रॅनन्क्युलेसी : (मोरवेल कुल). फुलझाडांपैकी [⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] द्विदलिकित (बियांत दोन दलिका−दले−असणाऱ्या) वनस्पतींचे एक मोठे व प्रारंभिक कुल. याचा समावेश मोरवेल गणात अथवा ⇨रॅनेलीझमध्ये करतात. ए. एंग्लर, ए. बी. रेंडेल व इतर श्सत्रज्ञांच्या मते हे कुल तितके प्रारंभिक नाही. जे. हचिन्सन व वेटश्टाइन यांच्या मते ते प्रारंभिक असून त्याच्यापासून काही प्रारंभिक एकदलिकित (बियांत एकत दलिका−दल−असणाऱ्या) वनस्पतींची कुले उगम पावली असावीत. या कुलात जे. सी. विलिस यांच्या मते एकूण ४० प्रजाती व ७०० जाती (जी. एच्. एम्. लॉरेन्स : ३५ प्रजाती व १,५०० जाती रेंडेल : ३० प्रजाती व १,२०० जाती) आहेत.
बहुतेक वनस्पती अनेक वर्षे जगणाऱ्या ⇨ओषधी (नरम व लहान, क्वचित काष्ठयुक्त) असून पाने साधी, क्वचित संयुक्त (अनेक सुटी दले असलेली), एकआड एक, खंडित (अंशतः किंवा पूर्णतः विभागलेली) व तळाशी खोडाला वेढणारी असतात. फुले द्विलिंगी व पुष्पदले सर्पिल (एकाआड एक), अर्धसर्पिल, क्वचित मंडलित (पुष्पदलांची वर्तुळ असलेली), नियमित, कधी एकसमात्र (एका उभ्या पातळीने दोन सारखे भाग होणारी) व अवकिंज (इतर पुष्पदले स्त्रीकेसराच्या खालच्या पातळीवर असलेली) असतात. फुलात परिदलांची एक किंवा दोन मंडले (संवर्त व पुष्पमुकुट) क्वचित भिन्न व स्पष्ट असतात केसरदले (पुं-केसर) सुटी, बहुधा अनेक, सर्पिल आणि क्वचित थोडी असतात. काही जातींत परिदले व केसरदले यांमध्ये मधुप्रपिंड (मध स्त्रवणाऱ्या ग्रंथी) आढळतात. किंजदले (स्त्रीकेसर) एक ते अनेक, बहुधा सुटी किंवा कधी जुळलेली असून बीजके (अपक्व बीजे) एक किंवा अनेक असतात [⟶ फूल]. घोसफळात (अनेक स्वतंत्र फळांच्या झुबक्यात) अनेक पेटिका (पेटीसारखी) फळे, कृत्स्न (शुष्क, एकबीजी व न तडकणारी) फळे किंवा मृदुफळे [⟶ फळ] असून बियांत पुप्क (गर्भाबाहेरचा अन्नांश) असतो. यातील ⇨मोरवेल, अतिविष, बाळकडू, काळे जिरे, दुधिया बचनाग, उदसलाप (हिमालयी पेओनी), डेल्फिनियम नार्वेलिया इ. वनस्पती उपयुक्त आहेत.
पहा : रॅनेलीझ.
संदर्भ : 1. Mitra, J. N. An Introduction to Systematic Botany and Ecology, Calcutta, 1964.
2. Mukherji, H. Ganguli, A. K. Plant Groups, Calcutta, 1964.
3. Rendle, A. B. The Classification of Flowering Plants, Vol. 2. Cambridge, 1963.
परांडेकर, शं. आ.