रशियन सोव्हिएट फेडरेटेड सोशालिस्ट रिपब्लिक :रशियातील पंधरा प्रजासत्ताकांपैकी क्षेत्रफळाने व लोकसंखेने सर्वांत मोठे आणि आर्थिक दृष्ट्या सर्वांत विकसित प्रजासत्ताक. लोकसंख्या १४,३०,९०,००० असून ती देशाच्या सु. ५१·५१% आहे (१९८५). क्षेत्रफळ १,७०,७५,४०० चौ. किमी. असून ते देशाच्या ७६·२% आहे. पश्चिमेस फिनलंडचे आखात व काळ्या समुद्रापासून पूर्वेस पॅसिफिक महासागरापर्यंत याचा विस्तार आहे. या प्रजासत्ताकाचे क्षेत्रफळ चीन किंवा अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या जवळपास दुप्पट आहे. प्रजासत्ताकाची पूर्व-पश्चिम कमाल लांबी ८,०५० किमी. व दक्षिणोत्तर रूंदी ४,०२५ किमी. आहे. या प्रजासत्ताकाच्या उत्तरेस आर्क्टिक महासागर, पूर्वेस पॅसिफिक महासागर, दक्षिणेस उत्तर कोरिया, चीन, मंगोलिया, कझाकस्तान प्रजासत्ताक, कॅस्पियन समुद्र, आझरबैजान व जॉर्जिया प्रजासत्ताके नैऋत्येस काळा समुद्र, ॲझॉव्ह समुद्र पश्चिमेस युक्रेन, बेलोरशिया, लॅटव्हिया, एस्टोनिया ही प्रजासत्ताके, बाल्टिक समुद्र आणि फिनलंड व नॉर्वे हे देश आहेत. राज्यकारभाराच्या सोयीसाठी प्रजासत्ताकाची विभागणी ४९ प्रांतांत, ६ प्रादेशिक विभागांत, १६ स्वायत्त प्रजासत्ताकांत व १० राष्ट्रीय जिल्ह्यांमध्ये केलेली आहे. मॉस्को ही प्रजासत्ताकाची तसेच देशाची राजधानी आहे.

भूवर्णन :या प्रजासत्ताकाचा बहुतांश भाग मैदानी स्वरूपाचा आहे. उच्चभूमीच्या प्रदेशाने फारच कमी क्षेत्र व्यापलेले आहे. अगदी वायव्य भागातील कोला द्वीपकल्पावरील खिबीनी पर्वत, यूरोपीय रशिया व सायबीरिया यांना विभागणारा उरल पर्वत, दक्षिण-मध्य सायबीरियातील कुझनेट्‌स्क खोरे, पूर्व सायबीरियातील बैकल, स्टॅनोव्हॉय, सीखटे अल्यीन, व्हर्कोयान्स्क व अनादीर श्रेण्या हे प्रमुख पर्वतीय प्रदेश आहेत. मैदानी प्रदेश व पर्वतीय प्रदेश असे या प्रजासत्ताकाचे प्रमुख दोन विभाग पडत असले, तरी भूरचना व इतर नैसर्गिक घटकांना अनुसरून पुढीलप्रमाणे एकूण नऊ प्राकृतिक विभाग पाडता येतात : (१) कोला-कारेलियन विभाग, (२) रशियन मैदान, (३) काकेशस, (४) उरल व नॉव्हायाझीमल्या, (५) पश्चिम सायबीरियन मैदान, (६) मध्य सायबीरिया, (७) बैकल प्रदेश, (८) ईशान्य सायबीरिया (९)अतिपूर्वेकडील प्रदेश.

