राज्यशास्त्र : सत्ताविषयक शास्त्र म्हणजे राज्यशास्त्र होय. विशिष्ट भूप्रदेशात निवास करणाऱ्या सर्व समाजावर आणि समाजातील सर्व संस्थांवर प्रभाव असलेली शक्ती म्हणजे सत्ता होय. ही शक्ती कर्तव्य ठरवते, निषेध पाळावयास लावते कर्तव्ये न पाळल्यास किंवा निषेध न मानल्यास देहदंड, धनदंड इ. दंड करते आणि निषिद्ध वर्तनास प्रतिबंध करते. यासच राजकीय सत्ता म्हणतात. समाजातील व्यक्ती, गट आणि सर्व समाज यांची भूमी व जीवितरक्षण करणारी सुव्यवस्था तिच्याने उत्पन्न होते आणि स्थिरावते, तसेच सुव्यवस्थेस धोका उत्पन्न झाल्यास तो नष्ट करते वा तसा धोका उत्पन्न होऊ देत नाही, ती राजकीय सत्ता होय. समाजसंबंधी सत्तेच वास्तव व्यवहार कसा चालतो, त्या व्यवहाराचे प्रकार किती असतात, म्हणजे संघटना किती प्रकारच्या असतात, सत्ता कोण व्यक्तिशः व समूहशः कशी काबीज करतात, विस्तारतात वा गमावतात म्हणजे ती सत्ता कशी उत्पन्न होते, वाढते व घटते त्याचप्रमाणे ती युक्त आणि कल्याणकारक कशी असते वा असावी किंवा तशी नसते इ. गोष्टींचा विचार राजकीय तत्त्वज्ञानात आणि राजकीय विज्ञानात असतो. सामाजिक आदर्शांचा व ध्येयवादांचा ऊहापोह वस्तुवादाशी निगडित असतो म्हणून राजकीय तत्त्वज्ञानात विज्ञानदेखील ग्रथित केलेले असते. सत्तेचे वरिष्ठ वा अंतिम अधिष्ठान म्हणजे सार्वभौमत्व, सत्तेची युक्तता वा न्याय्यता (लिजिटिमसी) सनदशीर म्हणजे संविधानसहित सत्ता, सत्तारहित म्हणजे अराजक आणि सत्तायुक्त समाज, निसर्गातील दैवी किंवा धार्मिक पावित्र्य आणि सत्ता यांचा संबंध, शुद्ध नैतिक सामाजिक जीवन आणि सत्तेचा व्यवहार, समाजरचनेचे विविध प्रकार आणि त्यांची कार्ये यांचा सत्तेशी असलेला संबंध, राज्य हा सत्तेचा विकसित आविष्कार व त्या आविष्काराचे प्रकार, या आविष्कारांवाचून अस्तित्त्वात असलेले मागासलेले समाज आणि आदर्श अराजक स्थिती, एकात्मक केंद्रराज्य आणि संघराज्य यांच्यातील वैशिष्ट्ये आंतरराष्ट्रीय संबध, युद्धसंस्था इ. विषयांचा राजकीय तत्त्वज्ञान व राजकीय विज्ञान यामध्ये सोपपत्तिक ऊहापोह असतो. सनदशीर म्हणजे संविधानाशी संबद्ध सत्ता. कायद्याचे शासन, एक किंवा अनेक सत्ताधाऱ्यांचे मनमानी शासन, विशेषतः राजकीय ध्येयवाद उदा., लोकशाही, राष्ट्रवाद, समाजवाद, साम्यवाद, मानवी मूलभूत हक्क, राजसत्ता, बेबंदशाही (दुरवस्था) आणि तिची कारणे यांचे अध्ययन राज्यशास्त्रांत करावयाचे असते. धार्मिक शासन आणि इहवादी शासन यांच्या संबंधाची मीमांसाही राज्यशास्त्रात विस्ताराने केलेली असते. कित्येक वेळा धर्मसंस्था ऐहिक शासन चालवीत असते. कित्येक वेळा ऐहिक शासन धर्मसंस्थेच्या प्रभावाखाली असते. कित्येकदा धार्मिक सत्ता आणि ऐहिक सत्ता यांच्यात समन्वय वा समतोल असतो. कित्येकदा ऐहिक शासनच वरिष्ठ दैवी शक्तिचे पाठबळ मिळालेले मानले जाते. वैज्ञानिक व औद्योगिक क्रांतीनंतरच्या आधुनिक युगात गेल्या दोनशे-अडीचशे वर्षांत इहवादी राज्ये शासन करू लागली आहेत. या सर्व मुद्यांचा राज्यशास्त्रात ऊहापोह असतो.

पश्चिमी राज्यशास्त्र: मानवजातीच्या ज्ञात इतिहासात मुख्यतः जेथे राज्यसंस्था निर्माण झाल्या, त्या संस्कृतींचाच इतिहास व्यवस्थित रीतीने नोंदला गेला आहे. अलीकडे गेल्या शंभर वर्षात दळणवळणची वेगवान साधने उपलब्ध झाल्यावर ⇨ राज्यसंस्था स्पष्ट स्वरूपात अस्तित्वात नसलेल्या मागासलेल्या जमातींचे समाज अध्ययनाच्या क्षेत्रात आले आहेत. या अध्ययनातून सत्ताविषयक किंवा राजकीय मानवशास्त्र (पोलिटिकल अँथ्रपॉलॉजी) ही ज्ञानाची नवीन शाखा निर्माण झाली आहे आणि गेल्या सु. पन्नास वर्षांत ही राजकीय मानवशास्त्राची शाखा विशेषकरून विस्तार पावत आहे. भारत, चीन,ग्रीस व रोमन त्याचप्रमाणे मुस्लिम राष्ट्रे यांच्यातील प्राचीन संस्कृतीचे अध्ययन गेल्या दोनशे वर्षात वाढले. या संस्कृतींमध्ये विशिष्ट राजकीय सत्ताविषयक शास्त्रे निर्माण झाली परंतु राजकीय शास्त्रांचा गेल्या सु. अडीच हजार वर्षांत यूरोपमध्येच अथवा पश्चिमी संस्कृतींमध्येच अखंड अभ्यास सुरू आहे. त्यामुळे विविध स्वरूपाची वैचारिक भर त्यात पडत गेलेली दिसते. या पश्चिमी संस्कृतीतील राज्यशास्त्राचा प्रारंभ व्यवस्थित, आकर्षक आणि सर्वांगीण स्वरूपात प्लेटोपासून सुरू होतो. एकोणिसाव्या शतकातील कार्ल मार्क्सपर्यंत ही विविध स्वरूपे विस्ताराने मांडलेली दिसतात. कार्ल मार्क्सनंतरही विसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत राज्यशास्त्रविषयक चिंतन वाढतच आहे. त्याचा सारांश थोडक्यात देणे आवश्यक आहे.

               

यूरोपियन राज्सशास्त्राचे तत्त्वज्ञानात्मक स्वरूप प्लेटोने आपल्या सुराज्य (दि रिपब्लिक) या ग्रंथात मांडले आहे. यातील संवाद वादविवादाच्या स्वरूपातील आहे. सुराज्य या गंथापेक्षाही अधिक व्यावहारिक स्वरूपाचे राजकीय चिंतन त्याच्या राज्यकर्ता (स्टेट्समन) आणि कायदे (लॉज) या ग्रंथांमध्ये आले आहेत.

               

सुराज्य या ग्रंथामध्ये कविप्रतिभेने आकर्षक बनलेला राज्यविषयक विचार मांडलेला आहे. नगरराज्य आदर्श कसे असावे, याची मांडणी करीत असता विविध मानवी नैसर्गिक स्वभावांनुसार उच्चनीय वर्गयुक्त समाजरचना वर्णिलेली आहे. ही नगरराज्यातील संस्कृती दासवर्गाच्या श्रमावर निर्माण झालेली आहे. वरिष्ठ वर्गाचे संपन्न आणि नैतिक वा कल्याणमय जीवन आदर्श राज्यात कसे असावे, याचे स्पष्टीकरण यात मिळते. समाजात निसर्गनियमाप्रमाणे तीन प्रकारचे मानवांचे वर्ग असतात व ते आनुवंशिक रीतीने चालू असतात. मातापित्यांचे गुण संततीमध्ये उतरतात. याला काही अपवाद आढळतात. मातापित्यांपेक्षा अधिक गुणसंपन्न संतती असली, तर तिला वरच्या वर्गात स्थान द्यावे. मातापित्यांपेक्षा कमी गुणांची संतती असेल, तर तिला खालच्या वर्गांत स्थान द्यावे. निसर्गाप्रमाणे तीन प्रकारचे मानववंश असतात. वरिष्ठ, प्रज्ञांसपन्न, उत्साही, शूर अशा माणसांचा वरिष्ठ वर्ग. समाजाचे शास्ते, सत्ताधारी या वरिष्ठ वर्गातले असावेत. हे सोन्यासारखे असतात. चांदीसारखा दुसरा दुय्यम दर्जाचा मानववंश असतो. त्यांतील लोक कमी प्रज्ञाशाली असतात परंतु चांगले सैनिक बनू शकतात. तिसरा वर्ग लोहवर्ग होय. त्यांतील लोक केवळ शरीर श्रम करूनच जीवनधारणा व समाजधारणा करू शकतात. वरिष्ठ वर्ग म्हणजे राजांचा वर्ग. या राजांना खाजगी संपत्ती, खाजगी संतती आणि खाजगी पत्नी असता कामा नये. खाजगी कुटुंब आणि संपत्तीमुळे सत्तेचा दुरुपयोग सत्ताधारी करतात, भ्रष्टाचार व पक्षपातीपणा वाढतो. सर्व वरिष्ठ सत्ताधारी पतिपत्नी हे सामुदायिक असावे, संपत्ती समुदायाचीच. संततीला आपले स्वतःचे नेमके आईबाप कोण हे माहीत असता कामा नये. अशा तऱ्हेचे स्वार्थरहित सत्ताधारी म्हणजे राजे हे तत्त्वज्ञानी बनले तरच निःस्वार्थी आणि निरहंकारी बनू शकतात कारण समाजाला न्यायाचे राज्य पाहिजे असते. राज्याचे खरे उद्दिष्ट न्याय होय. तत्त्वज्ञानी हे या असत्य आणि भ्रममय जगातून वास्तव, शाश्वत, अंतिम सत्यतत्त्वांचे आकलन करतात आणि त्या आदर्श तत्त्वांप्रमाणे शासन चालवितात. असा हा तत्त्ववेत्त्या राजांचा किंवा सत्ताधाऱ्यांचा साम्यवादी वरिष्ठ वर्ग असला, तरच न्यायाचे राज्य स्थापित होते. प्लेटोचा असा हा ⇨यूटोपियावाद फारसा मोहक आणि उत्तेजक ठरला नाही. प्लेटोचे हे सुराज्य होय. त्याने कल्पिलेले अशा तऱ्हेचे तत्त्ववेत्ते राजे किंवा सत्ताधारी ज्या राज्यात आणि समाजात नसतील, त्या राज्यात, समाजात किंवा नगरराज्यात भ्रष्टाचार आणि गुन्हे यांना खीळ पडत नाही. परंतु आधुनिक उदारमतवादी राज्यशास्त्रज्ञांच्या मते आधुनिक हुकूमशाहीच्या आणि बंदिस्त समाजाच्या राज्यव्यवस्थेचा पहिला पुरस्कर्ता ⇨ प्लेटो होय नागरिक स्वातंत्र्याचा प्लेटो हा शत्रू होय, अशीही टीका प्लेटोवर अलीकडे झाली आहे.


              

प्लेटोने सुराज्य हा यूटोपियावाद मांडल्यानंतर त्या काळी अस्तित्वात असलेल्या राजसत्ता, श्रेष्ठसत्ता (ॲरिस्टॉक्रसी) व प्रजासत्ता इ. निरनिराळ्या राज्यव्यवस्थांचे मूल्यमापन प्लेटोने केले आहे. राजसत्ता उत्तम असते परंतु तिला व्यवहार्य स्वरूप देणे फार कठीण असते. उच्चवर्गीय श्रेष्ठांचे शासन संपत्तीच्या लोभाने अवनत होत जाते कारण शास्ते अधिक संपन्न होतात आणि गरीब लोक त्यांचा हेवा करू लागतात, म्हणून समाजात सुसंवाद टिकत नाही. प्रजासत्ताक पद्धतीत गरीब लोकांचा प्रभाव वाढतो. जे एकसारखे नसतात, त्यांच्या योग्यतेप्रमाणे विशिष्ट वागणूक दिली जात नाही. लोकशाहीतले गरीब नेते संपन्न वर्गाची लूट करू लागतात व ती लूट आपसांत वाटून घेतात. शेवटी अव्यवस्था माजून दंडधारी, जुलमी माणूस राज्य करू लागतो. मनमानी राज्यपद्धती आल्यावर लोकांच्या लक्षात येते की, राज्यकर्ता हा राक्षस असतो.

               

प्लेटो म्हणतो, की भूमितीसारखे तर्कशुद्ध राज्यशास्त्र असते परंतु ते कल्पनेतच राहते. याकरता कायद्याचे राज्य निर्माण करावे लागते. राज्यकर्ता हा कलाकारासारखा असतो. सामाजिक विशिष्ट परिस्थिती हे माध्यम नीट लक्षात घेऊन, तो वापरतो. राज्यकर्त्यांना विशिष्ट शिक्षण देऊन तयार केले पाहिजे. मध्यवर्ती किल्ल्यामध्ये सत्ताधाऱ्यांना स्थापित करायला पाहिजे. कवी आणि गवई यांच्यापासून सत्ताधाऱ्यांना दूर केले पाहिजे. सुसंवादी समाजव्यवस्था, कल्याणमय जीवनपद्धती आणि कायद्याचे राज्य या तीन गोष्टी राज्याची उद्दिष्टे होत.

