राब्बी : राब्बी या हिब्रू भाषेतील शब्दाचा अर्थ ‘माझा गुरू’ असा आहे. सामान्यतः ज्यू विद्वानांना तसेच धार्मिक ग्रंथ व तत्त्वे शिकविणाऱ्यांना ही उपाधी लावली जाते. बॅबिलनमध्ये केवळ राब (गुरू) हीच उपाधी पूर्वी होती परंतु पॅलेस्टाइनमध्ये ‘राब्बी’ ही उपाधी विशेष प्रचारात होती. ⇨ येशू ख्रिस्ताच्या असल्या उपाध्या नव्हत्या. गॉस्पेलमध्ये कुठेकुठे त्यांचा जो वापर आढळतो, तो नंतरच्या लेखकांनी केला असावा, असे तज्ञांचे मत आहे. एका प्राचीन हिब्रू ग्रंथात म्हटले आहे, की “ज्याला बरेच शिष्य आहेत व त्या शिष्यांना शिष्य आहेत, अशा गुरूला ‘राब्बी’ म्हणतात. जेव्हा त्याचे हे शिष्य विसरले जातात (म्हातारे होतात) तेव्हा त्याला ‘राब्बन’ म्हणतात आणि जेव्हा त्या शिष्यांचे शिष्यही विस्मृतीत जातात तेव्हा केवळ त्याच्या नावाने त्याला संबोधण्यात येते.” राब्बी हा केवळ शिक्षक असतो. ईश्वर आणि मानव यांतला तो मध्यस्थ नव्हे. यहुदी धर्मात धर्मगुरूंच्या अधिकाराचे क्रम किंवा पायऱ्या मानल्या जात नाहीत. केवळ यहुदी धर्माच्या सखोल ज्ञानाने कोणताही माणूस राब्बी बनू शकतो. टॅलमुडिक (तलमूद) काळात (इ. स. पहिले ते पाचवे शतक) राब्बी हे ‘जुना करार’ तसेच ज्यू कायद्यांचा अर्थ लावण्याचे काम करत. नंतर कालपरत्वे त्यांच्या कामात बदल होत गेले. राब्बीला विवाह करणे आवश्यक मानले जाते. राब्बीच्या पत्नीस ‘रेबेत्झिन’ म्हणतात. तिला आपल्या पतीच्या धार्मिक कार्यात सक्रिय भाग घ्यावा लागतो. राब्बीला मुख्यत्वे धार्मिक शिक्षण देणे, सिनॅगॉगमध्ये प्रार्थना, जन्म, विवाह, मृत्यु इ. प्रसंगीचे विधी पार पाडणे ही कामे करावी लागतात. आधुनिक इझ्राएलमध्ये राब्बीस ‘राव्ह’ म्हटले जाते आणि तो सिनॅगॉगचा प्रमुख म्हणून काम पाहतो.
संदर्भ : Kertzer, Morris Norman, What is a Jew?, Toronto, 1953.
माहुलकर, दि. द.