रामवर्मा, वयलार : (२५ मार्च १९२८ – २७ ऑक्टोबर १९७५). आधुनिक मल्याळम् कवी, गीतकार व कथालेखक. जन्म अलेप्पी जिल्ह्यातील वयलार या गावी. माध्यमिक शिक्षण घेतल्यावर वयलार लढ्याच्या वेळी तेव्हाच्या अविभक्त कम्युनिस्ट पक्षाशी त्यांनी संबंध प्रस्थापित केले. साहित्यातील प्रगतिशील चळवळीशीही त्यांचा सक्रिय संबंध होता. त्यांच्या आयुष्यातील अत्यंत सर्जनशील असा काल त्यांनी चित्रपटांसाठी गीते रचण्यात व्यतीत केला. हजारावर चित्रपटगीते त्यांनी रचली. त्यांची चित्रपटगीते काव्यगुणांनी ओतप्रोत असून ती लोकप्रियही आहेत. त्यांच्या सर्गसंगीतम् (१९६१) ह्या काव्यसंग्रहास केरळ साहित्य अकादेमी पुरस्कार लाभला. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मरणार्थ मल्याळम् मधील सर्वोत्कृष्ट सर्जनशील कृतीस ‘वयलार रामवर्मा पुरस्कार’ देण्यात येऊ लागला.

त्यांच्या बहुतांश कृती काव्यसंग्रहांच्या व चित्रपटगीत – संग्रहाच्या स्वरूपात आहेत. त्यांनी काही कथाही लिहिल्या. त्यांच्या काही कृतींची नावे पुढीलप्रमाणे : काव्य-पदमुद्रकळ (१९४८), कोंतयुम् पूणूलूम् (१९५०), नाटिंटे नाटम् (१९५२), आयिष (१९५४), एनिक्कु मरणलिल्ल (१९५५), ओरु जूडास जनियक्कुन्नु (१९५५), मुळंकोटु (१९५५), एन्टे माट्टोलिक्कवितकळ (१९५७), सर्गसंगीतम् (१९६१), पाटिप्पतिंज पाट्टुकळ (१९६१), एन्टे चलच्चित्रगानंगळ (१९६५ –६७) इत्यादी. लघुकथासंग्रह – वेट्टुम् तिरुतुम् (१९५१) आणि रक्तम् कलर्न्न मण्णु (१९५६).

सुरुवातीच्या काळात वयलार, पी. भास्करन्, ओ. एन्. व्ही. कुरुप आणि तिरुनल्लूर करुणाकरन् हे सर्वजण एटप्पळ्ळी संप्रदायाचे अनुयायी होते परंतु नंतर ते सामाजिक क्रांतीचा पुरस्कार करणारे कवी झाले. यांतील वयलार व भास्करन् हे नंतर चित्रपटसृष्टीकडे वळले तरीही त्यांनी आपल्या सर्वच साहित्यकृतींतून आपली क्रांतिकारी भूमिका कायम ठेवलेली दिसते. काव्याद्वारे समाजवादी विचारांचा पुरस्कार हे वयलार यांचे बलस्थान आहे. त्यांच्या काव्यात गतिशीलता व जोम ही वैशिष्ट्ये प्रामुख्याने दिसतात. काहीसा शब्दबंबाळपणाही त्यांच्या आरंभीच्या काव्यात दिसतो. त्यांच्या ठिकाणी काटेकोरपणाचा व संक्षेपाचा अभाव आहे. त्यांच्या शब्दकळेला वक्तृत्वाचा बाज आहे. सूचकतेपेक्षा ते सरळसोट अभिव्यक्तीचा अवलंब करतात. त्यांच्या कवितेत अनेकदा विरोधी शक्तींना शिव्याशाप दिलेले आढळतात. नेमकेपणा व मुद्देसूदपणाही त्यांच्या काव्यात आढळत नाही. जुन्याच गोष्टींचे पुन्हा अर्थविवरण करण्याचा ते प्रयत्न करतात. त्यांची नंतरची कविता अधिक परिपक्व व सरस आहे. असे असले, तरी एकंदरीत क्रांतिकारी ध्येयाने प्रेरित झालेल्या ह्या कवीचे मल्याळम् साहित्यात कवी म्हणून उच्च प्रतीचे स्थान आहे.

भास्करन्, टी. (इं.) सुर्वे, भा. ग. (म.)