               

ॲरिस्टॉटलचे राज्यशास्त्र (पॉलिटिक्स) वाचनीय आणि महत्त्वाचे आहे. त्या काळच्या शिक्षित ग्रीक नागरिकांचे ग्रह आणि भावना त्यात प्रतिबिंबित झाल्या आहेत. त्याचप्रमाणे मध्ययुगाच्या अंतापर्यंत तो राज्यशास्त्राचा प्रमाणभूत ग्रंथ होता. आजच्या राज्यकर्त्याला त्या ग्रंथाचा काही उपयोग नसला, तरी राज्यसंस्थेचा महिमा या ग्रंथात प्रथम वर्णिला आहे. उच्चतम कल्याणाच्या उद्देशाने उच्चतम आकृतिबंधाचा अस्तित्वात आलेला मानवी समाज म्हणजे राज्य होय, असे तो दाखवून देतो. मनुष्य हा राज्य निर्माण करून राहणारा प्राणी होय. स्त्री-पुरुष, स्वामी-दास यांनी युक्त अशी कुटुंबसंस्था निसर्गतःच प्रथम अस्तित्वात येते. अनेक कुटुंबांच्या समुदायातून ग्राम निर्माण होते आणि स्वयंपूर्ण ग्रामसमुदाय म्हणजे राज्य होय. पूर्ण विकसित मानवसमाज म्हणजे राज्य होय. समाजाव्यतिरिक्त व्यक्ती काहीही करू शकत नाही. जसा देहावेगळा हात निरुपयोगी असतो, तशीच राज्यरहित व्यक्ती निरुपयोगी असते. ज्याने कायद्याचे राज्य निर्माण केले, त्याने जनहिताचे उत्कृष्ट कार्य केले आहे कारण कायद्यावाचून माणूस जनावरापेक्षा दुष्ट बनतो आणि कायदा हा राज्याधीन असतो. समाज हा केवळ देवघेवीकरिता आणि गुन्हे टाळण्याकरता नसतो. कल्याणमय जीवन हे राज्याचे उद्दिष्ट असते.

               

प्लेटोच्या सुराज्यावर ॲरिस्टॉटलने विविध आक्षेप घेतले आहेत. राज्याला प्लेटोने घट्ट व्यक्तिमत्त्व दिले आहे. ते प्रमाणबाह्य आहे. वरिष्ठ सत्ताधाऱ्यांची कुटुंबसंस्था प्लेटोने नाकारली आहे. त्यात पिता, माता, बंधू, भगिनी ही वैयक्तिक नाती न राहता, ती सर्वसामान्य होतात. माता, पिता, बंधू इ. हे केवळ शाब्दिक उपचार बनतात. त्यामुळे एकमेकांशी खाजगी नात्याने जे जिव्हाळ्याचे व जबाबदारीचे वर्तन घडते, ते घडू शकत नाही. नवरा-बायको हे नाते नाहीसे झाल्यामुळे व्याभिचारापासून निवृत्ती हा सद्‌गुण म्हणून शिल्लक राहणार नाही. त्यामुळे सद्‌गुण आणि दुर्गुण कसे ओळखायचे याची पंचाईत होणार. सगळ्यांच्या समान बायका असल्यामुळे प्रपंचाची जबाबदारी घेणारी अशी व्यक्ती दिसणार नाही. प्रचंड मोठ्या अनेक दालनांच्या घरात  सर्वांचे एक भोजनगृह इत्यादी. खऱ्या खाजगी कौटुंबिक जीवनापासून व त्या सुखापासून वंचित असे स्त्रीपुरुष प्लेटोच्या या साम्यवादी कुटुंबात राहणार. साधुसंन्याशांच्या मठासारखे हे मठ होणार, त्यांच्यात ब्रह्मचर्य मात्र राहणार नाही.

               

संपत्तीची खाजगी मालकी, मानवी समानता इ. प्रश्नांचाही ॲरिस्टॉटलने विचार केला आहे. संपत्तीची खाजगी मालकी असली, तर उपकारवृद्धी आणि उदारता हे सद्‌गुण म्हणून जीवनात दिसणार. खाजगी संपत्ती नसली, तर ते दिसणार नाहीत. स्वामी आणि दास यांच्यात समानता नाही. विषमतेमुळे क्रांत्या होतात, असे खरे नाही सत् शासन असले पाहिजे. सबंध समाजाचे हित किंवा कल्याण साधणारे शासनच सत् शासन असले पाहिजे. केवळ शासन नीट चालले म्हणून सर्वांचे कल्याण होते असे नव्हे. तीन प्रकारची सत् शासने असतात: राजसत्ता वा राजेशाही (मॉनर्की), अभिजनसत्ता (ॲरिस्टॉक्रसी) आणि संविधाननिष्ठसत्ता (पॉलिटी). असत् शासने तीन प्रकारची: सुलतानशाही (टिरनी), स्वल्पतंत्र (ऑलिगॉर्की) आणि प्रजाशासन (डेमॉक्रसी). या सहा प्रकारच्या शासनांच्या शिवाय त्यांची अनेक प्रकारची मिश्रणे आढळतात. सत् शासन की असत् शासन हे शासनकर्त्याच्या नैतिक गुणांवर अवलंबून असते संविधानावर नव्हे.

               

राजसत्ता अभिजनसत्तेपेक्षा अधिक चांगली आणि अभिजनसत्ता संविधाननिष्ठ सत्तेपेक्षा अधिक चांगली असे असले, तरी सर्वांत जी चांगली ती बिघडली म्हणजे अत्यंत दुष्ट बनते. म्हणून मनमानी सुलतानाशाही ही स्वल्पतंत्रापेक्षा आणि लोकशाहीपेक्षा केव्हाही दुष्टच असते. प्रत्यक्ष अस्तित्वात असलेली सरकारे वाईटच असतात, परंतु त्यातल्या त्यात ॲरिस्टॉटलच्या मते लोकशाही उत्तम असते. ॲरिस्टॉटलने बंडे आणि क्रांत्या का होतात, याची सविस्तर मीमांसा केली. शिक्षणाचा प्रसार, कायद्याबद्दल आदर आणि कायद्याच्या अंमलबजावणीत व प्रशासनात न्याय या तीन गोष्टी असल्या म्हणजे क्रांती टाळता येते. ॲरिस्टॉटलच्या राज्यशास्त्रात राज्याच्या उद्दिष्टांमध्ये सुसंस्कृत नागरिक निर्माण करणे ही मुख्य गोष्ट सांगितली आहे. कला आणि ज्ञान यांच्याबद्दल प्रेम असलेला श्रेष्ठ वर्ग निर्माण करणे, हे राज्याचे ध्येय होय. हे ध्येय ग्रीक संस्कृतीत दीर्घकालपर्यंत प्रभावी ठरले. प्लेटोच्या मते न्याय व ॲरिस्टॉटलच्या मते कल्याण ही राज्याची अंतिम उद्दिष्टे होत.

               

राज्यविषयक किंवा सत्ताविषयक तत्त्वज्ञान रोमन संस्कृतीने दिले नाही ते ग्रीक संस्कृतीचेच वैशिष्ट्य होय परंतु कायदा अथवा वैधता आणि प्रशासन यासंबंधी पश्चिमी जगाला रोमने वैशिष्ट्यपूर्ण मौलिक योगदान केले आहे. त्याचा वारसा जगाला मिळाला व आतापर्यंत टिकून राहिला. हा रोमचा वारसा निर्माण करणाऱ्यांमध्ये ⇨सिसरो (इ. स. पू. १०६– ४३) याचा मुख्य वाटा आहे. सिसरो हा कायदेपंडित आणि राजकीय मुत्सद्दी होता. सिसरोची रिपब्लिक आणि लॉ या शीर्षकाखाली दोन पुस्तके प्रसिद्ध आहेत. प्लेटोच्या पुस्तकांप्रमाणेच ही शीर्षके आहेत परंतु त्यात नावीन्य आणि वैशिष्ट्य आहे. तो सगळ्या जगाचा विचार करतो. प्लोटो आणि ॲरिस्टॉटल सबंध मानवजातीचे राजकीय तत्त्वज्ञान सांगत नाहीत. ग्रीक लोकसमाजच त्यांच्या डोळ्यासमोर प्रामुख्याने होता. सिसरो रोमन साम्राज्याला एक उच्च उद्दिष्ट आहे, असे मानतो. स्थानिक प्रदेशांना स्वयंशासन आणि स्वातंत्र्य दिल्यानेच व्यापक मोठ्या साम्राज्याची एकात्मता सिद्ध होते, अशी त्याची श्रद्धा होती. त्याची अशी श्रद्धा होती की सगळे विश्वच राज्य असून, देव आणि मानव त्याचे नागरिक आहेत. सगळ्या राष्ट्रांना सर्वकाळी लागू पडणारा नैसर्गिक प्रमाणभूत असा कायदा आहे. प्रत्येक मनुष्य मार्गदर्शन मिळाल्यास सद्‌गुणी बनू शकतो, असे त्याचे मत होते. राज्याची चर्चा करीत असताना कायदेपंडित या नात्याने सिसरो कायद्याचीच चर्चा करतो कारण त्याच्या मते राज्य म्हणजे कायद्याचे राज्य होय. माणसांची संपत्ती समान असू शकत नाही, गुण समान नसतात पण सगळ्या नागरिकांचे समान कायदेशीर हक्क असतात. त्याच्या मते कायदा नुसता अधिकार आणि जबरदस्ती यांच्या मर्यादेत सिद्ध होऊ शकत नाही. खरा कायदा सद्सद्‌वेकबुद्धीनेच सिद्ध होतो आणि तो निसर्गाशी सुसंगत असतो. सद्सद्‌विवकेबुद्धी ही सर्व मानवाच्या ठिकाणी वसत असते. त्यामुळे कायदा वा अन्य सर्व मानवांचे तत्त्वतः एकच ! [⟶ रोमन संस्कृति].

  


             

राज्याचे निरनिराळे आकृतिबंध तपासत असताना तो ॲरिस्टॉटलची तत्त्वमीमांसा मान्य करून न्याय हे राज्यसंस्थेचे अंतिम उद्दिष्ट होय असे मानतो. म्हणजे राजसत्ता, अभिजनसत्ता की लोकसत्ता, हा महत्त्वाचा प्रश्न राहत नाही. या तिन्ही राज्यपद्धतींचे स्परूप एकत्रित संमिश्र असले पाहिजे आणि हे संमिश्रण समतोल असले पाहिजे.

               

सेंट ऑगस्टीन (इ. स. ३४५–४३०) रोमन साम्राज्यात उत्तर आफ्रिकेत जन्मला. त्याची माता ख्रिश्चन होती, वडील ख्रिश्चन नव्हते. इ. स. ३८७ मध्ये सेंट ऑगस्टीनने इटलीत ख्रिस्ती धर्माची दीक्षा घेतली. पूर्वायुष्य व्यावहारिक उलाढालीत आणि सर्व तऱ्हेच्या चैनीत गेले. ख्रिस्ती दीक्षा घेतल्यावर जीवनपद्धती मूळापासून बदलली. उच्च दर्जाची विचारसरणी, नैतिक श्रद्धा आणि बायबलवरील विश्वास यांमुळे चर्चच्या संस्थेवर त्याचा प्रभाव पडून उंच उंच श्रेणींवर तो चढत गेला. तो हिप्पोचा बिशप ३९६ साली बनला. इ. स. ४३० मध्ये त्याचा मृत्यू झाला. त्यावेळी त्याच्या आयुष्यात ख्रिश्चन धर्म विस्तार पावत होता आणि ख्रिस्तेतर पेगनवादाशी स्पर्धा सुरू होती. त्याने ४१३ मध्ये देवनगरी (सिटी ऑफ गॉड) हा ख्रिस्ती धर्माच्या इतिहासातील अत्यंत प्रभावी ग्रंथ लिहिण्यास सुरुवात केली आणि ४२६ मध्ये तो ग्रंथ पुरा झाला. त्याची बावीस प्रकरणे आहेत. ख्रिश्चनेतर पेगवानवादातील विसंगती आणि पोकळपणा त्याने विस्ताराने चर्चिला. [⟶ पेगन]. मुख्यतः त्याने मानवी जीवनाचे दिव्य मार्ग (देवनगरी) आणि पार्थिव मार्ग (ऐहिक नगरी) असे दोन विभाग वर्णिले. यूरोपच्या मध्ययुगीन राजकीय आणि धार्मिक इतिहासाला फार महत्त्वाची प्रेरणा देणारा हा ग्रंथ झाला. तो कायदेपंडित किंवा राजकीय विचारवंत नव्हता तो धर्मतत्त्वज्ञ होता. देव, श्रद्धा आणि मोक्ष हे त्याचे मननाचे विषय होते. राज्याची संघटना आणि राज्याचे व चर्चचे संबंध याला त्याच्या ग्रंथांत विशेष महत्त्व नाही. देवनगरी म्हणजे चर्च नव्हे आणि पार्थिवनगरी म्हणजे राज्य नव्हे. पार्थिवनगरीमध्ये स्वतःवरचे प्रेम आणि सत्तेची लालसा हे प्रभाव पाडतात उलट देवनगरीमध्ये देवभक्ती स्वतःचा धिक्कार करूनही महत्त्वाची ठरते आणि त्या देवभक्तीतून सुव्यवस्था निर्माण होते. मानवजातीचे या दोन जीवनपद्धतींप्रमाणे दोन विभाग पडतात. मानवी व्यवहार आणि देवभक्तीचा व्यवहार असे दोन व्यवहार या विश्वात चालतात. माणसांमध्ये या दोन नगरींचे रहिवासी देवाने निवडलेले व झिडकारलेले एकमेकांत मिसळलेले आढळतात. जे देवानेच निवडलेले ते ईश्‍वराच्या सान्निध्यात शाश्वत काळ राहतात आणि देवाने झिडकारलेले शाश्वत काळपर्यंत नरकनिवासी होतात. मनुष्य आणि देव यांचा सुसंवाद असला म्हणजे माणसा-माणसातल्या संबंधात न्यायाचा व्यवहार होत असतो आणि देवाच्या शाश्वत राज्याचा नागरिक मनुष्य बनतो. देवाच्या भक्तीतून आणि सेवेतून या न्यायाला आकार येतो. या देवनगरीच्या तत्त्वाचे सूचक लक्षण म्हणजे चर्च होय. देवनगरीचाच चर्च हा भाग असतो. पार्थिवनगरी राज्यसंस्थेत प्रतिबिंबित झालेली असते. अपवित्र माणसांचा सामाजिक आणि राजकीय व्यवहार हा पार्थिवनगरीचा व्यवहार होय. राज्य नागरिकांमध्ये शांततेची स्थापना करते व ही शांतता देवाच्या सेवेला लावायची असते, नाहीतर राज्याची शांतता ही मर्यादित कालापुरतीच टिकते. त्या शांतीचा देवसेवेकरिता उपयोग करायचा असतो. सेंट ऑगस्टीनने प्लेटोचे न्याय हे राजकीय उद्दिष्ट व कल्याणमय जीवन हे ॲरिस्टॉटलचे राजकीय उद्दिष्ट, ख्रिश्चन धर्मीय दृष्टिकोनातून मांडले आहे.