कारेलियन या पठारी भागात कटक, टेकाडे व अनेक सरोवरे पहावयास मिळतात. प्राचीन हिमक्षेत्राचे बरेच अवशेष येथे दिसतात. कोला द्विपकल्प हा पठारी व टेकड्यांचा प्रदेश असून तो खनिजसंपत्तीसाठी महत्त्वाचा आहे. जगप्रसिद्ध रशियन मैदानी प्रदेश पश्चिम सरहद्दीपासून पूर्वेस उरल पर्वतापर्यंत व उत्तरेस आर्क्टिक महासागरापासून दक्षिणेस कॉकेशस पर्वत व कॅस्पियन समुद्रापर्यंत पसरलेला आहे. व्होल्गा, नीपर, डॉन, पश्चिम द्वीना ह्या या विभागातील प्रमुख नद्या आहेत. या विभागाचा बराचसा भाग तैगा, मिश्र व रूंदपर्णी अरण्यांनी व्यापलेला आहे. ग्रेट कॉकेशसच्या बॉलशॉय कावकाझ) उत्तरेकडील भागाचा समावेश या प्रजासत्ताकात होतो. उरल व नॉव्हायाझीमल्या या प्राकृतिक विभागांमुळे आशिया खंड यूरोप खंडापासून वेगळे केले गेले आहे. आर्क्टिक महासागरातील नॉव्हायाझीमल्या ही बेटे म्हणजे उरल पर्वताचाच विस्तारित भाग आहे. पश्चिमेस उरल पर्वतापासून पूर्वेस येनिसे नदीपर्यंतचा प्रदेश पश्चिम सायबीरियन मैदान म्हणून ओळखला जातो. या विभागात ओब व येनिसे या दोन मुख्य नदीप्रणाल्या आणि चनी, उर्बिंका व कुलुंडा ही प्रमुख सरोवरे आहेत. या प्रदेशाच्या उत्तर भागातील पूर नदीखोऱ्यात उरेनगॉय येथे नैसर्गिक वायूचे विस्तृत साठे सापडले आहेत. हा जगातील सर्वांत मोठा साठा समजला जातो. मध्य-पश्चिम सायबीरियन मैदानी प्रदेशातही खनिज तेल, नैसर्गिक वायू, लोहखनिज व कोळशाचे मोठे साठे आहेत. या प्रदेशाचा दक्षिण भाग हा देशातील धान्याचे कोठार म्हणून ओळखला जातो. पश्चिमेस येनिसे नदीपासून पूर्वेस ईशान्य सायबीरियन पर्वतीय प्रदेशापर्यंतच्या मध्य सायबीरिया या प्राकृतिक विभागात वेगवान व द्रुतवाहयुक्त भरपूर असून नद्या असून त्या वीजनिर्मितीसाठी विशेष उपयुक्त आहेत. बैकल हे जगातील सर्वांत खोल सरोवर याच विभागात आहे. दक्षिण भागात अल्ताई, सलेर, कुझनेट्‌स्क अल्ताऊ, सायान व स्टॅनोव्हॉय या पर्वतरांगा आहेत. अल्ताई पर्वतातील बेलुखा (४,६२० मी.)हे या प्रजासत्ताकाच्या आशियाई भागातील सर्वोच्च शिखर आहे. अल्ताई श्रेणीतच ३,५०० पेक्षा अधिक सरोवरे आढळतात. बैकल या प्राकृतिक विभागात बैकल सरोवराच्या पश्चिमेकडील सिसबैकलिया व पूर्वेकडील ट्रान्सबैकलिया प्रदेशांचा समावेश होतो. पश्चिमेस लीना नदी व पूर्वेस कोलीमा पर्वत यांदरम्यान ईशान्य सायबीरिया हा पर्वतीय पठारी स्वरूपाचा प्राकृतिक विभाग येतो. व्हर्कोयान्स्क, चेर्स्की, सरीचेव्ह आणि सुंटार-खायटा ह्या येथील ३,००० मी. पेक्षा अधिक उंचीच्या व महत्त्वाच्या पर्वतश्रेण्या आहेत. अतिपूर्वेकडील प्रदेश या प्राकृतिक विभागाचा विस्तार उत्तरेस चुकची द्विपकल्पापासून दक्षिणेस व्हॅल्‌डिव्हस्टॉकपर्यंत आहे. यातच कॅमचॅटका द्वीपकल्प आणि कमांडर, कूरील व सॅकालीन बेटांचा समावेश होतो. हा मध्यम उंचीचा प्रदेश असून त्यात जूग्‌जूर, स्टॅनोव्हॉय, बुर्यात, सीखटे अल्यीन, कोर्याक, श्रेदीनी व व्हस्टॉचन्यी या प्रमुख पर्वतश्रेण्यांचा समावेश होतो. या प्राकृतिक विभागात नेहमीच भूकंपाचे तीव्र धक्के बसत असून तेथे अनेक जागृत ज्वालामुखीही आहेत. कॅमचॅटका द्वीपकल्प व कूरील बेटांवर २५० पेक्षा अधिक ज्वालामुखी असून त्यांपैकी ६७ जागृत ज्वालामुखी आहेत. सॅकालीन बेटांवर लोह, कथिल, सोने, कोळसा, खनिज तेल, अँटिमनी, मॉलिब्डेनम, तर कॅमचॅटका द्वीपकल्प व कूरील बेटांवर कोळसा, खनिज तेल, सोने, तांबे, गंधक इत्यादींचे साठे आहेत.

