राव, कानुरू लक्ष्मण : (१५ जुलै १९०२ – १८ मे १९८६). भारतीय स्थापत्य अभियंते. केंद्रीय मंत्रिमंडळात ते १९६३-७३ या काळात पाटबंधारे व वीजनिर्मिती खात्याचे मंत्री होते. धरणांसंबंधीचे एक तज्ञ म्हणून त्यांना आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळालेली होती.
राव यांचा जन्म आंध्र प्रदेशातील कांकिपाडू येथे झाला. मद्रास विद्यापीठाची बी. ई. पदवी संपादन केल्यावर त्यांनी ब्रिटनला जाऊन बर्मिंगहॅम विद्यापीठाच्या एम्. एस्सी. व पीएच्. डी. या पदव्या संपादन केल्या. ब्रिटनमधील लफबरो एंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ते काही काळ साहाय्यक प्राध्यापक होते. भारतात परत आल्यावर त्यांनी विविध राज्यांत नोकरी केली व पुढे केंद्र सरकारच्या पूर नियंत्रण खात्यात प्रमुख अभियंते झाले. १९६० मध्ये ते केंद्रीय पाटबंधारे व वीजनिर्मिती मंडळाचे अध्यक्ष झाले. नंतर ते केंद्र सरकारच्या जल व वीजनिर्मिती आयोगाच्या अभिकल्प (आराखडा) व संशोधन विभागाचे सदस्य म्हणून डिसेंबर १९६१ मध्ये सेवानिवृत्त झाले. १९६२, १९६७ व १९७१ या वर्षी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकींत ते विजयवाडा मतदार संघातून काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेवर निवडून गेले. पाटबंधारे व वीजनिर्मिती खात्याचे मंत्री आणि जल व वीजनिर्मिती आयोगाचे सदस्य या नात्याने भारतातील नागार्जुनसागर, कोसी, हिराकूद, चंबळ यांसारख्या बहुतेक सर्व महत्त्वाच्या धरणांच्या व जलविद्युत् निर्मिती प्रकल्पांच्या अभिकल्पांत त्यांचा निकटचा सहभाग होता. यूरोप, अमेरिका, ईजिप्त, चीन इ. प्रदेशांतील धरणांची त्यांनी पाहणी केली.
इन्स्टिट्यूशन ऑफ एंजिनियर्स (इंडिया) या संस्थेचे अध्यक्ष म्हणून १९५९-६० व १९६०-६१ या दोन वर्षांकरिता लागोपाठ त्यांची निवड झाली. संयुक्त राष्ट्रांच्या नैसर्गिक साधनसंपत्ती समितीचे तसेच आंतरराष्ट्रीय जलसंपत्ती संघटनेचे ते अध्यक्ष होत. ⇨मृदा यामिकी व पाया अभियांत्रिकी यांविषयीच्या आंतरराष्ट्रीय समितीतील राष्ट्रीय (भारतीय) समितीचेही ते अध्यक्ष होते.
भारत सरकारचा पद्मभूषण हा किताब (१९६३), आंध्र विद्यापीठाची सन्माननीय डी. एस्सी. पदवी (१९६०), लंडनच्या इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल एंजिनियर्स व इन्स्टिट्यूट ऑफ स्ट्रक्चरल एंजिनियर्स या संस्थांचे सदस्यत्व हे बहुमान त्यांना मिळाले. इन्स्टिट्यूशन ऑफ एंजिनियर्स (इंडिया) या संस्थेच्या जर्नलसाठी राव यांनी केलेल्या उत्कृष्ट लेखनासाठी त्यांना तीन वेळा राष्ट्रपतींच्या सुवर्णपदकाचा सन्मान प्राप्त झाला.
राव यांनी स्टँडर्ड बुक ऑन काँक्रीट, इंडियाज वॉटर-वेल्थ आणि कॅलक्युलेशन्स, डिझाइन्स अँड टेस्टिंग ऑफ रिइन्फोर्सड काँक्रीट हे ग्रंथ लिहिले. ते हैदराबाद येथे मृत्यू पावले.
कुलकर्णी, सतीश वि.