            

नीक्कोलो मॅकिआव्हेली (१४६९–१५२९) हा प्रबोधनयुगात सत्ताविषयक तत्त्वज्ञानाची मांडणी करणारा प्रज्ञावंत निर्माण झाला. त्याच्या राज्यविषयक विचारांनी धक्के दिले.त्याचे सत्ताविषयक तत्त्वज्ञान अनुभवनिष्ठ आणि वैज्ञानिक आहे. स्वतःच्या  सत्ताविषयक उलथापालथीच्या अनुभवांवर आधारलेले हे तत्त्वज्ञान आहे. सत्ताविषयक उद्दिष्टे साध्य करून देणारी वास्तव साधने कशी असतात, याचे स्पष्टीकरण तो करतो. सत्ताविषयक उद्दिष्टे योग्य की अयोग्य, या प्रश्नाला तो महत्त्व देत नाही. याचा अर्थ असा नव्हे की त्याला सत्ताविषयक उच्च उद्दिष्टे इष्ट वाटत नाहीत पण सत्ताविषयक उद्दिष्टे साधत असताना, साधने शुद्ध की अशुद्ध, याचा विचार करणारे राजकारणी यशस्वी कमी होतात. सत्तेच्या राजकारणात यशस्वी व्हायचे, तर राजकीय अप्रामाणिकपणा, लबाडी, फसवणूक, वगैरे साधने यशस्वी व समर्थ सत्ताधारी वापरल्याशिवाय रहात नाही, ही गोष्ट प्रामाणिकपणे मांडणारा हा पहिला राज्यशास्त्रकार आहे. राज्ये कशी जिंकली जातात, कशी उत्तम रीतीने रक्षिली जातात आणि कशामुळे गमावली जातात, याचे नीट स्पष्टीकरण मॅकिआव्हेलीने आपल्या प्रिन्स या पुस्तकात केले आहे. तो म्हणतो : सनदशीर, संविधाननिष्ठ असे थोडे सत्ताधारी असतात. धर्मगुरू पोपसुद्धा निवडणुकीच्या वेळी भ्रष्टाचार करतात.

               

सत्तेच्या राजकारणात उत्तम, मध्यम, कनिष्ठ असे सर्व प्रकारचे लोक इतिहासात आढळतात, असे तो म्हणतो. धर्मस्थापक हे उत्तम लोक होते. राजघराण्यांचे मूळ संस्थापक किंवा गणराज्याचे मूळ संस्थापक त्यांच्या खालोखाल होते. चांगले ग्रंथकार या चांगल्या लोकांपैकीच तिसऱ्या श्रेणीत समाविष्ट होतात परंतु त्याच्या उलट धर्मविध्वंसक, राजघराणी नष्ट करणारे, ज्ञान आणि सद्गुण यांचे शत्रु इतिहासात सरसावलेले दिसतात. सुलतानशाही निर्माण करणारे सगळ्यात दुष्ट होत. त्यात ⇨ जुलिअस सीझर (इ. स. पू. १००–४४) सुद्धा येतो. राज्याला धर्माची आवश्यकता आहे परंतु धर्मात सत्य आहे म्हणून नव्हे धर्म हा समुदायशक्ती निर्माण करतो माणसांना जोडतो हे त्याचे महत्व. मॅकिआव्हेली चर्च या संस्थेवर टीका करतो याची कारणे दोन : चर्च या संस्थेमुळे त्याच्या कालखंडात धर्मावरची श्रद्धा कमी झाली आणि चर्च या संस्थेमुळे इटलीच्या राष्ट्रीय एकात्मतेला दीर्घकाळ खीळ पडली.

               

सत्तेचे अंतिम क्षेत्र हे मुक्त स्पर्धेचे क्षेत्र आहे, असे मॅकिआव्हेली मानतो. त्याच्या मते न्याय्य राज्य आणि न्यायरहित राज्य असा भेद नाही. लोकसंमत राज्य हे लोकसंमत नसलेल्या राज्यापेक्षा अधिक चांगले या त्याच्या दृष्टीच्या मुळाशी हक्कांची कल्पना नाही. अवलोकनावरून असे सिद्ध झाले, की लोकसंमत शासने कमी क्रूर, कमी अविवेकी असतात. राष्ट्रीय स्वातंत्र्य, सुरक्षितता आणि सुव्यवस्थित संविधान या तीन राजकीय गोष्टी त्याच्या मते विशेष महत्त्वाच्या ठरतात.

               

इहवादी वैज्ञानिक पद्धतीने सत्तेची मीमांसा करणाऱ्या राज्यशास्त्रज्ञांमध्ये मॅकिआव्हेलीप्रमाणेच ⇨टॉमस हॉब्ज (१५८८–१६७९) हा मोठा विचारवंत मानला जातो. राज्य नाही, सरकार नाही अशा स्थितीत माणसे राहतात म्हणजे नैसर्गिक स्थितीत राहतात, अशी कल्पना करून या स्थितीत प्रत्येक मनुष्य दुसऱ्यांसारखा असतो म्हणजे तो स्वतःचे स्वातंत्र्य मजबूत करून दुसऱ्यांवर सत्ता गाजवू पाहतो. स्वतःचे स्वातंत्र्य आणि दुसऱ्यावर सत्ता गाजविण्याची प्रवृत्ती, यांच्या मुळाशी आत्मसंरक्षणाची प्रवृत्ती आहे. या नैसर्गिक स्थितीत प्रत्येकजण दुसऱ्यावर सत्ता गाजविण्याकरिता लढत राहतो. या नैसर्गिक स्थितीत संपत्ती नसते, न्याय-अन्याय नसतो. लढ्याची स्थिती असते. ताकद, अक्कलहुशारी आणि लबाडी हेच सद्‌गुण ठरतात. ही सतत युद्धाची वा स्पर्धेची स्थिती टाळण्याकरता माणसे समाज बनवून राहू लागतात. अनेक माणसे एकत्र येऊन वरिष्ठ निवडतात. हा सतत चालू राहणारा संघर्ष बंद करण्याकरता माणसे समुदाय करून आवश्यक ती सत्ता त्याला अर्पण करतात. असा हा करार प्रत्यक्ष घडत असतो, असे नव्हे. राजा मान्य होतो, याचाच अर्थ करार करतात. स्वतः  वर नियंत्रण ठेवण्याकरिता माणसे यत्नशील राहतात. मधमाशा आणि मुंग्या हे प्राणी समुदायाने राहतात, याचे कारण त्यांची तशी नैसर्गिक प्रवृत्ती आहे. माणसांना विचारपूर्वक निर्बंध निर्माण करावे लागतात. हा करार माणसे आपसांत करतात व ठरवतात, की कोणाची तरी आज्ञा अथवा हुकूम सर्वांनी पाळायचा. बहुमत ज्या बाजूला होईल, त्या बहुमतवाल्यांप्रमाणे अल्पमतवाल्यांनीही करार पाळायचा. करार पाळायचा ठरले म्हणजे नागरिक सर्व हक्क गमावतात. कोणते हक्क गमावत नाहीत ते वेळोवेळी शासनच ठरविते. बंडाचाही हक्क नागरिकाला नाही कारण नागरिक आणि सत्ताधारी यांच्यातला हा करार नसतो. अशा रीतीने जे सर्वमान्य राज्य तयार होते त्याला लिव्हायथन (मर्त्य देव) असे अभिधान हॉब्जने दिले आहे.

  


             

वरिष्ठ सत्ता म्हणजे कोणीतरी एक माणूस वा माणसांचे मंडळ म्हणजेच सार्वभौम अधिष्ठान (सॉव्हरिन). सार्वभौम सत्ता ही अमर्यादित असते असे हॉब्ज म्हणतो. अंतर्गत शांतता राखणे हे सार्वभौमाचे मुख्य कर्तव्य होय. जे शांततेला बाधक ते असत्य होय. संपत्तिविषयक कायदेसुद्धा सार्वभौमाच्या अखत्यारीत असावे लागतात कारण राज्य असल्यामुळेच संपत्ति निर्माण होते.

               

सार्वभौम सुलतानशाहही असू शकतो. परंतु बेबंदशाहीपेक्षा भयानक सुलतानशाही अधिक चांगली होय. कारण सार्वभौमाचे आणि प्रजेचे अथवा नागरिकांचे हितसंबंध बरेचसे समान असतात. नागरिकांची सुबत्ता वाढली तर सार्वभौम राजाची सुबत्ता वाढते. सार्वभौम हा सुरक्षित राहतो, नागरिक हे कायदे पाळणारे असले तर हॉब्जच्या मते राजसत्ता मंडळाच्या किंवा सभेच्या सत्तेपेक्षा अधिक हितकार होय. मंडळाचे सदस्यसुद्धा राजासारखेच स्वार्थी असू शकतात. राजा एकच असतो म्हणजेच एकच स्वार्थी सत्तेच्या द्वारे भ्रष्टाचारी बनू शकतो परंतु अनेक सदस्य असलेल्या मंडळामध्ये स्वार्थी लोकांचा मोठा समूह असतो, त्यामुळे भ्रष्टाचाराचे क्षेत्र अधिक विस्तृत बनते.

               

सत्तेच्या शास्त्रात दोन प्रश्न महत्वाचे ठरतात. राज्याचा उत्तम आकृतीबंध कोणता आणि राज्याला किती प्रकारच्या सत्ता असतात ? हॉब्जच्या मते राजसत्ता हा राज्याचा आकृतीबंध उत्तम होय आणि राजसत्तेला अमर्याद सत्ता असली पाहिजे. बेबंदशाही ही अमर्याद सुलतानशाहीपेक्षा वाईट होय, असे हॉब्जचे मत आहे. राज्यसंस्था समाजसंस्थेचा विशिष्ट आकार म्हणून अस्तित्वात येते, समाजसंस्थेतील सर्व नागरिकांचे मुख्य हितसंबंध समान असतात. असे हॉब्ज मानतो. कार्ल मार्क्सप्रमाणे वर्गीय हितसंबंधांचा विरोध तो लक्षात घेत नाही. राज्य हे युद्धात सतत सज्ज असावे लागते, म्हणून युद्धसमयी राजाला सर्व अधिकार देणे आवश्यक असते आणि ते सर्व अधिकार शांततेच्याही काळात सुरक्षित राहावे लागतात, असे हॉब्जचे मत आहे. लिव्हायथन या आपल्या ग्रंथात आंतरराष्ट्रीय संबंधांचा परामर्श हॉब्ज घेत नाही. अजूनही आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजे राष्ट्राराष्ट्राचे संबंध हे राज्यरहित स्थितीतल्या, सतत संघर्षात सापडलेल्या नैसर्गिक मानवांसारखेच आहेत. सर्व राष्ट्रे प्रत्यक्ष युद्धग्रस्त जरी नसली तरी युद्ध केव्हा निर्माण होईल, याचा नियम नसतो. प्रत्येक राष्ट्राला सतत सावध रहावे लाते. आज सर्व राष्ट्रे मोठ्या शस्त्रास्त्र साधनांनी संपन्न अशी लढू लागली, तर मानवाचा सार्वत्रिक विनाश ओढवल्याशिवाय राहणार नाही. आंतरराष्ट्रीय अराजकता हा मानवजातीला असलेला कायमचा सर्वविनाशक धोका आहे.

               

हॉब्जप्रमाणेच ⇨जॉन लॉक (१६३२–१७०४) सामाजिक करार हे राज्यशासनाचे अधिष्ठान मानतो. प्रबोधनकालानंतरच्या यूरोपात राज्यशासनाची न्याय्यत्ता सिद्ध करण्याची आवश्यकता वाटू लागली. लोकांनी शासनविरुद्ध बंड करून उठू नये आणि शासनास विवेकबुद्धीने मान्यता द्यावी, याकरिता राजकीय तत्त्ववेत्त्यांचा राज्योत्पत्तीच्या उपपत्ती शोधण्याचा विविध स्वरूपाचा प्रयत्न चालू होता. त्यात मुख्यतः दोन उपपत्ती पर्यायाने स्वीकारल्या जाऊ लागल्या. राजाचा अधिकार हा देवदत्त अधिकार आहे, ही उपपत्ती सर रॉबर्ट फिल्मर याने पॅट्रिआर्क(१६८०) या आपल्या ग्रंथात मांडली. त्याकाळी असलेल्या राजसत्तांनी या उपपत्तीला स्वाभाविकच पाठिंबा दिला. ही उपपत्ती अतिप्राचीन काळापासून भावनाबळावर निरनिराळ्या बहुतेक सर्व राष्ट्रांमध्ये रुजलेली होती. राजा हा अत्यंत पवित्र व्यक्ती आहे, अशा या भावनेमुळे राजसत्ता स्थिरावण्यास मदत होत होती. वरिष्ठ सरदारवर्गही आपली स्थाने बळकट करण्याकरिता ही उपपत्ती मान्य करी, मात्र त्यातले काही अमान्य करीत कारण त्यांचा त्या त्या राजवटीला विरोध असतो. राजपदाच्या आनुवांशिकतेचे समर्थन या उपपत्तीने सहज करता येते. हॉब्ज आणि लॉक यांनी इहवादी दृष्टिकोन पुरस्कारला. परंतु सामाजिक काराची उपपत्ती ही वस्तुवादी आहे की नाही, हा प्रश्न निकालात निघू शकत नाही. म्हणजे असे की, खरोखर मानवसमूहाने आपसांत करार करून राजसत्ता निर्माण केली (हॉब्ज) अथवा वरिष्ठ समाजनेता आणि प्रजाजन यांनी एकमेकांत करार करून राजसत्ता किंवा राज्य शासन निर्माण केले (लॉक), याला ऐतिहासिक पुरावा देता येत नाही परंतु वैघ गृहीतकृत्य म्हणून या उपपत्तीचा स्वीकार करणे आवश्यक ठरते. कारण जनतेला शासनाची आवश्यकता असते. त्याकरिता शासनाच्या आज्ञा वा हुकूम मान्य करण्याची भावना असावी लागते.

