रामकृष्ण मिशन : एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस बंगालमध्ये स्थापना झालेली आध्यात्मिक क्षेत्रातील एक सेवाभावी संस्था. संस्थापक स्वामी विवेकानंद. मूळ प्रेरणा त्यांचे सद्गुरू ⇨ रामकृष्ण परमहंस यांची. आयुष्याच्या अखेरीस काशीपूरच्या उद्यानगृहात कर्करोगाने आजारी असताना जानेवारी ते ऑगस्ट १८८६ या अवधीत आपल्या आठ-दहा तरुण शिष्यांना व विशेषेकरून विवेकानंदांना म्हणजे त्यावेळच्या नरेंद्राला रामकृष्णांनी जे मार्गदर्शन वेळोवेळच्या संवादांतून केले, त्यामध्ये रामकृष्ण मिशनच्या स्थापनेचे बीज आहे. नरेंद्राला समाधीचा पहिला अनुभव आला तेव्हाच रामकृष्ण त्याला म्हणाले, ‘तुला या जगात जगन्मातेचे काही कार्य करायचे आहे, ते पुरे होईतो तुला या आनंदात बुडून राहता येणार नाही’. त्यानंतर आपल्या अंतरंगशिष्यांपैकी नरेंद्र, राखाल आदी अकरा जणांना रामकृष्णांनी भगवी वस्त्रे व रुद्राक्षाच्या माळा दिल्या, छोटासा विधी करून संन्यास दिला आणि एके दिवशी भिक्षा मागून आणण्यास सांगितले. रामकृष्णांनी दिलेला हा संन्यास म्हणजे रामकृष्ण मिशनचा मूळ प्रारंभ होय, अशी त्यांच्या शिष्यांची धारणा आहे. अगदी अखेरीस निरवानिरव करावी त्याप्रमाणे रामकृष्णांनी नरेंद्रास म्हटले, ‘माझ्या मागे या सर्व मुलांची नीट काळजी घे, यांतील कुणी घरी परत जाणार नाही व संसाराच्या पाशात अडकणार नाही ते पहा.’ आपली पत्नी सारदादेवी यांना रामकृष्ण म्हणाले, ‘तुम्हालाही काही कार्य करावे लागेल.’ सारदामातेचे वात्सल्यपूर्ण मार्गदर्शन पुढे १९२० पर्यंत या अंतरंगशिष्यांना मिळत राहिले.
पंधरा ऑगस्ट १८८६ च्या मध्यरात्रीनंतर रामकृष्णांनी महासमाधी घेतल्यावर महिनाभराच्या आत कलकत्त्याच्या वराहनगर भागातील एक पडक्या घरात हे सारे अंतरंगशिष्य राहू लागले. हा पहिला मठ. रामकृष्णांचे गृहस्थाश्रमी शिष्य काही आर्थिक साहाय्य करीत. मिळेल ते दोन घास अन्न आणि आध्यात्मिक साधना, धर्मग्रंथांचा अभ्यास व अधूनमधून तीर्थयात्रा असा त्यांचा जीवनक्रम होता. १८८७ च्या प्रारंभी विरजा होम करून या सर्वांनी विधिपूर्वक संन्यासदीक्षा घेतली व नवीन नावे धारण केली. स्वामी विवेकानंद, स्वामी ब्रह्मानंद, स्वामी सारदानंद, स्वामी प्रेमानंद, स्वामी शिवानंद, स्वामी अभेदानंद, स्वामी तुरीयानंद, स्वामी रामकृष्णानंद, स्वामी त्रिगुणातीतानंद, स्वामी योगानंद, स्वामी निरंजनानंद, स्वामी अद्वैतानंद आणि स्वामी अद्भुतानंद अशी त्यांची नावे होत. या सर्वांच्या सहकार्यातून पुढे रामकृष्ण मिशन आकारास आले. ते प्रत्यक्षात उतरण्यापूर्वी विवेकानंदांनी १८९१ पासून सु. अडीच वर्षाच्या अवधीत केलेले अज्ञातावस्थेतील साऱ्या भारतामधील भ्रमण, १८९३ साली शिकागो येथील सर्वधर्म परिषदेत हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व करून मिळवलेले अपूर्व यश, इंग्लंड-अमेरिकेत साडेतीन वर्षे संचार करून स्थापलेल्या दोन तीन वेदान्त सोसायट्या, त्यांचे शिष्यत्व पतकरलेल्या सात-आठ पाश्चात्य शिष्यांचे भारतात झालेले आगमन आणि विवेकानंदांनी विदेशांत केलेल्या महान कार्याचा भारतात झालेला अपूर्व गौरव एवढ्या घटना पुढील आठदहा वर्षांत घडाव्या लागल्या. १ मे १८९७ या दिवशी कलकत्त्याला बागबझार भागात बलराम बसू यांच्या घरी आपले गुरूबंधू व रामकृष्णांचे प्रमुख अनुयायी यांची खास सभा घेऊन विवेकानंदांनी रामकृष्ण मिशनची रीतसर स्थापना केली. त्याचे कायदेशीर विश्वस्तनिधीपत्र शासनाकडे नोंदवण्यात आले.
