रांक, ऑटो : (२२ एप्रिल १८८४–३१ ऑक्टोबर १९३९). ऑस्ट्रियन मानसशास्त्रज्ञ व समाजशास्त्रज्ञ. जन्म व्हिएन्नामध्ये. लहानपणापासूनच त्याला वाचनाचे वेड होते. काव्याच्या व सर्जनशीलतेच्या क्षेत्रामध्ये प्रायोजित केलेल्या फ्रॉइडच्या संकल्पना व सिद्धांत वाचून तो फ्रॉइडकडे आकृष्ट झाला व त्याने प्रयत्नपूर्वक फ्रॉइडबरोबर मैत्री संपादन केली. १९०६ पासून तो फ्रॉइडच्या घरी दर बुधवारी भरणाऱ्या, निकटच्या अनुयायांच्या बैठकीचा, वयाने सर्वांत लहान असा सक्रिय सभासद होता. १९०६ ते १९१५ पर्यंत तो ‘व्हिएन्ना सायकोअनॅलिटिक सोसायटी’चा चिटणीस होता. त्याने सुरुवातीच्या लेखांत फ्रॉइडच्या सिद्धांताला अनुसरून साहित्य व काव्याच्या क्षेत्रांत अबोध मनाचे अर्थविवरण करून बरेच लेख लिहिले. फ्रॉइडला ते फारच आवडले. पुढे त्याने ‘आत्मरति’ (नार्सिसिझम), प्रतीके व बालवयीन लैंगिकतेच्या सिद्धांताची लोककथांमधील समांतरता दाखवून देणारे लेख लिहिले. १९१२ मध्ये त्याने व्हिएन्ना विद्यापीठाची डॉक्टरेट संपादन केली. त्याचे पहिले पुस्तक द मिथ ऑफ द बर्थ ऑफ अ हीरो (इं. भा. १९५२) १९०९ साली प्रसिद्ध झाले. त्यात फ्रॉइडने ‘फॅमिली रोमान्स’ नावाचे एक प्रकरण लिहिले होते. हे पुस्तक रांकचे प्रायोजित मनोविश्लेषणात सर्वांत मोठे योगदान मानले जाते. १९१२ साली त्याचे द इन्सेस्ट-मोटिव्ह इन पोएट्री अँड सागा (इं. शी.) हे पुस्तक प्रसिद्ध झाले. त्याच वर्षी त्याने हान्स झाक्सबरोबर इमॅगो नावाचे प्रतिष्ठित नियतकालिक सुरू केले. १९१३ मध्ये त्याने अर्नेस्ट जोन्सबरोबर इंटरनॅशनल जर्नल फॉर सायकोअनॅलिसिस (इं. शी.) नावाचे नियतकालिक सुरू केले. १९२१ ते १९२४ तो या नियतकालिकाचा संपादक होता. १९१३ मध्ये त्याने झाक्ससमवेत सिग्निफिकन्स ऑफ सायकोअनॅलिसिस फॉर मेंटल सायन्सेस (इ. भा. १९१६) हे पुस्तक लिहिले. १९१४ मध्ये त्याचे Doppelgunger हे पुस्तक बाहेर पडले. त्याची बहुतांश पुस्तके मूळ जर्मन भाषेत लिहिलेली होती पण त्यांतील बहुतेकांचे ताबडतोब इंग्रजीमध्ये अनुवाद झाले. त्याच साली तो ऑस्ट्रियन लष्कराच्या सेवेत दाखल झाला व तेथे त्याने काही वर्षे काढली. त्याच सुमारास त्याने स्वतःच्या संचालकत्वाखाली मनोविश्लेषणात्मक ग्रंथांची आंतरराष्ट्रीय प्रकाशनसंस्था काढली व डाइ डॉन जुऑन-गेस्टाल्ट (१९२४) नावाचे पुस्तक लिहिले. त्यात त्याने लोककथांमधील डॉन वॉनच्या व्यक्तिरेखेतील ‘दोषगंड’ व ‘शिक्षागंडा’ चे महत्त्व दाखवून दिले. १९२४ मध्ये त्याने द ट्राउमा ऑफ बर्थ (इं. भा. १९५२) हे पुस्तक लिहिले. त्यात त्याने जन्मामुळे बालक आईपासून वेगळे होते व त्याचा बालकाला मोठा मानसिक धक्का बसतो. म्हणून त्याच्यमध्ये वेगळेपणाची चिंता निर्माण होते. ह्या चिंतेला त्याने ‘प्राथमिक चिंता’ असे नाव दिले व या प्राथमिक चिंतेच्या पोटी पुढच्या आयुष्यात जडणाऱ्या मानसिक विकृतींचे मूळ आहे असे मत मांडले. सुरुवातीला फ्रॉइडने त्याची स्वतंत्र मतासाठी प्रशंसा केली पण पुढे जेव्हा रांकने फ्रॉइडचा ‘लिबिडो’ व बालवयीन लैंगिकतेचा सिद्धांत सोडून देऊन आपलाच सिद्धांत मानसिक विकृतींची खरी कारणमीमांसा करतो म्हणून प्रतिपादन करण्यास सुरुवात केली, तेव्हा फ्रॉइडला ते सहन न होऊन त्याने त्याला आपल्या निकटवर्ती गटातून काढून टाकले. १९२४ मध्ये त्याने एस्. फेरेंत्सी समवेत द डिव्हलपमेंट ऑफ सायकोअनॅलिसिस (इं. भा. १९२५) हे पुस्तक लिहिले व त्यात स्वतःचा निराळा संप्रदाय दाखविला.