जगातील मोठ्या नद्यांमध्ये गणना होत असणाऱ्या काही नद्या या प्रजासत्ताकापासून वाहतात. ओब-इर्तिश नदीप्रणाली (५,४१० किमी.), लीना (४,२६५ किमी.), येनिसे (४,०९२ किमी.) आणि अमूर (२,८२४ किमी.) ह्या त्यांपैकी सर्वांत मोठ्या नद्या आहेत. दहा किमी. पेक्षा अधिक लांबीच्या सु. एक लाख नद्या या प्रजासत्ताकात आहेत. येथील उत्तर द्वीना, पेचोरा, ओब, येनिसे, लीना, इंडिगिर्का आणि कोलीमा नद्या आर्क्टिक महासागराला अमूर, अनादीर व कॅमचॅटका द्वीपकल्पावरील नद्या पॅसिफिक महासागराला नीव्हा, डॉन, नीपर व कूवान्य या नद्या बाल्टिक व काळ्या समुद्रमार्गे अटलांटिकला आणि व्होल्गा व उरल नद्या कॅस्पियन समुद्राला जाऊन मिळतात. प्रजासत्ताकातील सरोवरांची संख्या दोन लाखांपेक्षा अधिक आहे. व्होल्गा नदीवरील रिबिन्स्क, गॉर्की, क्वीबिशेव्ह आणि व्होल्गोग्राड कामानदीवरील कामा डॉन नदीवरील त्सीमल्यान्स्क आणि ओव नदीवरील ओव हे विस्तृत असे कृत्रिम जलाशय  आहेत.

प्रजासत्ताकाच्या वेगवेगळ्या भागांतील हवामान वेगवेगळे असले, तरी सामान्यपणे कोरडे व खंडांतर्गत स्वरूपाचे आढळते. आर्क्टिक महासागर व आर्क्टिक वृत्त यांदरम्यानचा प्रदेश प्रामुख्याने टंड्रा प्रदेशात मोडतो. टंड्राच्या दक्षिणेस, यूरोपीय विभागात लेनिनग्राडपर्यंत व आशियाई विभागात ट्रान्स-सायबीरियन लोहमार्गापर्यंतचा प्रदेश घनदाट अरण्यांनी व्यापलेला आहे. या प्रदेशाच्या दक्षिणेस वृक्षयुक्त तसेच वृक्षरहित काळी मृदायुक्त स्टेप प्रदेश येतात. प्रजासत्ताकाचे सु. दोन-तृतीयांश क्षेत्र अरण्यांखाली आहे.

इतिहास : १९१७ मध्ये झारशाहीच्या अस्तानंतर सोव्हिएट राज्याची स्थापना होऊन संपूर्ण राज्याचे अधिकृत नाव रशियन सोव्हिएट फेडरेटेड सोशालिस्ट रिपब्लिक (आर्. एस्. एफ्. एस्. आर्.) असे ठेवण्यात आले. त्यानंतर या प्रजासत्ताकाच्या क्षेत्रफळात वारंवार बदल होत गेले. १९२३ मध्ये त्याचे क्षेत्रफळ सु. २,०५,७९,८८० चौ. किमी. म्हणजे देशाच्या क्षेत्रफळाच्या ९४·६% होते परंतु १९२४ मधील उझबेक व तुर्कमेन प्रजासत्ताकांची निर्मिती, १९२९ मधील ताजिकिस्तान व १९३६ मधील कझाकस्तान आणि किरगीझिया या स्वतंत्र प्रजासत्ताकांच्या निर्मितीमुळे आर्. एस. एफ्, एस्. आर्. या मूळ प्रजासत्ताकाचे क्षेत्रफळ कमीकमी होत गेले. दुसऱ्या महायुद्धाच्या सुरूवातीस त्याचे क्षेत्रफळ सु. १,६५,१०,४७० चौ. किमी. (देशाच्या ७७·३%) होते. त्यापैकी २४% क्षेत्रफळ यूरोपीय विभागात व बाकीचे आशियाई विभागात होते. १९४० मध्ये कारेलो-फिनिश सोव्हिएट सोशालिस्ट रिपब्लिकची निर्मिती झाल्याने प्रजात्ताकाचे तेवढे क्षेत्र कमी झाले. ‘तानू-तूव्हा पीपल्स रिपब्लिक’ चा (पूर्वीचा चीनचा भाग) १९४४ मध्ये आर्. एस्. एफ्. आर्. मध्ये समावेश झाला. १९४५ मध्ये पूर्व प्रशियाचा उत्तर भाग, दक्षिण सॅकालीन व कूरील बेटांचा या प्रजासत्ताकात समावेश करण्यात आला. १९४६ मध्ये काराचे स्वायत्त विभाग व चिचेन-इंगूश ए. एस्. एस्. आर्. यांचा जॉर्जियामध्ये, तर शेवटी १९५४ मध्ये क्रिमियाचा युक्रेनमध्ये समावेश झाला. त्यावेळी या प्रजासत्ताकाचे क्षेत्रफळ १,६८,९५,९२७ चौ. किमी. (देशाच्या ७६%) होते. १९५३ मध्ये मगडान या नवीन प्रांताची निर्मिती झाली, तर यूरोपीय रशियात अर्झमास, बॉलशॉव्ह, ब्येलगराट, ल्यीप्यिट्‌स्क व काम्यिन्स्क या नवीन पाच प्रांतांची निर्मिती झाल्याने प्रजासत्ताकाच्या सरहद्दी बदलल्या गेल्या. १६ जुलै १९५६ रोजी कारेलो-फिनिश एस्. एस्. आर्. ची कारेलियन ए. एस्. एस्. आर्. या नावाने या प्रजासत्तांतर्गत पुनर्स्थापना करण्यात आली. अशा प्रकारे वेळोवेळी झालेल्या बदलांमुळे प्रजासत्ताकाच्या क्षेत्रफळात व सरहद्दींमध्येही वारंवार बदल होत गेले.

