राउस (रॉस), फ्रान्सिस पेटन : (५ ऑक्टोबर १८७९—१६ फेब्रुवारी १९७०). अमेरिकन वैद्य व व्हायरसवैज्ञानिक. कर्करोगावरील संशोधनाबद्दल त्यांना १९६६ चे वैद्यक किंवा शरीरक्रियाविज्ञानाचे नोबेल पारितोषिक ⇨चार्लस् ब्रेटन हगिन्झ यांच्याबरोबर विभागून मिळाले.

राउस यांचा जन्म बॉल्टिमोर (मेरिलंड) येथे झाला. त्यांनी जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या बी.ए. (१९००) व एम्.डी. (१९०५) या पदव्या मिळवल्या. मिशिगन विद्यापीठात १९०६—०८ या काळात विकृतिविज्ञानाचे निदेशक म्हणून काम केल्यानंतर त्यांनी रॉकफेलर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल रिसर्च या संस्थेत संशोधन कार्यास सुरुवात केली. १९२० मध्ये याच संस्थेत ते विकृतिविज्ञान व सूक्ष्मजंतुविज्ञान या विषयांचे सदस्य झाले आणि पुढे १९४५ मध्ये या संस्थेत ते गुणश्री सदस्य झाले, तरी तेथील आपले संशोधन कार्य त्यांनी सातत्याने पुढे चालू ठेवले.

या संस्थेत १९१० मध्ये त्यांनी कोंबडीमधील मारक अर्बुदावर (नवीन कोशिकांच्या—पेशींच्या—अत्याधिक वाढीमुळे निर्माण होणाऱ्या गाठीवर) संशोधन केले. एका कोंबडीतील अर्बुदाचे दुसऱ्या कोंबडीमध्ये प्रतिरोपण करण्यात प्रथम यश आल्यानंतर त्यांनी अर्बुदास कारणीभूत असणाऱ्या पदार्थाचा शोध केला आणि मूळ अर्बुदाप्रमाणे नवीन अर्बुद तयार करणारा पदार्थ त्यांना सापडला व तो व्हायरस असल्याचे आढळले. त्यांच्या या संशोधनाबद्दल कित्येक वर्षे अविश्वास दाखवण्यात आला. नवनिर्मित वाढ अर्बुदच नसावी किंवा असली तर ती ज्यांपासून होते त्या मूळ अर्बुद कोशिकाच असाव्यात वगैरे शंका घेण्यात आल्या. १९२५ मध्ये या संशोधनाबद्दल पुन्हा विचार होऊन त्याकडे शास्त्रज्ञांचे लक्ष ओढले गेले. १९३० नंतरच्या दशकाच्या अखेरच्या काळात प्राण्यांमध्ये होणाऱ्या अनेक कर्करोगांना व्हायरस कारणीभूत असतात या वस्तुस्थितीला व्यापक मान्यता मिळाली. ब्रिटिश शास्त्रज्ञांनी यात विशेष लक्ष घातले आणि अखेर राउस यांचे संशोधन सर्वमान्य होऊन त्यांना १९६६ मध्ये नोबेल पारितोषिकाचा बहुमान देण्यात आला.

वरील संशोधनाशिवाय राउस यांनी पहिल्या महायुद्धाच्या काळात रक्तातील तांबड्या कोशिकांची आयुर्मर्यादा वाढवून त्यांच्या ⇨रक्ताधानातील उपयुक्ततेवर, सशामधील चामखिळीवर (एक प्रकारच्या त्वचा रोगावर) आणि काही कर्करोगोत्पादक रासायनिक पदार्थावरही संशोधन केले. त्यांनी व्हायरस आणि कोशिका यांच्या संवर्धनासाठी अनेक तंत्रे विकसित केली आणि ही तंत्रे प्रयोगशाळेत प्रमाणभूत म्हणून वापरण्यात येतात.

राउस यांच्या व्हायरस अर्बुदविज्ञानातील कार्याबद्दल त्यांना अनेक मानसन्मान मिळाले. नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे कोव्हालेंको पदक (१९५६), अमेरिकन पब्लिक हेल्थ ॲसोसिएशनचा लास्कर पुरस्कार (१९५८) व नॅशनल सायन्स पदक (१९६६) हे त्यांपैकी काही होत. १९२७ मध्ये नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे सदस्य म्हणून त्यांची निवड झाली. ते न्यूयॉर्क येथे मरण पावले.

भालेराव, य. त्र्यं.