राजैश्वर्य : राजाची ऐश्वर्यसूचक विशिष्ट चिन्हे वा उपकरणे. सामान्यतः छत्र, दंड, सिंहासन, चामर व मुकुटादी अलंकार ही हिंदू राजाची परंपरेने मानली जाणारी ऐश्वर्यदर्शक चिन्हे असून त्यांचे थोडक्यात वर्णन पुढे दिलेले आहे.

(१) राजच्छत्र : राजच्छत्राचा राज्यांगामध्ये अंतर्भाव देवाने केला आहे. दांडा असलेले आणि दांडा नसलेले असे राजच्छत्राचे दोन प्रकार होते. दांडा असलेल्या छत्राची उघडझाप करता येई. दांडा, कंद (मूठ), शलाका (काडी), रज्जू (दोरी), वस्त्र व कीलक (मेढ) असे छत्राचे सहा भाग असत. छत्रास शिरःकुंभ देखील असे.

राजच्छत्राचे काही प्रकार असे: (१) प्रसादच्छत्र : या छत्राचा दांडा आणि मूठ लाकडी असे. शलाका बांबूच्या, रज्जू तांबड्या रंगाची आणि वस्त्रही तांबडे असे. (२) प्रतापच्छत्र : दंड आणि वस्त्र निळ्या रंगाचे. शिरःकुंभ सोन्याचा. हे छत्र युवराजासाठी वापरीत. (३) मनोहरच्छत्र : दंड आणि मूठ चंदनाची. रज्जू आणि वस्त्र पांढरे शुभ्र. शिरःकुंभ सोन्याचा. (४) कनकदंडच्छत्र : दंड व मूठ सोन्याची, शलाका सोन्याच्या, रज्जू व वस्त्र शुभ्र, शिरःकुंभ सोन्याचा. (५) नवदंडच्छत्र : दंड, मूठ व शलाका सोन्याच्या रज्जू व वस्त्र अशुक्र (अशुभ्र).

या छत्राचे तीन उपप्रकार सांगितले आहे. छत्राच्या शिरावर कुंभाकार असलेले कुंभादी छत्र, हंसाकार असलेले हंसादी छत्र अणि चामर खोचलेले चामरादी छत्र. याबाबतचे काही संकेत पुढीलप्रमाणे : कुंभादी आणि हंसादी नवदंड छत्रांस नऊ रत्ने जडवावीत. ३२ मोत्यांची माळ घातलेली असावी. शिरावर हिरा जडवावा. दंडावर कुरुविंद (माणिक), पद्मराग (लाल) इ. रत्ने जडवावीत. चामरादी नवदंडछत्राच्या वर राजाच्या हाताच्या मापाचे पांढरे चामर खोचावे. नवदंडछत्राच्या टोकावर आठ अंगुले परिमाणाची पताका असावी. अभिषेकप्रसंगी किंवा विवाहप्रसंगी हे छत्र वापरावे. शिरावरील कुंभाकाराऐवजी दर्पण, चंद्र, कमळाची कळी, अशा आकृत्या असाव्यात. इंस, चास पक्षी, पोपट, मयूरी, वाघ, सिंह, हत्ती, घोडा यांच्या आकृती नवदंडच्छत्रावर चितारलेल्या असाव्यात.

दंड नसलेले, म्हणून उघडझाप न होणारे ‘निर्दंडच्छत्र’ म्हणून ओळखले जाई. मुख्य आणि जधन्य या नावांचे निर्दंडच्छत्राचे दोन प्रकार होते. त्यांपैकी मुख्य छत्र आयताकृती, तर जधन्य छत्र वलयाकृती असे. बृहत्संहितेत (७३·१ –३) वर्णिल्यानुसार राजच्छत्र हे हंस, कोंबडा, मोर किंवा सारस यांच्या पंखांकृतींनी युक्त असावे. शुभ्र रेशमी वस्त्राने आच्छादिलेले असावे. मोत्यांनी जडविलेले असावे. त्यावर माला लोंबकळत असाव्यात. त्याचा दांडा सहा हात लांब असावा. तो शुद्ध सोन्याने वेष्टिलेला असावा. दंडाचा मूलभाग स्फटिकाने जडविलेला असावा. छत्र तीन हात विस्तृत, रत्नविभूषित व उंच असावे.

(२) दंड : प्राणिमात्रांच्या संरक्षणासाठी ईश्वराने धर्मस्वरूपी तेजोमय दंड निर्माण केला, अशी समजूत आहे. साम, दाम, भेद, दंड या उपायांपैकी दंड हा शेवटचा उपाय. त्या दंडाचे म्हणजेच शासनाचे प्रतीक म्हणून काष्ठनिर्मित (लाकडाचा) राजदंड स्वीकारला गेला. हा दंड वस्तुतः राजा, अशी संकल्पना मनुस्मृतीत (७.१७) आढळते. हा दंड प्रजेचे शासन व रक्षण करतो. त्यामुळे दंडाच्या भयाने जगत् हे उपभोगास उपयुक्त ठरते.

