राखी पौर्णिमा : रक्षाबंधनाच्या विधीमुळे श्रावण पौर्णिमेला मिळालेले एक नाव. ‘रक्षा’ या संस्कृत शब्दाचा ‘रक्षण’ असा अर्थ असून ‘राखी’ हे त्या शब्दाचेच मराठी रुपांतर होय. अलिकडच्या प्रथेनुसार या दिवशी बहीण भावाला राखी बांधते. ही राखी अक्षता, मोहऱ्या व सोने एकत्र बांधून तयार करतात. हळदीत भिजविलेला सुती दोराही राखी म्हणून वापरतात. हल्ली बाजारात तयार मिळणाऱ्या रंगीबेरंगी राख्या बांधल्या जातात. सकाळी स्नानानंतर देव, पितर व ऋषी यांना तर्पण करून दुपारी रक्षाबंधनाचा विधी करावा, असे शास्त्र आहे. भावाने आपले रक्षण करावे म्हणून बहीण राखी बांधते, अशी एक समजूत असली तरी सर्व संकटांपासून भावाचे रक्षण व्हावे, हा रक्षाबंधनामागचा प्रमुख हेतू आहे, असे दिसते. रक्षाबंधनामुळे सर्व अशुभांचा नाश होऊन जय, सुख, पुत्र, आरोग्य, धन इत्यादींची प्राप्ती होते आणि कोणाचाही जादूटोणा, मंत्रतंत्र वगैरे चालत नाही, अशी श्रद्धा आहे. पूर्वी उत्तर भारतापुरती मर्यादित असलेली ही प्रथा आता भारतभर रूढ झाली आहे. पुरोहित यजमानांना राख्या बांधून दक्षिणा मिळवितात. गरिबांनी श्रीमंतांना, नोकरांनी मालकांना, दुबळ्यांनी सबलांना आणि नागरिकांनी सैनिकांना राख्या बांधण्याची आणि दूरस्थ व्यक्तींना पोस्टाने पाठविण्याची पद्धत आढळते. जैन लोक राखी पौर्णिमा ‘रक्षापर्व’ म्हणून साजरी करतात. त्या दिवशी विष्णुकुमार वगैरे मुनींच्या कथा वाचून त्यांची पूजा केली जाते.
या प्रथेच्या उगमाशिवाय हेमाद्रिने चतुर्वर्गचिंतामणीमध्ये (व्रतखंड−अध्याय १९) भविष्योत्तापुराणातील इंद्राणीने कृष्णाने युधिष्ठिराला सांगितलेली कथा दिली आहे. या कथेनुसार असुरांकडून पराभूत दुर्दशा झाल्यावर इंद्राणीने त्याच्या उजव्या हातावर राखी बांधली आणि त्या राखीच्या प्रभावामुळे त्याने असुरांची दाणादाण उडवली. ‘राखीचा प्रभाव एक वर्षभर टिकणार असल्यामुळे तोपर्यंत वाट पहा’, असे शुक्राचार्यांनी त्यानंतर असुरांना सांगितले. स्वाभाविकच, दर वर्षी राखी बांधणे याचा अर्थ राखीच्या या प्रभावाचे पुनरुज्जीवन करणे असा होता. राखीचे स्वरूप यात्वात्मक ⇨ताईताचे आहे, असे यावरून दिसते. मूळच्या प्रथेनुसार राखी राजासाठी होती आणि राजपुरोहिताने ती राजाच्या उजव्या हातावर समंत्रक बांधावी, असा नियम होता. ‘ज्याच्यामुळे सामर्थ्यशाली बळी राजा बांधला गेला, त्याने तुला बांधत आहे हे रक्षे, विचलित होऊ नकोस,’ या अर्थाचा मंत्र म्हटला जात असे. इतिहासकाळापासून बहिणीने भावाला राखी बांधण्याची पद्धत रूढ झाली. चितोडची राणी कर्मवती हिने विशिष्ट मदतीच्या अपेक्षेने मोगल बादशहा हुमायून यास भाऊ मानून राखी पाठविली होती.
राखी पौर्णिमेलाच ‘पोवती पौर्णिमा’ असेही म्हणतात. या दिवशी पवित्रारोपण म्हणजेच देवतांना पोवती अर्पण करून नंतर ती स्त्री-पुरुषांच्या हातावर बांधण्याचा विधी असतो. पोवते म्हणजे देवतेला वाहण्याचा पवित्र दोरा होय. रक्षाबंधन हे या विधीचेच रूपांतर असण्याची शक्यता आहे. पूर्वी याच दिवशी केल्या जाणाऱ्या सर्पबलीचे पुढे नागपंचमीत रूपांतर झाले, असे दिसते. सर्पापासून वा सर्पासारख्या अनिष्ट शक्तीपासून रक्षण करण्याच्या हेतूने रक्षाबंधनाचा विधी सुरू झाला असण्याची शक्यता आहे. याच दिवशी ⇨श्रावणी वा उपाकर्म विधीही केला जातो.
या पौर्णिमेला ‘नारळी पौर्णिमा’ असेही म्हणतात. या दिवशी समुद्रकिनाऱ्यावरील कोकण, मलबार इ. प्रदेशांतील लोक जलाची अधिष्ठात्री देवता असलेल्या वरुणाला उद्देशून समुद्रात नारळ अर्पण करतात. खवळलेला समुद्र सामान्यतः या दिवसापासून शांत होऊ लागतो. मुसलमान व पारशी लोकांतही नारळ अर्पण करण्याची ही प्रथा आहे.
संदर्भ : Kane, P. V. History of Dharmashastra, Vol. V, Part I. Pune 1974.
साळुंखे, आ. ह.
“