आर्. एस्. एफ्. एस्. आर्. च्या अंतर्गत बश्किर, बुर्यात, चिचेनइंगूश चूव्हाश, डागेस्तान, कबार्डीयन-बाल्कार, कॅल्मिक, कारेलिया, कोमी, मारी, मॉर्ड्‌व्हिनीयन, नॉर्थ ऑसीशन, तातार, तूव्हा, उदमुर्त, याकूत अशी १६ स्वायत्त प्रजासत्ताके व आडगे, गॉर्नो-अल्ताई, ज्यूइश, कार्चायेव्ह-चिर्केस, खाकास असे ५ स्वायत्त विभाग तसेच १० राष्ट्रीय प्रदेश, ६ प्रदेश (क्राई) आणि ४९ विभाग होते (१९८५).

आर्थिक स्थिती :कृषी व उद्योग अशा दोन्ही दृष्टींनी हे देशातील विकसित प्रजासत्ताक आहे. या विकासात येथील नैसर्गिक साधनसंपत्तीचा महत्त्वपूर्ण वाटा दिसतो. येथील सु. १४% क्षेत्र शेतीखाली आहे. देशातील एकूण पिकांखालील क्षेत्राच्या ६०% क्षेत्र या प्रजासत्ताकात असून त्यांपैकी ६०% क्षेत्र धान्यपिकांखाली आहे. देशातील एकूण कृषिउत्पादनांपैकी जवळजवळ निम्मे उत्पादन येथून होते. गहू उत्पादनात युक्रेन व कझाकस्तान प्रजासत्ताकांखालोखाल या प्रजासत्ताकाचा क्रमांक लागतो. देशातील फ्लॅक्स, बटाटे व राय यांचे सर्वाधिक उत्पादन येथूनच घेतले जाते. त्यांशिवाय ताग, साखरबीट, भाजीपाला, सूर्यफूल, सातू, ओट ही महत्त्वाची पिके आहेत. व्होल्गा प्रदेश, उरल, उत्तर कॉकेशस, मध्य व चेर्नोसेम प्रदेश आणि पश्चिम सायबीरिया हे प्रमुख कृषी प्रदेश आहेत. बहुतेक सर्व शेतीचे सामूहिकीकरण केलेले आहे. लहान शेते मोठ्या शेतांमध्ये समाविष्ट केल्याने लहान सामूहिक शेतांची संख्या कमी झालेली दिसते. १९६० च्या दरम्यान सामूहिक शेतीपेक्षा मोठ्या राज्य शेतीवर अधिक भर दिल्याने सामूहिक शेतांची संख्या सु. ६५% कमी झाली, तर मोठ्या राज्यशेतांची संख्या दुपटीने वाढली. प्रजासत्ताकात एकूण सु. १३,३०० सामूहिक शेते व सु. १०,३०० राज्य शेते होती (१९७४). ग्रामीण भागातील लहानलहान बागा वगळता येथे खाजगी शेती नाही. प्रजासत्ताकातील काही प्रमुख कृषिउत्पादने पुढीलप्रमाणे आहेत  (उत्पादन हजारो मे. टनांमध्ये) : गहू ५३,८०० राय ६,४०० मका १,४०० बारीक तृणधान्ये १,००६ तांदूळ १,४६८ कडधान्ये ३,८२३ (१९८०), साखरबीट १६,२१५ सूर्यफूल २,०३१ बटाटे ३२,१०८ इतर भाजीपाला ११,१०० द्राक्षे ८८७, इतर फळे २,६३१ हिरवा चहा ७·१ (१९८१). रशियातील बहुतेक सर्व फर उत्पादन या प्रजासत्ताकाच्या टंड्रा व उत्तरेकडील अरण्यमय प्रदेशातून मिळते. देशातील सर्वाधिक लाकूड उत्पादन याच प्रजासत्ताकातून घेतले जाते.