(३) सिंहासन : सिंहासन हे आठ हात रुंद, आठ हात लांब व एक पुरुष उंचीचे असावे. त्यात पायऱ्या असाव्यात. सिंहासनामध्ये राजाला बसण्याची जागा चार हात रुंद व चार हात लांब असावी. भोजराजकृत युक्तिकल्पतरूमध्ये (अकरावे शतक) राजाच्या सिंहासनाचे आठ प्रकार सांगितले आहेत, ते पुढीलप्रमाणे :

पद्म सिंहासन : हे सिंहासन गम्भारी लाकडाचे, कमळाच्या आकृत्या कोरलेले, पद्मरागरत्ने जडविलेले व सोन्याने मढविलेले असावे. या सिंहासनाच्या पायांच्या वरच्या बाजूंची आकृती कमळांच्या कळ्यांची असावी व त्यांत पद्मरागरत्ने जडवावीत. सिंहासनाच्या आठही दिशांना प्रत्येकी एक व राजासनावर चार अशा एकूण बारा बाहुल्या कोरलेल्या असाव्यात. हे सिंहासन तांबड्या वस्त्राने आच्छादित असावे. पद्मसिंहासनावर बसणारा राजा अतिपराक्रम गाजवितो, अशी समजूत आहे.

सिंह-सिंहासन : हे चंदनाच्या लाकडाने बनविलेले असावे. त्यावर सिंहाच्या आकृती कोराव्यात. त्यात हिरे जडवावेत. हे सिंहासन सोन्याने मढवावे. पायांच्या वरच्या बाजूस सिंहाच्या आकृती असाव्यात. यात एकवीस बाहुल्या कोरलेल्या असाव्यात. मोती, शिंपली आणि अन्य रत्नांनी सिंहासन अलंकृत करावे. या सिंह-सिंहासनावर बसलेला राजा संपूर्ण पृथ्वी पादांक्रांत करतो, असे मानले जाते.

भृंग-सिंहासन : हे चाफ्याच्या लाकडाचे बनवावे. त्यावर भृंगाच्या (भुंगा) आकृती कोराव्यात. मरकत (पाचू) रत्ने जडवावीत. पायाच्या वरच्या बाजू कमळाच्या कळ्यांच्या आकृतीच्या असाव्यात. या सिंहासनावर बावीस बाहुल्या बसविलेल्या असाव्यात. ते निळ्या वस्त्राने आच्छादावे. या सिंहासनावर बसलेला राजा शत्रूंचा नाश करतो व विजयी होतो.

मृग-सिंहासन : हे लिबांच्या लाकडाचे बनवावे. त्यावर हरिणाच्या आकृती कोराव्यात. इंद्रनील (नीलमणी) रत्ने जडवावीत. हे सिंहासन सोन्याने मढवावे. पायाच्या वरच्या बाजूंची आकृती हरिणाची असावी. त्यावर चाळीस बाहुल्या बसवाव्यात. निळ्या वस्त्राने ते आच्छादावे. या सिंहासनावर बसलेला राजास लक्ष्मी, विजय, संपत्ती व आरोग्य प्राप्त होते.

शंख-सिंहासन : भद्र लाकडापासून हे सिंहासन बनवावे. त्यावर शंखाच्या आकृत्या कोरलेल्या असाव्यात. ते स्फटिकांनी जडविलेले व चांदीने मढविलेले असावे. पायांच्या वरच्या बाजूंची आकृती शंखनाभीची असावी. स्फटिकांच्या सत्तावीस बाहुल्या त्यावर कोरलेल्या असाव्यात. हे सिंहासन पांढऱ्या वस्त्राने आच्छादिलेले असावे.

गज-सिहासन : हे सिंहासन फणसाच्या लाकडाचे बनवावे. त्यावर हत्तीच्या आकृत्या कोराव्यात. हत्तीच्या शेपटाच्या खाली बाहुल्या कोराव्यात. विद्रुम (पोवळे) आणि वैदूर्य रत्ने जडवावीत. पायाच्या वरच्या बाजू हत्तीच्या शिराच्या आकाराच्या असाव्यात. माणके जडविलेल्या तांबूस वस्त्राने ते आच्छादावे. हे सिंहासन साम्राज्य मिळवून देते.

हंस सिंहासन : हे सालाच्या लाकडाचे बनवावे. त्यात हंसाच्या आकृत्या कोराव्यात. पुष्पराग रत्ने जोडावीत. ते सोन्याने मढवावे. वीस बाहुल्या कोराव्यात. गोमेद रत्न जडविलेल्या पिवळसर वस्त्राने ते आच्छादावे. असे सिंहासन राजाच्या सर्व अनिष्टांचे निवारण करते.