या संस्थेचे सर्वपरिचित नाव ‘रामकृष्ण मिशन’ हे असले, तरी मूळचा शब्द आहे ‘रामकृष्ण संघ’. काही वर्षांनंतर सोयीसाठी रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशन असे त्याचे दोन स्वतंत्र भाग करण्यात आले. विश्वस्तपत्रे व विश्वस्तमंडळे वेगळी करण्यात आली. मात्र रामकृष्ण संघाचे संन्यासीच दोन्ही संस्थांच्या विश्वस्त मंडळांत असतात. मठाच्या शाखांतून धार्मिक कार्य, तर मिशनच्या शाखांच्या द्वारा शिक्षण, रुग्णालये व आपत्कालीन साहाय्य इ. सेवाकार्ये अशी विभागणी करण्यात आली. रामकृष्णांच्या जीवनात आविष्कृत झालेल्या आध्यात्मिक सत्यांचा आचार व प्रचार करणे, पाश्चात्य जगात वेदान्त धर्माचा संदेश पोहोचवणे, भारतात आधुनिक विद्येचा प्रसार करण्यासाठी शिक्षणसंस्था चालवणे अशी ध्येये समोर ठेवून रामकृष्ण संघ स्थापन केला गेला आहे. त्याग आणि सेवा हे त्यांचे बीद्र, शिवभावाने जीवसेवा ही धारणा, तर ‘आत्मनो मोक्षार्थ जगद्वितीय च।’ हे बोधवाक्य आहे. कर्म, ज्ञान, भक्ती आणि योग या सर्वांचा मेळ साधणाऱ्या प्रतीकांनी युक्त असे बोधचिन्ह विवेकानंदांनी तयार केलेले आहे. त्यासाठी अनुक्रमे तरंगयुक्त पाणी, उगवता सूर्य, विकसित कमलपुष्प आणि वेटोळे घातलेला नाग अशी योजना असून, मध्यभागीचा हंस परमात्म्याचे प्रतीक आहे. मठाच्या सर्व शाखांमधून रामकृष्णांची पूजाआरती होते, तर रामकृष्ण, सारदामाता व विवेकानंद यांचे जन्मदिनोत्सव प्रतिवर्षी साजरे होतात. कोणत्याही स्वरूपाचा जातिभेद, धर्मभेद वा उच्चनीचभाव मानला जात नाही. १९०२ मध्ये ⇨ विवेकानंद समाधिस्थ झाल्यावर ब्रह्मानंद, शिवानंद, अखंडानंद आदी गुरूबंधूंनी १९३९ पर्यंत नेतृत्व केले, त्यानंतर संन्याशांच्या पुढील पिढीने तो भार उचलला.