राजकीय सत्तेची व्याख्या लॉकने अशी केली आहे : मृत्यूची शिक्षा देण्यापर्यंतचे आणि अर्थातच त्यापेक्षा कमी कठोर सगळ्या शिक्षा देण्यापर्यंतचे कायदे करण्याचा अधिकार म्हणजे राजकीय सत्ता होय. हे कायदे संपत्तीची व्यवस्था आणि संरक्षण यांकरिता मुख्यतः आवश्यक असतात. स्वराज्याला परकीय सत्तेपासून धक्का पोहोचू नये म्हणून संरक्षण करण्याचे आणि केलेले कायदे अंमलात आणण्याचे समाजाला अधिकार असतात आणि ते केवळ सामाजिक हिताकरताच असतात.

               

लॉकचे सत्ताविषयक तत्त्वज्ञान हे उदारमतवादी होते. सुलतानशाही किंवा हुकूमशाही अथवा सर्वाधिकारशाही जनहितविरोधी होण्याची शक्यता असते. म्हणून विधिमंडळ, प्रशासन आणि न्यायदान ह्या शासनाच्या वेगवेगळ्या कक्षा असाव्यात, असे लॉकने युक्तिवादाने सिद्ध केले आहे. त्याच्या मते, विधिमंडळ हे सर्व वरिष्ठ होय. परंतु त्याच्यापेक्षा वरचा अंतिम अधिकार समाजाची सार्वभौमसत्ता ठरते. कारण विधिमंडळाचे सदस्य वेळोवेळी समाजाने निवडून द्यावयाचे असतात. विधिमंडळ आणि प्रशासन हे वेगळे असणे त्याच्या मते आवश्यक होते. प्रशासन कक्षा विधिमंडळ कक्षेपेक्षा शिरजोर झाली, तर त्यावर काय उपाय? याचे उत्तर मिळू शकत नाही. ही गृहयुद्धाची स्थिती होय. अंतिम निर्णयाकरिता पुन्हा सार्वत्रिक निवडणुका घेणे प्राप्त ठरते. सार्वत्रिक निवडणुका घेणेही अशक्य ठरू शकते. लॉकचे सत्ताशास्त्र हे खाजगी संपत्तीचे सत्ताशास्त्र आहे, ही गोष्ट त्याने आपल्या ग्रंथात केलेल्या संपत्तिविषयक विवेचनावरून लक्षात येते.


फ्रेंच राज्यक्रांतीतील ⇨झां झाक रूसो (१७१२–७८) हा प्रेरक असे सत्ताविषयक तत्त्वज्ञान सांगणारा तत्त्वज्ञ. ‘सामाजिक करार’ (सोशल काँट्रॅक्ट – १७६२) या ग्रंथात तो आपली राज्योपपत्ती सांगतो. या ग्रंथात लोकशाहीचे समर्थन करणारी शैली आहे, परंतु सर्वंकष हुकूमशाही राज्याचे समर्थनही त्यातून निष्पन्न होते. त्याच्या मते इंग्लंड किंवा फ्रान्ससारखी मोठी राष्ट्रे खरीखुरी लोकसत्ताक राहू शकत नाहीत, नगरराज्येच खरीखुरी लोकसत्ताक राहू शकतात. तो म्हणतो, की ‘लहान राज्यांमध्ये लोकसत्ता चांगली चालते. मध्यम प्रतीच्या राज्यात श्रेष्ठांच्या मंडळाची सत्ता चांगली चालते आणि राजसत्ता मोठ्या राज्यात व्यवस्थित चालते’. त्याच्या मते लहान राज्ये कमी सामर्थ्यांची असली, तरी लोकसत्तेला त्यात वास्तव व्यवहार्य स्वरुप प्राप्त होऊ शकते. लोकसत्ता त्याच्या मते लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींची सत्ता नव्हे, ज्या शासनात लोक प्रत्यक्ष भाग घेतात, ते शासन लोकसत्ता होय. प्रतिनिधी सत्ता म्हणजे निवडलेल्या श्रेष्ठांचीच सत्ता होय.

               

सामाजिक कराराची उपपत्ती समजण्याकरिता सामाजिक कराराच्या अगोदरची माणसाची स्थिती म्हणजे समाजविरहित नैसर्गिक स्थिती लक्षात घ्यावी लागते. या नैसर्गिक स्थितीतून बाहेर पडण्याकरिता आणि सर्व मानवांना संरक्षणांचे आश्वासन देण्याकरिता माणसे एकमेकांबरोबर अविरोधाने आणि सहकार्याने राहण्याचा म्हणजे समाजात समाजघटक म्हणूनच रहावयाचा आपसांत करार करून समाजाची सत्ता स्थापित करतात. लॉकच्या मते जीवित आणि संपत्ती या दोघांचे आणि विशेषतः संपत्तीचे, अर्थात खाजगी संपत्तीचे रक्षण करणे, हा सामाजिक कराराचा उद्देश होय. परंतु रूसोच्या मते खाजगी संपत्तीने सामाजिक विषमता निर्माण होते. या सामाजिक विषमतेपेक्षा सर्व मानवांची समानता ह्या तत्त्वाला प्राधान्य देणे, हे सामाजिक कराराचे तत्त्व होय. रूसोच्या सामाजिक कराराच्या संकल्पनेत दोन मूलभूत संकल्पना आहेत. त्या आधुनिक राज्यसंस्थेच्या संकल्पना आहेत: (१) जनतेची सार्वभौम सत्ता आणि (२) ‘समूहईहा’ (जनरल विल). जनतेची सार्वभौम सत्ता ही जनतेपासून कधीही वेगळी होत नाही आणि नाश पावत नाही. सामाजिक कराराने ही जनतेची सार्वभौम सत्ता मान्यता पावते. [⟶सामाजिक कराराचा सिद्धांत].

               

दुसरी महत्त्वाची संकल्पना समूहईहा. ईहा म्हणजे इच्छा, अपेक्षा, वासना किंवा आकांक्षा. इच्छा, वासना, अपेक्षा किंवा आकांक्षा दोन प्रकारच्या: (१) त्या त्या व्यक्तीच्या स्वार्थविषयक इच्छा व (२) समस्त समजाचे ज्यात कल्याण साधेल, इशी इच्छा. अनेक व्यक्तींचे बहुमत विरुद्ध अल्पसंख्याकांचे अल्प मत असते. ही मतेसुद्धा पहिल्या प्रकारात मोडतात. समूहईहेमध्ये बहुमत आणि अल्पमत असा भेद पडत नाही. उदा., कोणाचाही प्राण धोक्यात येऊ नये, ही समूहईहा होय. यात अल्पमत व बहुमत असा भेद नाही. कोणाच्याही मालकीच्या संपत्तीचे अपहरण म्हणजे चौर्य ते होऊनये याबाबतीत दोन प्रकारची मते असू शकत नाहीत.

               

रूसोच्या राज्यशास्त्रविषयक विचारांचा यूरोपियन इतिहासावर मोठा प्रभाव पडला आहे. फ्रेंच राज्यक्रांतीचा प्रेरक ध्येयवाद देणारा रूसो मानला जातो. अमेरिकेच्या स्वातंत्रयुद्धावरही त्याचा प्रभाव होता. असे मानले जाते परंतु नेपोलियानसारखी राजसत्ता किंवा हिटलर, मुसोलिनी इत्यादिकांची हुकूमशाही यांचे समर्थनही रूसोच्या समूहईहा या सिद्धान्ताने करता येते, असे⇨कार्ल पॉपर (१९०२ –) सारखे विव्दान द ओपन सोसायटी अँड इट्स एनिमीज (१९४५) यासारख्या ग्रंथात सांगतात. अमेरिकेच्या स्वातंत्रयुद्धाला जो ध्येयवाद मिळाला, त्यावर⇨टॉमस पेनच्या  (१७३७ – १८०९) द राइट्स ऑफ मॅन या ग्रंथाचा विशेष प्रभाव पडलेला दिसतो.

               

एकोणिसाव्या शतकाच्या राज्यशास्त्रविषयक विचारांमध्ये उपयुक्ततावाद हा मूलभूत मानला जातो. याचा मुख्य प्रवर्तक ⇨जेरेमी बेंथॅम (१७४८ –१८३२) होय. उपयुक्ततावादी राजनैतिक तत्त्वज्ञान त्याने विस्ताराने मांडले. सामाजिक करार आणि निसर्गनियम या दोनही परंपरागत राज्यशास्त्रीय संकल्पनांचे त्याने खंडन केले. सुखदुःखांचा हिशोब करूनच माणसे बुद्धिवादाच्या आधारावर राज्यांचे व्यवहार नेहमी चालवू शकतात. आरोग्य, संपत्ती, सत्ता, मैत्री, औदार्य आणि अन्य अनेक इष्ट आणि अनिष्ट जीवनमूल्ये यांचे मोजमाप माणसे नेहमी करतात आणि राजकीय व्यवहार चालू ठेवतात. अशी मूलभूत भूमिका मांडून खुल्या व्यापाराचे तत्त्व व शिक्षित मतदारवर्गाने निर्माण केलेले शासन या दोन गोष्टी समाजधारणेस आवश्यक आहेत, हे त्याने सिद्ध केले.⇨जॉन स्ट्यूअर्ट मिल (१८०६ – १८७३) याने बेंथॅमच्या विचारांची अधिक साफसफाई केली. त्याच्या मते संस्कृती समृद्ध होते, ती सर्जनशील अल्पसंख्य प्रज्ञावंतांच्याच द्वारे आणि त्यांच्या मुक्त विचारसरणीमुळे, हे लक्षात ठेवले पाहिजे. लोकशाहीमध्ये असा प्रज्ञावंतवर्ग असावाच लागतो. मिलने पहिल्यांदा स्त्रीमुक्तीचा सिद्धांत व्यवस्थित रीतीने मांडला.

               

यूरोपमध्ये अठराव्या शतकाच्या शेवटी आणि विसाव्या शतकाच्या प्रारंभी राष्ट्र-राज्ये (नेशन स्टेट्स) निर्माण होऊ लागली आणि राष्ट्रवादाचा उदय झाला. राष्ट्रवाद म्हणजे राष्ट्राकरता मी आणि माझ्याकरिता राष्ट्र असून, माझे राष्ट्र स्वतंत्र राहिले, तरच माझे स्वातंत्र्य अबाधित राहते, असा राष्ट्रवादाचा मुख्य सिद्धांत आहे. जोसेफ मॅझिनी हा इटालियन देशभक्त उदार राष्ट्रवादाचा महान क्रांतिकारक प्रवक्ता मानला जातो. सगळी राष्ट्रे स्वतंत्र झाली पाहिजेत, या सिद्धांताला त्याने मूलभूत महत्त्व दिले. सर्व नागरिकांना शिक्षण देऊन प्रत्येक वयात आलेल्या नागरिकाला मतदानाचा हक्क जिच्यात दिला आहे, अशा तऱ्हेची राज्यसंस्था त्याने पुरस्कारिली. यूरोपातील सर्व स्वयंनिर्णयाने स्वतंत्र झालेली राष्ट्रे एकत्र येऊन त्यांनी एक संयुक्त राज्य निर्माण करावे, हे ध्येय त्याने पुरस्कारिले. पहिल्या महायुद्धानंतरचे ‘राष्ट्रसंघ’ आणि दुसऱ्या जागतिक महायुद्घानंतरचे ‘संयुक्त राष्ट्रे’ या दोन संस्था निर्माण होण्यास अनुकूल अशी विचारसरणी जोसेफ मॅझिनी याचे प्रथम मांडली.

               

आदर्श अराजकतावाद आणि समाजसत्तावाद या दोन ध्येयवादांचा किंवा या दोन ध्येयवादांच्या संयुक्त दृष्टिकोनाचे सतराव्या शतकापासून तो अद्ययावत विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत यूरोपियन आणि जागतिक राजकीय विचारसरणीवर मूलगामी परिणाम झालेले दिसतात. याचे प्रत्यंतर म्हणजे विल्यम गॉड्विन याने पोलिटिकल जस्टिस (१७९३) आणि रॉबर्ट ओएन याने न्यू व्हू ऑफ सोसायटी (१८१३) हे ग्रंथ लिहिले. गॉड्विनच्या मते व्यक्तिस्वातंत्र हे मूलभूत मूल्य आहे. माणसे स्वभावतःच विवेकशील असतात. सत्तापिपासू राज्यकर्त्यांनी युद्धसंस्था निर्माण केली आणि जुलमी राज्यव्यवस्था स्थापित केली. शिक्षण आणि स्वातंत्र्याचे हक्क यांचा विस्तार होत जावा आणि राज्यसंस्थेतून सत्तापिपासू लोकांचा प्रभाव कमी होत जावा. सशस्त्र क्रांती हा जुलमी राज्यसंस्था नष्ट करण्याचा उपाय नव्हे. सशस्त्र राज्यक्रांतीतून नवी हुकूमशाही तयार होते. धर्मसंस्थासुद्धा मानवाच्या अनिर्बंध स्वातंत्र्याच्या विरुद्ध असते. लैंगिक स्वातंत्र्यासह सर्व प्रकारचे स्वातंत्र्य माणसांना लाभले पाहिजे आणि ते योग्य शिक्षणाने शक्य आहे.⇨रॉबर्ट ओएन (१७७१–१८५८) हा इंग्लिश समाजवादी सहकारी अर्थशास्त्र आणि सहकारी समाजसंस्था यांचा पुरस्कार करणारा होता. त्याने आदर्श सहकारी सामाजिक संस्थांचा आलेख तयार केला. त्याने सांगितलेल्या कार्यक्रमामुळे उत्पादनवाढ, मानवतावादी शिक्षण आणि माणसाच्या सत्प्रवृत्तींचा आविष्कार या गोष्टी साध्य होतील, असे त्याचे मत होते. या अराजकतावाद्यांमध्ये⇨प्येअर झोझेंफ प्रूदाँ (१८०९ –१८६५) हा विशेष उल्लेखनीय फ्रेंच तत्त्वज्ञ होऊन गेला. वर्गरहित समाजरचना, भांडवलशाहीविरहित अर्थव्यवस्था, स्वंयंशासित उद्योजक त्याचप्रमाणे नोकरशाहीविरहित आणि भांडवलशाहीविरहित स्थितीत आर्थिक उत्पादन करणारे नागरिक ज्या समाजसंस्थेत आहेत, अशी समाजसंस्था निर्माण झाली, म्हणजे मानवी समाजातून युद्धास सतत उद्युक्त असलेल्या सार्वभौम राजकीय सत्ता नष्ट होतील, मानवसमाजात पूर्ण बदल होईल आणि जनतेमध्ये स्पर्धारहित सहकार्याची जाणीव पसरेल. [⟶ अराज्यवाद]. सेंट सायमन आणि⇨ऑग्यूस्त काँत (१७९८–१८५७) हे फ्रेंच मानवतावादी, वर्गहीन समाजरचनेच्या सिद्धांताच्या आधारावर संपूर्ण मानवजातीचे एक विश्वराज्य निर्माण व्हावे, या दृष्टीचे प्रवर्तक मानले जातात. काँतने वैज्ञानिक क्रांती झाल्यानंतर परंपरागत खिश्चन धर्माला तात्विक आधार रहात नाही, असा मूलगामी विचार मांडला. सर्व मानवजातीला दारिद्र्यातून बाहेर काढणारे विज्ञाननिष्ठ तंत्रज्ञान आहे, त्याकरिता स्वतंत्र सार्वभौम राष्ट्रे यांच्यातही नैसर्गिक बेबंदशाही नष्ट होणे जरूर आहे आणि मानवतेचा पूजक असा सर्व मानवांचा धर्म निर्माण होणे आवश्यक आहे, असे अनेक महत्त्वाचे मुद्ये काँतने मांडले आहेत. [⟶ विश्वराज्य आंदोलन].