हय-सिंहासन : हे केशराच्या लाकडाचे बनवावे. त्यावर घोड्यांच्या आकृती कोरलेल्या असाव्यात. यावर पंचाहत्तर बाहुल्या बसविलेल्या असाव्यात. पायांच्या वरच्या बाजूंचा आकार घोड्याचा असावा. विविधरंगी वस्त्रांनी हे हय-सिंहासन आच्छादित असावे. या सिंहासनाच्या उपयोगाने राजलक्ष्मी वाढते व राजास जय मिळतो.

सिंहासनाच्या वरील प्रकारांशिवाय मोगलांच्या मयूर-सिंहासनाचा उल्लेखही इतिहासात आढळतो.

छत्र आणि सिंहासन यांचा राज्यांग म्हणून भोजदेवाने युक्तिकल्पतरूमध्ये उल्लेख केला आहे. याव्यतिरिक्त ध्वज आणि यान (वाहन) देखील भोजदेवाच्या मते राज्यांगे होत.

(४) चामर : चामर म्हणजे चवरी. राजोपकरणात चवरीचा अंतर्भाव होतो. चवरी दोन हात उंचीची, सोन्याच्या वेळ्यांनी वेढलेली, हिरे जडविलेली असे. अशा चबरीस ‘भव्य’ असे नाव होते. राजांवर ढाळली जाई. म्हणून ती सुखकारक उपकरण मानली गेली. चवरीच्या सुवर्णवेळीत ब्राह्मण राजासाठी हिरा, क्षत्रिय राजासाठी पद्मराग, वैश्य राजासाठी वैदूर्य आणि शूद्र राजासाठी नीलमणी जडवीत.

हिमालय, विंध्य, कैलास इ. पर्वतांवर आढळणाऱ्या चमरी जातीच्या हरिणांच्या केसांनी चवरी बनवीत. लांबसडक, वजनाने हलके, स्निग्ध व मऊ स्पर्श असलेले केस चवरीसाठी वापरीत. लांब-सडकपणा हलकेपणा, स्वच्छता आणि घनदाटपणा हे चवरीचे चार गुण वर्णिले आहेत.

चामर (चवरी), भृंगार (सुवर्णपात्र), चषक (मद्याचा पेला), प्रसाधनी (फणी-कंगवा), वितान (छत्र), शय्या (पलंग), व्यजनं (पंखा), दर्पण (आरसा) व अंबर (वस्त्र) या नऊ राजोपकरणांत चामराचा प्रारंभीच अंतर्भाव केला आहे.

बृहत्संहितेनुसार (७२·३) चबरीचा दांडा एक हात, दीड हात किंवा अरत्नि (कोपरापासून करंगळीच्या टोकापर्यंतचे अंतर म्हणजे चोवीस अंगुळे) परिमाणाचा असावा. तो शुभ काष्ठापासून बनवावा. सोने, रूपे यांनी मढविलेला व चित्रवर्णरत्नांनी जडविलेला असावा.

(५) अलंकार : शिरस्त्राण, मुकुट, हार, कर्णकुंडले, अंगद (बाहुभूषणे), कंकण, वालक (वाळा) आणि मेखला (कमरपट्टा) ही राजाची आठ भूषणे होत. ही भूषणे पद्मराग, मोती, वैदूर्य, नीलरत्न, मरकत इ. रत्ने सोन्यांत गुंफून तयार करीत. मुकूटाला बुहत्संहितेत (अध्याय ४९) पट्ट असे संबोधलेले दिसते. त्यानुसार हा राजपट्ट मध्यभागी आठ अंगुले विस्तीर्ण (रुंद) असावा. रुंदीच्या दुप्पट लांबी असावी. पट्टाच्या बाजूंची रुंदी मध्यभागी निम्मी असावी. राजाच्या पट्टावर पाच शिखा (तुरे) असावेत. पट्ट शुद्ध सोन्याचे बनविलेले असोवत. इ. संकेत आहेत. (चित्रपत्र ५२)

पाहा : राज्याभिषेक; सिंहासन

लेखक : धर्माधिकारी, त्रि. ना.

जयपूरच्या महाराजांचे चांदीचे सिंहासन
हॅप्सबर्ग घराण्यातील सम्राट मथायस (कार. १६१२ – १५) याचा रत्नजडित हस्तिदंती राजदंड
ग्रेट ब्रिटनची महाराणी व्हिक्टोरिया हिने आपल्या राज्यारोहणप्रसंगी धारण केलेला राजमुकुट
रशियन सम्राट चौथा इव्हान (कार. १५३३ – ८४) याचा राजमुकुट
कोटा संस्थानिकाचे दरबारी राजासन, शस्त्रालंकार, राजदंड, छत्रचामरे इ.
फ्रेंच सम्राट १५ वा लुई (कार. १७१५ – ७४) याचा राजमुकुट
ऑस्ट्रियाचा सम्राट दुसरा रूडॉल्फ (इ. स. १३ वे शतक) याचा शाही मुकुट