वराहनगर येथून १८९२ मध्ये आलमबझारला, तेथून १८९८ मध्ये नीलांबर मुखर्जींच्या उद्यानगृहात व अखेर १८९९ मध्ये बेलूरला स्वतःच्या मालकीच्या जागेत रामकृष्ण संघ आला. बेलूर येथे त्यांचे केंद्र-कार्यालय आहे. संन्यासी व ब्रह्मचारी मिळून एक हजारांहून अधिक कार्यकर्ते तेथे आहेत. नवागत ब्रह्मचाऱ्यासाठी बेलूर मठात शिक्षणकेंद्र आहे, त्याचा दोन वर्षांचा अभ्यासक्रम पदव्युत्तर पातळीचा आहे. मठ व मिशन यांच्या भारताच्या सर्व भागांत मिळून नव्वदपर्यंत तर फ्रान्स, इंग्लंड, अमेरिका, अर्जेंटिना, स्वित्झर्लंड, सिंगापूर, मॉरिशस, फिजी बेटे, श्रीलंका व बांगला देश या इतर देशांत तीसहून अधिक शाखा आहेत. भारतामध्ये तेरा सुसज्ज रुग्णालये व ऐंशीहून अधिक छोटी रुग्णालये आहेत. सुमारे शंभर वसतिगृहांतून दहा हजारांवर विद्यार्थी आणि एक हजारावर विद्यार्थिनी यांची सोय आहे. सर्व शिक्षणसंस्थातून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सव्वा लाख आहे, तर स्थापत्य महाविद्यालयापासून तो महिला आणि आदिवासी यांच्यासाठी चालवल्या जाणाऱ्या वर्गांपर्यंत पाचशेहून अधिक शिक्षणसंस्था आहेत. साथी, दुष्काळ, भूकंप, महापूर अशा आपत्काली केल्या गेलेल्या सेवाकार्यांची संख्या शेकड्यांनी मोजावी लागेल. सारदामातेच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने १९४५ साली स्त्रियांसाठी स्वतंत्र संन्यासिनींचा सारदामठ स्थापन झाला. शिवाय श्रीरामकृष्ण-सारदा मिशन ही एक वेगळी संस्थाही कार्यरत आहे.
विवेकानंद अमेरिकेत असतानाच मद्रासहून ब्रह्मवादिन् हे इंग्रजी नियतकालिक सुरू झाले, पण ते नंतर बंद पडले. हिमालयातील मायावतीच्या आश्रमातून प्रबुद्ध भारत, तर कलकत्त्याहून बंगालीतील उद्बोधन ही नियतकालिके विवेकानंद भारतात परतल्यावर सुरू झाली. पुढे त्यांत दोनतीन इंग्रजी, तसेच हिंदी, मराठी, तमिळ, मलयाळम् व फ्रेंच या भाषांतील नियतकालिकांची भर पडली. विवेकानंदांची व्याख्याने आणि ‘एम्.’ यांचे रामकृष्णवचनामृत यांच्या निमित्ताने ग्रंथप्रकाशनाचा विभाग सुरू झाला. आज भारतात व परदेशांत मिळून पाचसात प्रकाशन केंद्रे आहेत. भारतीय संस्कृती व रामकृष्ण-विवेकानंदांची विचारधारा यांवरील शेकडो पुस्तके अनेक भाषांमधून आजवर प्रसिद्ध झाली आहेत आणि होत आहेत. राजकारणापासून रामकृष्ण संघ पूर्णपणे अलिप्त आहे. त्याचे कार्य सर्वस्वी आध्यात्मिक व सांस्कृतिक आहे. शंभर वर्षे उलटली, नाना आपत्ती येत राहिल्या, तरी आपल्या सत्त्वाला व ध्येयाला या संस्थेने ढळ पोहोचू दिलेला नाही. प्रसिद्धीपासून पूर्णपणे दूर राहून सारे कार्य शांतपणाने चालू आहे. स्वदेशातील दरिद्रनारायणाची सेवा आणि भारताच्या आध्यात्मिक संस्कृतीतील शाश्वत मूल्यांचा साऱ्या जगात प्रसार, असे कार्य करणारी ही अग्रगण्य संस्था आहे.
संदर्भ : 1. Isherwood, Christopher, Ramkrishna and His Disciples, New York, 1965.
2. Majumdar, R. C. Ed. Swami Vivekananda Centenary Volume, Calcutta, 1963.
3. Swami Budhananda, The Ramakrishna Movement, Calcutta, 1980.
4. Swami Gambhirananda, History of the Ramakrishna Math and Mission, Calcutta,
1957.
करंदीकर, वि. रा.
“