रमी : पत्त्यांच्या खेळाचा एक लोकप्रिय प्रकार. पत्त्यांची विशिष्ट प्रकारे जुळणी करण्याच्या तत्त्वावर हा खेळ आधारलेला आहे. एकाच समान चिन्हाच्या तीन वा अधिक पत्त्यांची क्रमवार रचना म्हणजे ‘सिक्वेन्स’ (उदा., चौकट सत्ती-अठ्ठी-नश्शी किंवा बदाम राजा-राणी-गुलाम वगैरे) तसेच समान आकड्यांच्या वा चित्रांच्या तीन वा चार पत्त्यांची जुळणी (उदा., चार राण्या, तीन सत्त्या वगैरे) अशा प्रकारे पत्ते जुळवणे, हे रमी या खेळाचे मुख्य तत्त्व होय. या जुळणीतत्त्वावर आधारित असे रमीचे अनेक प्रकार रूढ आहेत. ते सामान्यतः पाच गटांत विभागले जातात : (१) रमी हा मूळ प्रकार (२) ५०० रमी : या गटात कॅनास्ता, ओक्लाहोमा इ. प्रकारांचा समावेश होतो (३) कॉन्ट्रॅक्ट रमी (४) नॉक रमी (ह्यातून ‘जीन रमी’ हो लोकप्रिय प्रकार उगम पावला) काँक्विअन (ह्यातून ‘पॅन’ हा प्रकार निर्माण झाला) हे ते पाच गट होत. यांपैकी काही खेळांत फक्त्त एकाच प्रकारची जुळणी मान्य असते. उदा., ‘कॅनास्ता’ या खेळात क्रमरचना निषिद्ध मानली जाते.

सतराव्या शतकापासून पत्त्यांच्या खेळात अशा प्रकारच्या जुळणीतत्त्वाचा अवलंब होत होता. जुळणीतत्त्वावर आधारित ⇨ मॉजाँग या प्राचीन चिनी खेळात रमीची पूर्वचिन्हे आढळतात. रमीचा आधुनिक काळातील आद्य प्रकार म्हणजे काँक्विअन. हा एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात मेक्सिकोमध्ये प्रचलित होता. पुढे तो अमेरिकेत अन्यत्र प्रसृत झाला. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला टेक्सस व द. अमेरिकेत हा खेळ ‘कूनकॅन’ या नावाने खेळला जात असे. या खेळातूनच सध्याची रमी विकसित झाली. रमीचे अनेकविध प्रकार अमेरिकेमध्ये अमाप लोकप्रिय ठरले आहेत.

रमी या खेळात कितीही खेळाडू भाग घेऊ शकतात. जास्त खेळाडू असल्यास पत्त्यांचे दोन जोड वापरले जातात. या खेळाचे निश्चित व सर्वमान्य असे नियम नाहीत. त्यामुळे त्यात अनेकदा बरेच प्रकारभेद आढळतात.

पाच खेळाडूंमध्ये पत्त्यांचे दोन जोड घेऊन डाव कसा खेळला जातो, हे येथे वानगीदाखल दिले आहे. प्रत्येकाला तेरा पत्ते वाटल्यानंतर उरलेले पत्ते सर्व खेळाडूंच्या मध्यभागी पालथे ठेवावयाचे व त्यांतील एक पान उघडे करावयाचे. या पत्त्याच्या रंगाचे किंवा विरुद्ध रंगाचे पत्ते आणि जोकरची पाने रमीत जोकर म्हणून धरली जातात आणि ती कोणत्याही पत्त्याऐवजी डाव लावताना पूरक म्हणून वापरता येतात. पत्ते वाटलेल्या खेळाडूच्या उजव्या हाताला बसलेला खेळाडू उर्वरित पत्त्यांच्या संचातला एक पत्ता घेऊन खेळास सुरुवात करतो व हातातले नको असलेले पान टाकून देतो. त्याच्या पुढच्या खेळाडूला पूर्वीच्या खेळाडूने टाकलेले पान घेता येते अन्यथा ते त्याला नको असल्यास संचातला एक पत्ता घेता येतो व नको असलेले पान टाकता येते. अशा पद्धतीने खेळ चालू राहतो व अखेरीस मान्य जुळणीतत्त्वानुसार ज्या खेळाडूची सर्व पाने लागतील त्याला ‘रमी’ मिळाली, असे मानले जाते. बाकीच्या खेळाडूंच्या न लागलेल्या पानांची जी बेरीज होईल, तितके गुण जिंकणाऱ्या खेळाडूला मिळतात. रमीचे डाव बहुधा पैसे लावून खेळतात वा निव्वळ करमणुकीखातरही खेळले जातात. हे खेळ भारतात पुष्कळच लोकप्रिय आहेत.

पहा : पत्ते व पत्त्यांचे खेळ.

संदर्भ: Morehead, A. H. Mott-Smith, Geoffrey, Culbertson’s Card Games Complete, London, 1957.

गोखले, श्री. पु.