राजपूत कला : राजपूत समाजामध्ये एकीकडे शौर्य, त्याग, आदर्शाच्या व प्रतिष्ठेच्या रक्षणासाठी प्राणार्पण करण्याची वृत्ती यांची परंपरा जशी दिसून येते, तशीच दुसरीकडे जीवनोपभोग व कला-सौंदर्यविषयक आसक्तीही दिसून येते. ह्या मनोवृत्तीचे प्रतिबिंब त्यांच्या कलेत उमटले आहे. राजपुतांच्या जीवनात कला व शिल्प यांना फार मोठे स्थान मिळाले. राजदरबाराच्या आश्रयाने कला, शिल्प, वाङ्मय इ. सर्व क्षेत्रांत दर्जेदार निर्मिती झाली. स्थूलमानाने अकरावे ते अठरावे शतक या कालखंडात ही निर्मिती झाली. राजपुतांची सत्ता स्थिर होऊन राजवैभवाचा काळ आल्यावर वास्तुकलेचा मोठा उत्कर्ष झाला. अभेद्य दुर्ग, राजप्रासाद, मंदिरे, विजयस्तंभ, मशिदी आदी बांधकामे झाली. राजपूत वास्तुशैलीवर प्रथम गुजरातच्या सोळंकी शिल्पाचा [⟶ सोळंकी घराणे] व उत्तर काळात ⇨ इस्लामी कलेचा प्रभाव पडला. ⇨चितोडगढ, जालोर, कुंभालगड, रणथंभोर, जैसलमीर इ. किल्ले हे दुर्गशिल्पाचे उत्तम नमुने आहेत. या किल्ल्यांतून तसेच तटांनी वेष्टिलेल्या नगरांतून भव्य राजप्रासादांची निर्मिती झाली. अकबराच्या काळी राजपूत प्रासादशिल्पाचा मोगल वास्तुकलेवर मोठाच प्रभाव पडल्याचे ⇨फत्तेपुर सीक्रीसारख्या ठिकाणी स्पष्ट दिसते. चितोडचे दोन स्तंभ हे वेगळ्या प्रकारचे पण मंदिरशिल्पाशी नाते राखून आहेत. उदयपूर, बिकानेर, जोधपूर, अलवर, जयपूर येथील राजप्रासाद भव्य व कलापूर्ण आहेत. याशिवाय बंधारे, तलाव यांचीही उभारणी झाली. राजस्थानातील मंदिरेही नागर शिल्पशैलीचे वेगळे आविष्कार आहेत. राणकपूर, पुष्कर, भामरे,⇨उदयपूर,⇨दिलवाडा इ. ठिकाणी अकराव्या शतकापासूनची मंदिरे अस्तित्वात आहेत. गुजरातेतील सोळंकी मंदिरशैलीला अनुसरूनच नैर्ऋत्य राजस्थानातील दिलवाडा व परिसरातील मंदिरे बांधली आहेत. या वास्तूंच्या बरोबर मूर्तिकलेचीही प्रगती झाली. कारण या मंदिरांचा, मूर्तिकाम हा एक अविभाज्य भाग ठरला होता. ⇨अबू, दिलवाडा, अंबानेरी, ओसिया या ठिकाणी मूर्तिकामाचे अजोड नमुने दृष्टीस पडतात. विशेषतः जेथे संगमरवरासारखा दगड वापरला आहे, त्या वास्तूंची कोरीव अलंकरणे डोळयाचे पारणे फेडतात.
राजपुतांच्या दरबारी जीवनात, तसेच सामान्य जनांच्या जीवनातही चित्रकलेला अनन्यसाधारण स्थान आहे. मातीचे घडे, झोपड्या, वस्त्रे यांवर रेखाचित्रे तशीच रंगीत चित्रे काढली जात. ही प्रायः अलंकरणात्मक असत. मध्ययुगात घरे आणि मंदिरे यांच्या भिंती, छते यांवर सजावटीदाखल चित्रे काढीत, तसेच भागवतपुराण, गीतगोविंद, रामायण आदी ग्रंथांतील प्रसंगांची चित्रेही रंगवीत. तांबूस पृष्ठभागावर पांढऱ्या-पिवळ्या-हिरव्या रंगांनी चित्रे काढीत आणि माणसे एकचष्म पद्धतीने रंगवीत. त्याशिवाय ‘रागमाला’, ‘बारामास’, ‘नायक-नायिका भेद’ अशा विषयांवर शेकडो लघुचित्रे निर्माण झाली. पुढे मोगलांशी संबंध आल्यावर व्यक्तिचित्रे काढण्यासही प्रारंभ झाला. हस्तलिखित ग्रंथांत सुंदर प्रसंगचित्रे काढली जात. उष्ण प्रकृतीचे लाल व पिवळे रंग, बारीकसारीक तपशील, सुरेख निसर्गचित्रण व प्रवाही रेषा या वैशिष्ट्यांमुळे राजपूत चित्रकला उठून दिसते.