मासेमारी व्यवसायातही देशातील सर्व प्रजासत्ताकांमध्ये हे आघाडीवर असून मासेमारी प्रामुख्याने पॅसिफिक महासागर, कॅस्पियन समुद्र, आर्क्टिक महासागर व बाल्टिक समुद्रात केली जाते. देशाच्या जवळजवळ निम्मे पशुधन येथे आहे. प्रजासत्ताकात १९८४ मध्ये पुढीलप्रमाणे पशुधन होते (संख्या लाखांमध्ये) : गुरे ५९५ डुकरे ३९१ शेळ्या व मेंढ्या ६६२ कोंबड्या ५,८१० (१९८२). १९८३ मध्ये पशुधन उत्पादने पुढीलप्रमाणे झाली : मांस ८० लक्ष मे. टन, दूध ५०२ लक्ष मे. टन, लोकर २,१९,००० मे. टन. व अंडी ४,३४० कोटी. या प्रजासत्ताकाच्या आर्क्टिक विभागात जगात सर्वाधिक रेनडिअर पाळले जातात.

खनिज संपत्तीचे विस्तृत साठे येथे आहेत. देशाच्या ९०% कोळशाचे साठे व ५० टक्क्यांपेक्षा अधिक लोहखनिज व खनिज तेलाचे साठे या प्रजासत्ताकात आहेत. तेथे कोळशाचा अंदाजे साठा ६,००,००० कोटी टन असावा. अमेरिकेतील ॲपालॅचिअन कोळसा क्षेत्राखालोखाल जगातील दुसऱ्या क्रमांकाचे कुझनेट्‌स्क कोळसा क्षेत्र या प्रजासत्ताकात येते. याशिवाय यूरोपियन आर्क्टिक प्रदेश, मॉस्कोच्या दक्षिणेकडील प्रदेश, उरल व पूर्व सायबीरियातील ट्रान्स-सायबीरियन लोहमार्ग प्रदेशांत कोळशाचे मोठे साठे आहेत. मॉस्केच्या दक्षिणेस आणि उरल भागात लोहखनिजाचे विस्तृत साठे आहेत. उरल-व्होल्गा विभाग, उत्तर कॉकेशस व पश्चिम-सायाबीरियात खनिज तेलाचे भरपूर साठे आहेत. जगात इराणच्या आखाताखालोखाल येथील खनिज तेल व नैसर्गिक वायूचे साठे आहेत. खनिज तेल व नैसर्गिक वायूची वाहतूक प्रामुख्याने नळमार्गाने केली जाते. उरलमध्ये तर सर्वच प्रकारची खनिजे मिळतात. ॲस्बेस्टस, बॉक्साइट, क्रोमियम, तांबे, सोने, निकेल, ॲल्युमिनियम. प्लॅटिनम, मॉलिब्डेनम, फॉस्फेट, पोटॅश, गंधक, जस्त, शिसे यांचेही भरपूर साठे आहेत. कोला द्वीपकल्प फॉस्फेट उत्पादनासाठी, तर पूर्व सायबीरिया सोन्याच्या खाणींसाठी प्रसिद्ध आहे. जगातील विस्तृत पीटक्षेत्र लेनिनग्राड-मॉस्को यांदरम्यान आहे. युरेनियमचे साठे लेनिनग्राडच्या उत्तर भागात, उरलमध्ये व पूर्व सायबीरियात आहेत. प्रजासत्ताकातील प्रमुख खनिज उत्पादने पुढीलप्रमाणे हेत (आकडे लक्ष टनांत) : कोळसा ३,८१०·५९ (१९७५) अशोधित खनिज तेल ५,६४० नैसर्गिक वायू ३,६४० घ. मी. लोहखनिज ९५७ विद्युत्‌शक्ती ८,९८० किवॉ. ता.(१९८३).

