रायचूर : कर्नाटक राज्यातील याच नावाच्या जिल्ह्याचे व तालुक्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या १,२४,६०० (१९८१). हे कर्नाटक राज्याच्या ईशान्य भागात कृष्णा-तुंगभद्रा नद्यांच्या दुआबात वसलेले आहे. मुंबई-मद्रास लोहमार्ग रायचूरवरून जातो. कन्नड भाषेत याला रायचूरू म्हणून ओळखले जाते. याला राचूरू असेही म्हटले जाई. वेगवेगळ्या प्राचीन शिलालेखांतील उल्लेखिलेले राचऊर किंवा राचनूर हेच सध्याचे रायचूर असावे. राच म्हणजे राजा व ऊर म्हणजे ठिकाण किंवा नगर. कन्नड भाषेतील राजाचे ठिकाण या अर्थाच्या मूळ राचऊर किंवा राचनूर या शब्दावरून रायचूर हे नाव पडले. प्राचीन काळी हे महत्त्वाचे ठिकाण असावे. नायचूर असाही याचा उल्लेख आढळतो. बाराव्या शतकापासून रायचूरचा इतिहास मिळतो. येथील किल्ला पूर्वी विशेष महत्त्वाचा होता. किल्ल्याला एकूण पाच दरवाजे आहेत. किल्ल्यातील १२·८मी. X ·९ मी. आकाराच्या प्रचंड दगडावरील शिलालेखावरून हा किल्ला गोरे गंगय्या रेड्डी याने १२९४ मध्ये बांधल्याचे दिसते. किल्ल्याच्या तीन बाजूंना खंदक व एका बाजूला टेकडी आहे. मलिक काफूर याने हे ठिकाण १३१२ मध्ये घेतले. त्यानंतर ते विजयानगर, बहमनी, विजापूर, मुघल व आसफजाह राजांच्या ताब्यात गेले. आदिलशाहीची १४८९ मध्ये रायचूर ही पहिली राजधानी बनली. औरंगजेबाने विजापूर व गोवळकोंड्यानंतर रायचूर घेतले. शहराभोवती इतिहासकालीन दुहेरी तटबंदी आहे. रायचूरच्या सभोवतालच्या प्रदेशात अनेक ऐतिहासिक लढाया झाल्या.

शहरात अनेक मशिदी आढळतात. उदा., जामी मशीद, काली मशीद इ. यांशिवाय शहरात पीर सैलानी शाहची कबर आहे. जामी मशिदीच्या समोरच प्राचीन हिंदू राजप्रासादाचे अवशेष पहावयास मिळतात. व्यापारी, औद्योगिक व शैक्षणिक दृष्ट्या रायचूर महत्त्वाचे आहे. तृणधान्ये, मिरची, कापूस, तेलबिया इ. कृषिमालाच्या व्यापाराचे तसेच कापूस वटणी, कातडी कमावणे, तेलगिरण्या, भातसडी व मद्यनिर्मितीचे महत्त्वाचे कारखाने येथे आहेत. जवळच तांबे व लोहधातुक यांच्या खाणी आहेत. गुलबर्गा विद्यापीठाशी (स्थापना १९८०) संलग्न असलेली आठ महाविद्यालये शहरात आहेत.

चौधरी, वसंत