              

एकोणिसाव्या शतकात सर्वांत मोठा प्रभावी यूरोपियन तत्त्ववेत्ता ⇨जी. डब्ल्यू. एफ्. हेगेल (१७७०–१८३१) झाला. विश्वविषयक तत्त्वज्ञानाच्या अधिष्ठानावर त्याने आपले राज्यविषयक विचार मांडले आहेत. विश्व हे इतिहासबद्ध आहे. हा इतिहास म्हणजे चैतन्यतत्त्वाचा विकास होय. जर्मन-प्रशियन राजसंस्था हे या आदितत्त्वाचे संपूर्ण विकसित रुप आहे, असा सिद्धांत त्याने आपल्या विरोधविकासवादी पद्धतीने मांडला.

               

एकोणिसाव्या शतकातील समाजवादी क्रांतिकारकांमध्ये ⇨कार्ल मार्क्स (१८१८–१८८३) हा सर्वश्रेष्ठ क्रांतिकारक शेभून दिसतो. याचे कारण त्याच्या तत्त्वज्ञानाच्या व ध्येयवादाच्या प्रभावाखाली विसाव्या शतकातील रशियन राज्यक्रांती घडून आली.त्याचे राजकीय तत्त्वज्ञान पुढीलप्रमाणे आहे. सर्व मानवी घटना किंवा विश्वातील घटना या इतिहासबद्ध आहेत. इतिहास ही प्रचंड शक्ती आहे. ही शक्ती विरोधविकासवादी पद्धतीने व्यक्त होत असते. मानवप्राणी समाज करून राहू लागला, तेव्हा खाजगी संपत्ती ही संस्था नव्हती. सर्व अर्थव्यवस्था ही सामुदायिक होती, त्या वेळी वर्ग नव्हते म्हणून राज्यही नव्हते. आर्थिक वर्ग दोन प्रकारचे: पिळणारा उच्च वर्ग व पिळला जाणारा खालचा वर्ग. आर्थिक वर्ग अस्तित्वात आल्यानंतर वर्गांचा संघर्ष सुरू झाला. इतिहासाची हीच संघर्षात व्यक्त होणारी शक्ती होय. खाजगी संपत्ती स्थावर आणि जंगम स्वरूपात निर्माण होऊ लागल्यावर आर्थिक सामाजिक वर्ग अस्तित्वात आले. त्याचे उदाहरण म्हणजे यूरोपातील दासवर्गाच्या श्रमावर आधारलेली प्राचीन समाजसंस्था होय. दासवर्गाला नियंत्रित करण्याकरता दमन करणारी आणि शासन करणारी राज्यसंस्था निर्माण झाली. त्यातून मध्ययुगीन सरंजामशाही क्रांती झाली. यात दासवर्ग मुक्त झाला परंतु भूदासवर्गाने त्याचे स्थान घेतले. शेतावर मालकी हक्क नसून केवळ श्रम करणारा भूदासवर्ग अस्तित्त्वात आला आणि विस्तृत अशी सरदारवर्गांची सत्ता निर्माण झाली. त्या सरदारवर्गांचे नियंत्रण करणारी साम्राज्यशाही अस्तित्वात आली. या राज्यसंस्थेच्या पोटामध्ये किंवा अंतरंगामध्ये व्यापारी वर्ग निर्माण झाला आणि वैज्ञानिकयुगास प्रारंभ झाला. वैज्ञानिक तंत्रज्ञान विकसित होऊ लागल्यानंतर औद्योगिक क्रांती झाली आणि विकसनशील अशी संपन्न भांडवलशाही समाजव्यवस्था प्रभाव पाडू लागली. त्यात खाजगी संपत्ती नसलेला, केवळ परिश्रमावर जगणारा मोठा कामगारवर्ग निर्माण झाला. या कामगारवर्गाच्या दुरवस्थेतून समाजवादी क्रांतीचा विचार निर्माण झाला. वर्गहीन समाजरचना झाली, तरच कामगार हा स्वतंत्र होऊ शकतो, भांडवलशाही असेपर्यंत आपले स्वतःचे परिश्रम व त्यांतून निर्माण झालेली संपत्ती, यांवर त्याचा हक्क रहात नाही. हा प्रचंड जागतिक कामगारवर्गच समाजवादी क्रांती करुन कामगार वर्गाची हुकूमशाही निर्माण करील व ह्या हुकूमशाहीद्वारा भांडवलशाही वर्गव्यवस्था नष्ट करील असा भविष्यवाद कार्ल मार्क्सने द मॅनिफेस्टो ऑफ द कम्युनिस्ट पार्टी या पुस्तिकेत मांडला. कामगारवर्गाची हुकूमशाही भांडवलशाही अर्थव्यवस्थेला नष्ट करते. अर्थव्यवस्था नफ्याच्या तत्त्वावर न चालता लोकांच्या गरजा भागविण्याकरता चालू राहते, त्यातून वर्गहीन समाजरचना तयार होते. खाजगी संपत्ती नसल्यामुळे समाजातील संघर्ष नाहीसा होतो व हळूहळू राज्यसंस्था विरून जाते आणि आदर्श साम्यवादी समाजव्यवस्था अस्तित्वात येते. या व्यवस्थेत माणसे आपल्या सामर्थ्याप्रमाणे कामे करतात आणि सगळ्यांच्या गरजा बिनविरोध पुरविण्यात येतात. ही साम्यवादी क्रांती जागतिक क्रांती म्हणून सर्वत्र अस्तित्वात येते कार्ल मार्क्सचा हा उत्साहदायक आणि प्रेरक भविष्यवाद खरा ठरला नाही. रशियात कामगार क्रांती झाली, ती पूर्व यूरोपात पसरली परंतु तेथेच थांबली. चीनमध्ये लाल क्रांती झाली, तीही तेथेच थांबली. जागतिक क्रांती भविष्यकाळी केव्हा घडेल, याचा मात्र अंदाज येऊ शकत नाही. [⟶ मार्क्सवाद रशियन राज्यक्रांति].

               

या विसाव्या शतकात पिळवणूक करणारी केवळ नफ्यावर दृष्टी ठेवणारी भांडवलशाही पद्धती प्रगत राष्ट्रांत कोठेही आता दिसत नाही. वैज्ञानिक तंत्रज्ञानात पुढारलेल्या आधुनिक भांडवलशाही राष्ट्रांतील प्रतिनिधीप्रधान लोकशाहीच्या प्रभावाखाली कामगारवर्गाचे हक्क वाढीस लागले. त्यांची पिळवणूक घटू लागली. तो वर्ग मुक्त होऊ लागला. कामगारवर्ग भांडवलशाही राष्ट्रांत सुस्थितीमध्ये आत्मविश्वासाने आता नांदत आहे. सामान्य बहुजनसमाज प्रगत राष्ट्रांमध्ये दारिद्र्याच्या दुःस्थितीतून बाहेर पडला आहे कारण जनकल्याणकारी राज्यव्यवस्था हे उद्दिष्ट प्रगत भांडवलशाही राष्ट्रांमध्ये कार्यवाहीत आलेले आहे.

               

सर्व मानवजात स्वातंत्र्यपूर्ण आणि वैभवशाली अशा सामाजिक जीवनामध्ये नांदू लागेल, अशा तऱ्हेचे एकोणिसाव्या शतकातील क्रांतिकारकांचे विश्वचित्र नवे मार्क्सवादी आपला ध्येयवाद म्हणून सांगत असले, तरी काही अस्तित्ववादी या आदर्श चित्राबद्दल फार साशंक आहेत. कारण या विसाव्या शतकात अर्ध्या जगात मार्क्सवादी क्रांती झाली आहे. विशेषतः रशियात आणि चीनमध्ये ! परंतु तेथे मानवी स्वातंत्र्याचे संपन्न सामाजिक जीवन निर्माण होईल, असे निश्चयाने सांगता येत नाही. प्रत्येक क्रांती निर्माण झाल्यावर नवी बंधने येतात, पुन्हा असंतोष निर्माण होतोच.

               

सोव्हिएट रशिया आणि अमेरिका ही जगातील वरिष्ठ सत्ताधारी राष्ट्रे अण्वस्त्रांनी सुसज्ज झाली आहेत. त्याशिवाय इतर अनेक राष्ट्रे अण्वस्त्रनिर्मिती करू लागली आहेत. म्हणून विश्वविनाशाचा धोका उत्पन्न होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याला कारण ⇨सिग्मंड फ्रॉइड (१८५६–१९३९) याच्या मनोविश्लेषणशास्त्राप्रमाणे सामाजिक मनोविकृती ठरविता येते. स्वतःच्या   आणि दुसऱ्याच्या विनाशाची वासना माणसाच्या अर्धसंज्ञ मनामध्ये असते. अशी ही मनोविकृती आजच्या जागतिक समाजांमध्ये दृग्गोचर झालेली आहे. म्हणून ‘संयुक्त राष्ट्रे’ यासारखी संस्था निर्धास्त अशी विश्वव्यापी शांती निर्माण करण्यात यशस्वी होऊ शकत नाही. दुसऱ्या जागतिक महायुद्धानंतरच्या राजकीय चिंतनाचे थोडक्यात असे सार आहे. प्लेटोपासून तो अस्तित्त्ववादी-मार्क्सवादी आणि मनोविश्लेषणनिष्ठ निराशावादी व आशावादी राजकीय तत्त्वज्ञान आणि राजकीय विज्ञान यांचा हा संक्षिप्त परामर्श येथे नोंदला आहे.

भारतीय राज्यशास्त्र: भारतामध्ये प्राचीन काळी राज्यशास्त्र ही एक ज्ञानाची शाखा अस्तित्वात आली. बृहस्पती, शुक्र, मनू, भीष्म, कौटिल्य हे राज्यशास्त्राचे प्रणेते प्राचीन संस्कृत साहित्यात निर्दिष्ट केलेले आढळतात. कौटिलीय अर्थशास्त्र, मनुस्मृति, याज्ञवल्क्यस्मृतिमहाभारत (शांतिपर्व) या ग्रंथांत राजनीतीचे विवरण विशेष रूपाने प्रतिपादिले आहे.

    


           

प्राचीन काळी ज्या विविध ज्ञानशाखा होत्या, त्यांचे वर्गीकरण होऊन ‘त्रयी, वार्ता, दंडनीती आणि आन्वीक्षिकी’ अशा या चार विद्या त्यावेळच्या शिक्षणाच्या कार्यक्रमात समाविष्ट झाल्या. वार्ता म्हणजे अर्थोत्पादक व्यवसायाचे तंत्रज्ञान. योग्य तंत्रज्ञानाने अर्थ व अनर्थ यांचे आकलन होते. उदा., विविध शिल्पे, स्थापत्य, कृषिकर्म, पशुपालनविद्या, वस्त्रोद्योग, चित्रकर्म, धातुनिर्मिती, शस्त्रास्त्रनिर्मिती, पात्रनिर्मिती, अलंकारनिर्मिती, रथरचना इ. अनेक विषय वार्ता या संज्ञेखाली येतात. यांचे अध्ययन त्या त्या शिल्पात प्रवीण असलेल्या शिल्पकारांपासून घ्यावे असे कौटिल्याने म्हटले आहे. दंडनीती म्हणजे राज्यशास्त्र.

               

त्रयी म्हणजे धर्मशास्त्र आणि वार्ता म्हणजे अर्थोत्पादन आणि अर्थविनिमय यांची विद्या, त्याचप्रमाणे आन्वीक्षिकी म्हणजे तत्त्वज्ञान व तर्कशास्त्र. यांचे सातत्य टिकावे, सातत्याने त्या विद्या सामाजिक जीवनात रहाव्यात म्हणून विधिनिषेधव्यवस्था, विविध कर्तव्यांची व्यवस्था, अर्थात वर्णाश्रमव्यवस्था म्हणजे धर्मस्थापना आवश्यक आणि त्याकरता आवश्यक असलेले मुख्य साधन म्हणजे दंड होय. सत्ता म्हणजे दंड होय. हे धर्मस्थापनेचे साधन विश्वव्यापी तत्त्व भारतीय राज्यशास्त्रात सांगितलेले आहे. दंड ही शक्ती विवेकपूर्ण रीतीने दंडधारीने वापरली तर लोकयात्रा सुयंत्रित रीतीने चालते. सर्व व्यक्तींना धर्म, अर्थ व काम या पुरुषार्थांची नित्य व अबाधित रीतीने प्राप्ती होत राहिली म्हणजे लोकयात्रा सुयंत्रित चालली असे म्हणता येते (कौटिलीय अर्थशास्त्र १·४). महाभारताने मोक्ष या चौथ्या पुरुषार्थांची भर घातली. कौटिल्याने मोक्षाचा धर्मातच ‘आनन्त्य’ शब्दाने अंतर्भाव केला. दंडाचे म्हणजे हल्लीच्या अर्थी सत्तेचे उपयोजन सांगणारे शास्त्र म्हणजे दंडनीती होय. जे प्राप्तव्य प्राप्त झालेले नाही. त्याचा लाभ होण्याकरिता, जे लाभलेले आहे त्याचे सर्वथा रक्षण करण्याकरिता, रक्षिलेले वाढविण्याकरता आणि वाढलेले योग्य ठिकाणी पोहोचवण्याकरिता आवश्यक असलेले धोरण दंडनीती होय. लोकजीवन म्हणजे लोकयात्रा दंडनीतीवर अवलंबून असते. त्रयी, वार्ता व दंडनीती यांचे समीक्षण आन्वीक्षिकीच्या योगानेच होऊ शकते. ही समीक्षा सतत चालावी लागते. अधर्म कोणता व धर्म कोणता, कोणते तंत्रज्ञान अधिक अर्थसाधक व कोणते तसे नाही, कोणते राजकीय धोरण यशस्वी होऊ शकेल व कोणते होऊ शकणार नाही, यांची समीक्षा करण्याचे सामर्थ्य आन्वीक्षिकीने प्राप्त होते. तर्कशास्त्राच्या योगाने केलेली समीक्षा समाजाला उपयोगी पडते संकटात आणि सुस्थितीत बुद्धीचे कार्य सुस्थिर राहते प्रज्ञा म्हणजे सुविचार. भाषण आणि कृती यांतील कुशलता आन्वीक्षिकीने निर्माण होत असते. आन्वीक्षिकी सर्व विद्यांचा प्रदीप होय सर्व प्रकारच्या कार्याचे साधन होय सर्व प्रकारच्या कर्तव्यांचा कायमचा आधार होय. दंडनीतीच्या योगाने योग्य धोरण, अयोग्य धोरण, त्याचप्रमाणे बल कशात असते व दौर्बल्य कशात असते, याचा निर्णय करता येतो. दंडनीतीने समाजजीवन म्हणजे लोकयात्रा सुरक्षितपणे चालते हा भारतीय राज्यशास्त्राचा प्रथम मुलभूत सिद्धांत आहे.