देशातील जवळजवळ दोन-तृतीयांश उद्योगधंदे याच प्रजासत्ताकात आहेत. लेनिनग्राड, मॉस्को, व्होल्गा खोरे, उरल व कुझनेट्‌स्क खोरे अशी पाच प्रमुख औद्योगिक क्षेत्रे निर्माण झालेली आढळतात. मॉस्को हा सर्वांत मोठा औद्योगिक विभाग आहे. अचूक यंत्रे, वस्त्रोद्योग व विमान बांधणी यांचे हे प्रमुख केंद्र आहे. लेनिनग्राड हे सर्वांत मोठे सागरी बंदर व जहाजबांधणी उद्योगाचे प्रमुख केंद्र सून, मॉस्कोखालोखाल दुसऱ्या क्रमांकाचे नागरी औद्योगिक केंद्र आहे. अलीकडे व्होल्गा खोऱ्याचे औद्योगिकीरण मोठ्या प्रमाणात झालेले असून, तेथे वायू, स्वयंचलित यंत्रे, ट्रॅक्टर, विमाने व जहाजनिर्मितीचे मोठे कारखाने आहेत. उरल भाग लोह व अलोह धातुकाम, नायट्रेट, अवजड यंत्रे, लोहमार्ग, ट्रॅक्टर व रणगाडानिर्मिती या उद्योगांसाठी प्रसिद्ध आहे. कुझनेट्‌स्क खोरे कोळसा उत्पादनात अग्रेसर असले, तरी तेथे उद्योगधंदे कमी आढळतात. अलिकडे नोव्हासिबिर्स्क व इर्कुत्स्क हीसुद्धा प्रमुख औद्योगिक केंद्रे बनली आहेत.

देशातील बीड व रासायनिक खत उत्पादनांपैकी जवळजवळ निम्मे उत्पादन तसेच पोलाद, यांत्रिक हत्यारे, सिमेंट, वीज यांच्या एकूण उत्पादनांपैकी निम्म्यापेक्षा अधिक उत्पादन आणि खनिज तेल उत्पादने व सुती कापडाचे ८० टक्क्यांपेक्षा अधिक उत्पादन या प्रजासत्ताकामध्ये होते. याशिवाय मोटारगाड्या, ट्रॅक्टर, कृषियंत्रे, रेल्वे एंजिने, रेल्वेचे डबे, याऱ्या, संगणक, कृत्रिम रबर, प्लॅस्टिक, लाकूड उत्पादने, पादत्राणे व औषधे ही प्रजासत्ताकातील महत्त्वाची उत्पादने आहेत. ओद्योगिक उत्पादनांत अमेरिकेखालोखाल याच प्रजासत्ताकाचा क्रमांक लागतो. रशियातील इतर प्रजासत्ताकांना येथून मोठ्या प्रमाणावर वरील उत्पादने पाठविली जातात व इतर प्रजासत्ताकांकडून कोळसा, लोखंड, खनिज तेल व खनिज तेल उत्पादने, अलोह धातू, धान्य, कापूस, रेशीम, लोकर, कातडी, मांस, लोणी व फळे यांची यात केली जाते. प्रजासत्ताकातील काही प्रमुख औद्योगिक उत्पादने पुढीलप्रमाणे आहेत: सुती कापड ६१,०१६ लक्ष चौ. मी. लोकरी कापड ३,९०८ लक्ष चौ.मी.   सिमेंट ७३,११९ हजार टन (१९७५) कागद ४७ लक्ष टन पोलादी नळ १११ लक्ष टन (१९८३) धातू कापण्याचे रीप ९३,००० (१९८१) मोटारगाड्या १२ लक्ष (१९८३) ट्रक ६,५२,००० (१९८२) ट्रॅक्टर २,५३,००० (१९८१).