रांकने स्वतःची वेगळी मानसोपचारपद्धती सुरू केली. त्यात त्याने मानसोपचाराचे ध्येय हे रुग्णाला जन्माचा हक्क व त्यामुळे निर्माण होणाऱ्या प्राथमिक चिंतेची जाणा करून देऊन त्यामुळे उत्पन्न होणाऱ्या ‘दोषगंड’ व शिक्षागंडा’ चे निर्मूलन करण्याचे आहे असे प्रतिपादन केले. फ्रॉइडने व्यक्तीच्या जीवनात पित्याच्या महत्त्वावर सर्व भर दिला होता तर रांकने मातेच्या महत्त्वावर सर्व भर दिला. रुग्णाला मानसोपचाराने जन्माच्या धक्क्याचे पुनरानुभव घडवून त्याला त्यातून मुक्त करण्यासाठी मानसोपचार ऱ्हस्व करण्याचे तंत्र आरंभिले. सुरुवातीसच रुग्णाबरोबर चर्चा करून मानसोपचाराच्या बैठकी किती दिवस चालू ठेवावयाच्या ते नक्की करून वेळेचे बंधन घालण्यात येई. फ्रॉइडच्या मानसोपचारपद्धतीला वेळेचे बंधन नसे व केव्हा केव्हा हा मानसोपचार वर्षानुवर्षे चालू राही. त्याचप्रमाणे फ्रॉइडच्या पद्धतीत रुग्णाला रोगमुक्त करण्यासाठी मानसोपचारकाने अर्थघटनाशिवाय काही सक्रिय प्रयास करण्याची गरज नव्हती. रांकच्या मानसोपचारतंत्रास ‘सक्रिय मानसोपचार’ म्हटले जाते. त्यात मानसोपचारकाच्या प्रयत्नावर भर होता. हे मानसोपचाराचे सक्रियकरण व ऱ्हस्वीकरण फ्रॉइडला पटले नाही व रांक फ्रॉइडच्या वर्तुळामधून बाहेर पडला. १९२६ ते १९३५ रांक पॅरिसमध्ये राहिला व नंतर त्याने शेवटची वर्षे अमेरिकेत घालविली पण तेथे त्याचा फार प्रभाव पडला नाही. त्याचे न्यूयॉर्क येथे निधन झाले.
ऑटो रांकची अन्य पुस्तके अशी : विल थेरपी (३ भागांत, १९२९–३१, इं. भा. १९४५), सायकॉलॉजी ऑफ द सोल (१९३०, इं. भा. १९५०), मॉडर्न एज्युकेशन (१९३२), बियाँड सायकॉलॉजी (१९४१, इं. भा. १९५८).
पहा : मनोविश्लेषण.
संदर्भ : 1. Karpf, F. B. The Psychology and Psychotherapy of Otto Rank, New York, 1953.
2. Progoff, Ira, The Death and Rebirth of Psychology, New York, 1956.
3. Taft, J. J. Otto Rank : A Biographical Study, New York, 1958.
भोपटकर, चिं. त्र्यं.