               

लोकयात्रा हे दंडनीतीचे मुख्य उद्दिष्ट. दंडाने शिक्षणद्वारा लोक सन्मार्गात स्थिरावतात व लोकयात्रा हे उद्दिष्ट सिद्ध होते. दंडाची अन्याय्य उपयोजना दंडधारीने जर केली, तर दंड दंडधारीचाच अखेरीस दंड निःपात करतो, असा कौटिलीय अर्थशास्त्र, मन्वादी धर्मशास्त्र व भीष्मोक्त राजधर्मपर्व यांनी ऐतिहासिक निष्कर्ष नोंदलेला आहे. युद्ध म्हणजे मुख्य अर्थाने दंडाचा (सेनाशक्तीचा) वापर होय. तोसुद्धा प्रजारक्षणार्थ वापरणे हा राजधर्म होय. दंडतत्त्व हे त्रैलोक्यव्यापी आहे कारण त्रैलोक्य ही राजसंस्था आहे, असा वेदांचा अभिप्राय आहे. विश्वाची सुव्यवस्था आणि त्या सुव्यवस्थेने नियम यांना वेदांमध्ये ‘ऋत’ अशी संज्ञा आहे. ऋत शब्दाचा दुसरा अर्थ यज्ञाची योग्य प्रक्रिया आणि तिसरा अर्थ नैतिक नियम. विश्वाची सुव्यवस्था किंवा नियमबद्धता ही शाश्वत असून त्या नियमबद्धतेचे परिपालन इंद्र, वरुण, मित्र, सविता, यम इ. देव करीत असतात. ते ‘ऋतज’ म्हणजे नियमातूनच निर्माण झालेले असतात. उदा., या मानवी समाजातील राजा, मंत्री, सचिव यांची नेमणूक किंवा निर्मिती जशी नियमानुसार होते, त्याप्रमाणे देवांची योजना किंवा नेमणूक ऋताप्रमाणे होते, म्हणून त्यांना ऋतज म्हटले आहे. त्यांना ‘ऋतप’ असेही विशेषण लागते. म्हणजे ऋताचे-नियमांचे परिपालन करणारे आणि ‘ऋतावृध’ नियमांची वृद्धी करणारे म्हटले आहे. सूर्य, चंद्र, नक्षत्रे यांचे गतिचक्र ऋताधीन आहे. वर्षाचे बारा महिन्यांचे चक्र म्हणजे ऋताचेच चक्र होय. अरणी आणि मंथा यांतून अग्नी जन्मतो, ते ऋताचेच आविष्करण आहे. नद्या ऋताच्या आज्ञेप्रमाणेच वाहत असतात. माणसाने माणसाशी कसे वागावे याचे जे नियम आहेत, तेही ऋतज होत. अग्नी हा यज्ञामध्ये दिलेल्या आहुती देवांकडे पोचवितो किंवा देवांना यज्ञामध्ये उपस्थित करतो, ही ऋतानुसारेच क्रिया घडत असते. उषा प्रत्येक प्रातःकाळी पूर्व दिशेला उगवते, तेव्हा ती ऋताच्या स्थानातूनच बाहेर आलेली असते. हे ऋत म्हणजे सत्य होय आणि त्यालाच धर्म ही संज्ञा दिलेली आहे. विश्वाचे धारण करणारी शक्ती धर्म ही आहे आणि धर्म हा यज्ञरूप आहे.

               

स्वामी, अमात्य, जनपद, दुर्ग, कोश, दंड व मित्र असे सप्तांग राज्य भारतीय राज्यशास्त्रात आवश्यक म्हणून गृहीत धरले आहे. राज्याची ही प्रकृती म्हणजे स्वरूप होय. ही राज्याची अंगे म्हणजे मानवी देहाच्या अंगांप्रमाणे म्हणजे इंद्रियांप्रमाणेच महत्त्वाची होत. स्वामी हा प्रथम निर्दिष्ट केलेला आहे. सार्वभौम सत्तेचा प्रतीक, दंडधारी म्हणजेच राजा वा संघमुख्य होय. हा राजा वा संघमुख्य धर्मरक्षण करतो. त्रयी म्हणजे वेद हे विधिनिषेधांच्या द्वारे धर्माधर्माचा बोध करून देतात. वेद हे अपौरुषेय आहेत. धर्माधर्म हे वेदांच्या द्वारे ठरतात. स्वामी म्हणजे राजा धर्माधर्म ठरवत नाही. धर्माची अंमलबजावणी म्हणजे प्रशासन हेच मुख्य स्वामीचे कार्य होय.

               

भारतीय दंडनीतीत म्हणजे राज्यशास्त्रात राजसत्ताक पद्धतीच गृहीत धरून राजनीती वर्णिलेली आहे. गणराज्याची कल्पनासुद्धा भारतीय नीतिशास्त्रात आहे आणि कौटिलीय अर्थशास्त्रातही आहे परंतु कौटिलीय अर्थशास्त्र हे विजिगिषू आणि चक्रवर्ती बनू इच्छिणाऱ्या राजाचे प्रशासनशास्त्र आहे. भारतीय दंडनीतीचे किंवा राज्यशास्त्राचे महत्वाचे मौलिक तत्त्वज्ञान संक्षेपाने कौटिलीय अर्थशास्त्रात प्रारंभी सूत्ररूपाने मांडले आहे. परंतु विविध स्वरूपाचे राजकीय तत्त्वज्ञान मनुस्मृतीच्या ७ व ९ या अध्यायांत आणि महाभारताच्या शांतिपर्वातील राजधर्मपर्व आणि आपद्पर्व यांच्यामध्ये विवरिले आहे. युधिष्ठिर आणि भीष्म यांच्या संवादात (शांतिपर्व अध्याय १०८) राजसत्ताक राज्याबरोबर गणराज्यांचाही प्रश्न युधिष्ठिराने भीष्माला विचारला आहे. एक राजसत्ता दुसऱ्या राजसत्तेला ज्याप्रमाणे धोकादायक असते, तशी गणराज्यांनाही धोकादायक असते. लोभ आणि गर्व या वृत्तींच्या योगाने राज्याराज्यातील वैरे पेटत असतात, एकमेकांच्या स्पर्धा चालू राहतात. गणराज्य हे राजसत्तेपेक्षा अधिक सामर्थ्यशाली असू शकते, जर त्यांच्यात फाटाफूटीची प्रवृत्ती नसेल तर असे कौटिल्य ‘संघवृत्त’ या प्रकरणात विधान करतो म्हणून राजसत्तेच्या कह्यात संघराज्य येणे, हे सैन्यलाभ आणि मित्रलाभ यांपेक्षाही उत्तम होय, असे कौटिल्य म्हणतो. अखेर उपदेश देतो की, ‘संघाने म्हणजे गणराज्याने राजाच्या कुटिल कारस्थानांपासून स्वतःचा बचाव करावा’. भीष्मसुद्धा’ गणवृत्ति’ अध्यायात (म.भा.शां.१०८) गणराज्य कसे वर्धिष्णू व सुस्थिर होईल, यांसंबंधी उपाय सांगतो. यामध्ये राजसत्ता असो अथवा गणसत्ता असो, स्वामी किंवा मुख्य याच्या आज्ञा प्रमाण मानल्याच पाहिजेत, असा सिद्धांत भीष्म सांगतो. एकजूट टिकणे हेच राज्याचे सामर्थ्य होय, मग ती राजसत्ता असो अथवा गणसत्ता असो, या बाबतीत मतभेद असण्याचे कारण नाही. राज्याच्या आत फाटाफूट झाली म्हणजे राज्याचा समूळ नाश होतो, म्हणून अंतरंगातील एकजूट हा राज्याचा गाभा होय. तो पक्का असला म्हणजे बाह्य भयापासून म्हणजे परकीय आक्रमणापासून राज्य सुरक्षित राखणे चांगले शक्य होते.


               

कौटिल्य आणि सोळाव्या शतकातील यूरोपियन प्रबोधनकाली राज्यशास्त्राला वास्तववादाचे अधिष्ठान देणारा मॅकिआव्हेली यांचे राजनीतिशास्त्र सारखेच आहे. कारण सरळ आणि कुटिल राजकीय धोरणे यांमध्ये जेथे व जेव्हा जी धोरणे अवलंबावी, त्यांत शुद्ध व अशुद्ध विवेक करण्याची आवश्यकता नाही. सत्ता संपादणे, विस्तारणे वा आत्मरक्षण करणे या सबंधांत जे फलदायी तेच योग्य असाच विवेक बाळगावा या बाबतीत मॅकिआव्हेली व कौटिल्य यांची मते मिळती जुळती आहेत म्हणून दोघांचे साम्य दाखवितात. परंतु कौटिल्याशी मॅकिआव्हेलीपेक्षा प्लेटोची तुलना अधिक महत्त्वाची होऊ शकते. पश्चिमी राज्यशास्त्राच्या इतिहासात राजकीय तत्त्वज्ञान सांगणारा पहिला पंडित प्लोटो हा मानला जातो. कौटिल्याने आदर्श धर्मराज्य स्थापनेकरिता व ते सतत टिकविण्याकरिता आदर्श राजा वर्णिला आहे. कौटिल्याच्या मते जितेंद्रिय राजा हाच विवेकपूर्ण रीतीने दंडधारण करुन लोकसंस्थेचे पालन करू शकतो, प्रजांना पुरुषार्थ साधनेमध्ये नित्य उपयुक्त करतो कारण तो विवेकी असल्यामुळे अपराधानुरूपच दंडप्रयोग करतो आणि निरपराध्यांना पुरुषार्थसाधनेमध्ये शांततापूर्ण सामाजिक वातावरण निर्माण करतो. दंडशक्तीचा न्याय्य प्रयोग विद्याविनीत राजाच करु शकतो. विद्याविनीत राजा प्रजांच्या विद्याविनयामध्ये नित्य रत राहतो आणि सर्वभूतहितामध्ये रत राहून अविरोधाने राज्य भोगू शकतो. मनुष्यजातीचेच रक्षण आणि पालन एवढाच दंडप्रयोगाचा उद्देश नाही. या बाबतीत कौटिल्याचा भगवान बुद्धासारखाच अहिंसावादी दृष्टिकोण दिसतो. ‘विनयमूलो दंडःप्राणभूतां योगक्षेमावहः’ विद्याविनयी राजाने केलेला दंडप्रयोग हा प्राण्यांच्या योगक्षेमाला कारण होतो. प्राण्यांना जे हितकारक, त्याची नित्य अखंड प्राप्ती होणे म्हणजेच योगक्षेम होय.

               

‘विनय’ हा शब्द शिक्षणजन्य सत्प्रवृत्ती या अर्थी आहे. ही प्रवृत्ती स्वाभाविक आणि अध्ययनाने गुरुजनांच्या देखरेखीखाली जीवन जगण्यामुळे निर्माण झालेली, अशी दोन प्रकारची कौटिल्याच्या मते असते. उदा., काही मुले वर्णोच्चार करीत असताना आपोआप शुद्ध वर्णोच्चारच करतात. याचा अर्थ त्यांच्या ठिकाणी स्वाभाविकच शुद्ध वर्णोच्चारांची प्रवृत्ती असते. काही मुलांचे वर्णोच्चार प्रथम बोबडे असतात नंतर हळूहळू संस्काराने सुधारतात. शिक्षणाचा संस्कार घेण्यास मूळची पात्रता असावी लागते. शिक्षणाने पात्रता असलेली व्यक्तीच विद्येचे ग्रहण करू शकते, असे कौटिल्य म्हणतो. ‘क्रिया हि द्रव्यं विनयति नाद्रव्यम्’ (कौ. अ. १, ५, ४). कौटिल्याने वर्णिलेली विद्याविनयाची प्रक्रिया अशी : ज्याच्या ठिकाणी शुश्रूषा म्हणजे विद्येचे श्रवण करण्याची इच्छा असते, तोच आचार्याचा पाठ लक्षपूर्वक ऐकतो म्हणजे श्रवण करतो. श्रवण केल्यानंतर ग्रहण करता येते. ग्रहण केल्याने धारण करता येते म्हणजे ते मिळवलेले ज्ञान स्थिरावते. नंतर ते ज्ञान विज्ञान बनते म्हणजे स्पष्ट बनते. असे वारंवार अनेक विषयांचे स्पष्ट ज्ञान झाल्यावर काय स्वीकारायचे आणि काय टाकायचे, हे कळू लागते, म्हणजे ऊहापोह करता येतो. ऊहापोह केल्यानंतर बुध्दी तत्त्वाकडे आकर्षिली जाते म्हणजे सत्याची निवड करते. अशी प्रक्रिया विद्याविनयाची कौटिल्याने सांगितली आहे.