या प्रजासत्ताकात वाहतुकीच्या मार्गाचा विकास झालेला आढळत नाही. लांब पल्ल्याच्या महामार्गांची संख्या कमी आहे. व्होल्गा व तिच्या उपनद्याच फक्त अंतर्गत जलवाहतुकीच्या दृष्टीने उपयुक्त आहेत. श्वेत समुद्र व बाल्टिक समुद्र यांना जोडणारा २२७ किमी. लांबीचा श्वेत समुद्र-बाल्टिक कालवा (निर्मिती १९३३), १२८ किमी. लांबीचा मॉस्को-व्होल्गा कालवा (१९३७) व १०१ किमी. लांबीचा व्होल्गाडॉन कालवा (१९५२) हे वाहतुकीच्या दृष्टीने प्रजासत्ताकातील महत्त्वाचे कालवे आहेत. आर्क्टिक व पॅसिफिक किनाऱ्यांवरील बंदरे हिवाळ्यात गोठलेली असतात. त्यामुळे सागरी वाहतूक फारच कमी प्रमाणात चालते. लोहमार्ग वाहतूक हीच सर्वांत महत्त्वाची आहे. यूरोपीय भागात लोहमार्गांचे दाट जाळे आहे. ट्रान्स-सायबीरियन व दक्षिण सायबीरियन हे सायबीरियातील प्रमुख लोहमार्ग आहेत. हवाई वाहतूक मोठ्या प्रमाणावर चालते. टंड्रा व उत्तरेकडील अरण्यमय प्रदेशात अजूनही प्राण्यांकडून ओढल्या जाणाऱ्या हिमशकट (स्लेज) गाड्या व भारवाह पशू यांचा वाहतुकीसाठी उपयोग केला जातो. खनिज तेल, खनिज तेल उत्पादने व नैसर्गिक वायू यांच्या वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात नळ टाकण्यात आलेले आहेत. प्रजासत्ताकात ८३,३११ किमी. लांबीचे लोहमार्ग १,२६,००० किमी. लांबीचे अंतर्गत जलमार्ग व ४,४८,२०० किमी. लांबीचे रस्ते आहेत. तेथून ४,४९८ वृत्तपत्रे प्रकाशित होतात. त्यांपैकी ४,१९० वृत्तपत्रे रशियन भाषेतील आहेत. रशियन भाषेतील वृत्तपत्रांचा दैनिक खप १,१७८ लक्ष व इतर भाषांतील वृत्तपत्रांचा दैनिक खप ३० लक्ष होता (१९८२).

लोक व समाजजीवन :आर्. एस्. एफ्. एस्. आर्. मधील बहुसंख्य लोक (८२·६%) रशियन आहेत. त्यांशिवाय तातार (३·६%), युक्रेनियन (२·७%), चूव्हाश (१·२%), वश्किर, मॉर्ड्‌व्हिनीयन, डागेस्तानी, बेलोरशियन, ज्यू, जर्मन, उद्‌भुर्त, चिचेन, कझाक, चेरेमिस (मारी) इ. मिळून शंभरहून अधिक जमातींचे अल्पसंख्यांक लोक आढळतात (१९७९). यांपैकी काही गटांना खूप मोठी ऐतिहासिक पार्वभूमी असलेली दिसते. ही वंशभिन्नता प्रामुख्याने येथील स्वायत्त विभाग, प्रांत, जिल्हे इत्यादींना अनुसरून आढळते. इंडो-यूरोपियन, अल्ताइक, उरलियन व कॉकेशियन असे प्रमुख भाषिक गट येथे आढळतात. नैसर्गिक पर्यावरण व ऐतिहासिक पार्श्वभूमी या घटकांना अनुसरून लोकसंख्येचे असमान वितरण झालेले दिसते. मध्य यूरोपीय भाग आर्थिक दृष्ट्या विकसित असल्याने तेथे दाट लेकवस्ती आहे. दक्षिणेस कॉकेशस पर्वतापासून उत्तरेस लेनिनग्राड-चेरिपॉव्हिट्‌स-व्होलग्डा-कीरफ यांदरम्यानच्या प्रदेशात तसेच उरल विभागात मुख्यतः स्वर्डलॉफ्स्क व चिल्याविन्स्क यांदरम्यान लोकसंख्येची घनता अधिक आहे. कुझनेट्‌स द्रोणीप्रदेशातील कोळसा क्षेत्रामुळे नोव्होसिविर्स्कच्या सभोवती तसेच येनिसे नदीकाठावरील क्रॅस्नोयार्कसभोवताली लोकसंखेत बरीच वाढ झालेली दिसते. बैकल सरोवराच्या पूर्वेस ट्रान्ससायबीरियन लोहमार्गाच्या कडेने अधिक लोकवस्तीचा पट्टा निर्माण झाला आहे. प्रजासत्ताकाच्या पूर्वेकडील भागाचा विकास वेगाने होऊ लागल्यापासून युरोपीय भागातून या भागाकडे लोकांचे स्थलांतर मोठ्या प्रमाणावर होत असलेले दिसते. त्यांशिवाय इतर प्रजासत्ताकांकडेही लोकांचे बरेच स्थलांतर होत आहे. तेथील दोन-तृतीयांशापेक्षा अधिक लोकसंख्या नागरी आहे. दर हजारी जन्मप्रमाण १६·९ व मृत्युप्रमाण ११·६ होते (१९८४).

