रामन् पिळ्ळा, सी. व्ही. : (१९ मे १८५८ –२० मार्च १९२२). एकोणिसाव्या शतकातील एक श्रेष्ठ मलयाळम् कादंबरीकार व प्रहसनकार. मल्याळम्‌ भाषेचे ‘स्कॉट’ म्हणून ते ओळखले जातात. जन्म त्रिवेंद्रम् येथे. शिक्षण बी. ए. विद्यार्थिदशेपासूनच ते राजकीय चळवळींत सहभागी होते केरळ पॅट्रियट ह्या पत्राचे ते संपादक होते. नाटकांमधून ते भूमिकाही करत. तेव्हाच्या त्रावणकोर संस्थानात ते प्रमुख भाषांतरकार तसेच शासकीय मुद्रणालयात अधीक्षक म्हणूनही नोकरीस होते. त्रावणकोरच्या इतिहासावर आधारित महाकाव्यसदृश अशा तीन भव्य कांदबऱ्या त्यांनी लिहिल्या. मल्याळम्‌मधील आद्य कादंबरी इंदुलेखा (१८८९) लिहिणारे ⇨ ओ. चंतू मेनन (१८४६ – १८९९) हे त्यांचे समकालीन व प्रतिस्पर्धी होते.

सी. व्ही. रामन् पिळ्ळांनी आपल्या तीन प्रख्यात कादंबऱ्यांतून ऐतिहासिक काळातील जीवनाचे चित्रण अत्यंत बारकाईने व सर्व तपशीलांसह केले आहे. चंतू मेनन यांची इंदुलेखा ही वास्तववादी, तर सी. व्हीं. च्या सर्व ऐतिहासिक कादंबऱ्या स्वच्छंदतावादी आहेत. सामाजिक सुधारणेच्या प्रेरणेतून त्यांनी ८ प्रहसने लिहिली.

मार्तांड वर्मा (१८९१), धर्मराज (१९१३) आणि राम राज बहादूर (२ खंड, १९१७, १९२०) ह्या त्यांच्या अत्यंत गाजलेल्या ऐतिहासिक कादंबऱ्या होत. चंतू मेनन व सी. व्हीं.नी मल्याळम्‌मध्ये कादंबरीचे प्रवर्तन तर केलेच पण कादंबरीवाचनाची लोकांत अभिरुचीही निर्माण केली. प्रेमामृतम् (१९१५) ही त्यांची एकमेव सामाजिक कादंबरी आहे. या दोघा श्रेष्ठ कादंबरीकारांनी मल्याळम्‌ कादंबरीचा भक्कम पाया घातला. मार्तांड वर्मा आणि राम राज बहादूर ह्या दोन कादंबऱ्यांच्या १९५१ पर्यंत पंचविसावर आवृत्या निघाल्या. यावरून त्यांच्या लोकप्रियतेची कल्पना येईल.

सी. व्हीं. नी आपल्या तिन्ही ऐतिहासिक कादंबऱ्यांतील व्यक्तिरेखा अत्यंत प्रभावीपणे, सुस्पष्टपणे व सूक्ष्मपणे चितारल्या असून सर्वच ऐतिहासिक प्रसंग जिवंतपणे उभे केले आहेत. व्यक्तिरेखांतील वैविध्यही वैशिष्ट्यपूर्ण आहे. कुठल्याही दोन व्यक्तिरेखा एकसारख्या नाहीत. भाषा, वेषभूषा, वर्तन व इतर प्रकारांतून हे वेगळेपण त्यांनी चित्रित केले आहे. ऐतिहासिक काळाचे केवळ आंशिक दर्शन न घडवता संपूर्ण सामाजिक, राजकीय, धार्मिक इ. जीवनांगांचे त्यांनी तपशीलवार व जिवंत दर्शन मोठ्या ताकदीने घडवले आहे. अत्यंत विस्तृत व भव्य पटावर त्यांनी ह्या कादंबऱ्या लिहिल्या. ‘केशव पिळ्ळा’, ‘केशवन उण्णित्तान्’, ‘सुभद्रा’, ‘सावित्री’ ह्या त्यांनी निर्माण केलेल्या व्यक्तिरेखा चिरंतन आहेत.