               

राजपुत्राने उपनयन झाल्यावर वेदविद्या, तत्त्वज्ञान, अर्थनिर्मितीची तंत्रे आणि दंडनीती अथवा राज्यशास्त्र यांचे अध्ययन ब्रह्मचर्याश्रम स्वीकारून करायचे. वयाच्या सोळाव्या वर्षापर्यंत असे अध्ययन केल्यावर विवाह करावयाचा. परंतु विद्याविनय हा जन्मभर नित्य वाढतच राहिला पाहिजे. म्हणून त्या त्या विद्येत निष्णात असलेल्या व्यक्तींचा म्हणजे विद्यावृद्धांचा सहवास हा कायम राखला पाहिजे. दिवसाच्या पूर्व भागामध्ये युद्धविद्येत प्रावीण्य संपादन करायचे आणि दिवसाच्या नंतरच्या भागामध्ये पुराण, इतिहास, वारंवार घडणाऱ्या महत्त्वाच्या घटना, धर्मशास्त्र, अर्थशास्त्र इत्यादिकांचे श्रवण करीत रहावयाचे. नवेनवे नित्य शिकत रहावयाचे. जे शिकलेले आहे, त्याचे पुन्हा पठण करावयाचे. जे नीट कळलेले नाही, त्याचे वारंवार श्रवण करावयाचे. वारंवार श्रवण म्हणजे अध्ययन केल्याने प्रज्ञा उजळते. प्रज्ञेने योग म्हणजे कार्यकुशलता प्राप्त होते. योगामुळे व्यक्तिमत्त्व विकसित होते. या व्यक्तीमत्त्वाचाच ‘आत्मवत्ता’ या शब्दाचे कौटिल्य निर्देश करतो. प्रज्ञा, योग आणि आत्मवत्ता हे विद्यांचे सामर्थ्य होय.

               

विद्याविनयाच्या योगाने इंद्रियजयाची प्राप्ती हाते. काम, क्रोध, लोभ, मान, मद आणि हर्ष या सहा विकारांचा त्याग केला म्हणजेच इंद्रियांवर विजय मिळवता येतो आणि त्यामुळे शास्त्रानुसारे निश्चितपणे वर्तन घडते कारण शास्त्र हे संपूर्ण इंद्रियजयच असते. चारी दिशांवर प्रभुत्व गाजवविणारा राजाही इंद्रियांवर विजय न मिळविणारा त्वरित नाश पावतो.

               

या संदर्भात कौटिल्याने इतिहासातील अनेक पराक्रमी राजांचा नाश इंद्रियविजय न साधल्यामुळे कसा झाला, याचे स्पष्टीकरण केले आहे. दांडक्यभोज व करालवैदेह यांचा राष्ट्रासह व बांधवजनांसह नाश झाला कारण ब्राह्मणांच्या कन्यांमध्ये त्यांचे मन गुंतले. क्रोधाने जनमेजय आणि तालजंध हे नष्ट झाले. लोभाने चातुर्वर्ण्यव्यवस्था बिघडविणारा ऐल आणि अजबिंदू सौवीर यांचा नाश झाला. मानीपणामुळे म्हणजे गर्विष्ठपणामुळे, परस्त्री न परत करणारा रावण आणि राज्याचा हक्काचा भाग न दिल्यामुळे दुर्योधन नष्ट झाला. दंभोद्भव आणि हैहय अर्जुन हे प्राण्यांचा अवमान करणारे उन्मत्त झाल्यामुळे नष्ट झाले. अशा तऱ्हेचे हे आणि दुसरे राजे षड्रिपुंच्या आधीन झालेले, जितेंद्रिय नसलेले नष्ट झाले, असे इतिहासाचे सार कौटिल्य सांगतो आणि जितेंद्रिय जामदग्न्य आणि नाभाग अंबरीष दीर्घकालपर्यंत राज्य भोगणारे झाले, असे कौटिल्य सांगतो.

               

स्वतः दंडधारी राजा आणि प्रजा या दोघांनीही पुरुषार्थी जीवन जगावे, म्हणून पुरुषार्थविषयक तात्विक मीमांसा कौटिल्य सांगतो. ही पुरुषार्थविषयक तत्त्वमीमांसा महाभारतातील राजनीतिशास्त्रात किंवा दंडनीतीमध्ये निरनिराळ्या दृष्टिकोनांतून वारंवार मांडलेली आढळते.

               

पुरुषार्थ ही संकल्पना भारतीय राज्यशास्त्राच्या संदभार्त निर्माण झाली आहे. पुरुष म्हणजे माणूस. त्याचे इष्ट म्हणजे अर्थ. मानवाचे संपूर्ण हित पुरुषार्थ संकल्पनेमध्ये व्यक्त होते. सत्ताधारी राजा हा जितेंद्रिय असला पाहिजे, तरच तो न्याय्य राज्य किंवा धर्मराज्य योग्य रीतीने चालवू शकतो असे म्हटल्यावर राजाने सुखोपभोग घ्यावा की नाही असा प्रश्न उत्पन्न होतो. त्यावर कौटिल्य ‘त्रिवर्ग’ या पारिभाषिक शब्दाने धर्म, अर्थ अणि काम या तीन मानवी उद्दिष्टांचा निर्देश करून तिघांचेही सेवन राजाने आणि प्रत्येक माणसाने करणे आवश्यक आहे असे सांगतो. धर्म आणि अर्थ या दोन पुरुषार्थांना बाधा येणार नाही, अशा पद्धतीने काम पुरुषार्थाचा भोग घ्यावा, सुखरहित जीवन असू नये, असे तो सांगतो. धर्म, अर्थ आणि काम या तिन्ही पुरुषार्थांचा समतोल असावा. त्यांपैकी कोणत्याही एकाचा अतिरेक असू नये. अतिरेकामुळे ज्याचा अतिरेक होतो, त्यालासुद्धा तो बाधतो. उदा., धर्माचा अतिरेक झाला तर धर्मसुद्धा नीट शुद्ध स्वरूपात आचरणे अशक्य होते. कौटिल्याने धर्म आणि काम या पुरुषार्थांपेक्षा अर्थ हा पुरुष प्रधान मानला आहे. कारण धर्म म्हणजे मुख्यतः दान आणि काम म्हणजे वैभवाचा उपभोग, या दोन्ही गोष्टी अर्थमूलकच आहेत. महाभारतकार व्यासांच्या मते धर्म हा पुरुषार्थ प्रधान होय. त्यांनी धर्मानेच अर्थ आणि काम या पुरुषार्थांची सिद्धी होते, म्हणून धर्माचरणालाच प्राधान्य द्या असा महाभारताच्या समाप्ती श्लोकात आदेश दिला आहे. मनुस्मृतीतही हे तिन्ही परस्परांत गुंतलेले आहेत, म्हणून तिघांनाही सारखेच महत्व आहे, असा विचार मांडलेला आहे. लोकयात्रा हे राज्यशास्त्राचे मुख्य उद्दिष्ट आहे. पुरुषार्थाचे योग्य रीतीने सेवन करीत प्रजा जगतील, अशी व्यवस्था म्हणजे लोकयात्रा होय. महाभारताने तीन पुरुषार्थांमध्ये चौथ्या मोक्षपुरुषार्थाच्या संकल्पनेची भर घालून तीन ऐवजी चार पुरुषार्थ मानले.


               

कौटिल्याने ज्याप्रमाणे स्वामी म्हणजे राजा म्हणजेच अंतिम सत्ताधारी अथवा दंडाधारी कसा असावा, याचे विवेचन केले आहे, तसेच मनु, याज्ञवल्क्य इत्यादींच्या धर्मशास्त्रग्रंथांत तसेच महाभारतात आणि रामायणात केलेले आहे. तेसुद्धा विवेचन समाजधारणेच्या अनुषंगाने आलेले आहे. जितेंद्रियता हा निकष सर्वच राजकर्मचाऱ्यांना लागू आहे, असे कौटिल्य ‘सर्वं इद शास्त्रं इंद्रियजयः’ या सूत्राने सूचित करतो.

               

अराजक स्थितीमध्ये बेबंदशाही माजते, दुर्बलांना सबल छळत असतात, मात्स्यन्याय पसरतो. म्हणजे लहान माशाला मोठा मासा गिळतो, त्याप्रमाणे समाजाची स्थिती होते. त्यातून बाहेर पडण्याकरता या सर्व चराचरांच्या रक्षणार्थ ईश्वराने राजा निर्माण केला अशी आधिदैविक किंवा पारलौकिक उपपत्ती मनुस्मृतीत (७ – ३) सांगितली आहे. आदर्श राजा म्हणजे इंद्र, वायू, यम, सूर्य, अग्नी, वरुण, चंद्र आणि कुबेर अथवा पृथिवी या देवांचे शाश्वत सार एकत्र करून ईश्वराने राजा निर्माण केला. म्हणून राजा बाल असला, तरी मनुष्य म्हणून त्याची निंदा करू नये. मनुष्यरूपाने तो श्रेष्ठ देवच सिंहासनावर विराजमान झालेला असतो. धर्मस्थानेकरता तो विविध रूपे धारण करीत असतो. ब्रह्मतेजाने भरलेला धर्मरुप, सर्व प्राण्यांचा रक्षक दंड हा ईश्वराने प्रथम निर्माण केला आणि नंतर वरील इंद्रादी देवांचे सार एकत्र करुन दंडधारी राजा ईश्वराने निर्माण केला. मनुस्मृतीत (अध्याय ९) या इंद्रादी देवांच्या साराचे स्पष्टीकरण असे केले आहे: राजाच्या ठिकाणी असलेले इंद्राचे सामर्थ्य, राष्ट्राला सुखाचे जीवन जेव्हा राजा प्राप्त करून देतो तेव्हा लक्षात येते. इंद्र जसा वृष्टी करतो, तसा तो इष्टाची वृष्टी करून पालन करीत असतो. यास इंद्रव्रत असे म्हणतात. सूर्य ज्याप्रमाणे पृथ्वीवरील जलसंपत्तीचे आकर्षण करतो, त्याप्रमाणे राष्ट्रापासून राजा कर वसूल करीत राहतो यास अर्कव्रत म्हणतात. सर्व राष्ट्रांत कोठे काय चालले आहे, हे नित्य माहीत असावयास पाहिजे, म्हणून गुप्तचर राष्ट्रात पसरलेले असतात. जसा वायू सर्व प्राणिमात्रांमध्ये प्रविष्ट झालेला असतो, तसे हे गुप्तचर पसरलेले असतात. यास मारुतव्रत म्हणतात. यम ज्याप्रमाणे योग्य वेळी प्राण्यांना घेऊन जातो, त्याप्रमाणे राजा प्रजेचे नियंत्रण करीत असतो. यास यमव्रत म्हणतात. वरुण हा देव पापी लोकांना पाशांनी बांधतो त्याप्रमाणे राजा अपराध्यांचा निग्रह करीत राहतो. यास वारुणव्रत म्हणतात. राजाचे दर्शन झाल्याबरोबर प्रजा आनंदी होते ज्याप्रमाणे पूर्णचंद्रदर्शनाने माणसे आनंदी होतात त्याप्रमाणे. अशी स्थिती असेल, तर तो राजा चंद्रव्रताचे आचरण करतो असे म्हणावे. अग्नी ज्याप्रमाणे नेहमीच उष्ण आणि तेजस्वी असतो. तसा पापी लोकाच्या बाबतीत राजा कडक आणि तेजस्वी बनतो. म्हणून त्यास आग्नेयव्रत म्हणतात. पृथ्वी ज्याप्रमाणे सर्व प्राण्यांना धारण करते, त्याप्रमाणे सर्व प्रजेचे धारण करणारा राजा हा पार्थिवव्रताचे आचरण करतो, असे म्हणता येते. दंडधारी राजा हा सत्यवादी, विवेकी, पुरुषार्थ जाणणारा आणि ज्ञानी असा असावा लागतो. तरच तो वरील दिव्य व्रतांचे सतत आचरण करू शकतो. परंतु जो राजा विषयाभिलाषी, पक्षपाती आणि अविवेकी असतो, त्या राजाला दंडच नष्ट करतो. धर्मापासून विचलित झालेल्या राजाला बांधवांसह दंडच नष्ट करतो. म्हणून दंडधारी राजा हा पवित्र, सत्यनिष्ठ, यथाशास्त्र आचरण करणारा, न्यायी असावा लागतो. ही मनुस्मृतीमधील आधिदैविक राजविषयक उपपत्ती आणि कौटिलीय अर्थशास्त्रातील आदर्श राजविषयक विचार यांच्यामध्ये तत्त्वतः पूर्ण ऐकमत्य आहे. कौटिल्याची आदर्श राजाची कल्पना ही इहवादी आहे असा फरक मात्र लक्षात घ्यावा लागतो.

               

जितेंद्रिय आणि मनुस्मृतीत म्हटल्याप्रमाणे देवांच्या सारभूत अंशांनी भरलेला विवेकी दंडधारी राजा न मिळता, कामक्रोधांना वश होणारा, प्रजांचे शोषण करणारा राजा असला, तर प्रजापालन न्याय रीतीने होऊ शकत नाही असे मनू, कौटिल्य इ. दंडनीतिकार म्हणतात. यावरुन सिद्ध होते की राजसत्तासुद्धा न्याय रीतीने लोकसंस्थेचे पालन करू शकतेच, असे सर्व भारतीय राज्यशास्त्रकारांचे मत नाही. म्हणून महाभारतात आणि मनुस्मृतीत (९–३०१) राजा कालाचा कारण आहे, असे इतिहासाचे एक तत्त्व सांगितले आहे. राजाच्या प्रज्ञा व कार्यसामर्थ्याच्या उत्कर्षापकर्षाच्या परिमाणात फरक पडल्यामुळे युगे निर्माण होतात. कृत, त्रेता, द्वापर आणि कलि अशी कालगणना प्राचीन काली करीत असत. हल्लीही धार्मिक हिंदू तशी चतुर्युगांची कालगणना करतात परंतु ती अत्यंत काल्पनिक आणि अव्यवहार्य आहे. पूर्वी तिला मानवी व व्यवहार्य कालपरिमाणे होती. यांसंबंधी ज्योतिर्विद के.ल. दप्तरी यांनी बरेच संशोधन केले आहे. आळशी, कर्तव्यविमुख राजा राज्यावर असतो, तेव्हा कलियुग सुरू होते. कर्तव्याची जाण होऊन राजा योग्य उपाय योजू लागला, म्हणजे द्वापरयुग येते. योग्य उपायांची नीट व्यवस्था दृढ होऊ लागली, म्हणजे त्रेतायुग येते आणि प्रजापालनाचे सगळे न्याय्य उपाय फलद्रूप होऊ लागले म्हणज कृतयुग येते, असे मनुस्मृतीत व महाभारतात सांगितले आहे. प्लेटो आणि ॲरिस्टॉटल यांनी राजसत्तेची अवनती होते, तेव्हा सुलतानशाही किंवा दडपशाही (टिरनी) हे राजसत्तेचे विकृत रूप निर्माण होते, असे म्हटले आहे.