उत्तरेकडील प्रदेश सोडला, तर या प्रजासत्ताकाचा बाकीचा भाग सांस्कृतिक दृष्ट्या प्रगत आहे. देशातील ७०% शास्त्रज्ञ, अभियंते व तंत्रज्ञ या प्रजासत्ताकात असून, मॉस्को व लेनिनग्राड परगण्यांत देशाच्या ४०% वैज्ञानिक संशोधन संस्था व ७०% औद्योगिक संशोधन संस्था आहेत. मॉस्को व लेनिनग्राड ही शहरे देशातील प्रमुख शैक्षणिक केंद्रे आहेत. या प्रजासत्ताकातील कायदा व शिक्षण पद्धतींचाच इतर प्रजासत्ताकांत अवलंब केलेला दिसतो. पुस्तके, नियतकालिके व वृत्तपत्रे यांची छपाई व प्रकाशन यांबाबतींत देशात हे प्रजासत्ताक आघाडीवर आहे. ५,१०० पेक्षा अधिक नियतकालिके प्रसिद्ध होत असून, मॉस्को व लेनिनग्राड ही त्यांची मुख्य केंद्रे आहेत. प्रजासत्ताकातील ७३,१०० माध्यमिक शाळांत २,०१,५२,००० विद्यार्थी २,५२० विशेष माध्यमिक शाळांत २५,४३,००० विद्यार्थी व ५०० उच्च शिक्षण संस्थांमध्ये ३०,७३,००० विद्यार्थी शिक्षण घेत होते (१९८१-८२). १९५७ मध्ये विज्ञान अकादमीची सायबीरियन शाखा काढण्यात आली असून तिच्यात उरलपासून पॅसिफिकपर्यंतच्या सर्व वैज्ञानिक संशोधन संस्था येतात. प्रजासत्ताकातील डॉक्टरांची संख्या ५,७९,९०० व रूग्णालयातील खाटांची संख्या १८ लक्ष होती (१९८१).

कला, संगीत, नृत्य, ललितकला, साहित्य, वास्तुशिल्प इ. क्षेत्रांमध्येही प्रजासत्ताक आघाडीवर असून मॉस्को, लेनिनग्राड येथील बॅले आणि मॉस्को येथील संगीतिका जगप्रसिद्ध आहेत. लेखक, कलाकार, शिल्पकार, वास्तुशास्त्रज्ञ यांच्या येथे स्वतंत्र अशा संघटना आहेत. या विविध क्षेत्रांतील अनेक व्यक्ती जागतिक कीर्तीच्या आहेत. येथे ६०० पेक्षा अधिक वस्तुसंग्रहालये असून त्यांपैकी काही जगप्रसिद्ध आहेत. वेगवेगळ्या खेळांना प्रोत्साहन दिले जात असून, त्यादृष्टीने आवश्यक त्या विशेष सुविधा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

महत्त्वाची स्थळे:मॉस्को (लोकसंख्या ८६,४२,०००–१९८५)व लेनिनग्राड (४८,६७,०००) ही या प्रजासत्ताकातील औद्योगिक, शैक्षणिक व सांस्कृतिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाची शहरे आहेत. लेनिनग्राडला प्रमुख सागरी बंदर म्हणूनही महत्त्व आहे. त्यांशिवाय गॉर्की (१३,९९,०००), क्विबिशेव्ह (१२,५७,०००), नोव्होसिविर्स्क (१३,९३,०००), स्वर्डलॉफ्‌स्क (१३,००,०००), चिल्याविन्स्क (१०,९६,०००), ऑम्स्क (११,०८,०००), रॉस्टॉव्ह, साराटॉव्ह, कझॅन (१०,४७,०००), प्येर्म (१०,५६,०००), व्होल्गोग्राड, व्हॉरोनेश, अर्कांगेलिस्क, ॲस्ट्राखान, इर्कुत्स्क, ओव्हानोव्हो, खबारपस्क, क्रॅस्नोयार्स्क, व्ह्‌लॅडिव्हस्टॉक, कालीनिन, केमेरोव्हो, कीरफ, कोम्‌सोमोल्स्क-ऑन-दि-अमूर, क्रॅस्नोदार, मॅग्निटोगॉर्स्क, नोव्होकुझनेट्‌स्क, मुरमान्स्क, पेंझा, तूला, उफा व यारोस्लाव्ह्‌ल ही इतर महत्त्वाची शहरे आहेत.

चौधरी, वसंत