मार्तांड वर्मा ही त्यांची सुरुवातीची कादंबरी असून तीवर काहीसा स्कॉटच्या इव्हानहोचा प्रभाव दिसतो. धर्मराज ही त्यांची कथानकाच्या व हाताळणीच्या दृष्टीने अधिक परिपक्व कादंबरी आहे. त्यांची सर्वोत्कृष्ट व अत्यंत परिपक्व कादंबरी राम राज बहादूर ही होय. कथानक, व्यक्तिचित्रण व शैली या बाबतींत ती एक महान कादंबरी मानली जाते. लोकांना स्फूर्ती मिळावी या प्रेरणेतून त्यांनी त्रावणकोरच्या इतिहासातील शूर राजांचे चित्रण मोठ्या एकात्मतेने, प्रामाणिकपणे, देशभक्तीच्या ज्वलंत भावनेतून केले. त्यांच्या व्यक्तिरेखा आदर्शवादी आहेत. इंग्रजी कादंबऱ्यांचा प्रभाव त्यांच्यावर पडला. त्यांची भाषा काहीशी क्लिष्ट आहे आणि कथानकाची रचनाही जटिल आहे. त्यामुळे वाचकांचा अनेक वेळा गोंधळही उडतो तथापि अखेरपर्यंत वाचकाची जिज्ञासा कायम ठेवण्याचे त्यांचे कसब कौतुकास्पद आहे. त्यांच्या प्रेमामृतम् ह्या सामाजिक कादंबरीस त्यांच्या ऐतिहासिक कादंबऱ्यांची उंची प्राप्त होऊ शकली नाही. त्रावणकोरच्या मातीशी व परंपरांशी त्यांच्या ऐतिहासिक कादंबऱ्यांचे अतूट व चिरंतन नाते आहे.

चंतू मेनन आणि सी. व्हीं. नंतर अनेकांनी स्वतंत्रपणे तसेच त्यांच्या अनुकरणात्मक असे कादंबरीलेखन केले पण त्यातील कोणासही या दोघांची कलात्मक उंची गाठता आली नाही. सी. व्हीं. च्या ह्या तिन्ही ऐतिहासिक कादंबऱ्यांची इतरांनी नाट्यरूपांतरे करून ती यशस्वीपणे रंगभूमीवर आणली. म्हणूनच एका अर्थी ऐतिहासिक मल्याळम् नाटकाचे सी. व्ही. हेच जनक मानले जातात.

सी. व्हीं. नी सामाजिक दोष दर्शवून सुधारणा घडवून आणण्याच्या प्रेरणेतून प्रयोगक्षम अशी आठ प्रहसनसदृश विनोदी नाटके लिहिली. मल्याळम्‌मधील आधुनिक नाटकांची सुरुवात सी. व्हीं. च्या कुरुप्पिल्लाक्कळरी (१९०९) ह्या प्रहसनाने झाली. कुरुप्पिंटे तिरिप्पु (१९४९), पंटत्ते पाच्चन् (१९५०), वटळर पप्पन् (१९३२) ही त्यांची इतर उल्लेखनीय प्रहसने होत. यापूर्वी १८८४ मध्ये त्यांनी एक विनोदी नाटक लिहिले होते तथापि संस्कृत धर्तीवर रचलेली पद्ये तसेच बोलभाषेतील गद्याचा वापर असे त्याचे संमिश्र स्वरूप होते.

पी. के. परमेश्वरन् नायर यांनी मल्याळम्‌मध्ये सी. व्हीं. चे विस्तृत चरित्र सी. व्ही. रामन् पिळ्ळा ह्या नावाने प्रसिद्ध केले आहे.

भास्करन्, टी. (इं.) सुर्वे, भा. ग. (म.)