राजपूत राजदरबारात संगीताला मानाचे स्थान होते. राज्यकर्त्यांनी संगीताची शास्त्रीय चर्चा करणारे ग्रंथ लिहवून घेतले. त्यांत रागरागिणी यांची चर्चा व रागध्यानांची वर्णने आहेत. क्षेमकर्णाची रागमाला ही संस्कृत काव्यरचना, तसेच हिंदी भाषेतील संगीतदर्पण, रागरत्नाकर, संगीतसार या ग्रंथरचना लोकप्रिय ठरल्या मेवाडचा राणा कुंभ हा संगीताचा मोठा जाणकार होता आणि त्याने अनेक गायक-वादक यांना आश्रय दिला, असे सांगतात. चित्रकलेप्रमाणेच संगीतावरही भक्तिसंप्रदायाचा प्रभाव होता. मीराबाई ही संतकवयित्री होतीच, पण आपली कवने ती गातही असे. नाथद्वार, कांक्रोळी या मंदिरांतील भजने रागदारीत बांधलेली असत. विशेषतः धृपद गायकी जास्त वापरली जाई. जयपूर, बिकानेर, अलवर या दरबारांत उत्तमोत्तम गायक तयार झाले. या दरबारी गायकीबरोबरच राजस्थानातील लोकसंगीताची परंपराही मोठी व अखंड आहे. भाट, चारण, लंगा, भोपे, मिवाशी, धोली या लोकगायकांच्या जमातींनी, पारंपरिक लोककथा व लोकगीते ही समाजाच्या सर्व थरांत पोहोचविली. या आदिवासी कथांच्या जोडीला राजांची प्रशस्तिगीते, प्रेम-विरहाच्या लोकप्रिय कथा (धोला-मारू) यांचे गायन केले. तसेच लोकनाट्यांद्वारा ह्या कथा लोकांसमोर सादर केल्या. हालेर, सोहर यांसारखे काही खास स्त्रियांचे गायनप्रकार आजही प्रचलित आहेत. संगीत, लोकनाट्य यांच्या जोडीला नृत्यकलाही आली. घुमर, भवाई यांसारखी सामूहिक नृत्ये प्रचारात होतीच. जयपूर दरबारच्या आश्रयाने विकसित झालेल्या कथ्थक नृत्यशैलीचाही उल्लेख करावयास हवा. कठपुतळीचा खेळ आजही राजस्थानात लोकप्रिय आहे.
राजपूत परंपरेतील हस्तकलाही उच्च प्रतीच्या आहेत. इतर ठिकाणांप्रमाणे राजस्थानातही सोन्यारूप्याचे दागिने घडविणे हा कारागिरीचा महत्त्वाचा भाग आहे. मोगल दरबाराशी संबंध आल्याने पारंपरिक घाटात बदल झाले, वैविध्य आले. अबू येथील रूप्याचे, जोधपूर येथील जडावाचे, तर जयपूर येथील रत्नजडावाचे व मीनाकारीचे काम विशेष प्रसिद्ध आहे. या संदर्भात जयपूरचा मानसिंह याची कारकीर्द (१५८९–१६१४) विशेष मोलाची आहे. त्याने ठिकठिकाणच्या कारागिरांचा शोध घेऊन, त्यांना जयपूरमध्ये आणून वसविले आणि त्यांच्या व्यवसायाला प्रोत्साहन दिले.
राजपुतांची रंगीबेरंगी वस्त्रांची आवड प्रसिद्धच आहे. त्यांतही लाल व पिवळ्या रंगांची आवड विशेष दिसून येते. त्यात बांधणीसारख्या वैशिष्ट्यपूर्ण प्रकारात खासकरून एकप्रकारचा नाजुकपणा आढळतो. हाताने छपाई केलेली नक्षीही अशीच नाजुक दिसते. यांखेरीज ‘बादला’ (सुरई) सारख्या नित्य लागणाऱ्या वस्तू अत्यंत शोभिवंत करण्यात येतात. कोठे कड्यांवर मोर, तर कधी नळीला पक्ष्याचा आकार देऊन या साध्या वस्तू प्रेक्षणीय बनवितात. चमकदार रंगांची सुबक लाकडी खेळणी आणि खुर्च्या-दोले यांसारख्या वस्तूंच्या निर्मितीच्या बाबतीत राजस्थानी कारागीरांच्या प्राविण्याला तोड नाही. थोडक्यात, सामान्य जनांपासून ते राजपुरुषांपर्यंत समाजाच्या सर्वच थरांतील लोकांमध्ये सौंदर्यनिर्मितीची आकांक्षा व उपभोगवृत्ती दिसून येते. परिणामी त्यांच्या वास्तूंपासून ते नित्याच्या वापरातील वस्तूंपर्यंत सर्वच गोष्टींमध्ये एक चोखंदळ व उच्च दर्जाची कलात्मक अभिरुची दिसून येते. (चित्रपत्र ५१).
पहा : भारतीय कला मोगल कला.
संदर्भ : Ghurye, G. S., Rajput Architecture, Bombay, 1968.
लेखक : चव्हाण, कमल