               

कौटिलीय अर्थशास्त्रात राजसत्ता कशी निर्माण झाली, याची परंपरागत उपपत्ती थोडक्यात निर्दिष्ट केली आहे. वेदांमध्ये ही राजोत्पत्तीची उपपत्ती अनेक ठिकाणी सांगितली आहे. विश्वामध्ये सत्य आणि असत्य म्हणजे न्याय आणि अन्याय यांचा विभाग वा अंमलबजावणी यथायोग्य व्हावी, म्हणून वरुणाची निवड देवांनी केली, असे ऋग्वेदात (१०–१२४) म्हटले आहे. वरुण हा सर्वज्ञ असल्यामुळे तो त्रैलोक्यामध्ये कुठे काय चालले आहे, हे जाणतो.वरुण असत्यवादीला पाशात बांधतो व सत्यवादी व्यक्तीला विमुक्त करतो, असे अथर्ववेदात(४–१६) म्हटले आहे. असुरांच्या हल्ल्यापासून बचाव करण्याकरिता देवांनी सर्वश्रेष्ठ युद्धविशारद आणि वसतिस्थान देणारा इंद्र हा राजा म्हणून निवडला, असे ऋग्वेदात(१–३२) म्हटले आहे.

 राजाचे देवनिर्मित स्वामित्व (डिव्हाइन राइट ऑफ किंग) आहे, या परंपरागत सिद्धांताचे खंडन करण्याकरिता पश्चिमी राज्यशास्त्रात सामाजिक कराराची उपपत्ती हॉब्ज, रूसो आणि लॉक या तिघांनी मुख्यतः मांडली. प्रत्येकाच्या उपपत्तीचे स्वरूप वेगवेगळे आहे. त्यामुळे राजसत्तेला क्रांतीचे धक्के बसू लागले. लोकसत्ता व समाजवादी सत्ता यांच्या युगास प्रारंभ झाला. महाभारतात (१२–६७) भीष्माने राजसत्तेच्या उत्पत्तीचा अनेक प्रकारचा इतिहास सांगितला आहे. यूरोपियन सामाजिक कराराच्या उपपत्तीशी बरेचसे साम्य असलेल्या भीष्मानी उक्त एका उपपत्तीचा इतिहास असा : मुळात प्रारंभी अराजक स्थिती असताना ‘बळी तो कान पिळी’ अशी स्थिती उत्पन्न झाली. मोठा मासा लहान माशाला गिळतो, त्याप्रमाणे यादवी युद्ध होत राहिले. निर्भय, शांततापूर्ण सामाजिक जीवन निर्माण करण्याकरता भयग्रस्त प्रजांची समिती तयार झाली आणि त्यात त्यांनी ‘समय’ म्हणजे आपसांत करार केला. कठोर भाषा जो वापरील, दुसऱ्यावर जो हिंसक हल्ला करील, परस्त्रीशी जो संबंध ठेवील किंवा जो दुसऱ्याच्या मालकीच्या धनाचा अपहार करील, असे सर्व हे बहिष्कार्य होत. त्यांना समाजात स्थान असणार नाही. या करारानंतर सर्व वर्णांचा एकमेंकांवर विश्वास उत्पन्न झाला त्या प्रजा कराराचे पालन करीत स्थिरावल्या. परंतु कालांतराने लोक कराराचे पालन करीनासे झाले. पुन्हा दु:खद स्थिती उत्पन्न झाली. प्रजा पितामह ब्रह्मदेवाला शरण गेल्या. त्याला म्हणाल्या, ‘कोणी नियंता नाही म्हणून आमची ही दु:खद स्थिती निर्माण झाली आहे. ज्याची आम्ही सर्व पूजा करू शकतो आणि जो आमचे परिपालन करू शकतो, असा स्वामी कोण, ते सांगा.’ पितामह ब्रह्मदेवाने वैवस्वत मनूकडे प्रजांना पाठविले. मनूने प्रजांचे म्हणणे मान्य केले नाही. मनू म्हणाला, ‘राज्य करायचे म्हणजे त्याबरोबर क्रूरकर्मही करावे लागतेच. क्रूर कर्माला मी भितो. राज्य करणे हे अत्यंत कठीण काम असते. विशेषतः माणसे ही नेहमी खोटारडी असतात. त्यांच्यावर राज्य करणे तर फारच कठीण’. प्रजांनी मनूला पुनः प्रार्थना केली, ‘आम्ही जे काही धर्माचरण करू, त्याचा चतुर्थ भाग तुला मिळेल, लढाऊ वृत्तीचे लोक तुझे अनुयायी बनतील, सुंदर कन्या आम्ही तुला अर्पण करू. तुझा कोश सारखा वाढत रहावा म्हणून पशू, सुवर्ण आणि धान्य यांचे भाग नियमित तुला देऊ.’ मनूने प्रजेची ही प्रार्थना मान्य केली आणि मोठे सैन्य गोळा करून अराजक माजविणाऱ्या शक्तींवर हल्ला करून पराभूत केले. प्रजेतील प्रत्येक व्यक्ती स्वधर्मनिष्ठ बनली. कौटिलीय अर्थशास्त्रात (१–१३) ही वैवस्वत मनूविषयक कथा संक्षेपात वर्णिलेली आहे. प्लेटो आणि ॲरिस्टॉटल या दोघांनी राजसत्ताक, अभिजनसत्ताक आणि लोकसत्ताक अशा तीन प्रकारच्या आदर्श शासनसंस्था सांगून त्यांच्या सुलतानशाह, धनिकशाही आणि झुंडशाही अशा तीन प्रकारच्या अवनत अवस्था वर्णिल्या आहेत. ॲरिस्टॉटलने आणखी असे म्हटले आहे की सर्वच आदर्श संस्था झपाट्याने अवनत होत जातात, आदर्श स्वरूप टिकत नाही पण त्यातल्या त्यात लोकसत्ताक शासन बरे असते, असे मानावे लागते.

जोशी, लक्ष्मणशास्त्री


राज्यशास्त्रीय संशोधन संस्था : एकोणिसाव्या शतकात राज्यशास्त्राच्या अध्ययनास चालना मिळाली आणि सैद्धांतिक तसेच अनुप्रयुक्त या दोन्ही दिशांनी त्याचा अभ्यास होऊ लागली. बहुतेक सर्व देशांतील विद्यापीठांतून राज्यशास्त्र या विषयासाठी स्वतंत्र विभाग असून त्याद्वारे राज्यशास्त्राच्या अभ्यासाबरोबरच व्याख्याने, चर्चासत्रे, परिसंवाद इ. आयोजित केली जातात. राजकीय तत्त्वज्ञान, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय राजकारणातील समस्या इत्यादींसंबंधीचे अध्ययन-संशोधन जगातील अनेक ख्यातनाम संस्थांतून करण्यात येते. यांतील काही प्रमुख व प्रसिद्ध संस्था पुढीलप्रमाणे होत : इंग्लंडमध्ये फेबियन सोसायटी (१८८४), लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पोलिटिकल सायन्स (१८९५), पोलिटिकल स्टडीज असोसिएशन ऑफ द युनायटेड किंगडम (१९५०), रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल अफेअर्स (१९२०) इ. राज्यशास्त्रविषयक संशोधनकार्य करणाऱ्या काही संस्था आहेत. त्यांत संशोधन व अध्ययनाबरोबरच वर्तमानकालीन राजकीय प्रश्नांचा सांगोपांग तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर मागोवा घेण्यात येतो. तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर परिसंवाद, चर्चासत्रेही आयोजित केली जातात. या संस्थामार्फत फेबियन न्यूज (वार्षिक), पार्लमेंटरी अफेअर्स (त्रैमासिक), न्यूज लेटर (त्रैमासिक),पोलिटिकल स्टडीज (वार्षिक) व द वर्ल्ड टुडे (मासिक) इ. नियतकालिके प्रसिद्ध केली जातात. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पोलिटिकल सायन्स ही राज्यशास्त्राच्या अध्ययनाला वाहिलेली जगप्रसिद्ध अशी विद्यापीठ सदृशसंस्था इंग्लंडमध्येच आहे.                

अमेरिकेमध्ये अकॅडेमी ऑफ पोलिटिकल सायन्स (१८८०), अमेरिकन अकॅडेमी ऑफ पोलिटिकल अँड सोशल सायन्स (१८८९), अमेरिकन पोलिटिकल सायन्स असोसिएशन (१९०३), अमेरिकन सोशल ऑर्गनायझेशन (१९५५) इ. संस्था राज्यशास्त्रविषयक तसेच त्याच्या उपशाखांसंबंधी संशोधन – अध्ययन करतात. या संस्थेतर्फे अमेरिकन पोलिटिकल सायन्स रिव्ह्यू, प्रोसिडिंग्ज ऑफ द अमेरिकन पोलिटिकल सायन्स असोसिएशन, पोलिटिकल सायन्स क्वाटर्रली, द ॲन्युअल ऑफ द अमेरिकन अकॅडेमी ऑफ पोलिटिकल अँड सोशन सायन्सेस इ. नियतकालिके प्रसिद्ध केली जातात.

रशियातील ‘मॉस्को स्टेट इन्सिटट्यूट ऑफ इंटरनॅशनल रिलेशन्स’ आणि ‘रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ मार्किझम-लेनिनिझम’ या दोन संस्था राज्यशास्त्रविषयक संशोधन व मार्गदर्शन करतात.

कॅनडियन पोलिटिकल सायन्स असोसिएशन (१९१३) ही कॅनडातील ओटावा विद्यापीठातील राज्यशास्त्रविषयक संशोधन करणारी एक जगप्रसिद्ध महत्त्वाची संस्था आहे. कॅनडियन जर्नल ऑफ पोलिटिकल सायन्स, द बुलेटिन, ॲन्युअल मिटिंग इ. नियतकालिके या संस्थेतर्फे प्रसिद्ध होतात.

फ्रान्समध्ये ‘फाउंडेशन नॅशनल देस सायन्सेस पॉलिटिक्स’ (१९५४) व ‘सोसायटी द इकॉनॉमी पॉलिटिक’ या दोन राज्यशास्त्रीय संस्था असून त्यांच्यातर्फे रिव्ह्यू द फ्रांकाइज द सायन्स पॉलितिक, बुलेतिन-ॲनॅलितिक दि डॉक्युमेन्तेशन, मॉतस व ॲनल्स द इकॉनॉमी, पॉलितिक इ. नियतकालिके प्रसिद्ध होतात. ‘स्विस पोलिटिकल सायन्स असोसिएशन’ (१९५९) ही स्वित्झर्लंडमधील राज्यशास्त्रविषयक संशोधन करणारी एकमेव संस्था असून तिच्यामार्फत एक वार्षिक नियमितपणे प्रसिद्ध होते. बेल्जियममधील ब्रूसेल्स येथे स्थापन झालेली ‘इन्स्टिट्यूट बेल्जे द सायन्स पॉलिटिक’ ही एक महत्त्वाची संस्था आहे. तसेच ‘पोलिटोलॉजिस्ट इन्स्टिट्यूट’ ही बेल्जियममधील दुसरी राज्यशास्त्रविषयक संशोधन-अभ्यास करणारी संस्था असून तिच्यामार्फत रेस पब्लिका बेल्जियम पॉलिटिक यिअर बुक ही दोन नियतकालिके प्रसिद्ध होतात.

‘सोसायटी फॉर एशियन पोलिटिकल अँड इकॉनॉमिक स्टडीज’ (१९५३) आणि ‘जपान सोसायटी ऑफ पोलिटिकल इकॉनॉमी’ या जपानमधील दोन महत्त्वाच्या संस्था असून त्यांच्यामार्फत एशियाटिक स्टडीज हे त्रैमासिक प्रसिद्ध होते. हंगेरी व चीन या देशांत अनुक्रमे ‘पोलिटिकल अकॅडेमी ऑफ द हंगेरियन’ आणि ‘पोलिटिकल सायन्स इन्स्टिट्यूट (बिजिंग) या दोन राज्यशास्त्रविषयक संशोधन संस्था आहेत.

भारतात पुणे येथील ⇨ गोखले अर्थशास्त्र संस्था (१९३०), दिल्ली येथील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन’ (१९५४) व तेथीलच ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड पोलिटिकल रिसर्च’ या राज्यशास्त्रविषयक अध्ययन आणि संशोधन करणाऱ्या महत्त्वाच्या संस्था आहेत.

 देशपांडे, सु. र.

संदर्भ : 1. Aiyangar, Rangaswami, Manusmriti, Lucknow, 1949.

    2. Barker, Ernest, The Principles of Social and Political Theory, Oxford, 1951.

    3. Dunning, W. A. A History of Political Theories, 3 Vols., London, 1959-61.

    4. Ebenstein, William, Great Political Thinkers, New York, 1969.

    5. Greenstein, F. I. Polsby, N. W. Ed. The Handbook of Political Science, 9 Vols.,

       London, 1975.

   6. Kangle, R. P. The Kautiliya Arthasastra, Bombay, 1965.

   7. Lasswell, Harold D. The Future of Political Science, New Jersey, 1963.

  8. Mcilwain, C. H. The growth of Political Thought in the West, from the Greeks to the

      End of the Middle Ages, London, 1932.

  9. Narendra Nath, Aspects of Ancient Indian Polity, Oxford, 1921.

10. Popper, Sir Karl Raimund, The Open Society and It’s Enemies, London, 1966.

11. Sabine, G. H. A History of Political Theory, New York, 1961.

12. Saletore, B. A. Ancient Indian Political Thought and Institutions, Bombay, 1963.

१३. कंगले, र. पं. कौटिलीयम् अर्थशास्त्रम्, मुंबई, १९८२.