त्यांच्या चित्रांचे विषय हे सभोवतीच्या जीवनातून घेतलेले असत. उदा., ‘बाउल’, ‘संथाळ’, ‘माला’ या चित्रांतील व्यक्तिरेखा. तद्वतच कृष्ण-बलराम, गोपी, शिव, राम यांसारख्या पौराणिक व्यक्तिरेखा तसेच प्राणिजगतातील मांजर, गाय, घोडा, मासा, पक्षी इ. विषयही त्यांच्या चित्रांत आढळतात. मुख्यत्वे माता आणि बालक या विषयांवर व ख्रिस्त जीवनावरही त्यांनी चित्रे रंगवली. या त्यांच्या चित्रांतून येणारे आकार, घटना, व्यक्ती, वस्तू, प्राणी हे आभास निर्माण न करता चित्राचा घटक म्हणून ठसठशीतपणे साकार होताना दिसतात. कालीघाट शैलीचा प्रभाव असलेल्या ठसठशीत, वक्राकार व जोरकस लय असलेल्या रेषा हे त्यांच्या चित्रांचे एक खास वैशिष्ट्य. तैलरंग व कॅन्व्हास व्यतिरिक्त त्यांनी भारतीय परंपरेतील मृण्मय, वनस्पतिजन्य रंग, तसेच चुन्याचा थर असलेले वस्त्र अथवा लाकडी फलक वापरले. ज्यावेळी त्यांनी तैलरंगाऐवजी जलरंग हे माध्यम स्वीकारले, त्यावेळी त्रिमितीय आभास ही संकल्पनाच बाजूला पडून त्याची जागा मर्यादित रंग आणि मर्यादित रेषा यांद्वारे निर्माण होणाऱ्या चित्रांनी घेतली. चित्रासाठी वापरलेले रंग मृण्मय किंवा वनस्पतिजन्य असूनही संपूर्ण चित्र तेजस्वी रंगसंगतीचे वाटते. या मर्यादित रंगच्छटा हिंगूळ, हरिताल, खडू, चुनखडी इ. पदार्थांपासून तयार केलेल्या असत. बंधकद्रव्य म्हणून अंड्याचा बलक व मुख्यतः चिंचोक्याचा डिंक वापरीत. वेगवेगळ्या माध्यमांविषयीच्या आकर्षणामुळे त्यांनी मृत्तिकाशिल्प व कोरीवकामही केले आहे.
रूढ प्रस्थापित पाश्चात्त्य शैलीचा त्याग करून त्यांनी लोककलेचा केलेला आविष्कार हा केवळ त्यांच्या व्यक्तिगत कलाजीवनालाच नव्हे, तर संपूर्ण भारतीय कलाजीवनालाच नवे वळण देणारा ठरला. म्हणूनच भारतीय कलेचा प्रारंभीचा आधुनिक कालखंड घडविण्यात ज्यांचा हातभार लागला, त्यांत जामिनी राय यांचे स्वतंत्र व महत्त्वाचे स्थान आहे. कलेतील भारतीयत्वाच्या प्रसारासाठी, जास्तीत जास्त घरांतून चित्रे पोहोचावीत म्हणून आपल्या एकाच कलाकृतीच्या अनेक प्रती ते स्वतः रंगवीत असत व त्या अत्यंत अल्प किंमतीला विकत असत. कला व तिच्या शुद्धतेसाठी असलेल्या असीम निष्ठेचेच हे द्योतक आहे.
त्यांच्या चित्रांची प्रदर्शने लंडन (१९४६) व न्यूयॉर्क (१९५३) येथे भरली होती. पद्मभूषण (१९५५), ललित कला अकादमीचे फेलो (१९५६), रवींद्र भारती विद्यापीठाची सन्माननीय डी. लिट्. (१९६७) इ. मानसन्मान त्यांना लाभले. कलकत्ता येथे त्यांचे निधन झाले. त्यांची चित्रे ‘नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न म्यूझियम’ व अनेक खाजगी संग्रहांत संग्रहीत केली आहेत. (चित्रपत्र १९).
संदर्भ : ललित कला अकादेमी, समकालीन भारतीय कला सीरीज, यामिनी राय, नवी दिल्ली, १९८३.
खडपेकर, साधना
“