राजपीपला संस्थान : गुजरात राज्यातील ब्रिटिशांकित एक जुने संस्थान. ते भडोच जिल्ह्यात वसले आहे. संस्थानचा दोनतृतीयांश भाग सातपुडा पर्वतरांगांतील राजपीपला टेकड्यांनी व्यापला आहे. क्षेत्रफळ ३,८८३.५२ चौ.किमी. लोकसंख्या दोन लाख (१९४१) व वार्षिक उत्पन्न २५ लाख. उत्तर-पूर्वेस नर्मदा नदी व रेवा-कांठा पोलिटिकल एजन्सी विभाग, खानदेश जिल्ह्यातील मेहवासी जागिरी, दक्षिण-पश्चिमेस बडोदे संस्थान व सुरत-भडोच जिल्हे यांनी ते सीमांकित होते. संस्थानची राजधानी नांदोड असून संस्थानात ६५१ खेडी होती. गोहेल राजपुतांपैकी गामेर (गेमरा) सिंहजी याने १४७० च्या सुमारास गुजरातच्या सुलतानांना ३०० घोडेस्वार व १,००० पायदळ पुरवण्याचे कबूल करून या प्रदेशात स्वायत्त राज्य स्थापन केले. अकबराने गुजरात जिंकल्यावर रू. ३५,५५० खंडणी बसवली. अठराव्या शतकाच्या सुरुवातीस मोगल सत्तेला उतरती कळा लागली, तेव्हा संस्थानिक खंडणी देण्याची टाळाटाळ करू लागले. या शतकाच्या पूर्वार्धातच दमाजी गायकवाडने संस्थानच्या ४ परगण्यांच्या निम्म्या उत्पन्नावर हक्क बसविला. उत्तरार्धात गायकवाडानीच हे परगणे ताब्यात घेऊन त्याबद्दल संस्थानाला रू.९२,००० द्यावे असे ठरले. पेशवाईच्या अस्तानंतर संस्थान ब्रिटिशांचे जवळजवळ मांडलिक झाले. १८२१ मध्ये वैरिसालजी हा इंग्रजांच्या मदतीने गादीवर आला. इंग्रजांनी १८२३ मध्ये संस्थानने बडोद्याला पन्नास हजार रुपये खंडणी द्यावी असे ठरवून दिले. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी काही काळ संस्थानचा प्रत्यक्ष कारभारही इंग्रजांच्या हाती होता. संस्थानिकाला महाराणा म्हणत. १८९९ मध्ये नांदोड ते अंकलेश्वर अशी रेल्वे झाली. संस्थानाला कापसापासून चांगले उत्पन्न होई. विसाव्या शतकात शिक्षण, आरोग्य, नगरपालिका, गुरांचा दवाखाना अशा काही क्षेत्रांत थोड्याफार सुधारणा झाल्या. महाराण्याला न्यायदानाचे पूर्ण अधिकार असत. १९४८ मध्ये संस्थान तेव्हाच्या मुंबई राज्यात व पुढे १ मे १९६० पासून गुजरात राज्यात समाविष्ट झाले.
कुलकर्णी, ना. ह.