (१९४२, ४६ च्या नियोजित स्पर्धा दुसऱ्या महायुद्धामुळे झाल्या नाहीत) ऑक्लंड, न्यूझीलंड (१९५०) व्हँकूव्हर, कॅनडा (१९५४) कार्डिफ, ब्रिटन (१९५८) पर्थ, ऑस्ट्रेलिया (१९६२) किंग्स्टन, जमेका (१९६६) एडिंबरो, ब्रिटन (१९७०) क्राइस्टचर्च, न्यूझीलंड (१९७४) एडमंटन, कॅनडा (१९७८) ब्रिस्बेन, ऑस्ट्रेलिया (१९८२) व एडिंबरो, ब्रिटन (२४ जुलै ते २ ऑगस्ट १९८६).

या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये बॅडमिंटन, मुष्टियुद्ध, सायकल स्पर्धा, पट्ट्याचे हात, नेमबाजी, पोहणे, विविध मैदानी क्रीडास्पर्धा, वजन उचलणे, कुस्ती इ. क्रीडाप्रकारांचा अंतर्भाव झाला आहे. या स्पर्धांत एकेकाळी ब्रिटिश साम्राज्यात असलेले देश भाग घेतात. या देशांचे परस्परव्यापार तसेच सांस्कृतिक दृष्ट्या काही विशेष संबंध होते. ते सर्व देश या स्पर्धांत भाग घेतात. याशिवाय फॉकलंड बेटे, हाँगकाँग, स्कॉटलंड इ. ब्रिटनचे प्रदेशही विभागीय गटामधून भाग घेऊ शकतात. आज या स्पर्धेत एकूण ५८ संघ भाग घेऊ शकतात तर प्रत्यक्ष भाग घेणाऱ्या देशांची संख्या ४९ आहे.

या स्पर्धांमध्ये खरी चुरस असते, ती इंग्लंड, कॅनडा व ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये. सध्या या क्रीडासंघटन समितीचे अध्यक्ष आहेत पीटर हेटले. १९८६ च्या एडिंबरो स्पर्धांमध्ये इंग्लंड व ऑस्ट्रेलिया यांच्यात खरी चुरस होती. त्यांत ऑस्ट्रेलियाला ३९, तर इंग्लंडला ३८ सुवर्णपदके मिळाली. या स्पर्धांमध्ये विशेष गाजली, ती सर्वांत लहान म्हणजे फक्त १३ वर्षे वयाची कॅनडाची जलतरणपटू ॲलिसन हिग्सन. तिने २०० मी. अंतर गोल हात पद्धतीने (ब्रेस्ट स्ट्रोक) २ मि. ३१·२० से. इतक्या अल्प वेळात पोहण्याचा एक नवाच विक्रम केला. ती १२ महिन्यांची असल्यापासून पोहायला शिकली व सराव करू लागली. इंग्लंडचा डॅली टॉमसन याने डेकॅथलॉनमधील १०० मी. अंतर १०·३० सेकंदांत पूर्ण केले. या १९८६ च्या स्पर्धा विशेषेकरून गाजल्या, त्या ३२ राष्ट्रांच्या बहिष्कारामुळे. त्याला कारण होते ब्रिटनचे आफ्रिकेसंबंधीचे वर्णद्वेषी धोरण आणि विशेष म्हणजे, स्पर्धांच्या अखेरच्या क्षणी इंग्लंडने आपले धोरण बदलले नाही, म्हणून भारताचे पंतप्रधान राजीव गांधी यांनी २१ जुलै १९८६ रोजी भारताचा या राष्ट्रकुल स्पर्धांवरील बहिष्काराचा निर्णय नाईलाजाने जाहीर केला.

भारताने आतापावेतो निरनिराळ्या राष्ट्रकुल स्पर्धांत भाग घेऊन समाधानकारक कामगिरी केलेली आहे. १९७० च्या एडिंबरो स्पर्धांत भारतीय कुस्तीगीरांनी ५ सुवर्ण पदके व ३ रौप्य पदके तसेच इतर क्रीडाप्रकारांत ४ ब्राँझ पदके मिळविली. याच स्पर्धांत सांगलीचे पैलवान मारुती माने यांनी कुस्तीत रौप्य पदक मिळविले तर शिवाजी भोसले यांनी मुष्टियुद्धात ब्राँझ पदक मिळविले. १९७४ मध्ये क्राइस्टचर्च (न्यूझीलंड) येथे कुस्तीमध्ये रघुनाथ पवारने मिळवलेले सुवर्ण पदक व शिवाजी चिंगळे, सत्पाल, दादू चौगुले यांनी मिळवलेली रौप्य पदके ही विशेष उल्लेखनीय कामगिरी होय.

इतर खेळांमध्ये १९५८ मध्ये कार्डिफ (ब्रिटन) येथे ४४० यार्ड (४०२·३३ मी.) धावण्याच्या शर्यतीत मिल्खासिंग यांनी सुवर्ण पदक मिळविले. १९६६ मध्ये किंग्स्टन (जमेका) येथे प्रवीणकुमारचे हातोडा-फेकमध्ये रौप्य पदक, तसेच दिनेश खन्नाचे बॅडमिंटनमधील ब्राँझ पदक ही विशेष उल्लेखनीय होत. १९७८ च्या एडमंटन (कॅनडा) येथील राष्ट्रकुल स्पर्धेत कॅनडाच्या ग्रॅहम स्मिथने ६ सुवर्ण पदके मिळवून राष्ट्रकुल स्पर्धेतील वैयक्तिक पदकांचा उच्चांक प्रस्थापित केला. प्रकाश पदुकोण याने बॅडमिंटनमध्ये इंग्लंडच्या डेरेक टॅलबॉटचा १५-९ १५-८ असा सरळ पराभव करून वैयक्तिक सुवर्ण पदक मिळविले, तर अमी धिया व कन्वर ठाकूर यांनी संमिश्र दुहेरीत ब्राँझ पदक मिळविले.

या स्पर्धांमध्ये कॅनडा, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया हे एकीकडे ५० ते १०० पदके मिळवीत असताना, भारताची पदकसंख्या मात्र १०-१५ च्या घरातच राहते. त्यातही कुस्ती हे भारताचे प्रमुख क्षेत्र. पण गेल्या अनेक स्पर्धांत पाठविलेल्या स्पर्धकांची संख्या वाढूनदेखील पदकांची संख्या मात्र घटते आहे. खेळांकडे पहाण्याचा दृष्टिकोण, त्यास लागणारी साधनसामग्री, प्रत्यक्ष मानवी श्रम व सामन्यांतील ऐनवेळची जिद्द यांत भारतीय खेळाडू आंतरराष्ट्रीय स्पर्धांत खूपच कमी पडतात, असे दिसून येते.

आलेगावकर, प. म.